वेंकटरायशास्त्री, वेदम् : (२१ डिसेंबर १८५३ – १८ जून १९२९). तेलुगू साहित्यिक. चेन्नई येथे जन्म. त्यांचे वडील विद्वान होते. लहानपणापासूनच त्यांनी संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले. विशाखापटनम् येथील शाळेतून १८६९ साली ते मॅट्रिक झाले. काही काळ राजमहेंद्री येथे त्यांनी शिक्षकाचे काम केले. तेथे १८७९ साली ⇨कंदुकूरि वीरेशलिंगम् पंतुलू यांनी जे विधवाविवाहविषयक भाषण केले, त्याचे वेंकटरायशास्त्रींनी सयुक्तिक खंडन करुन विरेशलिंगम् यांच्याविरुद्ध सनातनी पक्ष संघटित केला. चेन्नईच्या मुत्त्यालपेट येथील हायस्कूलमध्ये त्यांनी काही काळ मुख्याध्यापकाचे काम केले. त्यांची १८८६ साली ‘मद्रास ख्रिश्चन कॉलेज’ मध्ये संस्कृत पंडित म्हणून नेमणूक झाली. १९१० मध्ये तेथून ते निवृत्त झाले. त्यांनी काही संस्कृत ग्रंथांचे तेलुगूमध्ये अनुवाद केले. १८८६ साली त्यांनी अलंकारसारसंग्रहमु, भोजचरित्रमु, विक्रमार्कचरित्रमु, बिल्हणीयम् हे ग्रंथ अनुवाद व टीपा यांसह प्रकाशित केले. कथासरित्सागरचा तेलुगू अनुवाद (१८९१) तसेच नागानंदम् (१८९१), अभिज्ञानशाकुंतलम् (१८९६), मालविकाग्निमित्रम् (१९१९), उत्तररामचरितम् (१९२०), विक्रमोर्वशीयम् व रत्नावली (१९२१) इ. नाटकांचे अनुवाद केले. यांशिवाय मेघसंदेशमु (१९०२), पुष्पबाणविलासमु (१९०९), अमरकोशमु (१९०९), साहित्यदर्पण इ. संस्कृत ग्रंथांचे तेलुगू अनुवाद विपुल टीपांसह त्यांनी प्रकाशित केले. या सर्व ग्रंथात त्यांनी पात्रोचित भाषेचा प्रयोग करुन साहित्यनिर्मितीसाठी व्यावहारिक (बोली) भाषा वापरावी की ग्रांथिक भाषा वापरावी, या तेलुगू साहित्यातील तत्कालीन वादाला समर्पक उत्तर दिले. पात्राची सामाजिक-सांस्कृतिक स्थिती, वांशिकता इ. विचारात घेऊन ग्रांथिक किंवा व्यावहारिक भाषांचा उपयोग करावा, असे त्यांचे प्रतिपादन असे. त्यांचा हा द्वैभाषिक प्रयोग त्यांच्या मौलिक नाटकांत फारच उठावदारपणाने दिसून येतो. असे असले, तरी त्यांनी गुरजाड वेंकट अप्पाराव यांच्या व्यावहारिक भाषेच्या प्रचारास विरोध केला होता. त्यांनी प्रतापरुद्रियमु (१८९७), उषानाटकम् (१९०१) आणि बोब्बिली युद्धम् (१९१६) ही स्वतंत्र तेलुगू नाटके लिहिली. ही त्यांची नाटके त्यांतील भाषावैचित्र्यामुळे अतिशय गाजली. प्रतापरुद्रियमु हे त्यांचे सर्वोत्कृष्ट नाटक मानले जाते. उषानाटकम्मध्ये उषा-अनिरुद्ध यांची पौराणिक प्रणयकथा आली आहे, तर बोब्बिली युद्धम् हे आंध्र प्रदेशामधील इतिहासातील घटनेवर आधारित आहे.
लाळे, प्र. ग.