ध्वनिविचार : (फोनेटिक्स). ध्वनिविचार म्हणजे भाषेतील ध्वनींचा अभ्यास. भाषा हे ध्वनिनिर्मित संकेतांनी बनलेले समाजाचे विनिमयसाधन आहे. हे ध्वनी मानवनिर्मित असतात. त्यांचे वैशिष्ट्य काय, ते निर्माण कसे होतात, त्यांचे वर्गीकरण कोणत्या तत्त्वानुसार होते इ. गोष्टींचा अभ्यास ध्वनिविचारात केला जातो.

ध्वनी : हवेच्या माध्यमातून प्रतिसेकंद सु. ३३५ मी. (१,१०० फूट) वेगाने आणि पाणी, धातू, लाकूड इ. माध्यमांतून त्यांचा लवचिकपणा व घनता यांच्यानुसार कमीअधिक वेगाने जाणाऱ्या विशिष्ट तरंगांना ‘ध्वनी’ ही संज्ञा आहे. एखाद्या पदार्थावर आघात झाला, की त्यात कंप सुरू होतो. हा कंप आजूबाजूच्या इतर पदार्थांवरही परिणाम करतो. तो हवेच्या माध्यमातून तरंगांच्या रूपात आपल्या कानावर आला, की आपणाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. प्रत्येक पदार्थाच्या कंपाचे एक ठराविक प्रमाण असते. मात्र तो किती दूरवर ऐकू येईल हे तो निर्माण करण्यामागील शक्तीवर अवलंबून असते. तो जेथपर्यंत ऐकू येऊ शकतो, त्या मर्यादेला ध्वनीचे ‘श्रवणक्षेत्र’ म्हणतात, तर त्याच्या प्रतिसेकंद आवर्तनाच्या संख्येला ‘कंप्रता’ म्हणतात. प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत किमान ते कमाल कंप्रतेची श्रवणेंद्रियाद्वारे संवेदना होण्याचा पल्ला वेगळा असतो. मनुष्याच्या बाबतीत हा पल्ला १६ ते २०, ००० हर्ट्‌झ सामान्यतः असतो.

ध्वनी पोकळीत निर्माण झाला, तर त्या पोकळीचा आकार, आकृती, जाडी, घटकद्रव्य (धातू, लाकूड इ.) इत्यादींच्या परिणामाने ध्वनीला एक विशिष्ट गुण प्राप्त होतो, त्याला ‘स्वरविशेष’ असे म्हणतात.

मनुष्याचे ध्वनियंत्र : श्वासोच्छ्‌वासाच्या नैसर्गिक क्रियेचा उपयोग करून मनुष्य ध्वनी निर्माण करतो. फुप्फुसातली हवा कंठमार्गाने तोंडाच्या पोकळीत आणून तोंडातील अवयवांच्या आवश्यक त्या हालचाली केल्याने पाहिजे तो ध्वनी माणसाला निर्माण करता येतो. श्वसनक्रियेत हवा नाकाच्या पोकळीतून नाकपुड्यात जाते. पण ध्वनिनिर्मितीत जरूर पडल्यास टाळूच्या मागच्या टोकाला असलेली पडजीभ वर वळवून या पोकळीत जाण्याचा मार्ग बंद केला जातो.

श्वासनलिका ज्या ठिकाणी संपते, त्यावरच्या भागात कंठपोकळी असते. कंठपोकळीत जी स्वरपटले असतात, त्यांच्यामधील फटीतून हवा जाताना स्वरपटलांची कंपने होतात व त्यामुळे ध्वनी निर्माण होतो. या ध्वनियुक्त हवेला वाटेत अडवून, तिच्या मार्गाचे स्वरूप बदलून आणि तोंडातील अवयवांची तिच्या बहिःसरणात योग्य ती हालचाल केल्याने आपल्याला हवे ते वर्णोच्चार मिळू शकतात.

कंठपोकळीतली ध्वनियुक्त हवा कुठून जाऊ शकते व त्या मार्गावर कोणकोणते अवयव आहेत, याची माहिती सर्व ध्वनींच्या वर्णनाला आवश्यक आहे.

कंठपोकळीतून वर जाताच जिभेच्या अगदी मागच्या बाजूला असलेली श्वासनलिका व अन्ननलिका यांच्यावर असणारी घशाची पोकळी लागते. या पोकळीकडून जिभेच्या पृष्ठभागावरून जिभेच्या टोकापर्यंत पोचल्यावर पुढे वरखाली दर्शनी दात व त्यानंतर या दातांना झाकणारे वरखालचे ओठ लागतात. जिभेच्या पृष्ठभागावर वरच्या हिरड्यांपासून पडजिभेपर्यंत टाळू पसरलेली आहे. टाळू ते जिभेच्या पृष्ठभाग आणि दातांची मागची बाजू ते घशाची पोकळी यांच्या दरम्यान तोंडाची पोकळी आहे. घशाच्या पोकळीच्या वर पडजिभेच्या मागून नाकाच्या पोकळीत जाण्याची वाट आहे. कंठपोकळीच्या उजव्या व डाव्या बाजूंना वरती दोन व खाली दोन अशी स्वरपटले वसलेली आहेत.

ओठापासून मागे जातजात या अवयवांचा आपण कार्यदृष्ट्या विचार करू :

ओठ : ओठ हे लवचिक अवयव आहेत. वरचा व खालचा ओठ तोंडाच्या उजवीकडे व डावीकडे ज्या टोकांना एकत्र येतात, त्यांना ‘ओष्ठसंधी’ हे नाव आहे. ओठ पसरलेले असले तर ओष्ठसंधी एकमेकांपासून कमाल अंतरावर असतात. ते पुढे नेऊन गोलाकृती करता येतात. ओठांची विशिष्ट हालचाल ज्या ध्वनींच्या निर्मितीत होते, त्यांना ‘ओष्ठ्य’ हे विशेषण लागते. ओठ सैलपणे बंद असताना हवेचे जोरदार बहिःसरण करून त्यात कंप निर्माण करता येतो. वरचा व खालचा ओठ यांच्या मध्यबिंदूत असलेल्या उभ्या अंतराला ‘उद्धाटन’ हे नाव आहे.

दात : दात हे अचल आहेत. पण जबड्याच्या हालचालीने ओठांप्रमाणेच वरच्या व खालच्या दातांतील अंतरही कमीजास्त होऊ शकते. ज्या ध्वनींच्या निर्मितीत दातांचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असते, त्यांना ‘दंत्य’ हे विशेषण लागते. दात ज्या ठिकाणी हिरड्यात जातात त्या सीमारेषेला ‘दंतमूले’ हे नाव आहे.


जीभ : मुखयंत्राचा अतिशय चलनक्षम भाग जीभ हा आहे. तिचे पुढचे टोक ‘जिव्हाग्र’ हे खालच्या दातांच्या मागच्या भागात लागलेले असते व अगदी मागचा भाग ‘जिव्हामूल’ घशाच्या समोर असतो. जिव्हाग्रापासून जिव्हामूलापर्यंतच्या सपाट भागाला ‘जिव्हा’ हे नाव आहे. जिभेच्या उजव्या व डाव्या बाजूला जिभेच्या कडा (पार्श्व) दाढांपर्यंत पसरलेल्या असतात. 

