गपी: नर (खालचा) आणि मादी (वरची)

गपी : सायप्रिनोडोंटिफॉर्मीस गणातील पीसिलायइडी या मत्स्यकुलातील मासा. याच्या अंगावरील झळकणाऱ्या रंगांच्या विविध छटांमुळे याला इंद्रधनु-मत्स्य म्हणतात. याचे शास्त्रीय नाव लेबिस्टीस रेटिक्युलेटस आहे. १८६६ मध्ये त्रिनिदाद बेटावर आर्. जे. एल्. गपी यांना याचा शोध लागल्यामुळे त्यांचेच नाव या माशाला नंतर देण्यात आले. हे मासे लहान, कणखर आणि बहुप्रसव (खूप पिल्ले होणारे) असल्यामुळे घरगुती जलजीवालयाकरिता (जलवासी प्राणी व वनस्पती यांच्या संग्रहालयासाठी) यांचा नेहमी उपयोग करतात. प्रयोगाने या माशांच्या अनेक नव्या वाणांची पैदास करण्यात आली आहे.

हे मासे मचूळ आणि गोड्या पाण्यात राहणारे असून व्हेनेझुएला, बार्बेडोस, त्रिनिदाद, उत्तर ब्राझीलचा काही भाग आणि गियाना येथे आढळतात. ते सर्वसाधारणपणे तळ्यांच्या पृष्ठभागाजवळ व नद्यांच्या संथ पाण्यात मुबलक आढळतात. हे मुख्यतः कीटकभक्षक असले, तरी विविध प्रकारचे खाद्य  त्यांना चालते. बुभुक्षित मासे पुष्कळदा आपली पिल्लेसुद्धा खातात. हे अनेकदा डासांच्या डिंभाचा (अळ्यांचा) मोठ्या प्रमाणावर खाऊन फडशा पाडतात म्हणून कधीकधी त्यांचा डासांच्या नियंत्रणाकरिता उपयोग करतात.

नराची लांबी ३ सेंमी. पेक्षा क्वचित जास्त असते लैंगिक पक्वतेनंतर त्याची फारशी वाढ होतच नाही. मादीची सारखी वाढ होत असते पण ती क्वचितच ६ सेंमी. पेक्षा जास्त लांब होते. नैसर्गिक परिस्थितीतील माद्यांचे रंग क्वचितच झगझगीत असतात पण जलजीवालयात ठेवलेल्या काही वाणांच्या माद्या चकचकीत रंगांच्या असतात. याच्या उलट नरांचे रंग बहुधा चकचकीत असतात. पक्ष (हालचाल करण्यासाठी वा तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्‍नायुमय घड्या, पर) लांब व त्यांचा रंग निळा व तांबडा असतो. गुदपक्षाचा उपयोग प्रवेशी अंग (मैथुनाकरिता उपयोगी पडणारे इंद्रिय) म्हणून होतो.

प्रियाराधनाच्या कामात मादीपेक्षा नरच जास्त पुढाकार घेतो आणि बहुधा सहचरीची निवडही तोच करतो. अंड्यांचे मादीच्या शरीरातच निषेचन (फलन) होते. गर्भावधी सु.चार आठवड्यांचा असून मादी पिल्लांना जन्म देते. जन्मानंतर सु. तीन महिन्यांनी ती प्रौढ होतात. शुक्राणू मादीच्या शरीरात कित्येक महिने राहू शकत असल्यामुळे तिला नरापासून वेगळे केल्यावरही तिची कित्येकदा वीण होते.

कर्वे, ज. नी.