बोलीभाषा विज्ञान : (डायलेक्टॉलॉजी). ‘बोलीभाषाविज्ञान’ याचेच दुसरे नाव ‘भाषिक भूगोल’ असे आहे. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती निदान एकातरी भाषेचा उपयोग करते, म्हणजेच बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कोणत्यातरी एका भाषेशी परिचय असतोच. परंतु परिचय असणे, विनिमयसाधन म्हणून वापरता येणे, म्हणजे त्या वस्तूचे अथवा गोष्टीचे ज्ञान असणे असे नव्हे. आपण सगळे पृथ्वीवर राहतो, म्हणून पृथ्वीविषयक अगदी ढोबळ माहितीसुद्धा आपल्याला असतेच, असे नव्हे. प्रत्येक हिंदू मनुष्य कोणत्यातरी जातीचा असतो, म्हणून त्याला हिंदू धर्माची, जातिसंस्थेची, एव्हढेच काय पण स्वतःच्या जातीचीही यथार्थ माहिती असतेच, असे नव्हे. किंबहुना अतिपरिचयामुळे अशा गोष्टींबद्दल एक स्वाभाविक अज्ञान किंवा कुतूहलशून्यताच असते.

हीच गोष्ट भाषेबद्दलही म्हणता येईल. भाषा वापरणाराला भाषा म्हणजे काय हे माहीत असतेच, असे नाही. एवढेच नव्हे तर स्वतःच्या भाषेची घडण, तिचे स्वरूप व कार्य यांविषयी बहुतेक लोकांना काहीच ठाऊक नसते. तरीही आपण अमुक भाषा बोलतो, म्हणून तिच्याविषयी वाटेल ती विधाने करण्याचे धार्ष्ट्य अनेक लोक करतात. परंतु शास्त्रीय दृष्टिकोणातून पाहणाऱ्या परभाषिक अभ्यासकालासुद्धा त्यातला पोकळपणा लगेच दिसून येतो.

मानवी भाषा म्हटली, म्हणजे तिच्या अंगी काही सर्वसामान्य वैशिष्ट्ये असतातच. प्रत्येक भाषा ही विशिष्ट ध्वनींचा वापर करते. हे ध्वनी वापरण्याची प्रत्येक भाषेची एक निश्चित पद्धत असते. ध्वनींच्या लहानमोठ्या शृंखलांतून अर्थदर्शक संकेत बनवले जातात. या संकेतांना विकारयुक्त बनवून किंवा ते तसेच वापरून, एका विशिष्ट क्रमाने ते मांडून विनिमय साधणारे घटक-वाक्ये, उपवाक्ये, वाक्यखंड इ. बनवता येतात.

बहुतेक जणांच्या मते अशी ही एका नावाने ओळखली जाणारी भाषा तिच्या सर्व प्रदेशात एकरूप असते, किंवा असली पाहिजे. पण भाषेची तर जातीय, व्यावसायिक, धार्मिक, प्रादेशिक, स्थानिक अशी असंख्य रूपे एकाच वेळी दिसून येतात. एकरूपतेचे समर्थक म्हणतात, ‘खरोखर भाषा एकच पाहिजे. तिचे लेखनातील रूप हेच तिचे खरे शुद्ध रूप. बोलताना ते कमीअधिक प्रमाणात विकृत होते. या बोलीरूपातही सुशिक्षित शिष्ट उच्चवर्गीयाकडून बोलले जाते, तेच तिचे ग्राह्य प्रमाण रूप. इतर रूपे अशुद्ध, कारण अडाणी लोकांना कसे बोलावे, शुद्ध उच्चार कसे करावे, व्याकरणाची खरी रूपे कोणती ते कळत नसते’.

या प्रश्नाचा उलगडा करून घेण्यासाठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेणे इष्ट आहे.

भाषेचे स्वरूप : भाषेचा अर्थच मुळी ‘बोलली जाणारी’ असा आहे. जगात अनेक समाज असे आहेत, की ज्यांच्या भाषा लिपिबद्ध नाहीत, लिहिल्या जात नाहीत, तरीही आपण त्यांना भाषा म्हणतो, कारण ते ध्वनिरूप विनिमय साधन असते. लेखन हे त्याचे दृश्य असे प्रतिबिंब आहे. अर्थात हे प्रतिबिंब लिपीच्या गुणावगुणांवर, आपण तिचा ज्याप्रकारे वापर करतो त्यावर अवलंबून असल्यामुळे ते शंभर टक्के प्रामाणिक असणे शक्य नसते, ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे. भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी पुष्कळदा लिखित पुरावाच घेणे भाग पडते, कारण भाषेच्या जुन्या रूपाच्या बाबतीत दुसरा पर्यायच संभवत नाही. पण बोलल्या जाणाऱ्या प्रचलित भाषेचे वर्णन करताना मात्र तो प्रत्यक्ष बोलला जाणाराच असला पाहिजे.

