भाषा : मानवी विकासाच्या इतिहासात भाषेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपण मानव व मानवेतर प्राणी असा फरक करतो, निसर्ग आणि मानव असाही फरक करतो. मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे निसर्गापुढे इतर प्राण्यांना नमून वागावे लागते, तसे ते मानवाला नेहमीच वागावे लागत नाही. निसर्गावर मात करण्याची शक्ती आपल्यात आहे, याची त्याला जाणीव आहे आणि ती वाढवण्याताचा तो बुद्धिपुरःसर, नियमितपणे, सतत प्रयत्‍न करतो आहे, ही गोष्ट आता स्पष्ट आहे.

उत्‍क्रांतीच्या प्रवाहात पूर्वमानव इतरांपेक्षा वेगळा पडला. त्याची शरीररचना वेगळी झाली. बाहयतः दुबळा असलेला हा प्राणी त्याच्या विशिष्ट शरीररचनेमुळे व मेंदूच्या वाढीमुळे निराळा बनला. हाताची रचना आणि त्याचा उपयोग यांमुळे त्याला साधनप्राप्तीची कल्पना आली. शरीरबाह्य साधने कशी निर्माण करावी, इकडे त्याचे लक्ष लागले. नव्या साधनांच्या शोधामुळे तो यंत्रयुगात आला आणि आजूबाजूचे जीवन बदलण्याची आणि ते स्वतःला अनुकूल करून घेण्याची त्याची पात्रता वाढत गेली.

दोन पायांवर चालण्याचे तंत्र अवगत झाल्यामुळे त्याच्यासारखे पुढील दोन अवयव साधन म्हणून वापरण्याची जेव्हा शक्यता निर्माण झाली, जेव्हा तो सहस्त बनला, तेव्हाच त्याच्या श्रेष्ठत्वाचा पाया घातला गेला. हाताला असलेला ‘कर ‘ हा शब्द या अवयवाचे साधन म्हणून वैशिष्ट्य दाखवणारा आहे. आद्य मानव हा ‘करू’ शकणारा प्राणी आहे.

वैयक्तिक प्रांणिजीवनात्मक वैशिष्ट्यांबरोबरच माणसाने आणखी एक वैशिष्ट्य प्राप्त करून घेतले, ते म्हणजे समूहजीवनाचे. तसे पाहिले तर, समूहजीवन जगणारे प्राणी अनेक आहेत. या समूहांना आपण कळप, थवा इ. नावे देतो पण माणसाने ज्या प्रकारचे सामूहिक जीवन विकसित केले आहे, ते या जीवनापेक्षा वेगळे आहे. प्राण्याचे सामूहिक जीवन हे नियमबद्ध, यंत्रबद्ध आणि नैसर्गिक प्रेरणांनी मर्यादित असते, त्यामुळे त्याचे पद्धतशीर वर्णन करता येते. त्यातल्या वर्तनाला, विनिमयघटकांना आपण त्या त्या प्राण्यांची भाषा असे नाव देतो. मग हे वर्तन मुंग्या, मधमाश्या इत्यादींप्रमाणे ध्वनींचा अजिबात उपयोग न करणे असो, किंवा काही पशुपक्ष्यांप्रमाणे अंशतः ध्वनी आणि अंशतः हावभाव अशा प्रकारचे असो. खरे तर, माणसाची भाषाही पूर्णपणे ध्वनिरूप नाही. समोरासमोर बोलताना तर सोडाच, पण स्वतःशीच किंवा दूरध्वनीवर बोलतानाही माणसे स्‍वाभाविक हावभाव करतातच. हावभाव हेदेखील काही प्रमाणात विनिमयाचे साधन आहे आणि हे नैसर्गिक व मूलभूत साधन भाषेच्या उत्पत्ती नंतरही तिला पूरक म्हणून टिकून राहिले आहे, असा निष्कर्ष यातून निघू शकतो आणि आपल्या अंगी असलेली वाक्‍शक्ती-म्हणजे ध्वनिनिर्मितीची शक्ती – तिच्या इंद्रियग्राह्यत्वामुळे इतर व्यक्तींशी संबंध जोडण्याचे अत्यंत प्रभावी विनिमयसाधन आहे, हे लक्षात येईपर्यंत हावभाव हेच माणसाचे आद्य साधन असले पाहिजे.

झाडावरून हातांनी फांद्या पकडत आणि पाय टेकून आधार घेणारा वानर नंतर हात मोकळे ठेवून केवळ पायांवर उभा राहणारा ताठ माणूस नंतर पायांनी चालत येऊ लागताच हातांचा उपयोग आपल्याला आवश्यक ते अन्न इतर पदार्थ मिळवण्यासाठी होऊ शकतो हे जाणणारा, साधननिर्मितीचा अंधुक किरण दिसलेली, ज्ञानशोधक माणूस शेवटी स्वतःच्या कुटुंबातील व जमातीतील इतर व्यक्तींशी अधिकअधिक विनिमय करताकरता वाक्‍शक्तीचा आपल्याला हवे ते साधन मिळवण्यासाठी उपयोग करता येईल, हे लक्षात येऊन बोलका झालेला माणूस अशी एक उत्क्रांतिपरंपरा आपल्याला दिसते.

कुटुंब : पण हा माणूस पूर्णपणे स्वतंत्र आणि निर्बंधरहित नव्हता. त्याच्या जीवशास्त्रीय अवस्थेमुळे त्याला ज्या मर्यादा पडल्या होत्या, त्यातूनच मानवजातीचे भवितव्य घडत होते. काही प्राण्यांची संतती जन्मतःच कार्यक्षम असते, स्वपोषणक्षम असते. स्वतःच्या उपजीविकेसाठी तिला शरीरवर्धनाची किंवा शिक्षणाची आवश्यकता नसते. पक्ष्यांसारख्या प्राण्यांनाही ठराविक काळापर्यंत आपल्या पिल्लांना उडण्याचे व अन्न शोधण्याचे शिक्षण द्यावे लागते, पण माणसाच्या बाबतीत मात्र परिस्थिती अगदी वेगळी होती. नवजात मानव अर्भक आत्मरक्षण व आत्मपोषण यांबाबत दीर्घकाळ परावलंबी असते. त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, आईने उचलून घेऊन पाजल्याखेरीज त्याचे पोषण होत नाही. आईचा नित्य सहवास ही त्याची गरज असते. असा हा अगतिक जीव व त्याची आई आणि या दोघांची जबाबदारी उचलणारा बाप, यांच्या सहजीवनातून कुटुंब जन्माला आले. आईचे कर्तव्य आणि बापाची जबाबदारी व अधिकार यांचे महत्त्व इतके होते, की जोपर्यंत कुटुंबातला सर्वांत वडील पुरूष जिवंत असे, तोपर्यंत नंतरच्या पिढ्यांतील सर्वांवर त्याची हुकुमत चालत असे आणि सर्वात वडिलधाऱ्या स्त्रीलाही तसाच मान द्यावा लागे. एकत्र कुटुंबाचा पाया हा अशा प्रकारे गरजेच्या पोटी घातला गेला.

टोळी : पण प्रत्येक कुटुंब स्वतंत्र असले, तरी ते अलिप्त व इतर अशाच कुटुंबांपासून वेगळे रहात नसे. अनेक कुटुंबांची एकत्र रहाणारी टोळी हा सहजीवनाचा घटक होता. मुळात ही टोळी म्हणजे विस्तारित कुटुंब असणेही शक्य आहे. शिकार, अन्नाचा शोध, बाहेरच्या संकटापासून रक्षण आणि उत्सवादी अनेक सांधिक प्रसंग, यांमुळे टोळीचे जीवन संघटित बनले होते आणि तिचे पुढारीपणही कोणा शक्तिसंपन्न व्यक्तीकडे असावे. प्रथमतः या टोळ्या हिंडणाऱ्या होत्या. अन्नाची कमतरता भासली, पाणी दुर्मिळ झाले, संकटे वाढली, की स्थलांतर करणे अपरिहार्य होते.

साधन : पण जिवंत रहाण्यासाठी जे काही करायचे त्यात साधनाचा शोध आणि साधनसामग्रीची वाढ यांना अग्रस्थान होते. शिकार कशी करावी, त्यासाठी काय साधन वापरावे, ते अधिक उपयोगक्षम कसे करावे, शिकार करून मिळालेले भक्ष्य कसे कापावे व सोलावे, त्याच्या कातड्याचा उपयोग होत असल्यास कसा करावा, इ, गोष्टी मानवी जीवनाच्या प्राथमिक अवस्थेतील होत्या. त्या अटळ होत्या. कारण मानवजीतीचे, म्हणजेच प्राचीन काळी त्यातल्या प्रत्येक समूहाचे किंवा टोळीचे अस्तित्वच त्यावर अवलंबून होते.


