इंडो-यूरोपियन भाषाकुटुंब : शोध व व्याख्या : कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीपुढे ⇨ सर विल्यम जोन्स यांनी २ फेब्रुवारी १७८६ रोजी केलेल्या भाषणात मांडलेली एक कल्पना हा संस्कृत व तत्सम भाषांच्या तुलनात्मक अभ्यासाचा प्रारंभबिंदू होय. जोन्स हे व्यासंगी विद्वान असून त्यांचे भाषाप्रभुत्व असामान्य होते. भारतात न्यायाधीश म्हणून येण्यापूर्वी त्यांनी यूरोपातील व पश्चिम आशियातील अनेक भाषांचा अभ्यास केला होता. हिंदू धर्मशास्त्राची प्रत्यक्ष माहिती व्हावी या हेतूने ते ⇨ संस्कृत भाषा  शिकले. त्यामुळे ती भाषा व यूरोपातील ग्रीक, लॅटिन इ. भाषा, त्याचप्रमाणे फार्सी भाषा यांच्यातील साम्यस्थळे त्यांच्या चटकन नजरेत भरली. वर निर्देशिलेल्या भाषणात ते म्हणाले : ‘‘संस्कृत भाषा किती पुरातन आहे कोण जाणे, पण तिची घडण मात्र विलक्षण आहे. ग्रीकपेक्षा अधिक परिपूर्ण व लॅटिनपेक्षा अधिक समृद्ध आणि या दोघींपेक्षा अधिक उत्तम रीतीने संस्कारित असूनही क्रियापदांचे धातू व व्याकरणाची रूपे यांबाबत तिचे या दोघींशी केवळ योगायोगाने असणाऱ्या नात्यापेक्षा अधिक जवळचे नाते आहे. हे नाते इतके दृढ आहे, की या तीन भाषांचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही पंडिताला त्या आज अस्तित्वात नसलेल्या कोणत्या तरी एका मूळ प्रवाहापासून आल्याची खात्री पटल्याशिवाय राहणार नाही.’’

गॉथिक, केल्टिक व फार्सी यांनाही हे विधान लागू असण्याची शक्यता त्यांनी पुढे व्यक्त केली पण आपल्या या कल्पनेचा अधिक विस्तार त्यांनी केला नाही.

सतराव्या व अठराव्या शतकांत यूरोपियन विद्वानांचे लक्ष जगातील भाषिक विविधता व वैचित्र्य यांच्याकडे वेधले होते. भाषांचे नमुने गोळा करणे, व्याकरणे लिहिणे, भाषेचे मूळ शोधण्याचा प्रयत्‍न करणे इ. गोष्टी चाचपडत चालल्या होत्या कारण संशोधनकार्यासाठी लागणारा तात्त्विक आधार मिळाला नव्हता. जोन्स यांनी तो दिला.

श्लेगेल याने १८०८ मध्ये आपला संस्कृत भाषेवरील ग्रंथ प्रकाशित केला पण या भाषेच्या श्रेष्ठत्वाने तो इतका भारावून गेला होता, की त्याला ती इतर भाषांची जननीच वाटली. पण त्यानंतरच्या दशकात बोप, रास्क, ग्रिम इत्यादींच्या अभ्यासाने हा भ्रम दूर केला. ⇨ फ्रांट्स बोपने स्पष्टपणे सांगितले, की संस्कृत ही ग्रीक, लॅटिन इ. भाषांची जननी नाही. ही सर्व एकाच मूळ भाषेची भिन्नभिन्न परिवर्तने आहेत. मात्र या मूळ भाषेचे यथार्थ स्वरूप संस्कृतने प्रामाणिकपणे जतन करून ठेवलेले आहे.