वर्णनाच्या सोयीसाठी जिव्हेचे भाग कल्पिण्यात आलेले आहेत. सर्वांत आधी जिव्हाग्र. ते व त्यामागील थोडा भाग यात ओठाप्रमाणे कंप निर्माण करता येतो. जिव्हाग्राच्या मागे असलेल्या पातळ व वळून खालची बाजू वर करू शकणाऱ्या भागाला ‘जिव्हापत्र’ म्हणजे जिभेचे पाते हे नाव आहे. जिभेच्या पात्याच्या मागच्या वरखाली होऊ शकणाऱ्या भागाला ‘जिव्हापृष्ठ’ हे नाव असून त्यानंतर घशाच्या दिशेने मागेपुढे सरकू शकणारे जिव्हामूल येते.

टाळू : वरच्या दातांच्या दंतमूलांपासून लोंबत्या पडजिभेपर्यंतच्या भागाला टाळू किंवा ‘तालू’ हे नाव आहे. टाळूचा पुढचा अर्धा भाग अस्थिमय व कठीण असून त्याला ‘कठिनतालू’ म्हणतात व मागच्या मऊ भागाला ‘मृदुतालू’ म्हणतात. या दोघींच्या मध्यावर असलेल्या जिव्हापृष्ठापासून सर्वांत दूर अशा काल्पनिक रेषेला ‘तालुशिखर’ हे नाव आहे. मृदुतालूच्या टोकाला असलेला ‘तालुपट’ म्हणजे पडजीभ श्वासोच्छ्‌वासाच्या वेळी खाली लोंबत असते. पण ध्वनिनिर्मितीच्या वेळी जरूर पडल्यास मागे वर वळून ती नाकाच्या पोकळीचा मार्ग बंद करू शकते. ध्वनिनिर्मितीच्या वेळी पडजीभ लोंबत असली तर अनुनासिक ध्वनी मिळतात. तालुपटात कंप निर्माण करून एक ध्वनी मिळू शकतो.

कंठ : श्वासनलिकेचे वरचे टोक व घशाच्या पोकळीची खालची बाजू यांच्या दरम्यान असलेल्या भागाला ‘कंठपेटी’ किंवा ‘कंठपोकळी’ म्हणतात. कंठपोकळीत उजव्या व डाव्या बाजूंना एकाखाली एक असे दोनदोन अतिशय लवचिक अवयव आहेत. त्यांना ‘स्वरपटले’ म्हणतात. या स्वरपटलांत कंप उत्पन्न झाला, की ध्वनीला एक विशेष गुण प्राप्त होतो, त्याला ‘घोष’ किंवा कंप म्हणतात. प्रत्येक ध्वनी सकंप किंवा सघोष नाहीतर निष्कंप किंवा अघोष असतो. पातळ व आखूड स्वरपटलांचे कंपन उच्च कंप्रतेचे होते. जाड व लांब स्वरपटलांचे नीच कंप्रतेचे होते. स्रियांच्या आवाजाची कंप्रता २०० ते ३०० हर्ट्‌झ आणि पुरुषांच्या आवाजाची कंप्रता १०० ते १५० हर्ट्‌झ असते.

दोन बाजूंच्या स्वरपटलांतील अंतर कमीअधिक करता येते, ती ताठ करून ते कमी करता येते, तर त्यांच्या कडा एकमेकांना भिडवून त्यांच्यातून जाणाऱ्या हवेचा मार्ग पूर्णपणे बंददेखील करता येतो. त्यांच्यामधील पोकळीला ‘मोर्गान्यीची पोकळी’ असे नाव आहे.

पोकळ्या : मुखयंत्रात चार महत्त्वाच्या पोकळ्या आहेत आणि त्यात चार विशिष्ट प्रकारचे नाद निर्माण होतात. तोंडाची पोकळी, घशाची पोकळी, मोर्गान्यीची पोकळी आणि नाकाची पोकळी या त्या होत. तोंडाच्या पोकळीतील नाद सामान्य परिचयाच्या भाषेतील नाद होय. घशाच्या पोकळीतील नाद अतिशय घर्षणयुक्त, मोर्गान्यीच्या पोकळीतील घोषयुक्त आणि नाकाच्या पोकळीतील अनुनासिक असतो.

ध्वनिनिर्मिती : बोलताना म्हणजे ध्वनिनिर्मिती करीत असताना हवा बऱ्याच प्रमाणात तोंडावाटे बाहेर जात असते. श्वासोच्छ्‌वास चालू असताना हवा नाकावाटे बाहेर जात असते. तोंड बंद असते. तालुपट खाली लोंबत असतो आणि स्वरपटले स्तब्ध असतात तर ध्वनिनिर्मितीच्या वेळी हवा तोंडावाटे बाहेर जाऊ लागते. तोंड उघडझाप करीत असते आणि त्यातील अवयवांच्या हालचाली सुरू असतात, तालुपट जरूरीप्रमाणे वर किंवा खाली होतो आणि स्वरपटले स्तब्ध असतात किंवा कंपयुक्त होतात.

ध्वनींचे वर्गीकरण : वरील चार तत्त्वांवर मुख्यतः ध्वनीचे स्वरूप अवलंबून असते. पण तोंडाचे किंवा त्यातील अवयवांच्या उघडझापीचे प्रमाण हेही ध्वनीचे स्वरूप नक्की करणारे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. हे तत्त्व म्हणजे बाहेर पडणाऱ्या हवेला होणाऱ्या अडथळ्याचे. हा अडथळा जवळजवळ शून्य असेल, मध्यम असेल किंवा पूर्ण असेल.

हवा बाहेर पडताना तिला होणारा अडथळा शून्य असेल तर ती ज्या आकृतीच्या पोकळीतून बाहेर पडते, त्या तोंडाच्या आकृतीला महत्त्व आहे. या आकृतीचे वेगवेगळे प्रकार जिभेच्या हालचालीने होतात. अशा प्रकारच्या उच्चारात तोंडातील नाद व त्याने श्रवणेंद्रियावर उमटलेला ठसा यांना महत्त्व असते. दुसऱ्या प्रकारच्या ध्वनीत बाहेर पडणाऱ्या हवेची वाट कुठेतरी चिंचोळी झालेली असते. या चिंचोळेपणामुळे त्या ध्वनीला एक वैशिष्ट्य प्राप्त होते. तिसऱ्या प्रकारच्या ध्वनीत बाहेर पडणारा हवेचा प्रवाह तोंडातील अवयवांकडून कुठेतरी पूर्णपणे अडवला जातो. अशा प्रकारच्या अडथळ्यामुळे जो खंड पडतो, तोही ध्वनिदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असतो.


पहिल्या प्रकारच्या ध्वनीत हवेचा प्रवाह मुक्त असतो. दुसऱ्या प्रकारातही प्रवाह खंडित होत नाही परंतु चिंचोळ्या वाटेत आवळला जातो. हे दोन्ही प्रकारचे ध्वनी ‘प्रवाही’ म्हणजे तोंडातील हवेच्या पुरवठ्याच्या प्रमाणात चालू राहणारे असतात. तिसऱ्या प्रकारच्या ध्वनीत मात्र हवेच्या प्रवाहात पूर्ण व्यत्यय येऊन तो तात्पुरता खंडित होतो. पहिल्या प्रकारच्या ध्वनींना ‘स्वर’ ही संज्ञा असून दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारच्या ध्वनींना ‘व्यंजने’ असे म्हणतात. स्वर व व्यंजने यांचे वर्गीकरण त्यांच्या निर्मितीच्या वेळी होणाऱ्या ध्वनियंत्रातील अवयवांच्या हालचालीनुसार होते.