जनन व पोषण ही प्राणिजीवनाची परंपरा अखंड टिकवून ठेवण्याची मूलभूत साधने आहेत. नरमादीचे एकत्र येणे, प्रजोत्पादन करणे, जरूर असेल तिथे आपल्या गटाचे वर्तन व जीवनक्रम संततीला शिकवणे ह्यातून जीवाला जावे लागते. आनुवंशिक अंतःप्रेरणा असणाऱ्या पशुपक्ष्यादी प्राण्यांकडून हे नकळत, स्वाभाविक आणि सहज होते. बुद्धी, विचार, कार्यकारणसंगतीमागील अनुभव, यांना तिथे स्थान नाही. बौद्धिक प्रगती व तिचा समाजरचनेवर परिणाम हे तिथे संभवत नाही. कारण जरी तिथे समूहजीवन आहे, विशिष्ट मर्यादेत चाकोरीतला अत्यंत मर्यादित विनिमय आहे, तरी तिथे समाजजीवन नाही. प्राणिजीवनाची पूर्णपणे नैसर्गिक परंपरा मानवप्राण्याने ओलाडली आहे. साधने, साधनांचा विकास, त्या विकासाला लागणारी बुद्धी आणि प्रयत्‍न यांनी माणसाने निर्माण केलेली प्रगतीची परंपरा, ही सामान्य प्राणिजीवनाच्या परंपरेहून अत्यंत भिन्न आहे. माणूस सतत बदलतो आहे, बदल घडवून आणतो आहे.

या अखंड परिवर्तनाची सुरूवात प्रथम साधन म्हणून वापरलेल्या दगडाच्या तुकड्यात, विस्तवाच्या शोधात आहे. गोल, चौरस, तिकोनी इ. आकृतींच्या भिन्नत्वाच्या ज्ञानात आहे. आणि .या परिवर्तनाचे यश प्रारंभी थोडे असलेले पण नंतर विराट होत गेलेले ज्ञान पुढील पिढीच्या स्वाधीन करून ते जिवंत व प्रवाही ठेवणाऱ्या विनिमयसाधनात आहे.

ज्ञानसंक्रमण : हे ज्ञान अनुभवजन्य, बुद्धिजन्य असल्यामुळे ते पुढील पिढीला समजेल, वापरता येईल अशा प्रकारे तिच्या स्वाधीन केले गेले नसते, तर ते नष्टच झाले असते, तसे ते व्हावे म्हणून माणसाने जे प्रयत्‍न केले, जी साधननिर्मिती केली आणि जे यश मिळवले, त्यावरच माणसाचे श्रेष्ठत्व अवलंबून आहे.

आंत्वान मेये यांनी एके ठिकाणी दाखवून दिले आहे, की मुले मोठी झाल्यावर साधन बनवण्यात, शिकार करण्यात आणि इतर काही गोष्टींत त्यांचे सहकार्य मिळावे अशी वडलांची इच्छा असणारच. काही अंशी हे काम वडलांच्या कृतींचे निरीक्षण करून, अनुकरण करून करता येणे शक्य होते. उदा., दगड टोकदार बनवणे, त्याची एक बाजू धारदार बनवणे, मारलेल्या जनावरांचे मांस कापून किंवा खरवडून काढणे इत्यादी. परंतु साधने अधिक प्रगल्भ व गुंतागुंताची झाल्यावर काही अंशी त्यांचा खुलासा केल्याशिवाय ज्ञानग्रहण करणे सोपे नव्हते. अशा प्रकारची अडचण ही एक नवे प्रभावी विनिमय साधन शोधून काढायला लागणारी पोषक अशी पार्श्वभूमी होती.

याशिवाय शिकारीचे व बाहेरील जगाचे अनुभव घरात सांगण्याची उत्कंठा, जमातीच्या प्रमुखाचे आदेश, सर्वसाधारणपणे निर्णय घेताना जमातीच्या सभेत आपले मत मांडणे, यांसाठीही असे साधन हवेच होते. साधनांचा विकास करणे, म्हणजेच बदलते सामाजिक जीवन व त्यांच्या गरजा यांना पुरे पडेल असे साधन शोधणे भागच होते.

विनिमय हा कमीत कमी दोन भिन्न व्यक्तींमध्ये होतो आणि तो होण्यासाठी त्याचे स्वरूप या दोन व्यक्तींना त्यांच्या इंद्रियांनी आकलन होण्याजोगे असावे लागते. विनिमयसाधन हे अशा प्रकारे इंद्रियग्राह्य असल्यामुळे या बाबतीत आधिक कार्यक्षम, आधिक व्यापक अधिक सुगम अशा इंद्रियांचा आधार घेणे मानवाकडून स्वाभाविकपणे घडले असावे. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या मानवासमोर इतर प्राण्यांचा धडा होता. एकमेकांना साद घालणारी नरमादी, हिंस्र पशूंच्या जवळ येण्यामुळे इतर प्राण्यांत होणारा कलकलाट किंवा विशिष्ट आवाज यातून दिला जाणारा सावधानीचा संदेश इ. घटनांत दिसून येणारे ध्वनींचे विनिमयसामर्थ्य हे दुःख, आनंद, भिती अशा प्रसंगी आपल्या स्वतःच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या आवाजाच्या आशय व्यक्त करण्याच्या सामर्थ्याबरोबर प्रत्ययाला आले असणार. मूल रडू लागताच दूर अंतरावर असणाऱ्या आईलाही तो संदेश मिळतो, हिंस्र पशूचा हल्ला होणार आहे हे जाणवताच हाकाटी करून दृष्टिपथात नसणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना शिकारी मानव बोलवतो कुत्र्याचे भुंकणे, गाईचे हांबरणे, सर्पाचा फूत्कार, वाघाची डरकाळी ऐकून प्रत्यक्ष न दिसणारा प्राणीही कोण असेल हे तो जाणू शकतो. ध्वनीच्या विनिमयसामर्थ्याचा धडा अशा प्रकारे निसर्गानेच मानवाला दिला. दगडाची आयुधे बनवणाऱ्या माणसाला सामग्रीतून साधन बनविण्याचे तंत्र अवगत होते विस्तवातून प्रकाश व उष्णता प्राप्त होते, हा कार्यकारणभावही ठाऊक होता. त्यातूनच धडपडत, ठेचाळत त्याने इंद्रियाच्या विषयसामग्रीचा नवा, सांकेतिक, केवळ समूहाच्या मान्यतेने रूढ झालेला समूहोपयोगी कार्यकारणभाव निर्माण केला किंवा तो नकळत त्याच्या हातून घडवला गेला, एवढे तरी मान्य करणे चुकीचे ठरणार नाही.

विनिमयसाधन-स्वरूप : दगड, बाण, विस्तव यांसारख्या भौतिक साधनांना शिकार, उष्णता, प्रकाश इ. प्रत्यक्ष साध्य असते. विनिमयात ते अप्रत्यक्ष असते. ध्वनी किंवा विशिष्ट क्रमयुक्त ध्वनिप्रवाह हा काहीतरी सांगण्यासाठी, सुचवण्यासाठी, अर्थ व्यक्त करण्यासाठी वापरलेला असतो. तो केवळ ध्वनी किंवा विशिष्ट क्रमयुक्त ध्वनीप्रवाह नसून आशयगर्भ, अर्थयुक्त असतो. त्यातून जे सांगायचे ते ध्वनिबाह्य असते. ते कर्णपटू गोंगाटात नसते, किंवा कर्णमधुर शुद्ध संगीतातही नसते. त्यातून माहिती मिळते, ज्ञान मिळते, आज्ञा किंवा प्रश्न यांचीही जाणीव होते. हे ज्ञान ज्या शक्तीने ध्वनीशी किंवा वेगवेगळ्या ध्वनिरूपांशी जोडले गेलेले असते ती म्हणजे अर्थशक्ती. विनिमयातील प्रत्येक ध्वनीरूप कोणत्या तरी अर्थाशी सर्वमान्य, समाजमान्य परंपरेने बांधलेले असते. याचाच अर्थ हा की, ते कोणत्याही नैसर्गिक, स्वाभाविक कार्यकारणभावावर अवलंबून नसते.

अर्थ आणि संकेत : भाषेशी संबंधित अशी ही कल्पना नीट समजावून घेतली पाहिजे. प्रत्येक माणसाला त्याच्या इंद्रियांच्या द्वारे बाह्य विश्वाचे दर्शन होते. हे दर्शन जरी अखंड असले, तरी सतत संपर्कामुळे व परिचयामुळे त्याचे भाग पाडणे, त्याचे पृथक्करण करणे, या गोष्टी माणसाकडून होतात. त्याचा परिणाम म्हणून या विश्वाचे विविध घटक, त्यांचे गुणधर्म इ. त्याच्या नजरेला येतात. याशिवाय जगातील प्राणी, वस्तू, घटना, समाजव्यवहार, व्यक्तीव्यक्तीवरील व्यवहार इ. असंख्य गोष्टींना तो साक्षी असतो. या सर्वांचा ठसा इंद्रियांद्वारे त्याच्या मनावर उमटतो. पण जेव्हा तो ठसा इंद्रियग्राह्य विनिमयासाठी साकार करण्याची आवश्यकता भासते, तेव्हा यातल्या प्रत्येक पदार्थाला, वस्तूला, घटनेला, क्रियेला स्पष्ट व पृथक संकेत ठरवणे आणि त्याचाच सर्वांनी सर्वत्र उपयोग करणे अपरिहार्य होते. यासाठी आपल्या अनुभवविश्वाचे सूक्ष्म आणि सोयीचे पृथक्करण करावे लागते आणि हे पृथक्करण एकत्र व्यवहार करणाऱ्या व्यक्तिसमूहासाठी, म्हणजेच भाषिक समाजासाठी, एकाच प्रकारचे असते. त्यासाठी वापरले जाणारे ध्वनिरूप संकेत, त्यांची मांडणी, त्यांना होणारे विकार एकाच प्रकारचे असावे लागतात. एकत्र नांदणारा भाषिक समाज अशा संकेतव्यवस्थेत बांधला गेल्याखेरीज  कार्यक्षम राहू शकत नाही.