असा पुरावा पाहू लागले म्हणजे दिसते, की भाषेची एकरूपता हा लेखनाने निर्माण केलेला आभास आहे. आपण कसेही बोलत असलो, तरी लेखन मात्र प्रस्थापित मान्य साहित्याचे अनुकरण करून केले पाहिजे, अशी भीतियुक्त भावना बहुतांश लेखकांच्या मनात असते. त्यामुळेच व्याकरण व शुद्धलेखन यांना अवास्तव महत्त्व आलेले आहे.

भाषेचे–एकाच नावाने ओळखल्या जाणाऱ्या भाषेचे-स्वरूप विविधतापूर्ण असते. ते सर्वत्र पूर्णपणे सारखे नसते. त्यात विशिष्ट क्षेत्रसूचक भेद असतात. त्यामुळेच अमुक माणूस कोकणातला, वऱ्हाडातला, अमुक खानदेशचा असे अभ्यासपूर्वक निरीक्षण करणारी व्यक्ती म्हणू शकते. पण या क्षेत्रातही पोटभेद व पोटपोटभेद असतात. प्रश्न आहे तो, कोणता भेद कुठून कुठपर्यंत पसरला आहे याचा. उदा., प्रमाण मराठीतील – ला या प्रत्ययाच्या जागी खानदेशीत आणि काही अंशी वऱ्हाडीतही –ले हा प्रत्यय आढळतो. या –ले प्रत्ययाची निश्चित व्याप्ती कशी ठरवावयाची ? ती व्याप्ती शोधून काढण्यासाठी कोणती पद्धत, कोणती साधने वापरावयाची ?

या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण पुढे पाहू. पण बोलीच्या संदर्भात ज्या भिन्नभिन्न संज्ञा वापरल्या जातात, त्यांची अर्थनिश्चिती व व्याख्या आपण आधी करू.


भाषा ही संज्ञा ज्या अनेक बोली एका विशिष्ट विनिमयसाधनाचे पोटभेद आहेत अशा एका सामाजिक साधनाला लागू केली जाते, तर पोटभाषा ही संज्ञा भाषेच्या महत्त्वाच्या प्रादेशिक भेदांना लागू होते. अशा प्रकारे पाहिले तर मराठी ही एक भाषा असून वऱ्हाडी, देशी, खानदेशी, कोकणी (सागरी मराठी) इ. प्रकार या तिच्या पोटभाषा होतील. या पोटभाषांच्या ठळक स्थानिक भेदांना ‘बोली’ असे नाव देता येईल. उदा., देशीच्या सातारी, कोल्हापूरी, माणदेशी इ., किंवा कोकणीच्या कुडाळी, मालवणी इत्यादी.

अर्थात हे सर्व भेद भौगोलिक आहेत. त्यांना क्षेत्रमर्यादा आहेत. पण याशिवाय काही जातिनिष्ठ व समाजनिष्ठ भेदही आढळतात. या भेदांनाही बोली म्हणता येईल. उदा., एकाच प्रदेशातील किंवा स्थानातील समव्यावसायिकांची बोली (व्यापारी, शेतकरी इ.), एकजातीय लोकांची बोली (लोहार, सोनार, कुंभार, चांभार इ.). मात्र या लेखात फक्त भौगोलिक भेदांचाच विचार करण्यात आला आहे.

हे करण्यापूर्वी बोलीची कामचलाऊ व्याख्या करणे इष्ट आहे. ती करण्यासाठी भाषेच्या बाबतीतील दोन महत्त्वाची तत्त्वे लक्षात घेतली पाहिजेत. एक विनिमयघनता आणि दुसरे आकलनसुलभता. काही व्यक्ती सदैव एकाच परिसरात असतात, त्यांचा परस्परांशी नित्य व्यवहार चालू असतो. अशा वेळी त्यांच्यात कमाल विनिमयघनता असते. उदा., एका एकभाषिक कुटुंबातील, इमारतीतील, गल्लीतील मंडळी. एकाच व्यवसायातील मंडळी गावात कितीही दूरदूर पसरलेली असली, तरी काही प्रसंगी काही वेळापुरती एकत्र येऊन विनिमय करतात. त्या विशिष्ट प्रसंगापुरती किंवा वेळापुरती त्यांचीही विनिमयघनता जास्त प्रमाणात असते.

