हॉल्डेन, जॉन बर्डन सांडर्सन : (५ नोव्हेंबर १८९२–१ डिसेंबर १९६४). ब्रिटिश आनुवंशिकीविज्ञ, जीवसांख्यिकीविज्ञ, शरीरक्रियावैज्ञानिक व विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ. जीवशास्त्रास तत्त्वज्ञानाचा आधार देऊन समष्टी आनुवंशिकी व क्रमविकास यांबाबतच्या संशोधनास नवीन दिशा देण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. 

जॉन बर्डन सांडर्सन हॉल्डेन
 

 

हॉल्डेन यांचा जन्म ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे झाला. ते प्रसिद्ध शरीरक्रियावैज्ञानिकजॉन स्कॉट हॉल्डेन यांचे सुपुत्र होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात वडिलांचे सहायक म्हणून वयाच्या आठव्या वर्षी केली. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड येथील ईटन कॉलेज व न्यू कॉलेज या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी न्यू कॉलेजमध्ये फेलो म्हणून व नंतर केंब्रिज विद्यापीठात अध्यापक म्हणून काम केले (१९२२–३२). ते कॅलिफोर्निया विद्यापीठात एक वर्ष अभ्यागत प्राध्यापक (१९३२) व लंडन विद्यापीठात प्राध्यापक (१९३३–५७) होते. 

 

हॉल्डेन यांनी १९३० मध्ये स्वतःच आपण मार्क्सवादी असल्याचे जाहीर केले. लंडन येथून कम्युनिस्ट पक्षामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या ‘डेली वर्कर’ याचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. यानंतर पक्षाच्या धोरणाबाबत त्यांचे मतभेद झाले. विशेषतः रशियन जीवशास्त्रज्ञट्रोफीम देनीसोव्ह्यिच लायसेंको यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्याने ते नाराज होते. १९५७ मध्ये ते भारतात आले व त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले. ते ओडिशा राज्यातील शासकीय आनुवंशिकी व जीवसांख्यिकी प्रयोगशाळेचे प्रमुख होते. 

 

हॉल्डेन, ⇨ सर रॉनल्ड एल्मर फिशर व स्यूअल राइट यांनी उत्परिवर्तनाचा (आनुवंशिक लक्षणांत होणारे आकस्मिक बदल याचा) दर, लोकसंख्येचा आकार, प्रजननाची संरचना व इतर घटक यांचे गणितीय पद्धतीने विश्लेषण केले तसेच त्यांनीचार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा उत्क्रांतीबाबतचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत वग्रेगोर योहान मेंडेल यांचा आनुवंशिकीतील अनुहरण सिद्धांत यांमध्ये सुसंगतता आणण्याच्या दृष्टीने संशोधन केले. हॉल्डेन यांनी एंझाइम क्रियेच्या सिद्धांतात व मानवी शरीरक्रियाविज्ञानात संशोधन करून त्यांमध्ये भर घातली. त्यांना विश्लेषण क्षमता, साहित्यिक क्षमता व विविध विषयांचे ज्ञान लाभल्यामुळे त्यांनी अनेक वैज्ञानिक क्षेत्रांत शोध लावले. त्यांच्या संशोधनकायार्र्चा प्रभाव त्या काळातील संशोधकांच्या पिढीवर पडला होता. 

 

हॉल्डेन यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये Daedalus (१९२४), ॲनिमल बायॉलॉजी (ब्रिटिश जीवशास्त्रज्ञजुलियन सॉरेल हक्सली यांच्या- सोबत १९२७), सायन्स अँड एथिक्स (१९२८), द इनइक्वॅलिटी ऑफ मॅन (१९३२), द कॉझेस् ऑफ इव्होल्यूशन (१९३३), हेरिडिटी अँड पॉलिटिक्स (१९३८), मार्कझिस्ट फिलॉसॉफी अँड द सायन्स (१९३८), न्यू पाथ इन जेनेटिक्स (१९४१), सायन्स ॲडव्हान्सेस (१९४७) व द बायोकेमिस्ट्री ऑफ जेनेटिक्स (१९५४) यांचा समावेश होतो. कृष्णा आर्. द्रोणम्र्ाजू यांनी संपादित केलेले सिलेक्टेड जेनेटिक पेपर्स ऑफ जे. बी. एस्. हॉल्डेन हे पुस्तक १९९० मध्ये प्रसिद्ध झाले. 

 

हॉल्डेन यांचे भुवनेश्वर (भारत) येथे निधन झाले. 

पाटील, चंद्रकांत प.