अर्थात या संकेतव्यवस्थेमागे ध्वनी व अर्थ यांचा कार्यकारणभाव नसला, तरी त्याच दर्जाची एक सामाजिक शिस्त असावी लागते. ती म्हणजे एकच संकेत एकाच अर्थाने, एकाच प्रकारे, सर्वांनी सर्वत्र पाळण्याची. स्‍वातंत्र्य असते ते मूळ संकेत ठरवण्याचे. पण तो एकदा निश्चित झाला की तो बदलणे, टाकून देणे किंवा आपल्याला वाटेल त्याप्रमाणे वापरणे, व्यक्तीला शक्य नसते. समाज अशा प्रकारचा हस्तक्षेप स्वीकारत नाही. कारण संकेतात ढवळाढवळ करण्याची प्रवृत्ती सुलभपणे एकत्र जीवन व्यतीत करण्याच्या आणि त्यातून प्रगती साधण्याच्या समाजाच्या मूलभूत हेतूला घातक आहे. या दृष्टीने भाषिक संकेतांचे स्वरूप धर्म, कायदा, राज्यव्यवस्था इत्यादींच्या नियमांप्रमाणे समाजाला बंधानकारक असते आणि म्हणूनच भाषा ही एक सामाजिक  संस्था आहे.

भाषा आणि समाज : भाषेचे स्वरूप हे अशा प्रकारे समाजरचनेशी बांधले गेलेले असल्यामुळे तिचे भवितव्य निश्चित झाले आहे. समाजाचा विकास, प्रगती, परिवर्तन, त्यातले संघर्ष, त्याच्या आकांक्षा, या सर्वांचे ती स्वाभाविक वाहन बनली आहे. समाजाचे यथार्थ प्रतिबिंब भाषेच्या रचनेत, उपयोगात आणि अर्थसंपत्तीत दिसून येते. भाषेतील एकंदर संकेतांचा अभ्यास करून ती ज्या संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करते ती निश्चित करणेही शक्य होते. वेदकालीन, महाभारतकालीन, बुद्धकालीन भारतीय समाजाचे ज्ञान मिळवण्याचे साधन तत्कालीन भाषाच आहे, हे विसरून चालणार नाही, जे समाजात असते किंवा घडते ते भाषेत सापडते, म्हणूनच भाषेचे सामाजिकत्व, म्हणजेच तिचे ऐतिहासिकत्व, लक्षात ठेवूनच तिचा अभ्यास झाला पाहिजे. हाच तिचा आशयनिष्ठ अभ्यास होय. तिच्या भौतिक, इंद्रियग्राह्य साधनांचा अभ्यास ही तिच्या स्वरूपाची दुसरी बाजू आहे.

भाषाभिन्नत्व-संस्कृती : भाषा ही अशा प्रकारे समाजनिष्ठ असल्यामुळे दोन भाषांचे भिन्नत्व हे त्यांच्याशी संबंधित अशा समाजजीवनातील भिन्नत्‍वावर अवलंबून असते. जीवनावश्यक, सर्वसामान्य, मूलभूत अशा वस्तू, क्रिया, पदार्थ इत्यादींविषयी या भाषांत बरेच साम्य दिसून येईल. पण त्यात कित्येकदा गंभीर स्वरूपाचे फरकही आढळतील. या फरकाचे महत्त्वाचे कारण बाह्य विश्वाकडे पाहण्याची समाजाची भिन्न दृष्टी, बाह्य विश्वाचे त्याने केलेल विशिष्ट पृथक्करण, त्याच्या भोवतीची भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती, त्याचे विशिष्ट सामूहिक अनुभव, हे आहे. थोडक्यात म्हणजे त्याला जे विश्वदर्शन घडते तेच तो संकेतबद्ध करतो. उदा., पाणी किंवा रंग या कल्पना घ्या. काही भाषांत पाण्याचे प्रकार मानून त्यांना नावे दिली जातील. पावसाचे वरून खाली पडणारे पाणी, वाहणारे पाणी, लाटा येतात असे पाणी. रंगांच्या बाबतीत तर फारच विविधता दिसून येते. काही भाषांत फक्त दोनच रंग आहेत : फिक्कट व गर्द, तर काही भाषांत ही संख्या किती तरी मोठी आहे. भौतिक पदार्थ व त्यांचे इंद्रियग्राह्य गुणच काय, पण मानसिक अवस्था, सुख, दुःख, आनंद, राग इत्यादींचे प्रकार आणि त्यांच्या छटा, विशिष्टत्व समाजाच्या पारंपारिक सवयी, यांच्याही बाबतीत प्रत्येक समाजाचे विशिष्टत्त्व जाणवते.

यालाच सांस्कृतीक भिन्नता म्हणता येईल. जुन्या परंपरतील हिंदू स्त्रीला नवरा म्हणजे ज्याच्याशी आपली जन्माची गाठ आहे आणि ती जन्मांतरीही कायम रहावी, तसे न मानणे, अगदी मनातसुद्धा आणणे, म्हणजे पाप किंवा व्यभिचार असे वाटते. तर अनेक समाज असे आहेत की ज्यात नवरा म्हणजे आजचा वैवाहिक सहचर या जन्मातच त्याची जागा दुसराही कोणी घेऊ शकेल. अशा परिस्थितीत ‘नवरा’ या शब्दाचे या समाज्यांच्या भाषांत जे भाषांतर होईल त्यात हिंदू परंपरेतील अनेक आशयछटांचा मागमूसही असणार नाही.

भाषांतर : भाषेच्या या समाजनिष्ठ स्वरूपामुळेच भाषांतराचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. केवळ व्याकरण येणे, शब्दकोश हाताशी असणे, याने हा प्रश्न सुटू शकणार नाही. एवढेच काय, पण परकी समाजाचा कितीही परिचय असला, त्याच्या व आपल्या भाषेवर कितीही प्रभुत्व असले, तरीही तो सुटू शकणार नाही. कारण भाषांतर हे आशय-समीकरण आहे. म्हणून जे एका समाजात रूढ आहे ते दुसऱ्या समाजात नसलेत तर हे समीकरण मांडणार कसे ?- ‘मी सोवळ्यात आहे ‘ याचे इंग्रजी किंवा फ्रेंच भाषांतर होणार कसे? उत्तम भाषांतर म्हणजे ज्या भाषेत परभाषिक कृती अनुवादीत झाली आहे त्यात ती सरस, प्रभावी वाटणे. पण मग हे भाषांतर प्रामाणिक असेलच असे नाही. शास्त्रीय लेखनात हे शक्य होईल पण ललित लेखनात म्हणजेच समाजजीवनाचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या लेखनात ते बऱ्याच अंशी किंवा काही अंशी तरी अशक्यच असते. [⟶ भाषांतर].

समाजभिन्नता : मुळात समाजभिन्नता ही वेगवेगळी ठिकाणी मानवोत्पत्ती होऊन, त्या त्या ठिकाणी ध्वनिप्रधान विनिमयसाधनाचा शोध लागून, भिन्नभिन्न संकेतपरंपरा अस्तित्वात येऊन, झाली असावी. मानवप्राण्याची उत्पत्ती एकाच ठिकाणी होऊन तो सर्व जगभर पसरला, असे मानता येत नाही. सर्व भाषांचे मूळ एकच असावे असे मानून त्या दिशेने संशोधन करण्याचा प्रयत्‍न काही अभ्यासक करतात पण आज तरी सर्व माणसे आणि सर्व भाषा यांचे एकच उगमस्थान असावे, या कल्पनेला आधार नाही.

परिवर्तन : मानवी समाजांची मूलभूत भिन्नता हे जसे भिन्न भाषिक परंपरांचे आदिकारण, तसेच परिसरभिन्नत्व व परिस्थितीभिन्नत्व हेही आहे. पण परिसर सोडून जाता येते, विशेषतः आपल्या अन्न, पाणी इ. प्राथमिक गरजा भागवल्या जाइनातशा झाल्या, म्हणजे त्या जिथे भागवल्या जातील असा प्रदेश शोधत हिंडणे, हे कृषिपूर्व काळातल्या माववाला अगदी अपरिहार्य होते. याच भटकंतीत पूर्वी अपरिचित असे नवेनवे अनुभव येणे, निसर्गाची नवनवी रूपे दिसणे, नवे प्राणी व नव्या वनस्पती आढळणे, कदाचित इतर जमातीच्या टोळ्यांशी गाठ पडून संघर्ष होणे. नवी साधणे सापडणे किंवा जुन्या साधनांत सुधारणा होणे, नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जुन्या व अंगवळणी पडलेल्या सवयी बदलणे, किंवा टाकून देणे, या सर्व आणि इतर अनेक गोष्टी घडून आल्या.

थोडक्यात म्हणजे भाषेचे स्वरूप, तिच्यातले परिवर्तन म्हणजेच तिचा इतिहास, तिची आजची क्षमता आणि विकासक्षमता म्हणजेच तिचे अनुभवक्षेत्र वाढण्याची शक्यता, या सर्वांची योग्य कल्पना येण्यासाठी ती आज ज्या समाजाचे विनिमयसाधन, संस्कृतिवाहन आणि ज्ञानसाधना आहे त्याचा इतिहास ठाऊक असणे अपरिहार्य आहे.

