सारामागो, झूझ : (१६ नोव्हेंबर १९२२–१८ जून २०१०). पोर्तुगीज कादंबरीकार. जन्म पोर्तुगालमधील अझिनहागा ह्या लिस्बनच्या ईशान्येला असलेल्या एका लहानशा खेड्यात. सारामागोचे आईवडील भूमिहीन शेतमजूर होते. दारिद्र्याची झळ सारामागोला लागली होती. यंत्रज्ञ (मेकॅनिक), धातुकाम करणारा अशा किरकोळ नोकऱ्या केल्यानंतर लिस्बनमधल्या एका प्रकाशनसंस्थेत त्याला नोकरी मिळाली. त्यानंतर तो यथावकाश पत्रकारितेकडे वळला. १९६९ मध्ये तो पोर्तुगीज कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य झाला. १९७४-७५ ह्या कालावधीत लिस्बनमधील एका वार्तापत्राचा तो संपादक झाला. ‘लँड ऑफ सिन’ (१९४७, इं. शी.) ही कादंबरी लिहून त्याने कादंबरीलेखनास आरंभ केला आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कादंबरीकार म्हणून त्याला यथावकाश मान्यता प्राप्त झाली.

झूझ सारामागोसारामागोची एक अतिशय महत्त्वाची कादंबरी म्हणजे ‘मेम्वार्स ऑफ द कॉन्व्हेंट’ (१९८२, इं. शी., इं. भा. बाल्टासार अँड ब्लिमुंडा) ही होय. अठराव्या शतकातील पोर्तुगालमधल्या धर्मन्यायपीठांची पार्श्वभूमी असलेल्या या कादंबरीत अपंग झालेला एक शूर योद्घा आपल्यावर आलेल्या एका प्रसंगापासून आपल्या प्रेयसीसह पळून जाण्यासाठी एका उडणाऱ्या यंत्राचा वापर करतो, असे दाखविले आहे. हे यंत्र चालविण्यासाठी मानवी इच्छाशक्तीचे बळ वापरलेले आहे. एक रूपकात्मक काल्पनिका (फँटसी) आणि माफ्रा कॉन्व्हेंट बांधण्यासाठी पोर्तुगालचा राजा जॉन पाचवा (१७०६–५०) ह्याने हजारो कामगारांना कसे वेठीस धरले, त्याचे दुःखदायक चित्रण ह्या कादंबरीत आलटून पालटून आलेले आहे. द यिअर ऑफ द डेथ ऑफ रिकार्डो रेइस (१९८४, इं. भा. १९८७) ही सारामागोची आणखी एक विशेष उल्लेखनीय कादंबरी. ह्या कादंबरीचा निवेदक आहे, एक कवी असलेला डॉक्टर. पोर्तुगालमधील सालाझारच्या हुकूमशाहीच्या आरंभीच पोर्तुगालमध्ये तो परतलेला आहे. एकीकडे तो आपल्या प्रणयी जीवनाचे करीत असलेले कथन आणि दुसरीकडे पोर्तुगालचा इतिहास आणि संस्कृती ह्यांतून प्रकट होणाऱ्या मानवी स्वभावाची चिकित्सा करणारे दीर्घ संवाद, असे ह्या कादंबरीचे स्वरूप आहे.

अतिदीर्घ वाक्ये हे सारामागोच्या लेखनशैलीचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. त्यामुळे त्याच्या लेखनाचे परिच्छेद पानेच्या पाने व्यापतात. ब्लाइंडनेस (१९९५, इं. भा. १९९७) ह्या त्याच्या कादंबरीत त्याने विशेषनामांचा उपयोग पूर्णपणे टाळलेला आहे. त्याऐवजी आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा उल्लेख त्याने तिच्या स्वभावाच्या एखाद्या अनन्यसाधारण वैशिष्ट्याने केलेला आहे.

आपल्या कल्पनाप्रधान कादंबऱ्यांतून त्याने मानवी जीवनाच्या स्थितीबद्दल सहानुभूतीने लिहिले. त्याच्या कादंबऱ्यांतली माणसे परस्परांशी संबंध जोडण्याचे प्रयत्न करताना दिसतात. एकाच समाजातल्या व्यक्ती म्हणून आपापसांत एक बंध निर्माण करू पाहतात. आपले व्यक्तित्व जपण्याची गरज त्यांना भासते आणि त्यासाठीही ती धडपडत असतात. तसेच आर्थिक-राजकीय व्यवस्थेच्या बाहेर जीवनाचा अर्थ आणि प्रतिष्ठा शोधू पाहतात.

सारामागोच्या अनेक कादंबऱ्यांतून सूक्ष्म उपरोध प्रकट होत असला, तरी ‘द नोटबुक’ मध्ये १९७६, इं. शी.) त्याने आपल्या राजकीय धारणा स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. सप्टेंबर २००८ ते ऑगस्ट २००९ ह्या कालावधीत मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून त्याने लिहिलेले लेख ह्या पुस्तकात समाविष्ट आहेत. भोवतालच्या मानवतेला संघटित असत्यवाद्यांनी घेरलेले असून ह्या असत्यांच्या जाळ्याचा भेद आपल्या समर्थ आणि कणखर गद्यशैलीत मांडलेल्या मतांच्या आधारे करणे, हा ह्या पुस्तकातील लेखांचा हेतू आहे.

सारामागोच्या अन्य पुस्तकांत मॅन्युअल ऑफ पेंटिंग अँड कॅलिग्राफी (१९७६, इं. भा. १९९३), द स्टोन रॅफ्ट (१९८६, इं. भा. १९९४), द हिस्टरी ऑफ द सीज ऑफ लिस्बन (१९८९, इं. भा. १९९३), द गॉस्पेल ॲकॉर्डिंग टू जिझस क्राइस्ट (१९९१, इं. भा. १९९३) आणि ऑल द नेम्स (१९९७, इं. भा. १९९९) ह्यांचा समावेश होतो. द गॉस्पेल…मध्ये त्याने येशू ख्रिस्त आणि मेरी मॅग्दालीन ह्यांच्या संबंधांविषयी लिहिले आणि गदारोळ उडवून दिला. ही कादंबरी ‘यूरोपियन लिटररी प्राइझ’साठी पाठविण्यास पोर्तुगाल सरकारने नकार दिला. त्याचा निषेध म्हणून त्याने देशत्याग केला आणि तो स्पेनला गेला.

सारामागो हा निरीश्वरवादी होता. कष्टकरी, शहरीकरणामुळे एकाकी आणि दुबळी झालेली माणसे ह्यांच्याबद्दल त्याला अपार कणव होती. यूरोपियन ऐक्य, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ह्यांवर तो टीका करी.

रामॅल्ला ह्या पॅलेस्टिनी प्रदेशातील शहराला सारामागोने २००० मध्ये भेट दिली, तेव्हा इझ्राएली सैन्याने ह्या शहराची नाकेबंदी केलेली होती. त्यावेळी त्याने शहरातल्या परिस्थितीची तुलना बंधनागाराशी (कॉन्सिंट्रेशन कँप) केली होती.

२००६ मध्ये झालेल्या इझ्राएल-लेबानन युद्घाच्या प्रसंगी तारिक अली, जॉन बर्गर, नोम चॉम्स्की आदींसह सारामागोनेही ह्या युद्घाचा आणि पॅलेस्टिनींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्राचा पूर्ण विनाश करण्याच्या इझ्राएली मनोवृत्तीचा निषेध केला.

१९९८ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळविणारा हा पहिला पोर्तुगीज लेखक होय. तिआस लास पाल्मास (स्पेन) येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.