पुढील विवेचनात आधी स्वरांचे, नंतर खंडित व्यंजनांचे व शेवटी प्रवाही व्यंजनांचे वर्णन व वर्गीकरण केले आहे.

स्वर : ‘असा’, ‘अणू’ इ. शब्दांतील हा ध्वनी उच्चारताना खालचा व वरचा ओठ यांत थोडे अंतर निर्माण होते, जीभ जवळजवळ जागच्या जागी पडून असते आणि स्वरपटलांत कंप उत्पन्न करून हवा तोंडाबाहेर पडत असते. या परिस्थितीत बाहेर पडणाऱ्या ध्वनिप्रवाहाला तोंडात कोणताही अडथळा झालेला नसल्यामुळे हा स्वर आहे व स्वरपटलांत कंप चालू असल्यामुळे तो सकंप किंवा सघोष आहे. बारकाईने पाहिले असता असे दिसेल, की जिभेचे टोक खालच्या दातांपासून मागे सरकले आहे आणि त्यामुळे जिव्हापृष्ठाच्या मध्यावर एक फुगवटा निर्माण झाला आहे म्हणजेच जिभेचा मध्यभाग टाळूच्या दिशेने किंचित वर उचलला गेला आहे. या सर्व माहितीचा उपयोग करून अ चे वर्णन पुढीलप्रमाणे करता येईल : हा एक सकंप, (जिभेचा पृष्ठभाग थोडासाच उंचावलेला असल्यामुळे) निम्न व (तो जिभेच्या मध्यभागी उंचावलेला असल्यामुळे) मध्य स्वर आहे. या वर्णनातील एकाच तपशिलाला पर्याय असणे शक्य आहे आणि तो म्हणजे सकंप याला. स्वरपटले स्तब्ध असूनही हीच हालचाल होऊन हा उच्चार होऊ शकेल. पण तो निष्कंप म्हणजे अघोष असेल. मात्र आपल्या परिचयाच्या बहुतेक भाषांत असा ध्वनी उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होऊ शकत नाही. अत्यंत हलक्या आवाजात कुजबुजताना असा ध्वनी मिळू शकतो.

अ च्या उच्चारणाच्या वेळी दोन ओठांमधले उभे कमाल अंतर जवळजवळ १ सेंमी. (३/८ इंच) असते. हे अ चे उद्धाटन होय.

आ च्या उच्चाराच्या वेळी जिभेचे टोक जवळजवळ दातांना लागून असते, जिभेच्या मध्यावरील फुगवटा अगदी सूक्ष्म असतो आणि उद्धाटन जवळजवळ १ इंच होते. फुगवटा अ च्या मानाने सूक्ष्म असल्यामुळे हा अधिक निम्न व तो जिभेच्या मध्यभागी असल्यामुळे मध्य स्वर आहे.

स्वरांचे वर्णन अशा प्रकारे जिभेचा तो भाग वर उचलला जातो आणि टाळूच्या दिशेने ज्या प्रमाणात कमी किंवा अधिक उचचला जातो त्यानुसार केले जाते. जिभेचा पुढचा भाग उचलला गेल्यास ‘पूर्व’, मधला भाग उचचला गेल्यास ‘मध्य’ व मागचा भाग उचलला गेल्यास ‘पश्च’ स्वर मिळतो. टाळूच्या दिशेने जीभ कमीत कमी उचलली गेल्यास स्वर ‘निम्न’, जास्तीत जास्त उचलली गेल्यास ‘उच्च’ आणि या दोहोंच्या दरम्यान उचलली गेल्यास ‘मध्यम’ असतो.

‘इथून’, ‘इराण’ इ. शब्दांतला पहिला ध्वनी उच्चारताना जिभेचा पुढचा भाग टाळूच्या पुढच्या कठीण भागाजवळ जातो, म्हणून या स्वराला पूर्व उच्च स्वर म्हणतात. पूर्व स्वरात हवेचा बाहेर पडण्याचा मार्ग पुढच्या बाजूला अरुंद असतो. मागच्या बाजूला मोठी पोकळी असते.

च्या उच्चारणाच्या वेळची जिभेची उंची थोडी कमी केली, की हा पूर्व मध्यम स्वर मिळतो, तर ती पूर्णपणे खाली आणून तिचे टोक खालच्या दातांच्या मागच्या बाजूला दाबल्यावर निर्माण झालेल्या फुगवट्यावरून ध्वनिप्रवाह जाऊ लागला, की हा पूर्व निम्न स्वर मिळतो. या सर्व उच्चारणात ओठ अधिकाधिक पसरट होत जातात.

च्या उच्चारणात जिभेची मागची बाजू मृदुतालूकडे वर उचलली जाते. ओष्ठसंधीमधले आडवे अंतर कमी होते. म्हणजे ओठ किंचित गोलाकृती होतात. जिभेची उंची थोडी कमी केली, की व अगदी खाली आणली की हा स्वर मिळतो. हे सर्व पश्च स्वर असून ते अनुक्रमे उच्च, मध्यम व निम्न आहेत. जीभ मागच्या बाजूने वर उचलताना तिचे टोक दातापासून जरा मागे येते.

आतापर्यंतचे स्वर , , , , , , , मुख्य व मार्गदर्शक मानून त्यांना होणाऱ्या विकारांच्या दृष्टीने इतर काही महत्त्वाच्या स्वरांचा विचार करणे उपयुक्त ठरेल.


पूर्व स्वरांच्या उच्चारणात ओठ पसरट असतात, असे आढळून आले आहे. पण ही अट अपरिहार्य नाही. त्यांचे उच्चारण ओठ गोल ठेवूनही करता येते. अशा प्रकारे ओष्ठ्य पूर्व स्वर उच्चारले जातात. ऐवजी इ‍ॅ, ऐवजी ए‍ॅ ऐवजी त्याचाच गोलाकृती स्वर आपणाला मिळतो. हे स्वर फ्रेंच, जर्मन इ. भाषांत उपलब्ध आहेत. ते फ्रेंचमध्ये अनुक्रमे u, eu असे दर्शविले जातात, तर जर्मनमध्ये Ü, Ö असे लिहिले जातात. 

पश्व स्वरांचे उच्चारण याच्या उलट ओठ पसरट ठेवून करणे शक्य असते.

उच्च, मध्यम व निम्न यांच्याही दरम्यान जीभ उचलून असंख्य उच्चार करता येतील. पण साधारणपणे ही तीन प्रमाणे ग्राह्य मानून त्यांच्या मानाने एखाद्या भाषेतील विशिष्ट स्वरातील जिभेची उंची किती आहे, हे दाखवणे वर्णनात्मक आणि व्यावहारिक दृष्टीने सोईचे असते.

हे स्वर पुढील आकृतीप्रमाणे दाखविता येतील :

पण वरील वैशिष्ट्यांपेक्षा आणखी काही वैशिष्ट्ये स्वरात आढळतात. ती पुढीलप्रमाणे : 

(१) तुलनात्मक उंची किंवा उद्धाटन-स्वर ज्या प्रमाणात उच्च त्या प्रमाणात त्याचे उद्धाटन कमी (उदा., ). तो ज्या प्रमाणात निम्न त्या प्रमाणात त्याचे उद्धाटन जास्त (उदा., )

(२) खोली – ओठापासून घशापर्यंतच्या अंतरानुसार त्याचे स्थान. पूर्व, मध्य व पश्च.