या विनिमयघनतेमुळे एकमेकांशी बोलणे, एकमेकांचे बोलणे समजणे हे शक्य होते. ते जितक्या प्रमाणात अधिक शक्य होते, तितकी त्यांची आकलनसुलभता अधिक.

एखाद्या विस्तृत प्रदेशातील विनिमयघनता ही भौगोलिक कारणांवरही अवलंबून असते. नदी, पर्वत, जंगल हे विनिमयाला (पूर्वीच्या काळी तरी) प्रतिबंधक होते. सह्याद्रीच्या अडथळ्यामुळे कोकणपट्टी व महाराष्ट्र यांमधला विनिमय मंदावला, तर दक्षिण पठारावर, मोठ्या नद्यांचा अपवाद सोडल्यास, तो अधिक सुलभपणे होत असे.

विनिमयाच्या थोड्याबहुत अभावामुळे विस्कळित झालेल्या एकभाषिक समाजाच्या बोलण्यात त्यामानाने कमीअधिक फरक दिसून येतो, ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे.

भाषेच्या अंगचा एक महत्त्वाचा धर्म म्हणजे तिची परिवर्तनक्षमता. इतर काही कारणांबरोबर हे परिवर्तन घडवून आणणारे महत्त्वाचे कारण काळ हे आहे. पूर्णपणे एकरूप अशी भाषा बोलणाऱ्या व्यक्तिसमूहाचे दोन अथवा अधिक गटांत विभाजन होऊन त्यांच्या विनिमयाला अडथळा आला, तर कालांतराने प्रत्येक गटाच्या भाषेत तिची स्वतःची अशी वैशिष्ट्ये निर्माण होतात. प्रारंभी ही वैशिष्ट्ये कमी आणि मामुली स्वरूपाची असतात. त्यांच्या भाषिकांचा एकमेकांशी होणारा व्यवहार फारसा अडथळा न येता होऊ शकतो. दुसऱ्याच्या गटाचा भाषिक जराशी वेगळी पण आपलीच भाषा वापरतो आहे, असे प्रत्येक गटाच्या भाषिकाला वाटत असते. जोपर्यंत आकलनाची पातळी इतपत असते, तोपर्यंत त्या दोन भाषिकांच्या व्यवहारसाधनांना मूळ भाषेच्या पोटभाषा म्हणणे इष्ट ठरेल. या ठिकाणी ही पोटभाषेची भावना संबंधित गटांच्या भाषिकांच्या दृष्टीने आत्मनिष्ठ असते आणि हाच निकष वर्गीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. तिऱ्हाईताला कदाचित त्या दोन वेगळ्या भाषा वाटतील, वा त्या एकच आहेत असा त्याचा ग्रह होईल.

या ठिकाणी आणखी एक संज्ञा लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ‘व्यक्तिभाषा’. म्हणजे एकच व्यक्ती नेहमी वापरत असलेले भाषिक विनिमय-साधन. जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींच्या बाबतीत हे साधन त्या व्यक्तींच्या दृष्टीने पूर्ण एकरूप असते, तेव्हा त्या व्यक्ती एकच बोली बोलत असतात. जेव्हा ते अंशतः भिन्न पण व्यवहाराला अडथळा न आणण्याइतके कमीअधिक सुबोध असते, तेव्हा त्या व्यक्ती एकाच भाषेच्या भिन्न बोली बोलत असतात, तर जेव्हा ते अत्यंत दुर्बोध किंवा अनाकलनीय असते, तेव्हा त्या व्यक्ती भिन्न भाषा बोलत असतात. पुष्कळदा एखादी अपरिचित भाषा कळल्याचा आपल्याला आभास होतो. उदा., गुजराती, हिंदी, बंगाली इ. भाषा ऐकताना मराठी भाषिकाला आपल्याला पुष्कळसे परिचित असे काहीतरी त्यात आहे, असे वाटते. पण हा आभास या भाषेत असलेल्या समान शब्दसंग्रहामुळे निर्माण होतो. पण शब्दसंग्रह म्हणजे भाषा नव्हे. शब्दांच्या मांडणीतून व्यक्त होणाऱ्या विधानांचा आशय कळणे म्हणजे भाषा कळणे. अरबी व फारसी या भाषांतील समान शब्दांचे प्रमाण फार मोठे आहे, तरीही त्यात परस्पर आकलन होत नाही, ते या कारणानेच.