बोपने व्याकरणाच्या रूपांकडे लक्ष दिले, तर ⇨ रास्‌मुस क्रिस्ट्यान रास्कने ते ध्वनिपरिवर्तनावर केंद्रित केले. ध्वनींचे परिवर्तन विशिष्ट नियमांनुसार होते, ही गोष्ट त्याच्या ध्यानात आली होती. रास्क, ⇨ याकोप ग्रिम व ⇨ कार्ल व्हेर्नर यांनी यांत काटेकोरपणा आणला. उदा., ग्रिमचा सिद्धांत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जर्मानिक-संबंधीच्या नियमावरून हे दिसून येते. या नियमाप्रमाणे इंडो-यूरोपियन अघोष स्फोटक प, त, क यांचे फ, थ, ख हे घर्षक बनतात, सघोष स्फोटकांचे अघोष होतात आणि महाप्राण स्फोटकांचे सघोष अल्पप्राण स्फोटक बनतात. ओल्ड हाय जर्मनमध्ये घर्षकांचे सघोष स्फोटक, अघोष स्फोटकांचे घर्षक आणि सघोष स्फोटकांचे अघोष स्फोटक बनतात.

या नियमाप्रमाणे पुढील उदाहरणे देता येतील :

  ग्रीक                              गॉथिक

पोउस् (पोदोस्)               फोःतुस् (पाय)

त्रेइस्                              थ्रेइस् (तीन)

कार्दिआ                         खाइर्तोः (हृदय)

देका                              ताइखुन् (दहा)

गेनोस्                            कुनि (जन)

फेरोः                              बाइरान् (भर)

थुगातेःर                         दाउख्तार् (मुलगी)

खोर्तोस्                          गार्द्‌स् (यार्ड)

अशा रीतीने सबंध ध्वनिपद्धतीमागील परिवर्तनाची तत्त्वे उलगडताना आलेल्या अडचणी अपवाद म्हणून दूर न सारता त्यामागे असलेले विशिष्ट कारण शोधण्याचे प्रयत्‍न सुरू झाले आणि त्यातूनच ध्वनिपरिवर्तनाचे नियम निरपवाद असतात, हे तत्त्व पुढे आले. व्हेर्नरने ग्रिमच्या सिद्धांतामधील अपवादात्मक वाटणाऱ्या गोष्टींचा खुलासा ज्या रीतीने केला त्यावरून हे सिद्ध होते.

संस्कृतला आदर्श मानणारा पूर्वग्रह दूर होताच अनेक गोष्टींचा खुलासा झाला आणि तुलनात्मक पुराव्याला महत्त्व मिळून एका विशिष्ट भाषेची मक्तेदारी नष्ट झाली. त्यामुळेच ⇨ फेर्दिनां द सोस्यूर  यांना इंयू. (इंडो-यूरोपियन) स्वरांच्या पद्धतीवर योग्य तो प्रकाश टाकता आला. त्याप्रमाणेच इंयू. मधील धातूंची व्यंस्वव्यं. (व्यंजन-स्वरव्यंजन) ही बांधणी ग्राह्य मानून ज्या ठिकाणी प्रारंभी किंवा शेवटी व्यंजन सापडत नाही, अशा धातूत ते पुनर्घटित करण्याची सूचना त्यांनी केली. उदा., सद् (इंयू. सेद्), गम् (इंयू. ग्वेम्), भर् (इंयू. भेर्) यांच्याबरोबरच अज्, स्था, अस्, धा इ. धातू सापडतात. यांतील स्वरादी धातूंतील आद्य व्यंजन व स्वरान्त धातूंतील अंत्य व्यंजन नाहीसे झाले असले पाहिजे, असा तर्क त्यांनी केला आणि हिटाइटचा शोध लागल्यानंतर या तर्काची सत्यता कुरिळोविच यांनी दाखवून दिली.

अशा रीतीने ज्या भाषांचा परस्परांशी असलेला संबंध, साम्य अथवा भेद, परस्पर तुलनेने समजावून घेता येतो, नियमांनी व्यक्त करता येतो, संकल्पित आद्यरूपावर तो आधारलेला आहे, असे दाखवून देता येते त्या भाषांना एका कुटुंबातील भाषा म्हणतात. असा संबंध ग्रीक व जर्मानिकमध्ये आहे, संस्कृत व ग्रीकमध्ये आहे, ⇨लॅटिन  भाषेत व संस्कृत भाषेत आहे आणि इतरही अनेक भाषात आहे.