(३) घोष–स्वर ‍सकंप आहे की निष्कंप हे दर्शवणारा गुण. मात्र विशिष्ट काळात कंपनसंख्या वरखाली होऊ न देणे, खालून वर नेणे किंवा वरून खाली आणणे यामुळे घोषाचे रूप बदलते. कंपनसंख्येच्या वागण्याला ‘रोह’ हे नाव असून तो स्थिर असल्यास त्याला ‘समरोह’, वर जाणारा असल्यास ‘आरोह’ व खाली जाणारा असल्यास ‘अवरोह’ अशी नावे आहेत. घोषाच्या या वैशिष्ट्यांचा उपयोग चिनी भाषेसारख्या भाषा फार मोठ्या प्रमाणात करतात. कित्येकदा साध्या विधानात रोहाचा उपयोग करून ते प्रश्नवाचक, उद्‌गारवाचक इ. बनवण्याचे तंत्र काही भाषा वापरतात (उदा., ‘तो गेला’ – ‘तो गेला’ ? – ‘तो गेला’ ! ).

(४) नाद – यात दोन मुख्य प्रकार आहेत : (१) केवळ तोंडाच्या पोकळीतील नाद असलेला ‘मौखिक’ व (२) ज्यात नाकाच्या पोकळीतील नादही मिसळलेला आहे असा ‘अनुनासिक’.

(५) निर्माणशक्ती – आवाजाचा लहानमोठेपणा हा स्वर उच्चारण्यासाठी वापरलेल्या कमीअधिक शक्तीवर अवलंबून असतो.

(६) अवधी – स्वर कमीअधिक काळ उच्चारणे. कमी काळ उच्चारलेला स्वर अधिक काळ उच्चारलेल्या स्वरापेक्षा ‘ऱ्हस्व’ व अधिक काळ उच्चारलेला ‘दीर्घ’.

(७) घनता – ज्यामुळे स्वर अवयवक्षम बनतो तो गुण. उदा., आई या शब्दातील दोन्ही स्वरांची घनता सारखी आहे. पण ची घनता वाढवून ची कमी केली, तर आय असा उच्चार होईल. संयुक्त स्वरांच्या उच्चारणात हे तत्त्व वापरले जाते.

(८) स्नायूंचा ताण – ताठ किंवा सैल उच्चारलेला स्वर

(९) ओष्ठीकरण – ओठांची विशेषतः ते गोलाकृती होतील अशी हालचाल.

(१०) मूर्धन्यीकरण – काही स्वरांच्या उच्चारणात वापरात नसलेले जिव्हाग्र मागे वळवून तालुशिखराकडे नेणे.


व्यंजने : तोंडातून बाहेर पडणाऱ्या अनिर्बंध ध्वनिप्रवाहात अडथळा उत्पन्न झाल्याने ऐकू येणाऱ्या ध्वनींना ‘व्यंजन’ हे नाव आहे. हा अडथळा अनेक प्रकारे होऊ शकतो. ओठापासून स्वरपटलांपर्यंत पसरलेल्या चलनक्षम अवयवांकडून तो होतो. तो पूर्ण म्हणजे हवेचा प्रवाह संपूर्णपणे बंद करणारा असेल किंवा आंशिक म्हणजे हवेचा मार्ग काही प्रमाणात बंद करणारा असेल. प्रवाह अडवण्याचे जे प्रकार आहेत, त्यांनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते आणि अशा अडवण्याला जे अवयव जबाबदार असतात, त्यांची नावे विशिष्ट व्यंजनांना देण्यात येतात.

ज्या व्यंजनांत अडथळा पूर्ण नसतो, हवेच्या बहिःसरणाला थोडी वाट असते, असे ध्वनी खंडित होत नाहीत ते स्वराप्रमाणे प्रवाही असतात.

उलट ज्या ध्वनींच्या उच्चारणात हवेचा मार्ग पूर्णपणे बंद होतो, त्यांत तो पुन्हा मोकळा होईपर्यंत कोणतीही संवेदना कर्णेद्रियांना होत नाही. मार्ग बंद झाल्यापासून तो पुन्हा मोकळा होईपर्यंतचा काळ स्तब्धतेचा असतो. अशा प्रकारे हवेचा मार्ग अंशतः किंवा पूर्णपणे बंद होणे याला ‘स्तंभन’ हे नाव आहे. स्तंभन झाल्यापासून तो मोकळा होईपर्यंतच्या काळाला ‘धृती’ हे नाव आहे आणि तो मोकळा होणे याला ‘मोक्ष’ हे नाव आहे. ज्या ध्वनींच्या उच्चारणात अडथळा पूर्ण असतो, त्यांच्या मोक्षाला ‘स्फोट’ ही विशेष संज्ञा आहे. धृती कमीत कमी असली, तर व्यंजन शुद्ध असते. ती वाढवली तर व्यंजनयुग्माचा भास होतो : उदा., लतालत्ता यांतील पहिल्या शब्दात त ची धृती कमीत कमी असते, तर लत्ता या शब्दात ती किंचित वाढवलेली आहे, म्हणजेच तचे स्तंभन व त्याचा मोक्ष यांत काही काळ गेलेला आहे. असाच फरक हला हल्ला, किसाकिस्सा इ. शब्दांच्या जोड्यांत आढळतो. शब्दारंभी नसलेल्या संस्कृत जोडाक्षरातले पहिले व्यंजन उच्चारात धृतियुक्त असते : शक्यशक्‌क्य, अश्वअश्‌श्व.

व्यंजनांचे वर्गीकरण : (१) स्फोटक : ध्वनीच्या उच्चारणात बाहेर जाणारा हवेचा प्रवाह ध्वनियंत्रात कुठेतरी पूर्णपणे अडवला गेला, तर निर्माण होणाऱ्या ध्वनीला ‘स्फोटक’ असे म्हणतात. हा स्वर उच्चारला जाताना तोंड एकदम बंद झाले, तर प् हा ध्वनी ऐकू येईल. इथे हवा ओठाकडून अडवली गेली असल्यामुळे प् या ध्वनीला ‘ओष्ठ्य स्फोटक’ म्हणतात. इतर काही स्फोटक जिभेच्या हालचालीने मिळतात. अशा स्फोटकांना जिभेचा स्पर्श ज्या अवयवाला होतो, त्याचे नाव दिले जाते. स्पर्श करणाऱ्या अवयवाला ‘स्पर्शक’ हे नाव असून स्पर्श जिथे होतो त्या जागेला ‘स्पर्शस्थान’ म्हणतात. ओष्ठ्य स्फोटात खालचा ओठ हा स्पर्शक व वरचा ओठ हे स्पर्शस्थान मानले जाते. 

जिभेच्या टोकाचा स्पर्श वरच्या दातांच्या मागे होऊन ध्वनिप्रवाह बंद झाला, तर त् हा दंत्य स्फोटक मिळतो आणि ते दंतमूलांना लागले, तर इंग्रजीत वापरला जाणारा ट् दंतमूलीय स्फोटक ऐकू येतो.

जिभेचे पाते मागे वळून त्याने कठिनतालूच्या तालुशिखरापर्यंतच्या निरनिराळ्या भागांना स्पर्श केला, तर हा मूर्धन्य ध्वनी निर्माण होतो.

जिव्हापृष्ठाचा पुढचा भाग उचलला जाऊन कठिनतालूच्या पुढच्या भागाला लागला, तर कठिनतालव्य क् निर्माण होतो. संस्कृतमधील च्, छ् वगैरे तालव्य स्पर्श मुळात कठिनतालव्य स्फोटक होते.