तसे पाहिले तर एक बोली बोलणाऱ्या कोणत्याही दोन व्यक्तींची भाषा पूर्णपणे सारखी नसते. इतर काही नसले तरी, त्यांचे आवाज तरी भिन्न असतात.


आवाजाच्या भिन्नतेमुळे अंधारातसुद्धा आपण भिन्नभिन्न व्यक्तींना ओळखू शकतो. आवाज म्हणजे व्यक्तिवैशिष्ट्ययुक्त मानवनिर्मित ध्वनी. पण तो भिन्न असल्यामुळे किंवा तोतरेपणा, भरभर बोलणे, नाकात बोलणे, संथपणे बोलणे, विशिष्ट लकबीने बोलणे, विशिष्ट शब्दाचा विशेष उपयोग करणे, यामुळेही एखाद्याचे बोलणे आपल्याहून भिन्न असले, तरी त्याची बोली या एवढ्याच कारणांमुळे आपल्यापासून भिन्न आहे, असे आपण मानत नाही.

बोलीची व्याख्या : अशा प्रकारे व्यक्तिभाषेचे स्वरूप लक्षात घेतले, म्हणजे बोलीची व्याख्या करणे शक्य व सोपे होईल. ती अशी : ज्या व्यक्तिसमूहाला आपण पूर्णपणे एकरूप असे भाषिक रूप वापरतो असे वाटते, त्याची भाषा म्हणजे बोली. ही एकरूपता केवळ तात्त्विक स्वरूपाची असते आणि भाषेच्या सामाजिक प्रश्नात असणे यापेक्षा वाटणे याला बहुतेक वेळा अधिक महत्त्व असते. प्रत्यक्षात एखाद्या शास्त्रज्ञाने एकच बोली बोलणाऱ्या (म्हणजे आपण बोलतो आहो असे ज्यांना वाटते अशा) दोन व्यक्तींचे बोलणे अभ्यासून त्या प्रत्येकाचे स्वतंत्रपणे वर्णन केले, तर संपूर्ण एकरूपतेचा दावा टिकणे कठीणच. अशा प्रकारे वस्तुनिष्ठ, व्याख्या करणे संभवनीय नसल्यामुळे वरील प्रकारची भावनानिष्ठ, व्यक्तिनिष्ठ व्याख्या करणे सोईचे ठरते आणि भाषा ही मूलतः एक सामाजिक संस्था असल्यामुळे तिच्या व्याख्येत वस्तुबाह्य कसोटी लावणे, कधीकधी स्वाभाविक ठरते.

कार्यपद्धती : बोलींचा उल्लेख आपण त्यांना स्थानिक किंवा प्रादेशिक नावे देऊन करतो पण बोलींचा क्षेत्रविस्तार ठरवायचा कसा? ⇨ग्रीअर्सनने काही ठिकाणचे भाषिक नमुने मागवून त्यांना ती ती नावे दिली. तेथील शिक्षकाकडून किंवा विश्वासार्ह व्यक्तींकडून तिथे स्थायिक असलेल्या व्यक्तीच्या भाषेत एक विशिष्ट उतारा भाषांतरित करून घेणे, किंवा एखादी गोष्ट इ. घेऊन ती प्रातिनिधिक मानणे ही त्याची पद्धत होती. जिथे एकंदर भाषिक परिस्थितीची अगदीच माहिती नव्हती, तिथे हे पहिले पाऊल अत्यंत उपयुक्त ठरले, यात आश्चर्य नाही. परंतु बोलींचा सिद्धांत मांडण्यासाठी ते अपुरे होते. एकमेकांपासून काही अंतरावर असलेल्या एका भाषेचे नमुने एकमेकांपासून भिन्न असतात आणि अशी भिन्नता उच्चार, शब्दसंग्रह, व्याकरण आणि वाक्यरचना या सर्व स्तरांवर कमीअधिक प्रमाणावर आढळून येते, ही कल्पना साधार असल्याचे दिसून आले, पण या भिन्नत्वाच्या मर्यादा नक्की करता येतात का, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यातून मिळाले नाही. ते मिळवण्याचे संशोधनकार्य एकोणिसाव्या शतकाच्या अगदी अखेरीला (१८९६) ⇨झ्यूल झील्येराँ या फ्रेंच अभ्यासकाने एदमाँ एदमाँ या सहकाऱ्याच्या मदतीने हाती घेतले. एदमाँचे श्रवणेंद्रिय तीक्ष्ण होते. ऐकलेली माहिती शास्त्रशुद्धपणे कशी लिपिबद्ध करायची, हे झील्येराँने त्याला नीट समजावून दिले. १८९७ ते १९०१ च्या दरम्यान एदमाँने ६३९ स्थानांना भेटी दिल्या. माहिती कोणाकडून, कोणती आणि कशी मिळवावयाची, याचे तंत्र त्याला अवगत होते. लोकांना विश्वासात घेऊन, मनमिळाऊपणाने त्यांना त्यांच्या स्वाभाविक भाषेत बोलायला लावून हे त्याने केले. मिळालेली माहिती चित्रबद्ध करणे, तिची छाननी करणे, तिच्यातून काय निष्कर्ष निघतात ते पाहणे, इ. नंतरचे काम झील्येराँने केले. वर सांगितलेल्या चारही स्तरांवरील निष्कर्ष व मार्गदर्शक तत्त्वे त्याने त्यातून गोळा केली.

यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत वाक्ये व नेहमीच्या उपयोगातील शब्द यांची संख्या जवळजवळ दोन हजार होती आणि त्यामुळे शब्दाला किंवा वाक्याला एक या हिशोबाने दोन हजार नकाशे तयार करावे लागले. काही नकाशांत एकच लॅटिन ध्वनी फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागांत कसा परिवर्तित झाला आहे हे कळले, तर काही नकाशांवरून एकाच प्राण्याला (उदा., घोडी, कोंबडा) किंवा वस्तूला वेगवेगळ्या प्रदेशांत काय म्हणतात, ते कळले. त्यामुळे ध्वनिपरिवर्तनाच्या भौगोलिक मर्यादा तर कळल्याच, पण कोणत्या भागात कोणते भाषिक (रोमान्स, जर्मानिक, केल्टिक) वर्चस्व आहे, हेही समजून आले.

सर्वांत धक्कादायक शोध लागला तो हा, की सर्वच ध्वनी एका निश्चित भौगोलिक क्षेत्रात एकाच विशिष्ट दिशेने बदलत नसून प्रत्येक ध्वनीचे परिवर्तनक्षेत्र निश्चित व स्वतंत्र आहे. प्रत्येक ध्वनीचे क्षेत्र दाखवणाऱ्या रेषा काढण्यात आल्या आणि त्यांना ‘समोच्चारदर्शक रेषा’ हे नाव देण्यात आले.

ध्वनिपरिवर्तनदर्शक नकाशा

बाजूच्या काल्पनिक नकाशावरून हे स्पष्ट होईल. चौकोन हा एकभाषिक प्रदेश आहे. त्याच्या मूळ भाषेतील दोन ध्वनी कालांतराने कसे परिवर्तित झाले, ते अखंडित रेषांनी दाखवले आहे.

अखंडित रेषेच्या उजव्या बाजूला मूळ क चा ख झालेला आहे, तर डाव्या बाजूला तो ग झालेला आहे. तसेच खंडित रेषेच्या उजव्या बाजूला ड अपरिवर्तित राहिलेला आहे, तर डाव्या बाजूला त्याचा ळ झालेला आहे. म्हणजे मूळ एकभाषिक क्षेत्राचे चार वैशिष्ट्यपूर्ण विभाग झालेले आहेत : (१) ग, ड (२) ग, ळ (३) ख, ळ आणि (४) ख, ड.

हा तात्त्विक विचार आपण या क्षेत्रातील मूळ दोन ध्वनींपुरताच केलेला आहे. पण भाषेत कितीतरी वेगवेगळे ध्वनी वेगवेगळ्या संदर्भांत आढळतात. ते सर्व लक्षात घेऊन त्यांच्या परिवर्तित रूपांचा नकाशा बनवला, तर तो किती गुंतागुंतीचा होईल याची कल्पनाच केलेली बरी ! दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की, ज्या ठिकाणी या रेषा एकमेकींना छेदून जातात त्या (आकृतीत वर्तुळाने दाखवलेल्या) क्षेत्रात बोलीतील भेद ठळकपणे दिसून येतात. शिवाय आठवड्याचा बाजार, जत्रा, शेजारच्या गावात लग्न, स्थलांतर इ. कारणांनीही बोलींच्या स्वरूपात बदल घडू शकतो.


इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की, काही ध्वनी सर्वच्या सर्व क्षेत्रांत एकाच दिशेने बदलतील, काही कुठेही मुळीच बदलणार नाहीत, तर काही, संदर्भांत, संपूर्ण नष्ट होतील. उदा., गुजरात-महाराष्ट्र क्षेत्रात ग्राम या शब्दातील ध्वनीत ग सर्वत्र टिकून राहिलेला आहे संयुक्त व्यंजनातील र चा संपूर्ण लोप झाला आहे शब्दांतर्गत आ टिकून राहिला आहे स्वरमध्यस्थ म गुजरात क्षेत्रात टिकून राहिला आहे, तर मराठी क्षेत्रात त्याचा व झाला असून त्याच्या आधीचा स्वर प्रथम अनुनासिक (गांव) आणि कालांतराने निरनुनासिक (गाव) बनला आहे आणि त्यातील अत्यं अ सर्व क्षेत्रात लोप पावला आहे (गु. गाम् म. गाव).

पण बोलींचा अभ्यास म्हणजे केवळ ध्वनिवैशिष्ट्यांचा अभ्यास नव्हे, हे वर आलेच आहे. काही बोली शब्दवैशिष्ट्यांमुळेही वेगळ्या करता येतात. उदा., भारतीय आर्य भाषांतील [⟶ इंडो-आर्यन भाषासमूह] ‘पाणी’ या अर्थाचा शब्द घेतला, तर आब, पानी, पाणी, जल, उदक असे त्यांचे क्षेत्रविभाजन करता येते.

अर्थात या ठिकाणी दिलेले सर्व शब्द मूळ भाषेत आढळतात. पण कित्येकदा काही बोलींतील काही शब्द मूळ भाषेतील नसतात. आर्य भाषा ज्या मूळ आर्येतर (द्राविड, ऑस्ट्रिक इ.) प्रदेशांत पसरल्या, तेथील भाषेत आद्य भाषेतील म्हणजे भाषिक निम्नस्तरातील कित्येक शब्द टिकून राहिलेले दिसतात. मराठीच्या काही बोलींतील कन्नड, तेलुगू इ.शब्द (तूप, बोट, पिल्लू, अडकित्ता) हे अशा प्रकारचे होत.

ऐतिहासिक काळात असे शब्द राजकीय किंवा सांस्कृतिक वर्चस्वामुळे येतात (जमीन, हजार, मास्तर, एस्टी) तर कित्येक परकियांकडून घेतलेल्या नव्या कल्पना, वस्तू (पगार, जुगार, काडतूस, पाव) इत्यादींमुळेही येतात.

अशा प्रकारच्या काही शब्दांचा वापर विशेष क्षेत्रांशी निगडित असल्याचे दिसून येते.

व्याकरणाचे काही प्रत्ययही क्षेत्रमर्यादित असतात आणि त्यानुसार भाषिक नकाशाचे एक वेगळे दर्शन आपल्याला घडते. सामान्यरूपात लागणारा ला हा प्रत्यय मराठीच्या पूर्वेकडील प्रदेशात-ले, तर किनारपट्टीत –का किंवा-आक असा आहे. केवळ अशा प्रत्ययांच्या क्षेत्रवार वाटपाचा अभ्यासही भाषिक भूगोलाला उपकारक ठरेल.

अशा प्रकारचा अभ्यास ⇨झ्यूल ब्लॉक यांच्या १९६३ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात भारतीय आर्य भाषांच्या दृष्टीने अतिशय स्थूल स्वरूपात केलेला आहे. हीच पद्धत अधिकाधिक मर्यादित क्षेत्रातील भाषांना व पोटभाषांना लागू केली, तर भारतीय आर्य भाषांतील बोलींचा अभ्यास अधिक पद्धतशीर व विश्वासार्ह होईल, यात शंका नाही. ब्लॉक यांचा हा अभ्यास ग्रंथनिष्ठ आहे. त्यांनी स्वीकारलेल्या पातळीवर तो योग्य आहे. पण अधिक सूक्ष्म व तपशीलवार अभ्यास मात्र झील्येराँ यांच्या क्षेत्रनिष्ठ व्यक्तिसंपर्कातून होऊ शकेल.

पहा : भाषा भाषाशास्त्र भाषिक वर्गीकरण.

संदर्भ : 1. Bloch, Jules, Application de la cartographie a l’ histoire de l’ Indo-aryen, Paris, 1963.             2. Dauzat, Albert, La geographie linguistique, Paris, 1948.             ३. कालेलकर, ना. गो भाषा : इतिहास आणि भूगोल, मुंबई,१९६४.

कालेलकर, ना. गो.