भाषेची उत्पत्ती: भाषेच्या उत्पत्तीसंबंधी वरती सागंण्यात आलेच आहे. चालणे इ. शारीरिक प्रवृत्तीप्रमाणे बोलणे ही काही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती नाही. ती एक समाजांतर्गत निरीक्षणाने व अनुकरणाने आत्मसात केलेली सामाजिक सवय आहे. काही कारणामुळे मानवी संपर्काला मुकलेले समाजबाह्य मूल आजूंबाजूच्या प्राण्याप्रमाणे ध्वनिनिर्मिती करू शकेल, पण बोलू शकणार नाही. त्याचे सामाजिकीकरण झालेले नसल्यामुळे, म्हणजेच कोणत्याही विशिष्ट मानवसमाजाचे ते घटक नसल्यामुळे, समाजनिष्ठ अशी संस्कृतीची अंगे त्याच्यात आढळणार नाहीत. तो केवळ एक मनुष्यप्राणीच असेल. लांडग्यांनी वाढवलेल्या उत्तर प्रदेशातील रामू या मुलाची गोष्ट या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे.


याबाबतीत महत्त्वाची गोष्ट ही की, विशिष्ट भाषांचे मूळ शोधणे वेगळे आणि वाक्‍शक्तीचा सामाजिक विनिमयासाठी सांकेतिक उपयोग करण्याचे जे साधन मानवाने निर्माण केले त्याचे मूळ शोधणे, त्याचा प्रारंभ कसा झाला हे शोधून काढणे, वेगळे. पहिला प्रश्न संपूर्ण पणे भाषिक व भाषेच्या उत्पत्तीनंतरच्या काळातला आहे, तर दुसरा ज्या कारणांनी, ज्या परिस्थितीमुळे भाषा ही संस्थाच अस्तित्वात आली त्यासंबंधीचा, भाषापूर्वकाळातला आहे. अशा संशोधनाला भाषिक पुरावा कोणतीच मदत करू शकत नाही. कारण तो मानवाच्या सामाजिक, मानसिक व बौद्धिक विकासाचा प्रश्न बनतो. ज्या गरजामुळे भाषेसारख्या साधनाकडे वळणे त्याला अपरिहार्य झाले, ती गरजच कशी उद्‍‌भवली इकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते.

गरज उद्‍‌भवली, ती समाजसंस्थेचे स्वरूप अधिकाधिक व्यापक व गुंतागुंताचे होत चालल्यामुळे. अनुभव, निरीक्षण व प्रयोग यांच्यामुळे वाढत चाललेल्या सृष्टिविषयक व जीवनाविषयक व जीवननिषयक ज्ञानामुळे आणि साधनसामग्रीमुळे. त्यांचा संग्रह करणे, ती टिकवणे आणि ती नष्ट होऊ नये यासाठी ती पुढील पिढीच्या स्वाधीन करुन तिचा प्रवाह चालू ठेवण्याच्या इच्छेमुळे. परंरानिर्मितीच्या आवश्यकतेमुळे, प्रारंभीचे ज्ञान हे जीवनावश्यक साधनांचे होते. ते विज्ञान या अवस्थेला पोचलेले नव्हे, पण विकास मात्र पावत होते. दगड, तीरकामठा, विस्तव, अन्न, वस्त्र, निवारा, आत्मरक्षण इत्यादींशी ते निगडीत होते. पण या सर्वांचे विनीमयसाधनात प्रतिबिंब उमटवणे, हे काम सर्वसामान्य संकेत स्वीकारल्यावाचून शक्य नव्हते. ज्या क्षणी असे संकेत निर्माण करण्याची कल्पना माणसाला आली, ती अंमलात आणण्याइतकी त्याची प्रगती झाली, तेव्हाच भाषा या संस्थेच भाषा या संस्थेचा पाया घातला गेला.

म्हणजेच माणसाच्या मेंदूचा विकास, बौद्धिक विकास, विचारशक्ती, भूत-भविष्य काळांचे ज्ञान इ. गोष्टींनी त्याला नव्या साधानांचे शोध लावण्याची प्रेरणा दिली. वस्तू, पदार्थ, प्राणी, घटना, क्रिया, गुण इत्यादींच्या परस्परसंबंधातून संकेतांची मांडणी, त्यांना होणारे विकार यांकडे तो हळूहळू गेला. कारण भाषा म्हणजे केवळ संकेत नव्हे, तर विश्वातील घटनांत गुंतलेल्या परस्परसंबंधी संकेताची पद्धतशीर मांडणी. संकेत कसे निर्माण झाले, ते सर्वमान्य कसे होऊ शकले, त्यांची रचना अभिव्यक्तीच्या दिशेने कशी होत गेली, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला उपलब्ध असलेल्या भाषिक पुराव्याच्या इतकी पलीकडची आहेत, की त्यांसंबंधी निव्वळ तर्क, कल्पनाविलास करणेच शक्य आहे. पण असा स्वैर तर्क किंवा कल्पनाविलास म्हणजे इतिहास किंवा शास्त्र नव्हे. भौतिक साधनांच्या किंवा जीवनाच्या बाबतीत निश्चित भौतिक परावाच ग्राह्य मानता येतो.

प्राण्यांच्या ध्वनींचे अनुकरण, श्रमपरिहारार्थ काढलेले सूर इ. कारणे देऊन अनेकांनी या प्रश्नाचा उकल करण्याचा प्रयत्‍न केला. पण भाषिक संकेत व आशय, ध्वनी व अर्थ, यांचा त्यातून खुलासा मिळत नाही. काहीजणांनी लहान मुलांच्या भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेचा आधार घेतला. पण आजचे मूल मुळातच भाषिक-सामाजिक वातावरणात असते. ते भाषा निर्माण करत नाही, मुळात असलेली परंपरागत भाषा निरीक्षण, अनुकरण, प्रयत्‍न-स्खलनपद्धतीने स्वतःच शिकते. कोणीही न शिकवता ते स्वतःच भाषा शिकते, एवढेच त्याचे वैशिष्ट्य.

भाषेचे मुळ शोधून काढण्याचा प्रयत्‍न हा एक बौद्धिक व्यायाम झाला आहे. त्यात तर्कसंगती कितीही असली, तरी निश्चित व निर्विवाद आधाराच्या अभावी त्यात काळ खर्च करून काहीही साध्य होणे शक्य नाही.

भाषिक परिवर्तन : अगदी ऐतिहासिक काळातले भाषेचे नमुने घेतले तरी हे लक्षात येईल, की तिचे स्वरूप अनेक अंगांनी एकसारखे बदलते आहे. त्यामुळे परिवर्तन आणि परिवर्तनक्षमता हे भाषेचे प्रारंभापासूनचे गुण आहेत, असे दिसून येते. अर्थात परिवर्तनक्षमता आहे म्हणूनच परिवर्तन होते. पण ही परिवर्तनक्षमता भाषेत कशामुळे येते, हे पाहिले म्हणजेच भाषेचे सत्यस्वरूप आपल्या लक्षात येईल.

भाषेचे स्वरूप द्विविध आहे, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. ते ध्वनींनी बनलेले, परंतु आशयात्मक किंवा अर्थवाहक असे आहे. यातील ध्वनिरूप हे गौण असून अर्थ हा प्रधान आहे. ध्वनी व अर्थ यांत कोणताही कार्यकारणसंबंध नाही. ते परंपरेचे नाते आहे. म्हणूनच एकत्र व्यवहार न करणाऱ्या समाजांत एकच अर्थ किंवा आशय एकाच काळी भिन्न भाषांतून भिन्न ध्वनिरूपांनी व्यक्त होऊ शकतो, एवढेच नव्हे तर एका भाषेतही कालानुसार भिन्न ध्वनिरूपे धारण करतो. ध्वनीच्या या गौणत्वामुळेच तो हळूहळू बदलत गेला, तरी त्याचा परिणाम आशयावर होत नाही किंवा कालांतराने ध्वनी ठळकपणे बदलला, तरी त्याचा परिणाम अर्थावर होत नाही.

भाषा आत्मसात करताना काही अंशी, कानाला पटकन उमगणार नाही इतक्या प्रमाणात, तिचे बाह्य असे ध्वनिरूप बदलले तर ती भौतिक साधनात घडून येणारी एक स्वाभाविक प्रक्रियाच मानावी लागेल. प्रारंभी सूक्ष्म असे हे स्खलन त्यात भर पडत पडत स्पष्ट होते, पण ते बोलणाऱ्या व्यक्तींना जाणवत नाही. आपण आपल्या गत पिढीतल्या लोकांप्रमाणे बोलतो आहोत असे नव्या पिढीला वाटते, तर आपली मुले आपल्यासारखेच बोलताहेत, ही जुन्या पिढीची खात्री असते.

नव्या व जुन्या पिढीतले खरे अंतर भाषिक नसते. ते भावनात्मक, सांस्कृतिक, नव्या सवयींचे, थोडक्यात म्हणजे आशयात्मक असते आणि भाषिक असलेच तर जुन्या पिढीला अपरिचित असे विचार किंवा वागणे या संबंधात असते. विचार, सवयी, नव्या वस्तू, वैज्ञानिक प्रगती इत्यादींमुळे भाषेचा आशय-विषय असे जे समाजजीवन तेच बदलते आणि मग भाषेलाही नव्या संकेतांचा आधार घ्यावा लागतो.