पण हा संबंध केवळ ध्वनीची व व्याकरणाची रूप यांच्यापुरताच मर्यादित नसतो. तो आशयात किंवा सांस्कृतिक क्षेत्रातही सापडतो. नाते, शरीराचे भाग, संख्या, मूलभूत पदार्थ व क्रिया इ. व्यक्त करणाऱ्या शब्दांतही तो आढळून येतो. किंबहुना अशा प्रकारचे सान्निध्य लक्षात आल्यामुळे भाषिक संबंध नक्की करता येतात. सांस्कृतिक देवाणघेवाण, परभाषेचा संपर्क, परिवर्तनाची तीव्रता यांमुळे ते पुसट होतात, पण त्यांचे नाते न ओळखता किंवा न पटवता येण्याइतके नाहीसे होत नाहीत.

संस्कृत, प्राचीन इराणी, ग्रीक, लॅटिन, जर्मानिक, केल्टिक, आर्मेनियन, अल्बेनियन, तोखारियन, हिटाइट, स्लाव्हिक, बाल्टिक या भाषासमूहांतील संबंध अशा प्रकारचे आहेत. म्हणून त्या एका कुटुंबातील भाषा आहेत आणि या कुटुंबालाच ‘इंडो-यूरोपियन’ हे नाव आहे. दुसरे विशेष परिचित नाव इंडो-जर्मानिक हे आहे आणि इंडो-हिटाइड हे नाव अधिक योग्य होय, असे काहींचे म्हणणे आहे.

इंयू. मधील भाषासमूह: () इंडोइराणियन समूह : यात वैदिक (१५००–१२०० ख्रि. पू.) व ⇨ अवेस्ताची प्राचीन इराणी भाषा (१०००–६०० ख्रि. पू.) यांचा समावेश होतो. इंयू.  या तिन्ही स्वरांचा एकमेव आ बनणे,  व मृदुतालव्य व्यंजनानंतर  चा  होणे, षष्ठी बहुवचनाचा नाम हा प्रत्यय, उकारान्त आज्ञार्थ एकवचन व अनेकवचन ही या वैशिष्ट्ये आहेत [→ इराणी भाषासमूह].

(२) ग्रीक : यात अनेक पोटभेद असून ते सर्व वापरले जात. होमरचे काव्य ख्रि. पू. ८५० च्या सुमाराचे आहे. या भाषेत ऋ, ॡ यांचे अर्, रा, अल्, ला होतात. भ, ध, इत्यादी महाप्राणांचा अभाव,  व आधीच्या स्फोटकांचा एकजीव होतो, स्वरमध्यस्थ  चा लोप होतो [→ ग्रीक भाषा].

(३) इटालिक समूह : स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, इटालियन, रूमानियन इ. भाषांचा पूर्वज. इटालिक भाषासमूहाच्या ऑस्कन-अंब्रियन व लॅटिन फॅलिस्कन या दोन शाखा आहेत. ख्रि. पू. २०० च्या सुमारापासून मिळालेल्या शिलालेखांत ऑस्कनचा उपयोग आढळतो. अंब्रियनचा पुरावा त्यानंतर शंभर वर्षांनी मिळतो. लॅटिन ख्रि. पू. सहाव्या शतकापासून उपलब्ध होते, पण भरपूर पुरावा मात्र चारशे वर्षांनंतर मिळू लागतो.

इटालिक इंयू., अवयवक्षम न, म, र, ल् यांचे अनुक्रमे एन्, एम्, ओर, ओल् होतात. त्ल चा क्ल होतो. , ध, घ यांचे क, थ, ख होतात. स्वरमध्यस्थ चा आधी व पुढे होतो [→ इटालिक भाषासमूह].

(४) केल्टिक समूह : या समूहात गॉलिश, ब्रिटिश (वेल्श, कॉर्निश, ब्रतों) व गाँयडेलिक (आयरिश, स्कॉच गेलिक, मांक्स) यांचा समावेश होतो. जुन्यात जुना पुरावा आयरिशचा असून तो पाचव्या शतकापासून उपलब्ध होतो.