जिव्हापृष्ठाचा मागचा मधला भाग वर जाऊन मृदुतालूला लागला, तर मध्य मृदुतालव्य क् मिळतो. मराठीत हा क् आहे. अगदी मागचा भाग स्पर्शक असला, तर अरबी कायदा इ. शब्दांतला अंत्य मृदुतालव्य ध्वनी मिळतो. मराठीतला मध्य मृदुतालव्यानंतर पूर्व स्वर आल्यास पूर्व मृदुतालव्य बनतात : काकी यातला पहिला क् मध्य असून दुसरा पूर्व आहे.

स्वरपटले एकमेकींच्या अगदी जवळ येऊन फुफ्फुसातून बाहेर पडणाऱ्या हवेची वाट बंद करू शकतात. अशा प्रकारे वाट बंद होणारा खटक्यासारखा आवाज हाही एक स्फोटक आहे. आंतरराष्ट्रीय ध्वनिलिपित तो ऽ या चिन्हाने दर्शविला जातो. मुळाक्षरे म्हणत असताना कित्येकदा तो ऱ्हस्व व दीर्घ स्वरांच्यामध्ये आपण म्हणतो : इ ऽ ई, उ ऽ ऊ इत्यादी.

आतापर्यंतचे वर्णन शुद्ध अघोष स्फोटकांचे होते. पण स्फोटकांच्या उच्चारणाबरोबर स्वरपटलांचा कंप होत राहिला, तर ब्, द्, ड्, ग् वगैरे सघोष स्फोटक निर्माण होतात. याला अपवाद कंठ्य स्फोटकाचा, कारण तो स्वरपटलांचा उपयोग करून उच्चारला जातो.


स्फोटकांचे आणखी एक उच्चारण महाप्राणयुक्त असते. स्फोटकाला लागणाऱ्या हवेचा साठा वाढवून तो जोराने बाहेर सोडला, तर फ्, थ्, ठ्, ख् वगैरे महाप्राण स्फोटक मिळतात. महाप्राण स्फोटकांच्या जोडीला स्वरपटलांचा कंप असल्यास भ्, ध्, ढ्, घ्, वगैरे सघोष महाप्राण स्फोटक तयार होतात.

(२) घर्षक : स्फोटकांच्या उच्चारात हवेच्या बहिःसरणाचा मार्ग पूर्णपणे बंद असतो. पण त्याऐवजी अशा ठिकाणी जराशी फट राहिली, तर हवा त्या चिंचोळ्या जागेतून एक विशिष्ट आवाज करत बाहेर पडेल. अशा प्रकारच्या आवाजाला ‘घर्षण’ व घर्षणयुक्त ध्वनीला ‘घर्षक’ हे नाव आहे. सामान्यतः ज्या ज्या ठिकाणी स्फोटक निर्माण होण्याची शक्यता असते, त्या त्या ठिकाणी त्याला मिळता घर्षक प्राप्त होईल. उदा., क्‌च्या स्पर्शस्थानी घर्षक ख् (अरबी, इराणी इ. भाषांत मिळणारा), च्या जागी घर्षक (याच भाषांत मिळणारा) इ. मिळू शकतील. अशाच प्रकारे कंठ्य स्फोटकाच्या जागी घर्षण होऊन हा घर्षक मिळतो. त्याचे निष्कंप रूप संस्कृत विसर्ग हे आहे. सकंप ह हा मात्र नेहमी स्वरपूर्वच आढळतो.

स्फोटकांना मिळत्या घर्षकांशिवाय काही स्वतंत्र घर्षकही आहेत. संस्कृतमध्ये असलेले घर्षक यापैकीच आहेत. त्यांपैकी पहिला जिभेचे पाते कठिनतालूजवळ नेऊन त्याच्या कडा शेजारच्या दातावर दाबून तयार झालेल्या आडव्या चिंचोळ्या वाटेतून हवा शीळ घातल्यासारखा आवाज करत गेल्याने मिळतो. हा मराठीतला श् होय. जिभेचे पाते तालुशिखराकडे नेऊन जिव्हाग्राच्या कडा व हे शिखर यांच्या फटीतून घर्षण करत जाणाऱ्या हवेमुळे ष् हा घर्षक मिळतो. श्‌च्या स्पर्शस्थानाच्या किंचित पुढे वरच्या दातांजवळ जरा गोलाकृती फट करून स् हा घर्षक तयार होतो. या घर्षकाचा सघोष ध्वनी तमिळमध्ये मिळतो, तर चा हा सकंप उच्चार (इंग्लिश rose मधील s प्रमाणे) व चा झ्य (इंग्लिश measure मधील s प्रमाणे) अनेक भाषांत मिळतात. यातला कोणताही सकंप उच्चार मराठीत नाही.

काही घर्षक जरा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांपैकी खालचा ओठ आत वळून वरच्या दातांना स्पर्श करून मिळणारा फ़ (इंग्लिश f) व त्याचा सकंप व़ (इंग्लिश v), जिभेचे टोक वरच्या व खालच्या दर्शनी दातांच्या मधून किंचित बाहेर काढून मिळणारा थ़ (इंग्लिश thin मधील th) व त्याचा सकंप ध़ (इंग्लिश this मधील th) हे महत्त्वाचे आहेत.

याशिवाय आपल्या परिचयाच्या इतर काही ध्वनींबरोबर घर्षणतत्त्व आणून दुसरे घर्षक मिळू शकतात.

(३) अर्धस्फोटक : ज्यांच्या उच्चारणाचा प्रारंभ स्फोटकांप्रमाणे असून मोक्ष घर्षकाप्रमाणे होतो, असा एक संकरित ध्वनिवर्ग असून त्याला अर्धस्फोटक हे नाव मराठीतील वर्ग हे या प्रकारच्या ध्वनींचे उत्तम उदाहरण आहे. तालव्य च्‌च्या उच्चाराच्या वेळी जीभ आधी त्‌च्या उच्चारणाप्रमाणे वरच्या दातांच्या मागच्या बाजूला जरा अधिक प्रमाणात लागते आणि निघताना मात्र एकदम न निघता मागच्या बाजूने सुटत जाऊन हळूहळू निघून येते आणि त्‌च्या पाठोपाठच एक घर्षण ऐकू येते. त्‌चे स्तंभन आणि त्याच्या घर्षणयुक्त मोक्ष यांतून हा स्फोटक + घर्षक असा अर्धस्फोटक मिळतो.

वरील वर्णनावरून मराठी तालव्य अर्धस्फोटक त् + श्, त् + श् + महाप्राण द् + झ्य (घर्षक) व द् + झ्य (घर्षक) + महाप्राण असे बनले आहेत, हे दिसून येईल. त्याचप्रमाणे दंत्य अर्धस्फोटक त् + स्, त् + स् + महाप्राण द् + झ्य (घर्षक), द् + झ् + महाप्राण असे बनलेले आहेत. दंत्य च् व संयुक्त व्यंजन त्स् यांतील फरक हा, की पहिल्यात त् धृतिशून्य आहे, तर त्स् मध्ये तो इतर संयुक्त व्यंजनांच्या आद्यवर्णाप्रमाणे धृतियुक्त आहे.