समाजजीवनातील बदल अंतर्गत घडामोडींमुळे किंवा संघर्षामुळे आणि बाह्य संपर्कामुळे, इतर समाजांच्या वर्चस्वामुळे, इतर काही भाषांच्या प्रतिष्ठेमुळे, त्यांच्यातील आकर्षक व उपयुक्त वाटणाऱ्या चालींच्या-जीवनपद्धतीच्या-प्रगतीच्या अनुकरणामुळे घडून येतो. आर्य, ग्रीक, हूण, तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज इत्यादींच्या लागोपाठ झालेल्या आक्रमणांचा इतिहास विचारपूर्वक व निःपक्षपातीपणे पाहिला आणि त्या संदर्भात भारतीय भाषांच्या परिवर्तनाचा अभ्यास केला, तर ही गोष्ट नीट समजू शकेल. या परिवर्तनापलीकडे जाऊन स्वभाषेचा त्याग करून परभाषेचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. भारतातील इंग्रजीभाषिक ख्रिस्ती समाज व उर्दूभाषिक मुस्लीम समाज ही त्याची आधुनिक काळातही ठळक उदाहरणे म्हणता येतील.

भाषेचा विकास : शैली व साहित्य : नित्य व्यवहारातली भाषा जाणीवपूर्वक वापरली जात नव्हती. ती एक चाकोरीतून जाणारी आवश्यक अशी सामाजिक सवय होती. विशिष्ट संदर्भात, विशिष्ट संकेत, विशिष्टपणे वापरणे एवढेच तिचे कार्य. पण या नियमबद्ध वापरात ज्यावेळी व्यक्तिवैशिष्ट्याची भर पडली, किंवा या नियमबद्ध रूपाबाहेर जाऊन आपले असे खास काहीतरी आपल्या पद्धतीने सांगण्याची व्यक्तीला जरूर वाटली, त्या वेळी भाषेचे जे व्यक्तीत्वाचा छाप असलेले स्वरूप अस्तित्वात आले ते म्हणजे शैली. आपले शिकारीतले अनुभव सांगताना, एखाद्याच्या गैरहजेरीत घडलेल्या घटना त्याला कळवताना, गोष्ट सांगताना, अनुभव व्यक्त करताना भाषेत शैलीचा वाटा मोठा असतो. शुद्ध आशयापलीकडे व्यक्तीचा उत्साह, नाराजी, आनंद, द्वेष, मत्सर इ. विकारांचे त्यात कळत नकळत मिश्रण होतेच. बोलणे ही जरी शारीरिक क्रिया असली तरी आशय, अनुभव व्यक्त करणे ही व्यक्तिविशिष्ट मानसिक क्रिया आहे. भाषा हा सामाजिक वारसा असला, तरी तिचा उपयोग ही एक व्यक्तिनिष्ठ क्रिया आहे आणि तिच्यातून व्यक्तिभिन्नत्व प्रतिबिंबित होणे अपरिहार्य आहे.


व्यक्तिविशिष्ट भाषिक रूपातून व्यक्तिविशिष्ट अनुभवांची निर्मिती ही साहित्याची आद्य प्रेरणा होय. ती निर्मिती समाजांतर्गत असली, बऱ्याच अंशी समाजविषयक असली, तरी ती समाजनिरपेक्ष होती, व्यक्तिसापेक्ष होती. परंतु तिने भाषेला जे वळण दिले ते दृष्टीआड करून चालणार नाही. विनिमयाचे स्वरूप व्यापक करणारे जे क्रांतिकारक बदल समाजजीवनता घडले, त्यामुळे अशा प्रकारच्या निर्मितीचा प्रसार अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर होऊन भाषेचे महत्त्व असंख्य पटींनी वाढले.

विनिमय-विस्तार : परस्परांशी संभाषण करणाऱ्या दोन व्यक्तींपलीकडे भाषेने घेतलेली झेप हिला ‘विनिमय-विस्तार’ हे नाव देता येईल. या विमिनय-विस्ताराचे महत्त्वाचे टप्पे लक्षात घेतले, तरच भाषेचे खरे महत्त्व लक्षात येईल.

प्रत्यक्ष विनिमय : अनेक माणसांनी एकत्र जमून, चर्चा करून विनिमय करणे, निर्णय घेणे किंवा एकाच माणसाने मार्गदर्शन करणे, उपदेश करणे, शिकवणे हा व्यापक विनिमयाचा पहिला टप्पा होय. एकाने बोललेले अनेकांना ऐकू येते, तेव्हा विशिष्ट ज्ञान मिळवणे हे ज्यांचे समान उद्दिष्ट आहे असे अनेक लोक एकाच शिक्षकाकडे जाऊ शकतात, एकच नायक अनेकांचे पुढारीपण करू शकतो. पण प्रारंभीच्या काळात सर्व जमात एकत्र रहात होती. शब्द हाच ध्वनिरूपाने विनिमय घडवून आणत असे. कुटुंबप्रमुख, जमातीचा पुढारी, शिक्षक, त्याचप्रमाणे धार्मिक जीवनातील आचारांचे नेतृत्व करणारा पुरोहित यांना विशिष्ट भूमिका प्राप्त झाल्या होत्या, तरी त्यांची कार्ये एकत्र जमून होत. दूर अंतरावरच्या, ध्वनीच्या टप्प्यापलीकडे, दृष्टीआड असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधणे शक्य नव्हते. त्याची आवश्यकता निर्माण झाली, तेव्हाच ध्वनिबाह्य किंवा ध्वनींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साधनाचा शोध लावणे माणसाला अपरिहार्य झाले.

अप्रत्यक्ष विनिमय : आपला माग लागेल अशी चिन्हे वाटेत ठेवणे, आपली ओळख पटेल अशी वस्तू दुसऱ्याकडे पाठविणे, यांसारख्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी प्रारंभी झाल्या असतील. पण प्राचीन मानवाची या दिशेने प्रगती दाखवणारी सर्वांत महत्त्वाची कृती म्हणजे चित्रण. गुहेत राहणाऱ्या माणसांनी अप्रतिम चित्रे काढली आहेत. या चित्रांना काही अर्थ होता का, काही विनिमयमूल्य होते का, हा प्रश्न फार कठीण आहे. त्याचे उत्तर देता येणे शक्य नाही. परंतु माणसाच्या या कौशल्याचे पुढे साधनात रूपांतर झाले हे निश्चित. चित्राने परिमाणयुक्त दृश्य वस्तूचे दर्शन घडवता येते. त्यात रंग नसेल, पण त्याची आकृती मात्र कोणत्या तरी दृश्य वस्तूचे स्मरण प्रभावीपणे घडवत होती. आजही पन्नास-पाउणशे हजार किंवा अधिक वर्षांनी ही चित्रे पाहून आपल्याला पुष्कळच बोध होतो. ही कल्पना माणसाला पाण्यातले प्रतिबिंब पाहून, निश्चल बसलेले पशुपक्षी पाहून, झाडाझुडपांची किंवा स्वतःची सावली पाहूनही सुचली असेल. पण वस्तू, प्राणी इत्यादींना चित्ररूप देतानाही त्याबरोबरच त्याला रूढ असणारा ध्वनिरूप संकेत आलाच आणि चित्र समोर नसतानाही केवळ ऐकण्याने म्हणजे ध्वनिरचना ओळखण्याने व्यवहार चालला आहे, हे लक्षात आल्यावर चित्रे ही ध्वनिचिन्हेच बनली, यातूनच अक्षर, लिपी यांच्याकडे वळणे शक्य झाले.

लेखन : पण इथे लेखनाचा उगम आणि इतिहास यांपेक्षा भाषेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व पाहिले पाहिजे.

ध्वनिरूप भाषा म्हणजे हवेत विरून जाणाऱ्या नादलहरी. उच्चारता उच्चारता नष्ट होणाऱ्या. लिपीने त्यांना दीर्घ जीवन दिले. जोपर्यंत लिपिबद्ध ध्वनिसंकेत लेखनासाठी वापरलेल्या सामग्रीला धरून आहे, ती सामग्री नष्ट झालेली नाही, तोपर्यंत ती अस्तित्वात रहाणार, तसेच भाषिक अभ्यासाचे साधन म्हणून तिचा उपयोग होणार, ही गोष्ट निश्चित आहे. असे अवशेष ईजिप्तमध्ये आहेत. हिटाइट लिपीचा शोध अशाच अवशेषांतून लागला इराणी सग्राटांचे, अशोकाचे शिलालेख, गुहांतून कोरलेल्या ओळी इत्यादींनी भाषेच्या अभ्यासाला उपकारक असे बहुमोल पुरावे दिले. लाकडावरचे, ताडपत्र-भूर्जपत्रावरचे पुरावे प्रसंगी नष्ट झाले, जळून गेले.

लेखनाला महत्त्व आले, ते व्यक्तीव्यक्तीतील संपर्क साधणाऱ्या भाषेच्या दृश्य व सहजसुलभ आविष्‍कारामुळे. त्यामुळे विनिमयाची शक्ती वाढली व क्षेत्र विस्तारले. दूर अंतरावरील व्यक्तींशी व्यवहार चालवणे काही प्रमाणात शक्य झाले. अंतर कमी कमी करत आणणे, ते जवळजवळ नष्ट करणे, हे विनिमयाच्या आविष्कारसाधानचे ध्येय आहे. त्याची सुरूवात लेखनाच्या शोधातून झाली.

