मूळव्याध : गुदद्वार, गुदमार्ग व गुदांत्राचा खालचा २ ते ३ सेंमी. लांबीचा भाग [⟶ गुदद्वार व गुदांत्र] यांच्याशी संबंधित उपकलास्तराच्या (पातळ पटवमय अस्तराच्या) खाली असलेल्या नीलांच्या जाळ्यातून सुरू होणाऱ्या नीलांच्या अपस्फीतीला (विस्फारणे, गाठाळणे व पीळ पडणे) ‘मूळव्याध’ किंवा ‘अर्श’ म्हणतात. मूळव्याधीचे मुख्य दोन प्रकार आहेत : (१) बाह्य- गुदद्वाराच्या बाहेर आणि (२) अंतःस्थ-गुदद्वाराच्या वर. बाह्य प्रकारात मूळव्याधीवर त्वचेचे आच्छादन असते, तर अंतःस्थ प्रकारावर श्लेष्मकलास्तराचे (बुळबुळीत पातळ पटलाचे) आच्छादन असते. एकाच वेळी दोन्ही प्रकार आढळल्यास त्यांचा उल्लेख ‘अंतर्बाह्य’ असा करतात. अंतःस्थ मूळव्याध जेव्हा गुदमार्गाबाहेर पडते तेव्हा ‘मूळव्याध-भ्रंश’ असा उल्लेख करतात. मूळव्याधीतील रक्तवाहिनीत जेव्हा अंतर्क्लथन होते (रक्ताची गुठळी अडकते) तेव्हा तिला अंतर्क्लथित मूळव्याध म्हणतात.

संप्राप्ती : अंतःस्थ प्रकारास पुढील गोष्टी कारणीभूत असतात :

(१) आनुवंशिकता : एकाच कुटुंबातील व्यक्तींमध्ये हा रोग आढळतो. जन्मजात अशक्त नीलाभित्ती व त्या भागातील अपसामान्य रक्तपुरवठा कारणीभूत असावीत. पुष्कळ वेळा पायातील नीला अपस्फीती व मूळव्याध एकाच व्यक्तीत आढळतात.

(२) आकारवैज्ञानिक : चतुष्पाद प्राण्यात गुदांत्राच्या नीलांतील रक्त विनाअडथळा हृदयाकडे सहज परतते. गुरूत्वाकर्षण यास मदत करीत नसले, तरी अडथळा निश्चित आणीत नाही. मानवात गुदांत्राच्या नीलांतील रक्ताचे वजन त्यांच्यामध्ये झडपा नसल्यामुळे रक्तदाब वाढवण्यास (शरीरात इतरत्र कोठेही नसतो एवढा) मदत करते. पशूंमध्ये मूळव्याध फक्त काही म्हातारी लठ्ठ कुत्री वगळल्यास फारच क्वचित आढळते.

(३) शरीररचनात्मक : ऊर्ध्व गुदांत्र नीलेच्या शाखा श्लेष्मकलास्तराखाली आधार नसल्यासारखा लोंबकळत असतात. त्या स्नायूमधून जाताना मलोत्सर्जनाच्या वेळी आकुंचनाबरोबर दाबल्या जातात. याशिवाय ऊर्ध्व गुदांत्र नीला प्रवेशिका नीलेची एक पोषक शाखा असल्यामुळे तिच्यामध्ये झडपा नसतात.

(४) इतर कारणे : मलावरोध व ⇨ मलोत्सर्गाच्या वेळी करावा लागणारा जोर कारणीभूत असतात. अल्प चोथायुक्त आहार [⟶ पोषण] व बैठा व्यवसाय मूळव्याधीस कारणीभूत होतात. गर्भारपणात ऊर्ध्व गुदांत्र नीलेवर दाब पडून, तसेच ⇨ प्रगर्भरक्षी हॉर्मोनाच्या (सरळ रक्तप्रवाहात मिसळणाऱ्या उत्तेजक स्त्रावाच्या) नीला भित्तीवरील परिणामामुळे मूळव्याध उद्‌भवते. श्रोणीय अर्बुदे (धडाच्या तळाशी असणाऱ्या भागात नवीन कोशिकांच्या-पेशींच्या-अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठी) व गुदांत्र कर्करोग यांमध्येही मूळव्याध होण्याचा संभव असतो.

ही व्याधी पुरुषांपेक्षा स्त्रियांत, विशेषतः जास्त वेळा प्रसूती झालेल्या स्त्रियांत, अधिक प्रमाणात आढळते.

