सिनो-तिबेटी भाषा समूह : (चिनी-तिबेटी भाषासमूह). अठराव्या शतकाचा उत्तरार्ध व एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध या काळात पाश्चात्त्य संशोधकांनी हिमालय, उत्तर-पूर्व भारत, चीन आणि त्या दरम्यानचा प्रदेश येथील अनेक भाषांचे निरीक्षण करुन लघुव्याकरणे व लघुकोश तयार केले. त्यात त्यांना नव्या भाषा आढळल्या आणि इंडो -यूरोपियन व सेमिटिक या ज्ञात भाषासमूहांसारखा एक नवा भाषासमूह असल्याचे जाणवले मात्र यात लिपिबद्घ भाषा थोड्या आहेत (चिनी, तिबेटी, ब्रह्मी, नेवारी, मेईथेई किंवा मणिपुरी, थाई) आणि तुल्य शब्दार्थरुपांच्या जोड्यांवरुन पूर्वप्रतिमान करणे सोपे नाही हेही जाणवले.

सुमारे १०,७४० लक्ष सिनो-तिबेटी भाषक लडाख ते बँकॉक व बीजिंग एवढ्या मोठ्या प्रदेशात आणि पूर्व मांचुरिया, दक्षिण-पूर्व आशिया, ओशिॲनिया, उत्तर व दक्षिण अमेरिका यांतून विखुरलेल्या वसाहतींमधून पसरलेले आहेत. ते चार शाखांतून विभागलेल्या भाषा बोलतात :

(१) सिनिटिक : या शाखेत तीन उपशाखा येतात : तिबेटी, ब्रह्मी आणि बोडो-गारो. त्यात उत्तर चीनमधील प्रमाण चिनी आणि दक्षिणेकडील विविध बोली येतात. सर्व मिळून ९,६०० लक्ष भाषक आहेत.

(२) तिबेटी-ब्रह्मी : तिबेटी शाखेत मध्य, दक्षिण, उत्तर, पश्चिम गटांतील तिबेटी बोली (ज्यातील बाल्टी, लडाखी, सिक्किमी इ. भारतात आणि गुरुंग बोली नेपाळमध्ये आढळतात), कनौरी-अल्मोडी गटातील हिमालयातल्या बोली, बाहिंग-वायु गटातील मध्य व पूर्व नेपाळमधील बोली, मीरी-डफला गटातील अरुणाचलातील बोली, शिवाय नेपाळमधील नेवारी, दार्जिलिंगमधील धिमाल इ. येतात. ब्रह्मी शाखेत ब्रह्मी -लोलो गटातल्या म्यानमार आणि त्याच्या उत्तर-पूर्वेकडील संलग्न प्रदेशात काचिन गटातल्या म्यानमार, उत्तर-पूर्व भारत आणि चीनमधल्या युनान प्रांतात कुकिचिन गटातल्या कुकी बोली म्यानमार, भारत, बांगलादेश सीमा-प्रदेशात नागा बोली नागालँड, त्याला संलग्न म्यानमारमध्ये आढळतात. मणिपूरची मेईथेई याच गटात येते. बोडो-गारो शाखेत बोडो-दिमासा आसाममध्ये, तर गारो मेघालयमध्ये आढळतात. एकूण पाच कोटी भाषक.

(३) कारेन शाखा : या शाखेत म्यानमारमधील कारेन प्रांत आणि संलग्न थायलंडमधल्या कारेन बोली येतात. एकूण २५ लक्ष भाषक.

(४) थाई-कादाई शाखा : या शाखेतील थाई गटातील दक्षिण-पश्चिम, मध्य आणि उत्तर थाई बोली थायलंड, म्यानमारमधला शान प्रांत, लाओस, उत्तर व्हिएटनाम आणि दक्षिण-पश्चिम चीनमध्ये बोलल्या जातात. त्यांच्यात थाई आणि लाओ ह्या राष्ट्रभाषा समाविष्ट आहेत. कादाई-कामसुई गटातील बोली दक्षिण-पश्चिम चीनमध्ये बोलल्या जातात. एकूण ६४० लक्ष भाषक. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील या शाखेतील आहोम जमातीची बोली आज नामशेष झाली आहे.

कारेन-ब्रह्मी-बोडो-खासी-तिबेटी-चिनी-थाई-कादाई अशी एक भाषांची साखळी दाखविता येत असली, तरी या चार शाखांमधले संबंध निश्चित करणे सोपे नाही. कोणती साम्ये एका समान परंपरेच्या विभाजनामुळे आणि कोणती भिन्न परंपरांच्या आदान-प्रदानामुळे उत्पन्न झाली आहेत हेही सांगणे कठीण आहे. कारेन शाखेचे ⇨ ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील मॉन-ख्मेर गट आणि थाई-कादाई शाखेचे ⇨ मलायो-पॉलिनीशियन भाषाकुटुंबातील मलेशियन गटाशी साम्य लक्षणीय आहे. दक्षिण-पश्चिम चीन आणि संलग्न दक्षिणेकडील प्रदेश यांतील मियाओ आणि याओ भाषा कदाचित सिनो-तिबेटी असतील.