अर्धस्फोटकातला घर्षक हा त्यातल्या स्फोटकाशीच संबंधित असतो किंवा स्फोटक हा घर्षकाशी संबंधित असतो, हे लक्षात ठेवले म्हणजे तालव्य च् मधील त् हा दंत्य नसून तालव्य असतो हे लक्षात येईल व अशाच प्रकारे प्, त्, क् वगैरे स्फोटकांनंतर त्यांचे मिळते घर्षक येऊन बनणाऱ्या अर्धस्फोटकांची कल्पना येईल.

(४) कंपक : एखाद्या लवचिक अवयवाकडून हवेचा मार्ग अगदी सैलपणाने बंद झालेला असल्यास जोराने बाहेर पडणारी हवा या अवयवात कंप उत्पन्न करते. त्यामुळे स्पर्शक स्पर्शस्थानापासून वेगळा होतो, हवा निघून गेल्यावर पुन्हा तिथे आपटतो व ही ताडनक्रिया एकसारखी चालू असते. हा कंप ओठात, जिभेच्या पात्यात व तालुपटात निर्माण होऊ शकतो. कडाक्याच्या थंडीत ओठातून काढलेला ‘ब्‌र्‌र्‌र्’ असा आवाज हा वस्तुतः एक कंपक म्हणजे ध्वनियंत्राच्या अवयवात कंप उत्पन्न करून झालेला ध्वनी आहे. जिव्हाग्र दातापासून तालुशिखरापर्यंत ज्या ज्या ठिकाणी स्पर्श करते, त्या त्या ठिकाणी त्यात असा कंप उत्पन्न करता येतो. मराठीतला कंपक (र) साधारणपणे जिव्हापत्र जिव्हामूलाच्या किंचित वर आणून व जिव्हाग्र खाली नेऊन होतो. तालुपटीय कंपक तालुपट जिभेच्या मागच्या भागावर आपटत राहिल्याने होतो. फ्रेंच, इंग्लिश इ. भाषांतील कंपक असा आहे.


कंप फार जोरदार नसला, तर अवयवाचे थरथरणे दुर्बळ होऊन त्याच ठिकाणी घर्षक कंपक निर्माण होतो.

ताडनक्रिया एकदाच झाली तर जो ध्वनी उच्चारला जाईल, त्याला ‘ताडित’ म्हणतात. मराठीतील स्वरमध्यस्थ ड् हा असा आहे : ‘डावा’ मधील ड् हा स्फोटक आहे, तर ‘वाडा’ मधील ताडित आहे.

(५) पार्श्विक : कित्येकदा जिभेच्या कडा दाढांच्या बाजूला खाली येऊन मधला भाग वर जाऊन पुढच्या किंवा मागच्या टाळूला स्पर्ष करतो व ध्वनिप्रवाह जिभेच्या कडांवरून तोंडाबाहेर पडतो. जिभेचे टोक वरच्या किंवा खालच्या दर्शनी दातांच्या मागच्या बाजूला स्पर्श करते. हवेचा प्रवाह जिभेच्या कडांनी जात असल्यामुळे या ध्वनींना ‘पार्श्विक’ म्हणतात. कित्येकदा जिभेच्या एकाच कडेने हवा जाऊन एकपार्श्विक ध्वनीही मिळतो. मराठी ल् आणि ळ् हे पार्श्विक ध्वनी आहेत. ल् हा दंत्य व ळ् हा मूर्धन्य आहे. दंत्य ल्‌च्या वेळी टाळूला लागणाऱ्या जिभेच्या भागाच्या मागचाही काही भाग टाळूला लागला, तर तालव्य ल् मिळतो. इटालियनमध्ये हा असून तो gli इ. शब्दांत gl असा लिहिला जातो. मृदुतालूला मागच्या जिव्हापृष्ठाचा स्पर्श होऊन मृदुतालव्य ल् मिळतो.

कंपक व पार्श्विक ध्वनींना ‘द्रव’ अशीही संयुक्त संज्ञा पूर्वी देण्यात येत असे.

(६) अनुनासिक : स्फोटकांच्या निर्मितीच्या वेळी नाकाच्या पोकळीकडची वाट बंद असते. ती मोकळी असली तर काही ध्वनिप्रवाह त्या वाटेने जाऊन नाद निर्माण करतो. हा नाद स्फोटकाला अनुनासिकत्व हा गुण देतो आणि त्या त्या स्फोटक वर्गातील अनुनासिक आपल्याला मिळते. तो निष्कंप स्फोटकाबरोबर झाला, तर निष्कंप अनुनासिक मिळते. पण निष्कंप स्वरांप्रमाणे निष्कंप अनुनासिकेही दुर्मिळ आहेत. मराठीतील म्, न्, ण्, ङ् ही … सर्व अनुनासिके सकंपच आहेत. कंठ्य स्फोटक सोडल्यास इतर सर्व स्फोटकांना मिळती अनुनासिके आढळतात.

(७) अर्धस्वर : स्वराच्याच व्यंजनरूपाला अर्धस्वर हे नाव आहे. स्वरांच्या ठिकाणी स्वतंत्र अस्तित्व असते. शब्दात ते अवयव म्हणून कार्य करू शकतात. त्यांच्या अंगी असलेल्या घनता या तत्त्वामुळे हे होते. च्या उच्चारणात हवेचा बहिःसरणाचा मार्ग जास्त संकुचित केला, की त्यातला स्वरनाद व घनता नष्ट होऊन हे व्यंजन मिळते. याच प्रकारे च्या जागी व् येतो. हे फक्त उच्च स्वरांचा मार्ग अरुंद केल्यानेत होते. गोलाकृती च्या जागी त्याचा मिळता अर्धस्वर येतो. हा फ्रेंच lui, huit इ. शब्दांत सापडतो.

ध्वनींचा उपयोग : ध्वनींच्या वर्णनात प्रत्येक ध्वनी हा एक स्वतंत्र घटक मानून त्याचे वर्णन दिले जाते. पण प्रत्यक्ष बोलल्या जाणाऱ्या भाषेत पूर्णपणे असंबंधित ध्वनी क्वचित सापडतात. मूलभूत ध्वनिघटकांचे समूहच भाषेच्या व्यवहारात वापरले जातात. अशा समूहांना ‘अवयव’ असे म्हणतात. प्रत्येक अवयवात एकतरी अवयवक्षम ध्वनी व इतर व्यंजने असतात. मराठीचेच उदाहरण घेतले तर तिच्यातला अवयव, म्हणजे एकाच उच्चारणात किंवा झटक्यात वापरला जाणारा समूह, पुढील प्रकारचा असतो : (१) केवळ स्वर (ऊ, ओ) किंवा प्रवाही व्यंजन (स् …, श् …), (२) स्वर + व्यंजन (ऊस्, ओल्) (३) स्वर + व्यंजन + व्यंजन (वर्ग, मस्त), (४) व्यंजन + स्वर (तो, पी), (५) व्यंजन + व्यंजन + स्वर (त्या, द्या),  (६) व्यंजन + व्यंजन + व्यंजन + स्वर (स्त्री, स्क्रू), (७) व्यंजन + स्वर + व्यंजन (घर् , पाल्), (८) व्यंजन + व्यंजन + स्वर + व्यंजन (द्वाड, श्वास) व (९) व्यंजन + व्यंजन + व्यंजन + स्वर + व्यंजन (स्त्रैण) इत्यादी.

