भाषांतर : भाषेचा वापर म्हणजे भाषाव्यवहार. भाषाव्यवहार हा तीन प्रकारचा: बोलणारा व लिहिणारा अर्थप्रेषण करतो तर ऐकणारा वा वाचणारा अर्थग्रहण करतो परंतु काहीवेळा एकच व्यक्ती प्रथम अर्थग्रहण करून नंतर त्याला अनुसरून अनुप्रेषण करते. ते अर्थाकडे लक्ष न देता केले म्हणजे अनुप्रस्तुती होते. उदा., ऐकलेले पाठ म्हणून दाखवणे, देवनागरीतील मजकूर रोमन लिपीत उतरवणे. पण अर्थ लक्षात घेऊन ते केले म्हणजे अनुवाद होतो. उदा., त्याच भाषेत गोषवारा सांगणे. परंतु साधारणतः अनुवाद म्हणजे दुसऱ्या भाषेत अनुवाद असे आपण समजतो. अन्यभाषिक अनुवादालाच ‘भाषांतर’ असेही म्हणतात.

भाषांतराचे व्यावहारिक संदर्भ निरनिराळे असू शकतात. भाषांतर हे मौखिक वा लेखी असेल त्वरित किंवा सावकाश केलेले असेल. जेव्हा दोन भिन्न-भाषीय व्यक्ती भेटतात, किंवा भिन्न-भाषीयांची सभा भरते, तेव्हा दुभाषा उपस्थित करावा लागतो. तो तत्काळ तोंडी भाषांतर करतो. वृत्तपत्रीय बातम्यांच्या भाषांतराचे स्वरूपही असेच कामचलाऊ असते. अर्थात अशा भाषांतरामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. अमेरिकेने जपानला पाठवलेल्या निर्वाणीच्या खलित्याचे जपानी भाषांतर चुकले आणि अणुबाँब टाकण्यात परिणती झाली. एका भाषेतील ग्रंथ वा लेख दुसऱ्या भाषेत लिखित स्वरूपात उपलब्ध करताना भाषांतराला वेळ मिळतो, त्याबद्दलच्या अपेक्षाही वाढतात आणि त्याचे परिणामही दूरगामी होऊ शकतात. धार्मिक, साहित्यिक किंवा शास्त्रीय लिखाणाच्या बाबतीत ही गरज विशेषतः उत्पन्न होते. बायबलचा किंवा बौद्ध धर्मग्रंथांचा प्रसार संस्कृत आणि ग्रीक वाङ्‍मयाची अरबी, फारसी भाषांतरे ग्रीक, लॅटिन, संस्कृत, अरबी यांसारख्या अभिजात भाषांतून त्यांना अनुसरणाऱ्या आधुनिक भाषांतील भाषांतरे आणि आधुनिक पाश्चात्त्य ज्ञान, साहित्य व तंत्रविद्या ह्यांचा जगभर प्रसार आणि त्यामुळे इतर भाषांना घ्यावा लागणारा प्रतिशब्दांचा शोध ही काही ठळक उदाहरणे ह्या ठिकाणी देता येतील.

भाषांतराबद्दल सामान्य माणसाची धारणा असते, की भाषांतर म्हणजे मजकूर तोच ठेवायचा, फक्त एका भाषेचा पोषाख उतरवून ठेवायचा आणि दुसऱ्या भाषेचा पोशाख चढवायचा. जणू काही- 

 रूप १ ⟶ अर्थ ⟶ रूप २.

पण भाषांतरकार्यातील अडचणी आणि धोके दिसून भाषांतरकर्ता हा नुसता भारवाही नसून अवघड आणि जबाबदारीचे काम करणारा कलाकार आहे, हे जेव्हा ध्यानात येते तेव्हा दुसऱ्या टोकाला जाऊन खरे भाषांतर अशक्य आहे, असे म्हणण्याची वृत्ती होते. इटॅलियन भाषेत तर म्हणच आहे, की ‘त्रादुत्तोरे त्रादितोरे’ (भाषांतरकर्ते तेवढे घातकर्ते). वास्तविक पाहता भाषांतराचे स्वरूप-

रूप १ ⟶ अर्थ१ ⟶ अर्थ २ ⟶ रूप २.