लेखनामुळे ग्रंथनिर्निती शक्य झाली, पण प्रारंभी या ग्रंथप्रसाराची गती मात्र अगदी मंद होती. प्रथम लेखकाने ग्रंथ लिहायचा, नंतर तो घेऊन नकलकाराने वेळेला एक याप्रमाणे तिच्या प्रती काढायच्या. या प्रतींवरून इतरांनी आपली प्रत उतरून घ्यायची, असा हा खटाटोपाचा धंदा होता. यात प्रत तयार करताना नकलकाराने केलेल्या चुका, स्खलने ही तर होतीच, पण मूळ लेखकापेक्षा स्वतःला शहाणे समजणारे लोक शब्द व मजकूर बदलत, पदरचा जादा मजकूर घालत. या कारणामुळे मुळात लेखकाने काय म्हटले असेल किंवा नसेल, शुद्ध संहिता कोणती, हे जुन्या ग्रंथाचा अभ्यास करताना पहावे लागते.

या अवस्थेतून ग्रंथनिर्मितीला अनेक शतकांची वाटचाल करावी लागली. पंधराव्या शतकात मुद्रणयंत्राचा उपयोग सुरू झाला आणि लेखकाला हवी तशी प्रत तयार होणे तर शक्य झालेच, पण एकाच वेळेला अगदी सारख्या शेकडो किंवा हजारो प्रतीही तयार होऊ लागल्या. साहित्यनिर्मितीबरोबर धार्मिक व राजकीय प्रचार यांचा मार्ग खुला झाला. विद्वानांचा विनिमय होऊन ज्ञानविज्ञानाची प्रगती झपाट्याने चालू झाली. शिक्षणाचे काम सोपे झाले. एक साचेबंद सर्वमान्य भाषा अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली. भाषेने एक नवे वळण घेतले. तिला स्थैर्य आले. पुस्तक जन्माला आले.

मुद्रणाने भाषिक व्यवहारात घडवून आणलेली क्रांती अपूर्व असली, तरी ती साक्षरांपुरतीच मर्यादित होती. कारण भाषा बोलणे ही सहज घडणारी सामाजिक प्रक्रिया आहे. मूक-बधिर आणि काही अंशी मंदबूद्धी सोडले तर ती सर्वांना सारखेच माप देते. पण लिहिणे-वाचणे शिकावे लागते. व्यक्तींची आर्थिक व सामाजिक परिस्थिती आणि सर्वांना निदान साक्षर बनवण्याची शासनाची क्षमता, देशव्यापी शिक्षणयंत्रणा यांवर ते अवलंबून असते.

मागासलेल्या देशांच्या अवनतीच्या अनेक कारणांपैकी ज्ञानग्रहण, ज्ञानप्रसार आणि ज्ञानसंवर्धन हे ज्या साधनांची होऊ शकते, त्यांचा योग्य वेळी योग्य उपयोग न होणे हे एक आहे. या ठिकाणी भाषेचा उपयोग अज्ञान दूर करणे, सामाजिक घटक या दृष्टीने प्रत्येक माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, यासाठी आहे.

ध्वनिमुद्रण : पण साक्षरतेचा अभाव म्हणजे अज्ञान ही अवस्था भाषेने आता ओलांडली आहे. विज्ञानाच्या प्रगतीने यांत्रिक युग इतके पुढे गेले आहे, की बोललेल्या शब्दाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. ही क्रांती घडवून आणण्याचे श्रेय दूरध्वनीला आहे, ध्वनिलहरी दूर अंतरावर नेऊन पोचवणाऱ्या आकाशवाणीला आहे, ध्वनिमुद्रण करणाऱ्या फितींना आहे.


खरे तर ज्ञान म्हणजे छापील मजकूर नव्हे. ज्ञान म्हणजे बोललेला शब्द नव्हे. कोणती गोष्ट कशी घडते, कशी केली पाहिजे, घटनांतील कार्यकारणभाव म्हणजे काय इ. गोष्टी म्हणजे ज्ञान. ते बव्हंशी शब्दांतून, भाषेतून येते एवढेच त्यांना महत्त्व. पण ज्ञान मिळवल्यावर, एखादी गोष्ट करता येऊ लागल्यावर भाषेची गरज उरत नाही. ते ज्ञान दुसऱ्या कोणाला द्यायचे असेल, तरच विनिमयसाधन म्हणून भाषेची गरज भासते.

लेखनाची गोष्टही अशीच आहे. जे ज्ञान बोलून, भाषेतून देता येते, त्यासाठी लेखनाची गरज नाही. आज अनेक प्रकारचे ज्ञान आकाशवाणीवरून देता येतेः शेती, आरोग्य, स्वच्छता, राजकीय किंवा अन्य प्रकारच्या घडामोडी, पशुपक्ष्यादींची माहिती, हवामान, जगातील वेगवेगळ्या भागांतील घटना इत्यादी.

ध्वनीच्या जोडीला आता चित्रही आल्यामुळे ज्या अनेक गोष्टी आपल्याला केवळ शब्दरूपांने माहित असतात, त्या दृश्य स्वरूपात आपल्यापुढे येऊ लागल्यामुळे भाषेला अधिक पूर्णत्व आले आहे. भाषिक क्रांतीची ही सर्वोच्च पायरी आहे, असे म्हणायला आज तरी हरकत नाही.

काही भाषिक प्रश्न : पण एका बाजूने भाषेची ही क्रांतीकारक प्रगती होत असताना दुसऱ्या बाजूला अनेक महत्त्वाचे भाषिक प्रश्न उभे आहेत. आज जास्तीत जास्त माणसे, समाज, राष्ट्रे विनिमयासाठी एकत्र येत आहेत. संयुक्त साष्ट्रसंघासारखी जागतिक विनिमय करणारी संस्था स्थापना झाली आहे, पण माणसे एकमेकांपासून दूरदूरच चालली आहेत. याला राजकीय व आर्थिक तत्त्वप्रणालीबरोबरच धर्म व भाषा ही दोन कारणे आहेत. वंश, भौगोलिक स्थान, धर्म व भाषा यांनी मानवात भेद निर्माण केले आहेत. पण यातील पहिल्या तीन कारणांपेक्षा शेवटचे भाषा हेच कारण सर्वात महत्त्वाचे आहे. भाषाच भिन्न असल्या, तर व्यक्तीव्यक्तीतला विनिमयच अशक्य होतो आणि परभाषिकाला मनुष्यवर्गातला एक प्राणी एवढेच अस्तित्व शिल्लक रहाते.

अनेकभाषिकत्व हे जगाचे तर एक मोठे दुखणे आहेच, पण भारताचे आणि इतर काही देशांचेही आहे. धर्माप्रमाणेच भाषा ही माणसाला जन्मतः चिकटलेली असल्यामुळे तिला एक भावनात्मक अधिष्ठान आहे. ‘मातृभाषा’ हा शब्द हे त्याचेच गोंडस प्रतीक आहे. अगदी एक मानल्या गेलेल्या मराठीसारख्या भाषेतही स्थानिक, प्रांतिक, सामाजिक, व्यावसायिक भेद आहेतच. समाजशास्त्रदृष्ट्या ते स्वाभाविक असले तरी विनिमयाच्या दृष्टीने ते सहजीवनातले अडथळेच आहेत, याचा अनुभव आपल्याला येतोच.

हे अडथळे दूर करण्यासाठीच प्रमाणभाषा, राष्ट्रभाषा किंवा संपर्कभाषा, आंतरराष्ट्रीय भाषा किंवा विश्वभाषा असे तोडगे सुचवण्यात येतात. यातल्या फक्त प्रमाणभाषेलाच शिक्षणाचे माध्यम म्हणून सामाजिक मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रभाषेचा प्रश्न बहुभाषिक देशातच असतो. बेल्जियम, स्वित्झर्लंड किंवा कॅनडासारख्या देशांत हा प्रश्न तितकासा त्रासदायक नाही, कारण तिथे दोन किंवा तीनच भाषा असून त्या सर्वांना समान दर्जा देणे शक्य आहे, असे असूनही कॅनडासारख्या देशांत इंग्रजी आणि फ्रेंच भाषिकांत जो दुरावा आहे, त्यामुळे तेथील वातावरण जवळजवळ नेहमीच स्फोटक असते. श्रीलंकेचा प्रश्नही अशाच स्वरूपाचा आहे.

सोव्हिएट संधातही एकशेवीस भाषा आहेत, पण सदस्य राष्ट्रांची अंतर्गत स्वायत्तता व त्यांच्या संस्कृतीला मिळणारे रक्षण, यांमुळे तिथे हा प्रश्न नाही. शिवाय संख्या, साहित्यसमृद्धी व ज्ञानसंग्रह या दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या रशियन भाषेला खुद्द सोव्हिएट संघात व बाह्य जगात एवढी प्रतिष्ठा आहे, की तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा संकुचित व आत्मघातकी विचार इतर भाषिकांच्या मनात येणे शक्य नाही.

याउलट अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रीय, सरकारी किंवा सार्वजनिक पातळीवर इंग्रजी (अमेरिकन) ही एकच भाषा आहे. तिथे अनेक पिढ्यांपासून येऊन स्थायिक झालेले असंख्य मुळातले परभाषिक आज शंभर टक्के अमेरिकन झालेले आहेत. आजही तिथले नागरिकत्व स्वीकारणाऱ्या परदेशीय परभाषिकांची मुले पुढच्याच पिढीला पूर्णपणे अमेरिकन होतात. त्यामुळे भाषिक प्रश्नाला तिथे वाव नाही.