आ. १. अंतःस्थ मूळव्याध : (१) डावा प्रमुख मोड, (२) उजवा पश्च प्रमुख मोड, (३) उजवा अग्र प्रमुख मोड, (४) दुय्यम मोडविकृतिविज्ञान : अंतःस्थ मूळव्याधीच्या मोडाची रचना ऊर्ध्व गुदांत्र रोहिणीच्या शाखांप्रमाणे तीन गटांत होते. रुग्ण पाठीवर पडून उताणा असताना पाय पोटावर गोळा केलेल्या अवस्थेत असताना (मूत्राशयातील अश्मरीच्या-मूतखड्याच्या-भेदनाकरिता ही अंगस्थिती वापरतात म्हणूवन तिला ‘अश्मरी भेदन’ अंगस्थिती म्हणतात) गुदद्वाराकडे पाहिल्यास घड्याळातील लहान काठ्याच्या ३, ७, आणि ११ वाजतानाच्या जागी हे तीन गट दिसतात (आ. १).

ऊर्ध्व गुदांत्र रोहिणीच्या उजव्या शाखेच्या दोन उपशाखा होतात, तर डावी शाखा विभाजन न होता तशीच राहते. उजव्या दोन उपशाखा आणि डावी एक म्हणून तीन जागी मोड तयार होतात व त्यांना ‘प्रमुख मोड’ म्हणतात. त्यांच्या मध्ये कधी कधी आढळणाऱ्या लहान मोडांना ‘दुय्यम मोड’ म्हणतात (आ. १ व २).

आ.२. प्रमुख व दुय्यम मूळव्याध मोडांची रचना: (१) डावा प्रमुख मोड, (२) उजवा पश्च प्रमुख मोड, (३) उजवा अग्र प्रमुख मोड (४) दुय्यम मोड, अ- अग्र, प- पश्चप्रत्येक प्रमुख मोडाचे तीन भाग वर्णिता येतात. (१) देठ : गुदांत्रात गुदमार्ग आणि गुदांत्र यांच्या संधिरेषेच्या वरचा भाग (२) अंतःस्थ मूळव्याध : संधिरेषेखालील दंतुर रेषेपर्यंतचा (त्वचा आणि श्लेष्मकला संधिरेषेपर्यंतचा) भाग आणि (३) बाह्य आनुषंगिक मूळव्याध : दंतुर रेषेपासून गुदद्वाराच्या कडेपर्यंतचा भाग. हा भाग फक्त जुनाट मोडामध्येच आढळतो.

गुदांत्र व गुदमार्ग यांचे अशुद्ध रक्त ज्या नीलांमार्फत हृदयाकडे नेले जाते, त्यांची रचना समजणे मूळव्याधीची उत्पत्ती समजण्याकरिता आवश्यक आहे. हे रक्त दोन मार्गांनी नेले जाते : (१) प्रवेशिका नीला यंत्रणा आणि (२) दैहिक (पूर्ण शरीराशी संबंधित असलेली) नीला यंत्रणा. गुदांत्र व गुदमार्गाचा वरचा भाग यांतील रक्त ऊर्ध्व गुदांत्र नीलेमार्फत प्रवेशिका नीला यंत्रणेत जाते. गुदांत्राचा खालचा भाग आणि गुदमार्गाचा वरचा भाग यांतील रक्त मध्यस्थ गुदांत्र नीलेमार्फत अतःस्थ श्रोणी निलेतून दैहिक नीला यंत्रणेत जाते. गुदमार्गाच्या खालच्या भागातील रक्त अधःस्थ गुदांत्र नीलेतून अंतःस्थ श्रोणी नीलेत नेले जाते. अधःस्थ नीलांच्या अपस्फितीतून बाह्य मूळव्याध उत्पन्न होते.

ऊर्ध्व, मध्यस्थ व अधःस्थ नीलांचे गुदमार्गस्तंभाखाली [जी. बी. मोर्गान्ये या इटालियन शारीरविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या मोर्गान्ये स्तंभाखाली ⟶ गुदद्वार व गुदांत्र] अधःश्लेष्म्यामध्ये जे जाळे असते त्याची अपस्फीती अंतःस्थ मूळव्याधीस कारणीभूत असते.


