रास्क, रास्‌मुस क्रिस्ट्यान : (२२ नोव्हेंबर १७८७−१४ नोव्हेंबर १८३२). डॅनिश भाषाशास्त्रज्ञ. ब्रॅण्डेकिल्डे आउफ फ्यूनन (डेन्मार्क) येथे जन्म. त्याला शाळेत असल्यापासूनच व्याकरण विषयाची आवड होती. पुढेही त्याने ह्याच विषयाचा अभ्यास चालू ठेवून ⇨इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील भाषांचा व त्या कुटुंबाबाहेरच्या भाषांचाही अभ्यास करून त्यांवर महत्त्वपूर्ण लेखन केले. १८१६ ते १८३२ ह्या कालावधीत त्याने दीर्घ प्रवास केला. त्यावेळी त्याने भेट दिलेल्या देशांत इराण व भारत यांचा समावेश होता. भारतातून त्याने पाली व अवेस्ता भाषांत असलेली अनेक हस्तलिखिते कोपेनहेगनला नेली. १८२६ साली कोपेनहेगन येथे त्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. इन्व्हेस्टिगेशन ऑन द् ऑरिजिन ऑफ द ओल्ड नॉर्स ऑर आइसलँडिक लँग्वेज हा निबंध एका पारितोषिक स्पर्धेसाठी त्याने १८८४ साली लिहिला. १८१८ साली तो प्रसिद्ध झाला, तेव्हा तो अतिशय गाजला. इंडो-यूरोपियन भाषांच्या तुलनात्मक अभ्यासाचा शुभारंभ म्हणता येईल, अशा योग्यतेचा तो निबंध ठरला. ह्या निबंधात त्याने जर्मानिक, बाल्टिक, ग्रीक, लॅटिन आणि आर्मेनियन एवढ्या भाषा इंडो-यूरोपियन असल्याचे मानले. संस्कृत व प्राचीन इराणी, तसेच अल्बेनियन व केल्टिक ह्या भाषा इंडो-यूरोपियन कुटुंबातल्या आहेत की नाहीत, ह्याविषयी रास्क प्रथम साशंक होता पण नंतर त्याने त्या सर्व इंडो-यूरोपियन असल्याचे मानले.

दूरदूरच्या प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्या कोणत्या भाषा एका भाषाकुटुंबात समाविष्ट करता येतील, ते ठरविण्यासाठी त्या भाषांत आढळणाऱ्या शब्दासादृश्यांवर अवलंबून न राहता (कारण शब्दसादृश्य हे निरनिराळ्या कुटुंबातील भाषांनी केलेल्या शब्दांच्या देवाणघेवाणीमुळे देखील असू शकते) त्यांत व्याकरणविषयक सादृश्य आढळते का, ते तपासावयास हवे, ह्या मुद्यांवर रास्कने प्रथम भर दिला. अर्थात शब्दसाम्य त्याने अगदीच दुर्लक्षित केले नाही. भाषेतील ज्या शब्दांना आपण ‘पायाभूत’ म्हणू शकू (फाउंडेशन ऑफ लँग्वेज) अशा शब्दांच्या आधारेच ध्वनिपरिवर्तनाचे नियम ठरविता येतात, हे रास्कने ज्याला ‘जर्मानिक व्यंजनविपर्यय’ (कॉन्सोनंट शिफ्ट) म्हणतात, तद्विषयक नियम सिद्ध करून सोदाहरण दाखवून दिले.

तुलनात्मक भाषाशास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय जसे रास्ककडे जाते, तसेच त्याने आणखी एक श्रेय संपादिले आहे. आंकेतील द्यु पेराँ नावाच्या एका फ्रेंच गृहस्थाने १७७१ मध्ये पारशी धर्मग्रंथांचे पहिले यूरोपियन भाषांतले भाषांतर (झेंद अवेस्ता, ऊव्ह्राझ दे झोरोआस्त्र) तीन खंडात प्रथम प्रसिद्ध केले. त्यानंतर आंकेतीलने ज्या हस्तलिखितांच्या आधारे आपला ग्रंथ प्रसिद्ध केला, ती खरोखरी अवेस्ताची होती, की त्याला इथल्या पारशी धर्मगुरूंनी दुसरेच काही देऊन फसविले, त्याविषयी यूरोपात मोठा वाद सुरू झाला. त्याचा शेवट रास्कने १८२६ साली ‘ऑन द एज अँड ऑथेंटिसिटी ऑफ द झेंद लँग्वेज’ हा लेख लिहून केला. ह्या लेखात रास्कने आंकेतीलने प्रसिद्ध केलेल्या अवेस्तात आणि संस्कृतात आढळणारी महत्त्वाची भाषिक साम्यस्थळे अभ्यासकांच्या निदर्शनास आणली व आंकेतीलने बरोबर आणलेली हस्तलिखिते अस्सल असल्याचे सप्रमाण सिद्ध केले.

रास्कने ‘ओल्ड नॉर्स’ व ‘ओल्ड इंग्लिश’ या भाषांची व्याकरणे लिहीली. रास्कचा भाषाशास्त्राविषयक अभ्यास इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबापुरता मर्यादित नव्हता. भारतातील द्राविडी भाषासमूह (द्राविडीला त्याने मलबारी म्हटले आहे) हा संस्कृतहून निराळा असल्याचे त्याने प्रथम म्हटले. फिनो-उग्रिक ह्या भाषागटातील फिनिश व लॅपिश ह्या भाषांचाही त्याचा अभ्यास होता. लॅपिशचे व्याकरणही त्याने लिहिले आहे. कोपनहेगन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Jespersen, Otto, Language, its Nature, Development and origin Book I, London, 1949.

2. Pedersen, Holger Trans., Spargo, J. W. The Discovery of Language (Linguistic Science in the Nineteenth

Century), Bloomington, 1962.

मेहेंदळे, म. अ.