केल्टिकमध्ये इंयू. ची होते. यांचे रिलि होतात. आद्य व स्वरमध्यस्थ नाहीसा होतो, ग्व चा होतो [→ केल्टिक भाषासमूह].

(५) जर्मानिक समूह : यात गॉथिक, नॉर्थ जर्मानिक (आइसलँडिक, नॉर्वेजियन इ.) व वेस्ट जर्मानिक (हाय जर्मन, लो जर्मन, अँग्‍लो-सॅक्सन, इंग्‍लिश, डच इ.) या शाखांचा समावेश होतो. गॉथिकचा सर्वांत जुना पुरावा चौथ्या शतकापासून मिळू शकतो.

जर्मानिकमध्ये इंयू. न्, म्, र्, ल् स्वरांचे उन्, उम्, उर, उल् होतात. व्यंजनांच्या परिवर्तनाची दिशा वर आलेली आहे. न्व चा न्न होतो [→जर्मानिक भाषासमूह].

(६) बाल्टिक समूह : यात दोन शाखा आहेत. पहिली पश्चिमेकडची. तीत ओल्ड प्रशियनचा समावेश होतो. ही भाषा अठराव्या शतकात नष्ट झाली. पूर्वेकडील शाखेत लिथ्युएनियन व लॅटव्हियन (लेटिश) येतात. सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ओल्ड प्रशियन व लिथ्युएनियन यांच्यातील पुरावा मिळू लागतो [→ बाल्टिक भाषासमूह].

(७) स्लाव्हिक समूह : याच्या तीन शाखा आहेत. दक्षिण (बल्गेरियन, सर्बो-क्रोशियन व स्लोव्हीनियन), पश्चिम (चेक, स्लोव्हाक, पोलिश व वेंदिश) व पूर्व (ग्रेट रशियन, व्हाइट रशियन किंवा ब्येलो-रशियन व युक्रेनियन). जर्मानिक भाषांपेक्षा स्लाव्हिक भाषांमधील फरक सौम्य आहेत.

बाल्टिक व स्लाव्हिक यांच्या संयुक्त समूहाला बाल्टो-स्लाव्हिक हे नाव आहे. इंयू. स्वराचा लिथ्युएनियनमध्ये इन व स्लाव्हिकमध्ये एं होतो. चा इर होतो. स्वरमध्यस्थ व्यंजनयुग्मांची साधी व्यंजने होतात. विशेषणानंतर यो हे सर्वनाम जोडून निश्चयार्थक विशेषण तयार होते [→ स्लाव्हिक भाषासमूह].

(८) आर्मेनियन समूह : या भाषेचा पुरावा पाचव्या शतकापासून मिळतो. ग्रंथगत भाषेला प्राचीन आर्मेनियन हे नाव आहे. अर्वाचीन आर्मेनियनच्या दोन शाखा असून पूर्व आर्मेनियन रशियात, इराणमध्ये आणि पश्चिम आर्मेनियन तुर्कस्तानात बोलली जाते.

आर्मेनियन अंत्य नसल्यास लोप पावतात. इंयू. , या स्वरांचे अन्, अम्, होतात, सघोष व्यंजने अघोष होतात [→ आर्मेनियन भाषा-साहित्य].

(९) अल्बेनियन : चौदाव्या शतकातील काही भाषांतरित धार्मिक साहित्यानंतर सतराव्या शतकाच्या शेवटापासून अल्बेनियनचा पुरावा मिळू लागतो. या भाषेचे दोन पोटभेद आहेत : उत्तरेकडे गेग व दक्षिणेकडे टास्क.

या भाषेत इंयू. चा होतो, चा होतो, चा होतो, अनुनासिकानंतर आलेले अघोष सघोष होतात [→ अ‍ल्बेनियन भाषा-साहित्य].

(१०) तोखारियन : १९०४ मध्ये चिनी तुर्कस्तान या मध्य आशियातील प्रदेशात सापडलेल्या काही लिखित पुराव्यावरून तिथल्या एका भाषेचा शोध लागला आणि ही भाषा इंडो-यूरोपियन कुटुंबातील आहे, अशी अभ्यासकांची खात्री पटली. हा पुरावा इ. स. च्या सहाव्या शतकाइतका जुना आहे. तिच्या भिन्न अशा दोन बोली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

या भाषेत इंयू. क, ग, घ बदलले नाहीत म्हणून ती इंयू. च्या पश्चिम गटाला (ग्रीक, लॅटिन इ.) जवळची आहे. कर्मणी प्रयोगात ती चा वापर करते [→ तोखारियन भाषा-साहित्य].