असे आहे. हा प्रवास करताना पुढील अडचणी संभवतातः (१) एका भाषेतील विविध अर्थ दुसऱ्या भाषेत विलिन होतात : बंगाली लोक सिगारेट, जल, संदेश ‘खा’ तात मात्र मराठीत अनुक्रमे ओढतात, पितात, खातात. (२) एका भाषेतील अर्थाची दुसरीत फेरमांडणी होते : त्याला चार बहिणी आहेत. (म.), उसकी चार बहने हैं (हिं), He has four sisters. (इं.) ह्या वाक्यांची तुलना करा. (३) जो अर्थ एका भाषेत सुटसुटीतपणे किंवा संक्षेपाने व्यक्त होईल, तो दुसऱ्या भाषेत विस्ताराने किंवा दूरान्वयाने व्यक्त करावा लागेल. उदा., ‘त्या रांगेतले कितवे घर?’ याचे इंग्‍लिश भाषांतर किंवा ‘The road was not motorable but only jeepable’ याचे मराठी भाषांतर करून पहा. (४) इतके करून जिथे दोन भाषांची सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी आहे, तिथे तो अर्थ सहज व्यक्त करता येणारही नाही : ‘पदर’, ‘माहेर’, ‘उष्टा’ ह्या मराठी शब्दांना इतर भारतीय भाषांत जसे सहज पर्याय मिळतील, तसे इतर भाषांतून मिळतीलच, असे नाही. गाय आणि cow, मोर आणि peacock, संध्याकाळ आणि evening ह्यांसारख्या जोड्या समानार्थी वाटल्या, तरी जोडीतल्या शब्दांचे सांस्कृतीक संदर्भ वेगवेगळे आहेत. (५) जी गत सांस्कृतीक संदर्भाची, तीच गत भाषिक संदर्भाची. उदा., वर दिलेल्या इटॅलियन म्हणीला यमकामुळे आणि अल्पाक्षरत्वामुळे जो चटकदारपणा आला आहे, तो त्या म्हणीचे भाषांतर ‘भाषांतरकर्ता हा विश्वासघातकी असतो’ असे धोपटपणे केले तर नाहीसा होईल, भाषांतर ‘यथार्थ’ होईल, पण ‘यथारूप’ होणार नाही. मराठी ‘मृत्युपत्र’ला हिंदित ‘इच्छापत्र’ म्हटले तर कायदेशीर अर्थ येईल, पण ‘मृत्यू’चा संदर्भ तेवढा स्पष्ट होणार नाही.

ह्या अडचणींचे निराकरण करताना काही गोष्टी ध्यानात येतात : (१) एकाच मुळाची अनेक भाषांतरे संभवतात. (२) भाषांतरात साधायच्या निरनिराळ्या गोष्टी एकदम क्वचितच साधतात. एक साधली तर दुसरी हुकते. ‘मामा’ला maternal uncle किंवा mother’s brother म्हटले तर अर्थ बरोबर येतो, पण ‘मामा, मला तुझ्याबरोबर ने’चा भाषांतर करताना थोडीशी अर्थहानी पत्करून uncle हा शब्दच वापरावा लागतो. अर्थहानी अशासाठी की, uncle मध्ये मामाबरोबर काका, मावसा, आत्याचा नवरा हे सर्वच येतात. (३) त्यामुळे भाषांतराची युक्तायुक्तता ठरवताना त्याचे कार्य कोणते, हे अगोदर निश्चित करावे. ते कार्य ठरल्यावर भाषांतर शब्दशः किंवा वाक्यशः करावयाचे, कोटेकोर अथवा स्वैर करावयाचे, अर्थसाम्याबरोबर रूपसाम्यही साधण्यासाठी धडपडायचे का, हे ठरवता येते.


भाषांतर किंवा अन्यभाषिक अनुवाद याचे कार्यानुसार दोन मुख्य प्रकार ठरतात : छायानुवाद आणि भावानुवाद. प्रथम काही उदाहरणे घेऊ : (१) मराठी : मामा, इंग्‍लिश छायानुवाद : mother’s brother, भावानुवाद : uncle (२) इंग्‍लिश : I don’t have a penny, मराठी छायानुवाद : ‘माझ्याजवळ पेनीसुद्धा नाही’, भावानुवादः ‘माझ्याजवळ छदाम नाही’. मूळ ‘ रूप १ ⟶ अर्थ १’ या जोडीला उद्देशून आपल्याला दोन प्रश्न विचारता येतात : (१) रूप १ मुळे कोणता अर्थ १ व्यक्त होत आहे, हे भाषा २ मधून सांगा. ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे छायानुवाद. उदा., एखाद्या दस्तऐवजाचा तर्जुमा मागितला, किंवा सटीक आवृत्तीत मूळ संस्कृतचा मराठीत किंवा जुन्या मराठीचा आधुनिक मराठीत अर्थ घ्यायचे ठरवले, तर त्या ठिकाणी छायानुवादाची अपेक्षा असते. (२) उलट रूप १ मुळे व्यक्त होणारा अर्त १ हाच भाषा २ मधून कसा व्यक्त करता येईल? त्याची पुन्हा अभिव्यक्ती कशी करता येईल ? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे भावानुवाद. उदा., प्रवाशाच्या मार्गदर्शिकेत रस्ता कसा विचारायचा, किंवा द लॉर्ड्‍स प्रेयर ही ख्रिस्ती प्रार्थना मराठीत कशी करायची, हे सांगायचे तर भावानुवादाची अपेक्षा असते. भावानुवादाचे टोकाचे उदाहरण म्हणजे एखाद्या कवितेची दुसऱ्या भाषेत पुनर्निर्मिती, किंवा एखाद्या नाटकाचे दुसऱ्या भाषेत आणि दुसऱ्या वेषात रूपांतर. छायानुवाद करताना तो ज्या भाषेत करावयाचा त्या भाषेची प्रकृती सांभाळण्याचे बंधन एवढे नसते. अर्थ १ व्यक्त झाला ना मग रूप २ सुघड नसले तरी चालेल अशी भूमिका असते. ‘हे भाषांतर आहे असे वाटतच नाही’, असे स्तुतिदाखल म्हणायचे ते भावानुवादाबद्दल छायानुवाद हा बोलूनचालून छायेसारखा असायला हवा. भावानुवाद करताना अर्थ १ शी इमान व त्याचवेळी भाषा २ शी इमान अशी तारेवरची कसरत असते. ‘भाषांतरे आणि बायका एक आकर्षक तरी असतात, किंवा एकनिष्ठ तरी असतात-दोन्ही असणे कठीण!’ ह्या फ्रेंच भाषेतील उक्‍तीमध्ये बरेच तथ्य आहे, असे भाषांतराच्या संबंधात तरी म्हणावे लागते.