 आ. ३. गुदांत्र व गुदमार्ग नीलांची रचना : (१) ऊर्ध्व गुदांत्र नीला (२) मध्यस्थ गुदांत्र नीला (३) अधःस्थ गुदांत्र नीला (४) अंतःस्थ गुदांत्र नीला जाल (५) बाह्य गुदांत्र नीला जाल.अंतःस्थ मूळव्याधींचे वर्गीकरण त्यांच्या दंतुर रेषेशी असणाऱ्या संबंधावरून करता येते. (१) प्रथम श्रेणी : अपस्फीत नीला जाल लहान असून रोगी मोड बाहेर येण्याची तक्रार करीत नाही. गुदमार्गदर्शन परीक्षेच्या वेळी कुंथावयास लावूनही मूळव्याध दंतुर रेषेखाली येत नाही. (२) द्वितीय श्रेणी : कुंथल्यावर मूळव्याध दंतुर रेषेखाली येते परंतु कुंथणे थांबवले म्हणजे पुन्हा रेषेच्या वर जाते. (३) तृतीय श्रेणी : मूळव्याध दंतुर रेषेखाली आल्यानंतर आपोआप परत वर जात नाही. हाताच्या बोटांच्या मदतीने वर सरकवावी लागते. (४) चतुर्थ श्रेणी : मूळव्याध दंतुर रेषेखाली कायमचीच उरलेली असते.

लक्षणे : बाह्य मूळव्याध बहुधा लक्षणविरहित असते. क्वचितच परिगुद त्वचाक्षोभ व खाज ही लक्षणे आढळतात. कधीकधी अंतर्क्लथन झाल्यानंतर वेदनांमुळे बाह्य मूळव्याध असल्याचे समजते.

अंतःस्थ मूळव्याधीचे पहिले लक्षण मलोत्सर्जनापूर्वी किंवा नंतर लालभडक वेदनारहित रक्तस्त्राव होणे हे असते. रूग्ण ‘शौचाच्या वेळी रक्त थेंब थेंब गळले’ अशा शब्दात बहुधा वर्णन करतो. मूळव्याध भ्रंश असल्यास परिगुद भाग सतत ओलसर राहतो. गुदमार्गात काहीतरी जड पदार्थ असल्याचा सतत भास होतो. सुरुवातीस भ्रंशित मूळव्याध आपोआप परत जागेवर जाते. परंतु हळूहळू चिरकारी (दीर्घकालीन) अवस्था येऊन भ्रंश कायम राहतो. वेदना हे साध्या मूळव्याधीचे लक्षण नसते परंतु शोथ (दाहयुक्त सूज) व अंतर्क्लथन तसेच गुदविदर, गुदांत्रशोथ, गुदमार्ग कर्करोग वगैरे रोग असल्यासच वेदना होतात.

सार्वदेहिक परिणामामध्ये चिरकारी रक्तस्त्रावामुळे ⇨ पांडुरोग (ॲनिमिया) उत्पन्न होतो. स्थानीय सूज, पूयीभवन, व्रणोत्पादन हे उपद्रव संभवतात. याशिवाय अंतर्क्लथन व पाशग्रस्तता (अभिसरणाला रोध होणे) हे गंभीर उपद्रव होण्याची शक्यता असते. अंतर्क्लथित मूळव्याधीत सूक्ष्मजंतु-संसर्गामुळे शोथ होतो व विद्रधी (गळू) तयार होतो. भ्रंशित मूळव्याध गुदमार्ग भित्तीतील आकुंचन स्नायूंच्या आकुंचनामुळे पाशग्रस्थ होऊन वेदना व सूज येऊन निळी पडते. या अवस्थेत रोहिणीतील रक्तपुरवठा पूर्णपणे थांबल्यास कोथ (शरीर भाग मृत होऊन सडू लागण्याची क्रिया) उत्पन्न होऊन, कधी कधी संपूर्ण मूळव्याधीचे मृतोतक (मृत कोशिकांचा समूह) बनून, ते गळून पडते आणि त्या जागी व्रण उत्पन्न होतो.

उपचार : लक्षरहित मूळव्याधीवर उपचारांची गरज नसते. सौम्य लक्षणे असल्यास मलोत्सर्जन सवयीचा नियमितपणा, आहारातील चोथा वाढवणे. जादा वेळ कुंथत न बसणे इ. उपचार उपयुक्त असतात. बाजारात निरनिराळी मूळव्याधीवरील मलमे, ती वापरण्याच्या सूचना व लावावयाच्या उपकरणासहित मिळतात. त्यांचा उपयोग वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा.

मुळव्याधीवरील उपचारांमध्ये स्थानीय अंतःक्षेपण (इंजेक्शन) व रबरी पट्टीने बांधणे या दोन निरनिराळ्या उपचारांचा बाह्यरुग्ण विभागातही उपयोग करता येतो. दोन्हीमध्ये भूल देण्याची गरज नसते.