(११) हिटाइट : १९०६ मध्ये मध्य ॲनातोलियामधील बोगाझकई या ठिकाणी जवळजवळ दहा हजार विटा सापडल्या. त्यांवर हिटाइट साम्राज्याचे लेख बाणाग्र चिन्हांनी कोरलेले सापडले. हे लेख २,००० ते १,३०० ख्रि. पू. इतके जुने असावेत.

या भाषेतही इंयू. च्या जागी च येतो आणि कर्मणी प्रयोगाचे चिन्ह आहे. तिचा शोध लागल्यामुळे सोस्यूर यांनी सूचित केलेला ‘लॅरिंजल’ या संज्ञेने ओळखला जाणारा वर्ण काल्पनिक नाही, हे सिद्ध झाले.

तोखारियन व हिटाइट या आता मृत भाषा आहेत, पण इतर इंयू. भाषांची परंपरा मात्र अजून अखंडित आहे [→ हिटाइट भाषा-साहित्य].

इंडो-यूरोपियनची ध्वनिपद्धती :

                                                स्वर

ऱ्हस्व – आ, इ, उ, ए, ओ, अ*.

दीर्घ – आ, ई, ऊ, ए, ओ.

संयुक्त – आइ, अइ, आउ, अउ, एइ, एउ, ओइ, ओउ, (आ, ए, ओ ऱ्हस्व व दीर्घ). *सं. पितर, लॅ. पातेर यांत सं. इ व लॅ. यांचा पुनर्घटित स्वर. याशिवाय र, ल, म, न यांचा स्वरांसारखा उपयोग होत असे आणि यांचा व्यंजनासारखा होत असे.

                                           व्यंजने

स्फोटक : ओष्ठ्य – प, फ, ब, भ.

दंत्य – त, थ, द, ध.

तालव्य – च, छ, ज, झ.

मृदुतालव्य – क, ख, ग, घ.

ओष्ठ्यमृदुतालव्य – क, ख, ग, घ.

घर्षक : स, झ.

अर्धस्वर : य, व.

कंपक : र.

पार्श्विक : ल.

अनुनासिक : म, न, ञ, ङ.

गुंतागुंतीची संयुक्त व्यंजने किंवा व्यंजनयुग्मे आढळत नाहीत. शिवाय कोणतेही व्यंजन शब्दारंभी येऊ शकते. कोणतेही व्यंजन स्वरांच्या मध्ये येऊ शकते. महाप्राण, ओष्ठ्यमृदुतालव्य व ओष्ठ्यस्फोटक शब्दान्ती येत नाहीत. व्यंजनत्रयीत आरंभी स शेवटी र किंवा ल असतो. धातूत अघोष स्फोटक व सघोष महाप्राण स्फोटक परस्परांमागून येत नाहीत.

ऱ्हस्वदीर्घत्वाचा निर्णायक उपयोग फक्त स्वरांपुरताच मर्यादित आहे. त्याचप्रमाणे आघाताचा उपयोगही शब्दाचे वाक्यातील कार्य निश्चित करण्याकडे होतो.

रूपपद्धती: या भाषेत दोन प्रकारची रूपे आहेत : विकाररहित व विकारयुक्त. क्रियाविशेषणे, पूर्वपदे, जोडरूपे यांसारखी विकाररहित रूपे विकारयुक्त रूपांच्या तुलनेने फारच कमी आहेत. धातू स्पष्टपणे जाणवत नाही, पण त्याचा अर्थ मात्र जाणवतो. व्याकरणविषयक कार्य नसणारी केवळ अर्थदर्शक स्वतंत्र रूपे नाहीत. रूपांच्या बरोबर त्यांची कार्यदर्शक चिन्हे असलीच पाहिजेत. रूपाचे दोन भाग असतात : मूळ अर्थदर्शक भाग (धातू) व व्याकरणविषयक माहिती पुरवणारा प्रत्ययादी भाग. त्याची घडणही आघात व स्वरविकार या तत्त्वांनी निश्चित केलेली असते. स्वरविकार ए/ओ/० यांच्या विशिष्ट वापरात दिसून येतो. रूप हे धातू व प्रत्यय यांच्या व्यवस्थेने स्वायत्तही असते आणि प्रत्ययाच्या विधानातील विशिष्ट संबंधामुळे वाक्याचाही घटक असते.

