इलिरियन भाषा : ग्रीसच्या उत्तरेला बाल्कन द्वीपकल्पाच्या वायव्येकडील प्रदेशाची ही एक इंडो-यूरोपियन भाषा होती. इ. स. पू. २३० पासून तिच्यावर लॅटिनचा प्रभाव पडू लागला, पण इ. स. सातव्या शतकापर्यंत ती तग धरून होती. मग मात्र स्लाव्हिक आक्रमणापुढे तिचा निभाव लागला नाही.

ही भाषा ग्रीक, इटालिक व जर्मानिक भाषासमूहांच्या सरहद्दीवर बोलली जाई. इलिरियन भाषिक लोक कर्तृत्ववान असल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या या तिन्ही प्रदेशांत वसाहती स्थापन केल्या. पॅलेस्टाइनला स्वतःचे नाव देणारे फिलिस्टिन्स मुळात इलिरियन गटाचे असावेत. ते इ. स. पू. बाराशेच्या सुमाराला आशिया मायनर, सिरिया व फिनिशिया या भागांत आले. पण काही टिपणे, भौगोलिक नावे व जुन्या करारातील काही नावे यांच्यापलीकडे त्यांसंबंधीचा कोणताही इतर पुरावा मिळत नाही.

इलिरियनची एक बोली मेसापियन इ. स. पू. पाचव्या शतकापासूनच्या लेखांत वापरलेली दिसते. अर्वाचीन अल्बेनियन ही इलिरियन गटाची भाषा असावी, असे काही अभ्यासकांचे मत आहे. पण अल्बेनियन भाषेचा पुरावा फार उशिरा म्हणजे १४६२ पासूनच मिळत असल्यामुळे या बाबतीत निश्चित विधान करणे सध्या तरी शक्य नाही.

कालेलकर, ना. गो.