आ. (४): गाब्रिएल पिचकारी व सुई.अंतःक्षेपणामध्ये ५% फिनॉल मिश्रित ३ ते ५ मिलि. बदामाचे तेल डब्ल्यू. बी. गाब्रिएल यांच्या खास पिचकारीने देठाच्या वर असलेल्या अधःश्लेष्म भागात टोचतात. या जागी ऊतक (कोशिकासमूह) काठीण्य उत्पन्न करण्याचा हेतू असतो. सहा आठवड्यांच्या अंतराने तीन अंतःक्षेपणे देतात. हा उपचार वेदनारहित असतो परंतु तो प्रथम श्रेणी वा द्वितीय श्रेणीची सुरुवात असलेल्या रुग्णातच गुणकारी असतो.

पाश्चात्य देशांतून अंतःक्षेपण उपचार जवळजवळ बंद झाला असून त्याऐवजी रबरी बंध उपचार अधिक लोकप्रिय झाला आहे. विशिष्ट उपकरणाने रबरी बंध देठाच्या वर आवळून बसवून रक्तपुरवठा हळूहळू बंद करतात. काही दिवसांतच ऊतकमृत्यू होऊन मूळव्याध गळून पडते. एका वेळी दोनापेक्षा जास्त मोडांवर इलाज करीत नाहीत.

शीत चिकित्सा नावाच्या उपचारामध्ये द्रव नायट्रोजन अथवा नायट्रस ऑक्साइड एका सळईत अभिसारित करून ती मूळव्याधीवर फिरवून तेथील ऊतक तीव्र शीत बनवितात. तापमान -२० से. पेक्षा खाली गेल्यावर केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या), रोहिणिका व छोट्या नीला यांचा ऊतकमृत्यू होतो आणि मूळव्याध गळून पडते. पूर्वी हा उपचार बाह्य रुग्ण विभागात करीत परंतु पुढे त्याचे वेदना आणि मृतोतकातील अतिस्त्राव हे दुष्परिणाम आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करूनच ही चिकित्सा करतात. याशिवाय या उपचारामुळे गुदमार्ग परिसंकोचीस (गुदमार्गाचे छिद्र बंद करणाऱ्या वलयासारख्या स्नायूस) इजा होऊन रुग्णास असंयत मलोत्सर्जनाचा उपद्रव होण्याची शक्यता असते.

मूळव्याध-उच्छेदन (कापून काढण्याची) शस्त्रक्रिया गुणित अंतर्क्लथित मोडावर आणि बंध उपचार न करता येणाऱ्या भ्रंशित मोडावर गंभीर लक्षणे असल्यास करतात.

भालेराव, य. त्र्यं.


आ. ५. बंध बांधलेली मूळव्याधआयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : अग्नी मंद होऊन दुष्ट झालेले दोषा त्वक, रक्त, मांस व मेद यांना बिघडवून गुदद्वाराच्या ठिकाणी मांसांकुर निर्माण करतात. यामुळे पुरीष प्रवृत्तीला अडथळा येतो व गुदाच्या ठिकाणी वेदना होतात. अपान वायूचा प्रकोप होऊन इतर वायूचा प्रकोप होतो व त्यामुळे शरीरभर अव्यवस्था होते. कधीकधी याउलट अग्निमांद्य-संग्रहणी-अतिसार यांसारखे विकार होऊन पचनक्रिया बिघडून आम साठून मल व मलाशय दुष्ट होऊन अर्शोद्‌भव होतो. अतिसार संग्रहणी व मूळव्याध हे तीन विकार एकमेकांचे कारण होऊ शकतात. म्हणजे यांपैकी एक विकार झाला, तर दुसरे दोन विकार होण्याचा संभव बराच असतो. यांमध्ये मूळव्याध हा विकार आनुवंशिकतेने होणारा आहे. त्याचे प्रकार सहा आहेत : त्रिदोषाने तीन (वात, पित्त, कफ), (४) सान्निपातिक, (५) रक्त बिघडून होणारा, (६) आनुवंशिक.

थोडक्यात अर्शाला कारण म्हणजे अग्नी व अपान वायूची दुष्टी प्रमुख असून अर्शाची चिकित्सा प्रामुख्याने अग्निदीपन या वायूचे अनुलोमन करणे, मलप्रवृत्ती सुखाने होईल असे करणे आणि आमवृद्धी न होता सम्यक मलप्रवृत्ती व्हावी म्हणून अग्निदीपन करणे अशी आहे. वाढलेले मांसांकुर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया, डाग देणे, क्षारलेपन-रक्तस्त्रुति-धूपण औषधांचा व उपनाह स्वेदनाचा उपयोग जरूरीप्रमाणे आवश्यक आहे. पैकी औषधोपचार शेकडा ८० मूळव्याधींना बरा करणारा आहे. या विचाराने मूळव्याधीवर सिद्धौषधे सांगितलेली आहेत.