नाम व क्रियापद ही स्प्टपणे भिन्न आहेत. अर्थात एक धातू कार्यपरत्वे नाम किंवा क्रियापद असू शकतो. पण नामाचे विभक्तिप्रत्यय व क्रियापद बनविण्यासाठी वापरले जाणारे प्रत्यय अगदी वेगवेगळे आहेत. दोन रूपांपधील भेद फक्त प्रत्ययांतील भेदानेच व्यक्त होतो. एकच प्रत्यय एकाच वेळी अनेक कार्ये करू शकतो.

विशेषण व नाम या दोघांनाही विकार होतात पण नामाचे लिंग स्वत:सिद्ध असते, तर विशेषणाचे प्रत्ययसिद्ध असते. धातूंपासून नामे बनवण्याचे अनेक प्रकार आहेत.

नामाचे सचेतन (पुरुषवाचक व स्त्रीवाचक) व अचेतन असे दोन वर्ग आहेत.

दोन नामवाचक धातूंचा समास बनवता येतो. त्यात आद्यस्थानी असलेल्या धातूला कोणताही विकार होत नाही.

पुरुषवाचक सर्वनाम नामापेक्षा काही बाबतींत भिन्न असते. त्याची रूपे एकवचन व अनेकवचन यांत भिन्न असतात, त्याचप्रमाणे प्रथमेपेक्षा इतर विभक्तींत वेगळी असतात. काही रूपे आघातयुक्त व काही आघातरहित असतात.

दर्शक विशेषणांची रूपे अंशत: नामासारखी व अंशत: सर्वनामांसारखी असतात.

कर्त्याचा कृतीशी असलेला संबंध व्यक्त करणे हे इंयू. क्रियापदाचे लक्षण आहे. इथे कर्माला जागा नाही. क्रियापद हे एकाच विशिष्ट रूपावर आधारलेले नाही. विकारक्षम रूपे अनेक प्रकारची असून त्यांचा प्रत्ययाशी संयोग होताना अनेक घडामोडी होतात : धातूवर आधारलेली अनद्यतनाची रूपे, वर्तमान व भूत यांची रूपे, द्वित्वयुक्त रूपे, प्रयोजक, इच्छादर्शक रूपे इत्यादी. ती कालदर्शक नसून अवस्थादर्शक असतात. चालू, पूर्ण, केवल इत्यादी.

प्रयोग दोनच आहेत : आत्मनिष्ठ व परनिष्ठ. कर्मणी प्रयोग हा प्रत्येक भाषेत नंतर स्वतंत्रपणे आला.

शब्द हा प्रत्ययादी चिन्हांमुळे स्वयंपूर्ण असल्यामुळे वाक्यारचनेत त्याला स्वातंत्र्य आहे कारण त्याचे कार्य वाक्यातील त्याच्या स्थानावर अवलंबून नाही. पण रूपांच्या परस्परावलंबित्वाचे नियम कडक आहेत. पुढे क्रियापदांशी एकरूप झालेले उपसर्ग अजूनतरी स्वतंत्र क्रियाविशेषणांसारखे वापरले जातात.

वाक्यात महत्त्वाचे शब्द सुरुवातीला येतात. कमी महत्त्वाचे शब्द पुष्कळदा आघातरहित असतात. दोन वाक्ये संबंधी सर्वनामाचा उपयोग करून जोडली जाऊ शकतात. प्रश्नवाचक स्वतंत्र शब्द नाही ते काम सर्वनामाकडून होते. नकार ने (सं. न) या शब्दाने व प्रतिषेध मे: (सं. मा) किंवा ने: या शब्दाने व्यक्त होतो. हिटाइटमध्ये ले: वापरला जातो.

