पंडित मदनमोहन मालवीयमालवीय, पंडित मदनमोहन : (२५ डिसेंबर १८६१ –१२ नोव्हेंबर १९४६). थोर भारतीय नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक. अलाहाबाद येथे गरीब श्रीगौड ब्राह्मण कुटुंबात जन्म. वडील व्रजनाथ आणि पितामह प्रेमधर व्यासंगी विद्वान होते. वज्रनाथ रामायणमहाभारतातल्या कथा सांगून निर्वाह करीत असल्यामुळे हुषार मदनमोहन इंग्रजी शिकविण्यासाठी-सरकारी शाळेतील फी भरण्यासाठी आईने–मोनादेवीने-आपले दागिने गहाण ठेवले. बी. ए. झाल्यावर (१८८४) स्वतःचे शिक्षण झाले त्याच सरकारी शाळेत त्यांनी इंग्रजी अतिरिक्त शिक्षकाची नोकरी धरली. मिर्झापूरचे पंडित नंदराम यांची मुलगी कुंदनदेवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला (१८७८). कॉलेजात असतानाच हिंदू समाज एकसंध करण्यासाठी त्यांनी काही सहकाऱ्यांसह एक संस्था काढली (१८८०). तिचे पहिले सार्वजनिक अधिवेशन १८८५ साली भरले. पुढील वर्षी तत्कालीन संयुक्त प्रांताच्या प्रतिनिधिमंडळात स्थान मिळून ते कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाला गेले. तेथल्या त्यांच्या भाषणाबद्दल सर ह्यूम यांनी त्यांना शाबासकी दिली आणि आयुष्याची दिशा बदलली. १८८५ पासूनच नोकरी सांभाळून ते इंडियन युनियन या छोट्या स्थानिक पत्राचे संपादन करीत असत. कलकत्त्याहून परतल्यावर राजा राजपाल सिंग यांनी हिंदुस्तान पत्राचे संपादक म्हणून मालवीयांची नियुक्ती केली. वर्षभरात हिंदुस्तानची लोकप्रियता वाढली आणि त्याचे दैनिकीत रूपांतर झाले. १८८८ साली अलाहाबादच्या काँग्रेस अधिवेशन भरले. त्याच्या स्थायी समितीचे चिटणीसपद मालवीयांना देण्यात आले. १९८९ च्या मुंबई अधिवेशनाहून परत आल्यावर मालवीयांनी हिंदुस्तान पत्राच्या संपादकत्वाचा राजीनामा देऊन वकिलीच्या अभ्यासास सुरूवात केली.

अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनात मालवीयांनी आपल्या भाषणात मुख्यतः फुटकळ व्यावसायिकांना प्राप्तिकरांपासून सूट देण्यासाठी कराची मर्यादा ५०० रूपयांवरून १,००० रूपयांवर आणावी, असे प्रतिपादन केले. पुढील वर्षी मुंबईला त्यांनी सरकारी खर्चात काटकसर करून गरीब शेतकऱ्यांवरचा करभार हलका करावा, असा आग्रह धरला. १८९० च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये कायदेमंडळाचे अर्धे बिनसरकारी सभासद तरी जनतेने निवडलेले असावेत, अशी मागणी केली. नियुक्त बिनसरकारी सभासदांना जनतेच्या हालअपेष्टांची पर्वा नसते त्यामुळेच मिठावरील कर वाढविण्यास किंवा गरीब शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या पटवारी अकरासारखे कर बसविण्यास त्यांनी संमती दिली, असे त्यांनी दाखवून दिले.

वकिलीची पदवी मिळाल्यावर १८९२ पासून त्यांनी वकिली सुरू केली. सार्वजनिक कार्यात खंड पडू न देता त्यांनी १९०९ पर्यंत वकिली केली. पुढे खिलाफत व असहकार आंदोलन बंद होण्यास कारणीभूत झालेल्या चौरीचौरा प्रकरणी एकूण २२५ जणांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली होता. त्यांचे वकीलपत्र मालवीय यांनी घेतले व त्यांतल्या १५३ लोकांचे प्राण वाचविले.