सहज अर्श हे असाध्य स्वरूपाचे असतात. अर्शचिकित्सा करताना शुष्क (न वाहणारे) व स्त्रावी म्हणजे रक्तस्त्रावी अर्श, तसेच गाढ वर्चस्व व शिथिल वर्चस्त्व (मलप्रवृत्ती कठीण व सैल होणे) असे भेद लक्षात घेऊन चिकित्सा करावी. रक्तस्त्रावी अर्शात एकांत स्त्रावी वातानुबंधी अगर कफानुबंध असा विचार करावा लागतो. गाढवर्चस् असणाऱ्या अर्शात मलप्रवृत्ती सुखाने होईल असे हरितकी, निशोत्तर इ. योग वापरावेत. सर्वसामान्यपणे ताक हे अर्शावर अत्युत्तम द्रव सांगितले आहे. शुष्कार्शावर भल्लातक, सुरण, चित्रक इ. द्रव्यांचा उपयोग करावा. अभयारिष्ठ, कुटजारिष्ट, सुरणादि, चित्रकादि वटी, कुटजावलेह, करंजासव इ. सिद्धौषधे अवस्थांनुसार उपयुक्त होतात. अर्शकुठार नावाचे औषध सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर उपयोगी आहे. दररोज तीन वेळा ४/४ गुंज प्रमाणात पाण्याबरोबर घ्यावे. त्याने वातानुलोमन होईल. मूलव्याधीमध्ये मुख्यतः वातानुलोमन औषधे व आहार घ्यावयाचा असतो. त्या दृष्टीने हे औषध नावाप्रमाणे कार्य करणारे आहे. कफ विशिष्ट मूळव्याधीमध्ये मुळाचा आकार मोठा असला, तर त्यावर भल्लातकादितैल लावावे. याचा पिचू गुदद्वारात ठेवावा. तसेच भोजनाच्या मध्ये (अर्धे भोजन झाल्यावर) गरम पाण्याबरोबर सामुद्रादि चूर्ण / ते १ मासा द्यावे. जेवणातही वातानुलोमक पदार्थ असावेत. अर्शकुठार चालू ठेवावे. पित्तज व रक्तज मूळव्याधींमध्ये सर्वसाधारण औषधे सारखीच असतात. पित्ताचा क्षोभ असताना पित्तशामक व वातानुलोमक असे कामदुधा १-१ मासा पित्त व वात कालांत दुधातून अगर मोरावळ्यातून अगर तुपातून द्यावे. शौचाला साफ होण्यासाठी अभयारिष्ट जेवताना द्यावे. प्रत्येक वेळी २-२ तोळे समभाग पाणी मिसळून द्यावे. वातज अर्शामघ्ये ठणका फार असतो. रोगी फारच बेचैन असतो. त्यावर महायोगराज गुग्गुळ २-२ गुंजा बारीक करून तूपसाखरेतून अगर सहचरादि तेलातून जेवणापूर्वी चाटावे. अभयारिष्ट जेवणानंतर समभाग पाण्यातून २-२ तोळे द्यावे. वातज मूळव्याधीत सिंहनाद गुग्गुळाचाही उपयोग ठणका थांबविण्यासाठी, वातानुलोमनासाठी व मलशुद्धीसाठी चांगला होतो. सहज अर्शासाठी प्रकृती स्थापनी चिकित्सा (रसायन) करावयास पाहिजे. लघुमालिनीवसंत ताज्या लोण्याबरोबर (२ तोळे) सकाळी द्यावे व भूक लागल्यावर तूपभात, दूधभात असाच आहार द्यावा. वसंतकुसुमाकर सुद्धा याच पद्धतीने द्यावा. अनुपानासाठी दुधाची साय व साखर द्यावी.

अर्शोद्‌भव होऊ नये यासाठी मलमूत्रावरोध, मैथून, सायकलवर फार बसणे, जागरणे इ. विशर कटाक्षाने टाळावा.

जोशी, वेणीमाधवशात्री

पहा : गुदद्वार व गुदांत्र भगंदर.

संदर्भ : 1. Cutler. B. S. and others, Manual of Clinical Problems in Surgery. Tokyo, 1984.

             2. Harmer, M. Taylor, S., Ed., Rose and Carless’ Manual of Surgery, London, 1960.

             3. Rains, A. J. H, Ritchie, H. D. Ed., Baily and Love’ s Short Practice of Surgery, London, 1977.

             4. Sabiston, D. C. Textbook of Surgery, Tokyo, 1972.

             5. Schwariz, S. I. and others, Ed., Principles of Surgery. Singapore, 1984.