अवयवक्षमता हा जसा स्वरांचा गुण आहे, तसाच तो प्रवाही व्यंजनांचाही आहे. ही अवयवक्षमता घनतेमुळे येते. ध्वनीचे उद्धाटन जितके अधिक तितकी त्याची घनता जास्त. त्यामुळे कमी घनता असलेल्या व्यंजनाच्या तुलनेने अधिक घनता असणारा ध्वनी अवयवक्षम ठरू शकतो. इंग्रजी ‘little’ या शब्दात li-ttle (लिट्ल्) असे दोन अवयव आहेत. पहिल्या अवयवात हा स्वर अवयवक्षम आहे, तर दुसऱ्यात ते काम ल् या पार्श्विकाने केलेले आहे. म्हणजे संस्कृतमधील ल् या स्वराचे कार्य तो करतो. इंग्रजी ‘mutton’ या शब्दातही mu-tton (ट्न्) असे दोन अवयव आहेत. दुसऱ्या अवयवात न् या ध्वनीने अवयवाचे काम केले आहे. अशाप्रकारचे अवयवक्षम ध्वनी इंडो-यूरोपियनमध्ये भरपूर होते. संस्कृतमधील हा स्वरही या कंपकाचे अवयवक्षम रूप आहे. स्वर सोडल्यास इतर अवयवक्षम ध्वनींना ‘घनध्वनी ’ अशी संज्ञा आहे. काही ध्वनीशास्त्रज्ञांनी उद्धाटनाच्या प्रमाणानुसार ध्वनींचे वर्गीकरण केले आहे. त्यापैकी फ्रेंच शास्त्रज्ञ मॉरीस ग्रामों यांनी केलेले वर्गीकरण पुढीलप्रमाणे :

उद्धाटन

ध्वनी

स्फोटक : प, ब, त, द, क, ग.

घर्षक : फ़, व़, थ़, घ, स़, झ़, श़, झ्य़, ख़, घ़.

अनुनासिक : म, न, ङ.

द्रव : ल, र, ळ. 

अर्धस्वर : य, व. 

उच्चस्वर: इ, उ, इ‍ॅ, अ.

मध्यस्वर : ए, ओ.

निम्नस्वर : आ.


फेर्दिनां द सोस्यूर यांनी अवयवाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे: अवयव हा वाढत जाणाऱ्या उद्धाटनामागोमाग येणाऱ्या कमी होत जाणाऱ्या उद्धाटनाच्या क्रमाने बनलेला ध्वनिसमूह असून त्याचा परमोच्च बिंदू स्वरोच्चारदर्शन असतो.

अवयवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे, की तो शब्दातील इतर अवयवांच्या तुलनेने जोरदारपणे उच्चारता येतो. या जोरदारपणाला ‘आघात’ हे नाव आहे. काही भाषांत शब्दांचा आद्य अवयव, काहींत अंत्य अवयव, तर काहींत उपांत्य अवयव नियमितपणे आघातयुक्त असतो. त्यामुळे आघाताचे महत्त्व जाणवत नाही. जर्मन, इटालियन, फ्रेंच, मराठी, गुजराती इ. भाषा अशा प्रकारच्या आहेत. त्यांना आघातशून्य भाषा असे म्हणायलाही हरकत नाही. पण इंग्रजीसारख्या भाषेत शब्दातील आघाताचे स्थान निश्चित नसते. म्हणजे प्रत्येक शब्दाला स्वत:चा आघात असतो. कित्येकदा ध्वनिदृष्ट्या सारख्या दिसणाऱ्या शब्दांचा अर्थ आघातावर अवलंबून असतो. अशाच प्रकारचा आघात वैदिक संस्कृतमध्ये होता. इन्द्रशत्रुः हा तत्पुरुष समास आहे की बहुव्रीही, एखादा शब्द नाम आहे की विशेषण इ. गोष्टी आघातावरून ठरत.

पण एरवी आघात नसलेल्या भाषांतही विशिष्ट हेतू व्यक्त करण्यासाठी, विधानातील महत्त्वाचा शब्द ठळक करण्यासाठी त्यावर आघात देण्याची पद्धत असते. अशा आघाताला ‘हेत्वाघात ’ हे नाव आहे. सामान्य विधानात सर्व ठराविक प्रकारे उच्चारले जातात. ‘मी पार्कसमोर रहातो’ यातील प्रत्येक शब्दाच्या आद्यावयवावर आघात देऊन तो शब्द ग्राह्य असे दाखवता येतं. ‘मी’ वर आघात दिल्यास ‘दुसरा कोणी नाही, ‘समोर’ वर आघात दिल्यास ‘मागे किंवा बाजूला नाही’ इ. अर्थ सूचित होतात. तर काही विधानांत आघाताने प्रश्न, उद्‌गार, शंका इ. दर्शविता येतात. ‘तो गेला?’ ‘तो गेला!’ इ. वाक्यांत विरामचिन्हे वापरून हे साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण आघातातील सुरावरून व्यक्त होणाऱ्या सर्व मानसिक अवस्था विरामचिन्हाने व्यक्त होणे अशक्य आहे.

संधी : काही भाषांत एका शब्दातील अंत्य ध्वनी व नंतरच्या शब्दातील आद्य ध्वनी यांचा संयोग होऊन या दोन ध्वनींत विशिष्ट बदल होतात. या बदलाला ‘संधी’ हे नाव आहे. संस्कृतमध्ये शब्दाच्या शेवटी त् व नंतरच्या शब्दारंभी र् इ. आल्यास त् चा द् होतो. म् किंवा न् आल्यास न् होतो. च् आल्यास त् तालव्य होऊन च्च् मिळतो इत्यादी. काही भाषांत प्रत्यय इ. लागतानाच हे बदल होतात: मराठी दे + आज्ञार्थी अनेकवचनाचा प्रत्यय = द्या, घे + = घ्या इ. ठिकाणी झालेला चा य् संधिनियमानुसार आहे. अशा संधीला ‘अंतःसंधी’ असे म्हणतात, तर दोन शब्दातील संधीला बहिःसंधी हे नाव आहे.

प्रत्येक भाषेची ध्वनिसंख्या निश्चित असते, तिची रचना ठरीव असते आणि या ध्वनींची उपस्थितींही नियमित असते. मराठी शब्दारंभी स्वर किंवा व्यंजन येते, पण काही व्यंजने येत नाहीत दोन अथवा अधिक व्यंजनांचा संयोग होऊ शकतो, पण काही व्यंजनांचा होत नाही. संस्कृतात शब्दाच्या शेवटी स्वर किंवा एकच व्यंजन येऊ शकते. प्राकृत शब्द स्वरान्त असतात इ. नियम त्या त्या भाषेच्या ध्वनिरचनेची वैशिष्ट्ये दाखवतात. विशिष्ट भाषेच्या ध्वनिविचाराचा अभ्यास या सर्व वैशिष्ट्यांच्या वर्णनाशिवाय होणार नाही.

भाषिक ध्वनींचा यांत्रिक अभ्यास : ध्वनींचा मुखयंत्राच्या हालचालीचे वर्णन करून केलेला अभ्यास प्रथम भारतीयांना केला. आजही त्याचें महत्त्व कमी झालेले नाही. पण शरीररचनेचे सूक्ष्म ज्ञान आता झालेले असल्यामुळे अनेक ध्वनींचे बिनचूक वर्णन व खुलासा देणे आता शक्य झाले आहे. हा उच्चारणप्रधान ध्वनिविचार होय.