भारतातील भाषिक स्थिती मात्र शोचनीय व हास्यास्पद आहे. या देशात ६०० वर भाषा व असंख्य बोली आहेत. घटनेप्रमाणे त्यातल्या काही प्रमुख आहेत, पण राजकीय स्थित्यंतरानुसार त्यातही भर पडत असते. घटनेच्या आठव्या परिशिष्टात संस्कृत या मृतभाषेचा समावेश आहे, पण इंग्रजीचा नाही. वास्तविक इंग्रजी ही भारतातील एका राज्याची कामकाजाची भाषा आहे, विद्यापीठांचे माध्यम आहे, संसदेतील अनेक सभासद, मंत्री तिचाच उपयोग करतात, माध्यमिक शिक्षणातील ती एक आवश्यक भाषा आहे, भिन्नभाषिक सुशिक्षितांची, सभा, संमेलने, परिसंवाद इत्यादींची विनिमयभाषा आहे. अनेक उत्तम वर्तमानपत्रे, मासिके, संस्थांची मुखपत्रे यांची ती भाषा आहे. ज्ञान, विज्ञान, साहित्य, मनोरंजन, राजकारण इ. अनेक क्षेत्रांत ती अपरिहार्य आहे. केंद्र सरकारचा जवळजवळ सर्व कारभार या भाषेतूनच चालतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या अभावी आपला बाह्य जगाशी असलेला राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संपर्क पूर्णपणे नष्ट होईल.

भाषिक व्यवहारात भाषेचा दर्जा ही महत्त्वाची गोष्ट आहे. तिची ज्ञानाची अभिव्यक्ती व संग्रह करण्याची क्षमता, तिला जगात असलेली मान्यता, या दृष्टीनेच तिच्याकडे पाहिले पाहिजे. त्या मानाने तिच्या भाषिकांची संख्या ही मुद्दा गौण आहे. हे लक्षात ठेवले तर आज तरी जगात, विशेषतः भारताच्या दृष्टीने, इंग्रजी हीच सर्वांत महत्त्वाची व उपयुक्त भाषा आहे. तिची परंपरा नष्ट होऊन देशाचे कोणतेच हित होणार नाही. तिला दूर सारण्याचा एकच मार्ग म्हणजे आपल्या भाषा तिच्या पातळीला आणणे. अर्थात लहान, संघटित, सुशिक्षित भाषिक समाजाला (उदा., इझ्राएल) हे जितके शक्य असते तितके ते जाती, धर्म, व्यवसाय, स्थानिक भेद इ. कारणांनी खंडित असलेल्या, विस्कळित, शिक्षणाच्या बाबतीत मागासलेल्या समाजाला नसते. भाषिक विकासाचे हे अडथळे दूर करून कोणत्याही भाषेचा भविष्यकाळ विनिमयसाधन म्हणून अधिक प्रभावी बनवणे शक्य असते, पण त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील बहुसंख्य लोक विकासाभिमुख व जिज्ञासू असावे लागतात. ते जोपर्यंत नाहीत, तोपर्यंत केवळ परिभाषांचे कोश निर्माण केल्याने समाजावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.

समाज जागृत झाला, स्वतःचे हित कशात आहे हे त्याला समजू लागले, तरच सामान्य विनिमयाची भाषा म्हणजे काय हे समजण्याची आणि ती स्वीकारण्याची पात्रता त्याच्यात येईल. केवळ राष्ट्रभाषेऐवजी संपर्क भाषा, राज्यभाषा असे प्रयोग करून हा प्रश्न सुटणार नाही, म्हणून लोकशिक्षण हेच सामाजिक प्रश्न सोडवण्याचे खरे साधन आहे. पण लोकांना शिक्षण देण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो त्याचा आपल्याकडे अभाव असल्यामुळे या प्रश्नाबाबत योग्य मार्गदर्शन होऊ शकत नाही. साहित्य अकादेमीसारखी संस्था ज्यांना भाषा म्हणून मान्यता देते, त्यांना ते स्थान सरकारात नाही. अशा परिस्थितीत सामान्य विनिमयाच्या भाषेचा प्रश्न बिकट झाला, तर नवल नाही.


संस्कृत भाषा मृत असली तरी केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक दृष्टिनेच नव्हे, तर प्राचीन इतिहास व समाजजीवन यांच्या अभ्यासाचे साधन, भाषाशास्त्रीय अभ्यासाला अपरिहार्य असे तिचे स्थान, धार्मिक संस्कार व आचार यांचे उगमस्थान इ. गोष्टींमुळे ती अजूनही एक चैतन्यपूर्ण व प्रभावी भाषा आहे. शिवाय तिचे ललित साहित्य, तिच्यातील शास्त्रीय ग्रंथ, महाभारत व रामायण ही वीरकाव्ये यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. हीच गोष्ट पाली, अर्धमागधी, माहाराष्ट्री इ. प्राकृत भाषांची आणि सम्राट अशोकादींच्या शिलालेखादी साहित्याची. भाषा मृत होते ती दैनंदिन विनिमयसाधन म्हणून अभ्याससाधन म्हणून नव्हे. ग्रीक, लॅटिन, हिब्रू यांसारख्या भाषांनाही हा नियम लागू आहे. प्राचीन भाषा शिकणे म्हणजे केवळ तिचे व्याकरण शिकून शुद्ध वाक्यरचना करता येणे नव्हे. तिचे महत्त्व कशात आहे, ज्ञानाच्या व कलेच्या विविध क्षेत्रांत तिने जगाला काय दिले, हे शोधून काढणे व ऐतिहासिक दृष्ट्या ज्ञानवर्धनाच्या परंपरेत तिचे स्थान नक्की करणे, हा आपल्या अभ्यासाचा हेतू असला पाहिजे. म्हणून केवळ घोकंपट्टीच्या किंवा स्मरणशक्तीच्या जोरावर ग्रंथ पाठ करणे याला आता किंमत राहिलेली नाही. लेखनपूर्व काळात असा माणूस हा एक संदर्भग्रंथ होता. त्याच्याजवळ शिकून आणखी असेच संदर्भग्रंथ तयार होत. पण ज्ञानरक्षणाच्या या परंपरेला मुद्रणयुगात अर्थ उरलेला नाही.

परभाषा शिकण्याची एक स्वाभाविक उत्सुकता काहीजणांत असते. काही लोकांची ती गरज असते. त्यामुळे ती कशी शिकावी, सुलभपणे पण भरभर कशी आत्मसात करावी, इकडे लक्ष दिले जाते.

यामुळे भाषा शिकवण्याच्या तंत्रात सतत बदल होत राहिला आहे. पूर्वी व्याकरण व कोश यांचा उपयोग करून, पाठांतर करून, गणिताप्रमाणे रूपमालिका पाठ करून, भाषांतराची उदाहरणे सोडवून हे केले जाई. पुढे यांत्रिक साधने उपलब्ध झाली. ध्वनिमुद्रिकांमुळे एकच धडा पुनःपुन्हा ऐकून उच्चाराचे अनुकरण अधिकाधिक निर्दोष होऊ लागले. ध्वनिफिती, ध्वनिशाळा इ. आधुनिक राहण्याची प्रसार झाल्याने केवळ भाषाशिक्षकावरच अवलंबून राहण्याची आवश्यकता खूप कमी झाली, जवळजवळ संपुष्टात आली आणि अगदी प्रचलित अशी बोलण्याची सामग्री हाती येऊन शिक्षण जिवंत भाषेच्या अगदी निकट गेले.

भाषाध्यापनाची सामग्री म्हणून भाषेचे विश्लेषण होऊ लागले. मातृभाषा व जिचा अभ्यास करायचा ती लक्ष्य भाषा यांच्यातील साम्य व भेद ध्यानात घेऊन अमुक एक मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्याला अमुक एक परभाषा शिकवताना विशेष भर कशावर दिला पाहिजे, याकडेही लक्ष देण्यात येऊ लागले. अभ्याससामग्री तयार करताना आणि तिचा उपयोग करताना काय केले पाहिजे, हेही उलगडत गेले.

परभाषाशिक्षण हे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. एक तर त्या भाषेतील साहित्य व ज्ञानसंग्रह आपल्या हाती लागतात जर अशी भाषा ही एक जिवंत भाषा असली तर ती ज्या समाजाची असेल त्या समाजात आपण मिसळू शकतो. पण आपल्याला होणारा लाभ हा त्या भाषेच्या दर्जावर अवलंबून असतो. इंग्रजी, फ्रेंच यांसारख्या ज्ञानभाषा, साहित्यसमृद्ध भाषा शिकून जे मिळेल, ते एखादी सामान्य भाषा शिकून मिळणार नाही. तशी सामान्यपणे कोणी शिकतही नाही. कारण भाषेचे अध्ययन हे सहेतुक असते. केवळ छंद म्हणूनही कोणी वाटेल ती भाषा शिकणार नाही.

भाषाशिक्षणाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पूर्वग्रह नष्ट होणे. आपली स्वतःची भाषा तर्कशुद्ध आहे, असे बहुतेकांना वाटते. पण भाषा ही विशिष्ट नियमांना धरून चालणारी शिस्तबद्ध रचना असली, तरीही बहुतेक नियमांना भाषेतच मर्यादा असतात, अपवाद असतात.शिवाय आपल्या भाषेतलेच सर्व शब्द, त्यांचे प्रयोग, त्यांचे अर्थ इ. आपल्यालाही माहीत असतातच असे नाही. आपल्या भाषेत एकसारखी भर पडत असते. विनिमयाच्या ज्या कोपऱ्यात आपण पोचलेले नसतो तिथे ती आपल्याला नेते, कारण विनिमयाच्या क्षेत्रात आपल्याला काय माहीत नाही ते अनुभवापूर्वा किंवा एखादा विशिष्ट प्रसंग येण्यापूर्वी सांगता येत नाही. परभाषेच्या अभ्यासात तर यापेक्षाही अधिक जागरूकता बाळगावी लागते. मराठी भाषेत नामाला तीन लिंगे असतात, हिंदी किंवा फ्रेंचमध्ये दोन आहेत, इंग्रजीत लिंगभेद नाही. तरीही या सर्व भाषांचा व्यवहार चालू आहे. संस्कृतमधले नामाचे द्विवचन नष्ट झाले, आत्मनेपद व परस्मैपद हा क्रियापदातला भेद उरला नाही, इतर अनेक क्रांतीकारक परिवर्तने घडून आली, तरी नंतरच्या संस्कृतोद्‍भव भाषांचे अडले नाही.