वकिलीबरोबरच ते काँग्रेसच्या कामात लक्ष घालीत. नंतर त्यांनी अलाहाबाद म्युनिसिपल बोर्डातही कार्य सुरू केले. बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. १९०२ साली ते संयुक्त प्रांताच्या कायदेमंडळावर गेले. काँग्रेसच्या मवाळ गटाबरोबर राहून त्यांनी संघर्ष टाळून बंगाल फाळणीविरोधी प्रचार व स्वदेशीचा पुरस्कार केला. १९०९ साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याच वर्षी इंपीरिअल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. तेथे प्रेस ॲक्ट, सेडीशस मिटिंग्ज ॲक्ट आणि परदेश मजूर भरती इत्यादींना त्यांनी कसून विरोध केला. होमरूल लीगला विरोध असला, तरी ॲनी बेझंट व इतर होमरूल पुढाऱ्यांना डांबून ठेवल्याबद्दल त्यांनी सरकारचा कडक शब्दांत निषेध केला. १९१८ साली इतर मवाळ नेते काँग्रेसपासून दूर गेले, तरी ते बाहेर पडले नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या खास अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर रौलट बिलाला कडाडून विरोध केला. आय्‌.सी.एस्‌ परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात, असा ठराव माँटेग्यू घोषणेनंतर लगेच केन्द्रीय कायदेमंडळात मांडून त्यांनी सरकारला अडचणीत आणले होते. नव्या सुधारणांची घडण होत असताना जिना-मालवीय आदी केंद्रीय असेंब्लीच्या १९ सदस्यांची हिंदी लोकांच्या मागण्यांचा एक सर्वसंमत मसुदा तयार करून सरकारकडे धाडला होता.

काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी काँग्रेसच्या अनेक धोरणांना जाहीररीत्या विरोध केला. असहकार आंदोलनाचे वेळी सरकारी व सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळा-कॉलेजांवर बहिष्कार टाकण्यास त्यांनी विरोध केला. खिलाफतीच्या मागणीला पाठिंबा दिला पण त्यासाठी राष्ट्रीय आंदोलन होऊ शकत नाही, हेही त्यांनी जाहीर केले. नंतर इंग्लंडच्या युवराजांच्या भेटीअगोदर सरकार व काँग्रेसमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या भेटीवर बहिष्कार टाकण्याच्या कार्यक्रमालाही त्यांचा विरोध राहिला. कायदेमडळावरील बहिष्कार त्यांना मान्य होता, म्हणून ते १९२०–२१ च्या निवडणुकीला उभे राहिले नाहीत. पुढे चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांच्याबरोबर स्वराज्य पक्ष स्थापून निवडणुकांत भाग घेण्याच्या प्रचारात ते सक्रिय राहिले तथापि सर्वत्र अडवणूक हे धोरण मान्य नसल्यामुळे त्यांनी इंडिपेंडंट काँग्रेसच्या झेंड्याखाली निवडणुक लढविली. पुढे अनेक प्रश्नांवर स्वराज्य पक्षाशी सहकार्य केले परंतु १९२६ मध्ये सभात्याग करण्यास नकार दिला. हाडाचे उदारमतवादी असल्यामुळे १९२८ च्या कलकत्ता अधिवेशनात कम्युनिस्ट समर्थक ३०,००० कामगारांनी निदर्शने करण्याची परवानगी मागितली. तेव्हा मालवीय आणि मोतीलाल नेहरू यांनी अनुमती दिली. मोतीलालजींनी त्यांना विस्तारित नेहरू समितीचे सदस्य म्हणून घेतले होते. १९३० च्या कायदेभंगाचे वेळी मात्र राजीनामा देऊन त्यांनी तुरूंगवास पतकरला. पुढील वर्षी त्यांना गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. तेथे त्यांनी सर्वसाधारणपणे म. गांधींच्या विचारांना साथ दिली. १९३३–३४ साली सत्याग्रह मागे घेऊन केंद्रीय असेंब्लीच्या निवडणुका लढविण्यात पंडित मालवीय व डॉ. अन्सारी हे प्रमुख होते तथापि जातीय निवाड्याला विरोध करण्याचे काँग्रेसने नाकारल्यामुळे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष या आघाडीतर्फे वेगळ्या निवडणुका लढवून मालवीय व त्यांचे सहा पाठीराखे निवडून आले.