ध्वनींची कर्णेद्रिंयावर जी संवेदना होते, तिच्या मदतीने आपण त्यांचे वर्गीकरण करतो. अनेकदा उच्चार करूनही तीच संवेदना झाली, तर आपण तो एकच ध्वनी आहे असे म्हणतो. पण दोन उच्चारांमुळे दोन भिन्न संवेदना झाल्या, तर आपण दोन भिन्न ध्वनी ऐकू आले असे म्हणतो. मग या दोन संवेदनांतला भेद कितीही सूक्ष्म असो. कर्णेद्रियाने असा भेद टिपणे, याचा सराव व्हावा लागतो. आपल्या सवयीच्या भाषेचे ध्वनी बऱ्याच वेळा यात अडथळा उत्पन्न करतात. शेवटी संवेदनाच आत्मनिष्ठ असल्यामुळे ऐकणे या गोष्टीला मर्यादा पडतात.

यामुळेच ज्यात व्यक्तीच्या संवेदनेचा प्रश्न येत नाही, असे वस्तुनिष्ठ ध्वनिचित्रण ध्वनींच्या अभ्यासाला फार उपयुक्त ठरते. एक साधे उदाहरण घेऊ. एखादा ध्वनी सघोष आहे की नाही, हे उच्चारणप्रधान ध्वनिविचारानुसार स्वरपटलांच्या कंपनावर किंवा स्तब्धतेवर अवलंबून असते. पण ज्यावेळी वर सांगितलेली शंका एखाद्या ध्वनीच्या बाबतीत उत्पन्न होते, त्यावेळी हा कंप चालू आहे की काय, हे प्रत्यक्ष पाहणे शक्य नसते. उच्चार होत असताना गळ्यावर बोटे ठेवून हा कंप कित्येकदा अजमावता येतो, पण त्याबद्दलही मतैक्य होईलच असे नाही. ध्वनिचित्रणाने हा प्रश्र सोडवला आहे. ध्वनीच्या घोषाचे चित्रणही होऊ शकत असल्यामुळे हा नेत्रगोचर घोष आपल्या शंकेचे समाधान करू शकतो.


प्रारंभीची यंत्रे ओबडधोबड होती. कंपकाटा (ट्यूनिंग फॉर्क), गोल फिरणाऱ्या दंडगोलावर (सिलिंडर) टोकदार पेन्सिलीने केलेले ध्वनिप्रवाहाचे रेखन व काही कंपने एवढ्यापुरती ती मर्यांदित होती. पण आधुनिक ध्वनिपरिक्षेची विजेची यंत्रे-ध्वनिग्राहक (मायक्रोफोन), ऋणकिरण दोलनलेखक (कॅथोड रे ऑसिलोग्राफ), छानक (फिल्टर), वर्णपटमापक (स्पेक्ट्रोमीटर) इ. वापरून मानवी ध्वनींच्या सर्व अंगाचे सूक्ष्म निरिक्षण व परीक्षण करणे शक्य झाले आहे. दोलनलेखन यंत्रामुळे ध्वनिलहरींचे नेत्रगोचर चित्रण होणे शक्य झाले आणि इतर यंत्रांनी इतर तपशील स्पष्ट केले.

ध्वनिपरिवर्तन : वर ध्वनींचा कालनिरक्षेप अभ्यास आलेला आहे. पण काळाच्या ओघात भाषेतील ध्वनी कमीअधिक प्रमाणात बदलतात. हे परिवर्तन विशिष्ट ध्वनीत, विशिष्ट संदर्भात घडून येते. संस्कृतमधील आद्य प् मराठीत बदलत नाही (पादपाय, पुत्रपूत, पारपार), पण तोच स्वरमध्यस्थ असल्यास त्याचा व् होतो (दिपदिवा, कूपकुवा, ताप ताव्).

हे परिवर्तन संत गतीने नकळत होते, ते विशिष्ट काळी विशिष्ट समाजात होते. ते निरपवाद असते. ते शब्दात न होता विशिष्ट परिस्थितीतल्या विशिष्ट ध्वनीत होते. ते स्वैर नसून नियमबद्ध असते.

ध्वनिपरिवर्तनाने शब्दांचे बाह्यरूप तर बदलतेच पण त्याचा परिणाम प्रत्यय व उपसर्ग यांच्यातील ध्वनीवरही होत असल्यामुळे त्याचा भाषेच्या व्याकरणावरही परिणाम घडून येतो. संस्कृतमधील द्विवचन किंवा विभत्किप्रक्रिया नष्ट होण्याचे मुख्य कारण ध्वनिपरिवर्तन हे आहे.

एखाद्या विस्तीर्ण प्रदेशात हे परिवर्तन भिन्नभिन्न मार्गांनी होते. त्यामुळेच पोटभाषा, स्थानिक बोली व स्वतंत्र भाषाही निर्माण होतात. लॅटिनपासून फ्रेंच, पोर्तुगीज, रूमेनियम इ. भाषा तसेच संस्कृतपासून मराठी, गुजराथी, हिंदी इ. भाषा ध्वनिपरिवर्तनानेच आलेल्या आहेत.

ध्वनिलेखन : जगातील अनेक भाषा शिकताना अथवा त्यांचा अभ्यास करताना येणारी मोठी अडचण लेखनपद्धतीची आहे. असंख्य भाषांना लिपी नाही. काही भाषांना स्वतःची लिपी आहे, परंतु लिपींच्या बाह्य स्वरूपात व मूलभूत तत्त्वातही इतका फरक आहे, की त्यामुळे लेखनाच्या ज्ञानाचा फारसा उपयोग होत नाही. चिनी लिपी ही चित्रलिपी आहे, देवनागरी स्वरान्त लेखनपद्धतीवर आधारलेली आहे, रोमन लिपी वर्णलेखन करते इत्यादी.

प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने, तो ज्या क्रमाने बोलण्यात येईल त्या क्रमाने दाखवण्याची सोय शास्त्रशुद्ध लिपीत असली पाहिजे. या लिपीत एक चिन्ह नेहमी एकाच ध्वनीसाठी वापरले पाहिजे आणि एकच ध्वनी नेहमी एकाच चिन्हाने व्यक्त झाला पाहिजे. अशी लिपी आंतरराष्ट्रीय उपयोगाची ठरेल, एवढेच नव्हे तर ती वापरून परभाषिकांसाठी पाठ्यपुस्तकेही लिहिता येतील. या लिपीला ‘ध्वनिलिपी’हे नाव देणे योग्य ठरेल.

काही फ्रेंच अभ्यासकांच्या प्रयत्नाने ‘आसोसिआस्यों फोनेतिक् अँतेर्नास्योनाल्’ ही संस्था १८८६ साली स्थापन झाली आणि या संस्थेने ध्वनिलिपीत छापले जाणारे द फोनेटिक टीचर हे नियतकालिक सुरू केले. या संस्थेने तयार केलेला ध्वनिलिपीचा तक्ता बऱ्याच भाषाशास्त्रज्ञांकडून वापरला जातो. या संस्थेनेच आपली भूमिका विशद करणारी एक पुस्तिका प्रसिद्ध केली असून ती अतिशय मार्गदर्शक ठरली आहे.

संदर्भ: 1. Grammont, Maurice, Traitede phonetique, Paris, 1939.

           2. International Phonetic Association, The Principles of the International Phonetic Association, London, 1949.

           3. Malmberg, Bertil, La phonetique, Paris, 1954.

           ४. कालेलकर, ना. गो. ध्वनिविचार, पुणे, १९५५.

 

कालेलकर, ना. गो.