वर्णव्यवस्था : अक्षरे (सिलबल) सुटी उच्चारण्याकडे आणि शब्दरुप एकाक्षरी ठेवण्याकडे कल आहे. मध्ये स्वर, कधी त्याच्या आगेमागे अर्धस्वर, बहुधा अक्षराच्या आरंभी बरेच व्यंजन-पर्याय आणि अक्षराच्या अंती थोडे व्यंजन-पर्याय आणि शिवाय बऱ्याच भाषारुपांतून (नेवारी एक ठळक अपवाद) अक्षर-सुर अशी त्या अक्षराची रचना असते. क्वचित स्वराच्या जागी अर्ध-व्यंजन असते. अक्षर-सुरांचे कोशगत शब्द आणि व्याकरणातील प्रत्यय व्यवच्छिन्न ठेवण्याचे काम करतात (शिवाय इतर भाषांमध्ये सामान्यतः असतात तसे वाक्य-सुर असतातच).

पदव्याकरण : शब्दरुपाला शब्दरुप जोडून किंवा स्वरादेश करुन अर्थसंकलन करण्याची प्रवृत्ती आहे (उदा., घेणे-येणे म्हणजे आणणे, दोन-प्राणी-कुत्रा म्हणजे कुत्रा जातीचे दोन प्राणी, दोन-दहा-तीन म्हणजे तेवीस). पदांच्या जाती मुख्यतः तीन द्रव्य-पद, गुण-क्रिया-पद आणि संबंध-विधा-पद – कधी एकच शब्दरुप दोन जातींत दिसते.

वाक्य-व्याकरण : सिनिटिक आणि कारेन शाखांत कर्ता-क्रिया-कर्म आणि विशेषण-विशेष्य असा पदक्रम असतो. तिबेटी-ब्रह्मी शाखेत कर्ता-कर्म-क्रिया आणि विशेष्य-विशेषण पदक्रम असतो. थाई-कादाई शाखेत कर्ता-क्रिया-कर्म आणि विशेष्य-विशेषण पदक्रम असतो. परविकारांपेक्षा पदक्रम आणि संबंध-विधा-दर्शक यांच्यावर वाक्य-व्याकरणाची अधिक भिस्त असते.

शब्दसंग्रह : परकीय भाषेतून प्रत्यक्ष आदान केले तर, त्याचे शब्दरुप स्वकीय वाटेल असे केले जाते (उदा., संस्कृत ध्यान, चिनी घिथान) किंवा अनुवाद केला जातो (उदा., इंग्रजी टेलिफोन, चिनी तियेन-हुआ म्हणजे पदशः वीज-बोलती). प्राचीन ऑस्ट्रो-आशियाई, प्राचीन इंडो-यूरोपियन, संस्कृत व पाली आणि इंग्रजी या भाषांतून आदान झालेले आहे.

लेखनव्यवस्था : चिनी लिपी किंवा तिच्यावर आधारलेल्या लिपी कुंचल्याचे फटकारे एका चौकोनात बसवून एकक लिपिचिन्ह, एका-खाली एक लिपिचिन्हांची ओळ आणि उजवीकडून डावीकडे उभ्या ओळी अशा या लिपी दिसतात आणि लिपिरुप अर्थरुपाला जोडणे, अर्थरुपाला प्रचलित शब्दरुप जोडणे अशा वाचल्या जातात. भारतीय लिप्यांवर आधारलेल्या लिपी (उदा., ब्रह्मी, मेईथेई, थाई, नेवारी, तिबेटी) स्वराक्षर, स्वरमाला आणि व्यंजनाक्षर यांनी बनलेल्या डावीकडून उजवीकडे, वरुन खाली आडव्या ओळी अशा लिहिलेल्या दिसतात. त्या वाचताना मात्र त्या त्या भाषेच्या वर्णव्यवस्थेशी जुळवून घेतल्या जातात (उदा., थाई लिपीत ‘महाप्राण’ व्यंजनांचा उपयोग नसल्याने ते ते व्यंजनभेद सुरभेद दाखवण्याच्या कामी येतात).

चिनी आणि भारतीय संस्कृतींचा या भाषा आणि त्यांमधले वाङ्मय यांच्यावर प्रभाव दिसतो.

संदर्भ : 1. Benedict, Paul, Sino-Tibetan : A Conspectus, Cambridge, 1972.

2. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vols. 3, 1909.

3. Kuei Li, Fang, The Tai and The Kam-Sui Languages, Lingua : 14 : 148 179, 1965.

4. Lebar, Frank M. Hickey, Gerald C. Musgrave, John K. Ethnic Groups of Mainland Southeast Asia, 1964.

5. Shafer, Robert, Introduction to Sino-Tibetan, Vols. 5, Wiesbaden (Ger.), 1966–74.

6. Voegelin, C. F. Voegelin, F. M. Languages of the World : Sino-Tibetan Anthropological Linguistics, 6-7, Baltimore, 1964-65.

केळकर, अशोक रा.