एक भाषा दुसऱ्या भाषेतून उसनवारी करते, हाही एक अनुप्रेषणाचाच प्रकार म्हणायचा. ही उसनवारी साक्षात असेल (उदा., हिंदीमधून ‘bidi’, किंवा संस्कृतमधून ‘ahimsa’ ही इंग्‍लिश भाषेने केलेली उसनवारी), किंवा छायानुवादी असेल (उदा., अहिंसा ऐवजी ‘non violence’), किंवा भावानुवादी असेल (उदा., बीडी ऐवजी ‘leaf cigarette’).

यंत्रद्वारा भाषांतर : ह्या सर्वांवरून लक्षात येईल की, अनुवाद करणे सोपे नसेल. तरी छायानुवाद करायचा आणि तोही साहित्यापासून दूर अशा तांत्रिक, शास्त्रीय मजकुराचा करायचा तर तो बराचसा यांत्रिक पद्धतीने भागते. शास्त्रीय मजकुराची निर्मिती प्रचंड आणि विविध भाषांमधून होते आहे. शास्त्रीय ज्ञान असलेले भाषांतरकर्ते पुरेसे नाहीत. मात्र  भाषांतराची निकड तर जास्‍त आहे. ह्या परिस्‍थितीतून मार्ग काढण्यासाढी मग ह्यापुढचा विचार आला, की यंत्रद्वारा भाषांतरकार्य करवून घेता येईल काय?- गणकयंत्राचा वापर वाढल्यावर अमेरिका, इंग्‍लंड आणि रशिया ह्या देशांत १९५०-६० या दशकात ह्या दिशेने बराच शोध घेण्यात आला. पण भाषारचनेची गुंतागुत पहाता हे काम वाटले तेवढे सोपे नाही, असे लक्षात आले. ललित किंवा वैचारिक वाङ्‍मयाची गोष्ट सोडूनच द्या, पण तांत्रिक वा शास्त्रीय वाङ्‍मयाचेही फार तर ओबडधोबडच भाषांतर सध्या तरी हाती येऊ शकेल, ह्या गोष्टी ध्यानात आल्या आणि सुरूवातीचा उत्साह नंतर टिकलेला नाही. गणकयंत्राची क्षमता सतत वाढते आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मंडळी तिकडे वळतील, असे दिसते आहे.

संदर्भ :

    1. Brower, Reuben A. On Translation, Cambridge, Mass, 1959.

    2. Catford, J. C. A Linguisitc Theory of Translation, London, 1974.

    3. Holmes, James, S. Ed. The Nature of Translation, Paris, 1970.

    4. Nida, Eugene A. langauge structure and Translation, Stanford, 1975.

    5. Lefevere, Andre, Translating Poetry, Amsterdam, 1975.

    6. Locke, william N. Booth A. D. Ed. Machine Translation and Applied Lanfuage Analysis, 2 Vols., London, 1962.

    7. Locke william N. Booth A. D. Ed. Machine Translation of languages, New York, 1955.

    8. Mukherjee. Sujit, Translation as discovery, New Delhi, 1981.

    9. Steiner, George, After Babel, London, 1975.

 १०. केळकर, न. चिं ” नवा करार : ग्रंथ परीक्षण”, समग्र केळकर वाङ्‍म, खंड १०, पुणे, १९३८.

 ११. चित्रे, दिलीप, ” कवितेचे भाषांतर”, नवभारत, वर्ष ३६, अंक ७, वाई, एप्रिल १९८३.

 १२. चिपळूणकर, विष्णुशास्त्री, ” भाषांतर”, निबंधमाला, भाग ३, पुणे, १८९०.

 १३. जोशी, लक्ष्मणशास्त्री, ”अभिजात साहित्यांचे भाषांतर”. नवभारत, वर्ष ३६, अंक ४, वाई, जानेवारी १९८३.

 १४. नेमाडे, भालचंद्र, ”भाषांतरमीमांसेचे स्वरूप”, नवभारत, वर्ष ३६, अंक ११, वाई, ऑगस्ट १९८३.

 १५. माटे, श्री. म. ”अनुवाद अथवा भाषांतर, ” विवेकमंडन, पुणे, १९५६.

 १६. संत, दु. का. “साहित्याच्या भाषांतरातीस समस्या “, प्रा. रा. श्री. जोग गौरवग्रंथ, पुणे, १९६४.

 

केळकर, अशोक रा.