मालवीय हे हिंदू जातीयवादी आहेत, अशी सतत टीका होत असे. त्यांचे घराणे कर्मठ सनातनी हिंदू होते. त्यांच्या वैयक्तिक जीवनात हे संस्कार कायम राहीले. ‘हिंदू समाज’च्या स्थापनेत व नंतरच्या अधिवेशनात ते उत्साहाने सहभागी झाले. १८९२ नंतर त्यांनी संयुक्त प्रांतात हिंदीलाही राज्यभाषा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले पण ते उर्दूद्वेष्टे नव्हते. स्वतःच्या मुलाला त्यांनी उर्दू शिकविले. हिंदू समाजातील वर्णाश्रमव्यवस्था शास्त्रसंमत असली तरी काशीच्या पंडितांचे मन वळवून सुधारणांनाही मान्यता देता येईल, असा त्यांना विश्वास होता. हिंदू समाज एकसंघ झाला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रचार केला. १९०७ मध्ये अभ्युदय पत्र सुरू केले. १९१० मध्ये मर्यादा नावाचे मासिकही काढले. १९१५ मध्ये अभ्युदय हे दैनिक झाले. त्यावर्षी हरिद्वारला अखिल भारतीय हिंदुमहासभेची स्थापना झाली. तिचे ध्येय त्या वेळी राजकारणापासून दूर राहून सामाजिक सुधारणा करणे असे होते. पुढील वर्षी मालवीयांच्या अध्यक्षतेखाली पहिले अधिवेशन भरले. नंतर १९२३ सालीसुद्धा मालवीयच अध्यक्षस्थानी होते. तेव्हासुद्धा महासभा राजकारणापासून बव्हंशी अलिप्त होती. खिलाफत आंदोलनाचे वेळी खिलाफत नेत्यांनी ‘तनजीस ’ आणि ‘ताबलींग ’ या संघटना काढून जातीय प्रचाराला उधाण आणले. मलबारमध्ये भीषण दंगली झाल्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून बचावात्मक उपाय या भूमिकेतून ‘शुद्धी ’ आणि ‘संघटन’ मोहिमा सुरू झाल्या. त्यांत इतर अनेक नेत्यांबरोबर मालवीयांनीही पुढाकार घेतला होता तथापि पुढे जातीय निवाड्याला विरोध करूनही ते काँग्रेसच्या प्रवाहापासून दूर झाले नाहीत. जिना, डॉ. अन्सारी आदी नेत्यांबरोबर त्यांनी अनेकदा सहकार्य केले. १९०९ पासून ते अलाहाबादमध्ये लीडर नावाचे इंग्रजी पत्र चालवीत असत. असहकार आंदोलनाचे काळात त्यांनी अयोध्येच्या (अवधच्या)किसानांचे प्रश्न हाती घेतले आणि त्यासाठी १९२१ पासून किसान हे पाक्षिक सुरू केले. ⇨ बनारस हिंदू विश्वविद्यालय हे पंडित मदनमोहन मालवीयांचे एक चिरंतन स्मारक ठरेल. आधुनिक पद्धतीने प्राचीन धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्याची सोय करावी, तसेच सर्व शास्त्रीय विषयांची अत्याधुनिक माहिती विद्यार्थांना मिळावी, यासाठी वेगळे विश्वविद्यालय काढण्याची स्वप्ने ते १९०४ पासून रंगवू लागले होते. देशी उद्योगधंद्यांचा पुरस्कार हा तर त्यांचा नित्याचा व आवडीचा विषय. या विश्वविद्यालयातून उद्योगांच्या प्रगतीचाही मार्ग काढावा, ही एक त्यांची तळमळ होती. पूर्ण आराखडा केल्यावर १९११ पासून ते वर्गणी गोळा करू लागले. एका व्यक्तीने एवढा पैसा उभा केल्याची उदाहरणे तुरळकच आढळतील. १९१५ साली बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेसंबंधी अधिकृत कायदा केंद्रीय असेंब्लीने पास केला. तोपर्यंत पंडीतजींच्या गंगाजळीत ३४ लाख रूपये जमले होते. १९१६ मध्ये विश्वविद्यालय सुरू झाले. १९१९ पासून पुढील १९ वर्षे मालवीयाजी उपकुलगुरू होते. त्यांची गंगाजळी भरतच राहिली. १९३६ पर्यंत एकूण १ कोटी ५५ लाख रूपये मिळाले. ज्ञात असलेल्या प्रत्येक शास्त्रीय शाखेचे परिपूर्ण शिक्षण देणारे विश्वविद्यालय म्हणून बनारसला मोठाच लौकिक मिळाला. जातपात आणि धर्म यांचा विचार न करता मालवीयजी प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला सर्वतोपरी साहाय्य करीत. १९३८ नंतर उपकुलगुरूपद सोडून मृत्यूपर्यंत मालवीयजींनी विश्वविद्यालयातच कुलमंत्री म्हणून काम केले.

पंडित मालवीय दीर्घायुषी होते तथापि प्रकृती अधिक निरोगी राहावी यास्तव त्यांनी प्राचीन वैद्यकात सांगितलेला कायाकल्पाचा दीर्घ प्रयोग स्वतःवर केला. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. १९४६ अखेरीस देशभर भीषण जातीय दंगली उसळत असतानाच बनारस येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी कुंदनदेवी या १९४२ सालीच निवर्तल्या होत्या.

संदर्भ : 1. Parikh, Chunilal, Eminent Indians and Indian Politics With Their Life Sketches, Portrait and Speeches, Bombay, 1892.

             2. Pattabhi –Sitaramayya, B. History of the Indian National Congress, Vols. l and ll, Delhi, 1969.

             ३. भिडे, रा. गो. पंडित मदनमोहन मालवीय चरित्र, मुंबई, १९३१.

             ४. महामालवीयजी जन्मशताब्दि समारोह ग्रंथ, बनारस, १९६१.

नगरकर, वसंत