संख्यापद्धती दशमूलक आहे. एक ते दहापर्यंतच्या आकड्यांना स्वतंत्र शब्द आहेत. त्यांतील पहिले चार विशेषणासारखे वापरले जातात. दहाच्या पुढचे दशकदर्शक आकडे संख्येला दहाचे निदर्शक रूप जोडून होतात (सं. विंशत् द्विंशत्—दोन दहा). ही मोजणी शंभरपर्यंत जाते व नऊशेपर्यंत दशकाप्रमाणेच शब्द बनतात. क्रमवाचक शब्द संख्यावाचकांना प्रत्यय लावून बनतात. काही भाषांत द्वादशमूलक पद्धती असावी. तिथे १०० याचा अर्थ १२० असा होतो.

ही सर्व भाषिक पद्धती वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळ्या दिशांनी बदलली. ध्वनिपद्धतीत सर्वत्र सुलभीकरणाकडे (विशेषत: व्यंजनांच्या) कल दिसतो. ओष्ठ्यमृदुतालव्य स्फोटक नाहीसे झाले, स्फोटकांच्या सैल उच्चारामुळे काही भाषांत घर्षक निर्माण झाले, व्यंजनयुग्मे आली, स्वर व व्यंजने अशी दोनही कार्ये करणारे ध्वनी कोणतेतरी एकच कार्य करू लागले, संयुक्त स्वर आखूड झाले. काही भाषांत स्वरपद्धती अधिक समृद्ध झाली, तर संस्कृतसारख्या भाषेत ती खालावली.

सर्वांत महत्त्वाचे परिवर्तन उच्चारणपद्धतीत झाले. काही भाषांत आघात नष्ट झाला, काहींत तो निश्चित अवयवांवर स्थिर झाला, त्यामुळे भाषेचा तोल नाहीसा होऊन एकंदर शब्दरचना बदलली.

रूपपद्धती सोपी व नियमबद्ध झाली. स्वरविकाराची गुंतागुंतीची पद्धत सर्वत्र मागे पडली. नाम व क्रियापद जास्त सुसंघटित झाली. त्यांत अंतर्गत सुसंगती आली. विभक्तिप्रत्यय कमी होत जाऊन त्याऐवजी सहायक शब्द आले. शब्दाच्या शेवटचा अवयव क्षीण होत गेल्यामुळे किंवा नष्ट झाल्यामुळे असे सहायक शब्द वापरणे किंवा नवे प्रत्यय निर्माण करणे भाग पडले. प्रत्ययरहित नाम हा केवळ कल्पनावाचक विशिष्ट कार्य नसलेला शब्द बनला. हे परिवर्तन मूळ इंयू. प्रकृतीच्या अगदी उलट आहे.

जगातील सर्व भाषांचा विचार करता आज इंयू. कुटुंबीय भाषाच सर्वांत आघाडीवर आहेत, असे दिसून येते. भाषिक अभिव्यक्तीचे अत्यंत सामर्थ्यवान दर्शन त्यांच्यात आपल्याला घडते. त्यांचे साहित्य क्षेष्ठ प्रतीचे आहे आणि अत्यंत सूक्ष्म मानसिक व्यापार किंवा तांत्रिक गोष्टी सांगण्याची शक्ती त्यांत आहे. यूरोप-आशियाच नव्हे, तर आफ्रिकेचे काही भाग, ऑस्ट्रेलिया व आसपासचा प्रदेश आणि अमेरिका यांत त्या भाषा पसरल्या आहेत. वांशिक गुण आणि भाषेचे सामर्थ्य यांचा हा परिपाक आहे.

संदर्भ :  1. Brugmann, Karl, Kurze Vergleichende Grammatik der Indo-Germanischen Sprachen, Paris, 1906.

2. Meillet, Antoine Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris, 1954.

3. Meillet, Antoine, Introduction a l’Etude Comparative des Langues Indo-Europe’ ennes, Paris, 1973.

कालेलकर, ना. गो.