जी गोष्ट व्याकरणाची किंवा भाषेच्या बाह्य रूपाची तीच आशयाची किंवा अर्थभांडाराची. दोन समाजांतले सांस्कृतिक, बौद्धिक किंवा जीवनविषयक अंतर भाषेतून व्यक्त होते. जितके समाज, जितके त्यांचे जीवनप्रकारे, तितकीच त्यांची अभिव्यक्तिभिन्नता. एकाच समाजातील व्यक्तीव्यक्तीतही स्वभावभिन्नतेनुसार भाषा विशिष्ट रूप धारण करते. या रूपाला आपण शैली म्हणतो. व्यक्तिविशिष्ट ध्वनी म्हणजे जसा आवाज, तसाच भाषेचा व्यक्तिविशिष्ट आविष्कार म्हणजे शैली. ही शैली सवयीमुळे येईल,अनुकरणामुळे येईल, विशिष्ट अनुभव परिणामकारकाणे व्यक्त करण्याच्या हेतूमुळे, म्हणजे काही अंशी जाणीवपूर्वक, येईल आणि मग आपण साहित्यक्षेत्राजवळ येऊ. साहित्य हा जितका उत्कट वैयक्तिक अनुभव असतो, तितकाच तो व्यक्तिमनाचा प्रभावशाली भाषिक आविष्कार असतो विशेषतः काव्यात. समाजाची सर्वसाधारण मालमत्ता म्हणून व्यक्तिमनात नोंद झालेली निर्विकार भाषा वेगळी आणि व्यक्तीच्या वापरात आढळणारे तिचे चैतन्यस्वरूप वेगळे. यांनाच फेर्दिनां द सोस्यूर यांनी अनुक्रमे ‘langue’ (लांग्) व ‘parole’ (पारोल्) हे शब्द वापरले आहेत. वापरातली भाषा काही अंशी व्यक्तिनिष्ठ असतेच, हा याचा अर्थ.

पण आशय जितका निश्चित, वस्तुनिष्ठ, नियमबद्ध तितके भाषेचे स्वरूप स्थिर, व्यक्तिबाह्य असते. जिथे वैयक्तिक मताला वाव नसतो, अशा प्रकारचे स्थलकालअबाधित ज्ञान व्यक्त करताना तिचे हे स्वरूप दृष्टीला पडते. म्हणूनच योग्य शब्द, परिभाषा जर एखाद्या भाषेजवळ असली तर तिला दुसऱ्या भाषतील शास्त्रीय लेखन व्यक्त करणे, ते भाषांतराच्या रूपात स्वभाषिकांना देणे शक्य असते. शास्त्रीय लेखनात वापरण्यात येणारे शब्द त्या त्या विषयात, कोणत्याही संदर्भात,निश्चित अर्थव्याप्तीच दाखवतात. ही अर्थव्याप्ती कमी अधिक होऊन चालणार नाही. हे शब्द गणितातल्या आकड्यांप्रमाणे असतात. त्यांनी बनलेला एका विशिष्ट शास्त्रीय विषयाचा कोश ही त्या विषयाची परिभाषा होय. अतिशय व्यापक आणि पुनःपुन्हा व्यक्त करावा लागणारा अर्थ सर्वत्र त्याच रूपात व्यक्त करण्याचे सामर्थ्य असणारा सुटसुटीत शब्द म्हणजेच पारिभाषिक शब्द. तो एकदा रूढ झाला की त्यात बदल करणे, तो योग्य आहे की अयोग्य याची चर्चा करणे हे शास्त्रीय लेखनाला हानिकारक आहे. दुर्दैवाने समानार्थक शब्द वापरण्याचे वेड असलेल्या भारतीयांना या प्रश्नाचे गांभीर्य अजून कळलेले नाही. अगदी रूढ झालेले, सर्वांना कळणारे शब्दसुद्धा, ते नीट अर्थ व्यक्त करत नाहीत, ते शेकडो वर्ष वापरले जात असले तरी परभाषिक आहेत, त्यांचा व्युत्पत्तिशास्त्रानुसार अर्थ वेगळाच आहे, अशा व इतर अनेक सबबींवर ते काढून टाकण्यासाठी अनेक लोक धडपडत असतात. हे सर्व प्रयत्‍न भाषाबाह्य आहेत. परकी शब्द असल्याने जोपर्यंत आशय किंवा ज्ञान गढूळ होत नाही, आकलन नीट होते, विनिमयात अडथळा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत भाषेत ढवळाढवळ न करणे इष्ट होय.


परकी शब्द वापरणे तर सोडाच, पण काही क्षेत्रांत परकी भाषांचाही पूर्णपणे आधार देणे अपरिहार्य झाले आहे. बाह्य जगाशी विनिमय, नव्या कल्पनांचा व प्रगतीचा महत्त्वाच्या ज्ञानभाषांच्या द्वारे परिचय करून घेणे, यासाठी विशिष्ट भाषांचा अभ्यास करावा लागतो. भाषांची विविधता ही एक ऐतिहासिक घटना असली, तरी सर्व मानवांची एकच भाषा असावी असा ध्येयवाद बाळगणारे, निदान सर्व मानवांनी जगातील आणखी कोणती तरी एकच विशिष्ट भाषा शिकावी, अशी व्यवहारवादी दृष्टी ठेवणारे समंजस लोक जगात आहेत. पण राष्ट्रवादाने, स्वभाषेच्या अभिमानाने, राजकीय महत्त्वाकांक्षेने व असूयेने झपाटलेल्या या जगात अजूनही एकभाषिकतेकडे वाटचाल होणे अशक्य आहे. निदान जगाची शास्त्रीय भाषा तरी एक असावी, म्हणजे कोणत्याही भाषेतील शास्‍त्रीय ग्रंथ, लेख इ. तिच्यात भाषांतरित करता येतील आणि तेवढी एकच भाषा शिकल्याने अभ्यासकांची सोय होईल, असे आंत्वान मेये यांचे मत होते.

भाषेचे महत्त्व तिच्या भाषिकांच्या संख्येवर आहेच, पण त्याबरोबरच तिचे भौगोलिक व्याप्तिक्षेत्र केवढे आहे, ज्ञानभाषा म्हणून तिचे स्थान काय आहे, याकडेही लक्ष द्यावे लागते. संयुक्त राष्ट्रसंघात अरबीला मान्यता आहे, तर हिंदीला का नसावी या प्रश्नाचे उत्तर यामुळे लक्षात येईल. परकीय भाषा येत असूनही दुभाषा वापरून संभाषण करणे हा स्वाभिमान नसून दुराग्रह आहे, हे आपण समजले पाहिजे. जर अनेक प्रादेशिक भाषा, इतर असंख्य भाषा, इतर असंख्य भाषा व बोली असणाऱ्या भारतात आपण संपर्क भाषा व राष्ट्रभाषा यांचा प्रचार करतो व आग्रह धरतो, तर जागतिक पातळीवर त्यामागचे तत्त्व लक्षात घेऊन आपण वागणे योग्य ठरेल. भाषिक दुराग्रहाची पकड हिंदीला विरोध करणाऱ्या लोकांवर आहे, हा आरोप पूर्णपणे खरा नाही. हिंदीचा हिरिरीने प्रचार करणाऱ्या हिंदी भाषिकांवर तर ती त्याहून अधिक आहे. भावनेचे अधिष्ठान असलेला कुठलाही प्रश्न नुसत्या तात्विक विवेचनाने, किंवा तर्कशास्त्राने सुटू शकणार नाही. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन, सामाजिक-राजकीय दृष्टीतून त्याच्याकडे पाहिले पाहिजे, विरोध का होतो हे पाहिले पाहिजे, आपण सुचवलेल्या धोरणापासून सोय कोणती, फायदा किती, हे संबंधितांना पटवून दिले पाहिजे. भाषाशिक्षण हे ओझे होता कामा नये, भाषिक धोरण हे लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणारे असता कामा नये आणि मातृभाषा तुच्छ लेखण्याचा किंवा टाकून देण्याचा प्रसंग कोणावरही येता कामा नये. विनिमयसाधन म्हणून सर्व भाषा-बोलींना सारखेच महत्त्व आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. भाषेबद्दलची ऐतिहासिक व सामाजिक दृष्टी या बाबतीत आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल.

(जगातील सर्व प्रमुख भाषा, भाषाकुटुंबे व भाषासमूह यांवर मराठी विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंदी आहेत).

पहा : अशिष्ट प्रयोग कृत्रिम भाषा द्विभाषिकत्व व बहुभाषिकत्व ध्वनिविचार बालभाषा बोलीभाषाविज्ञान भाषाकुटुंब भाषाशास्त्र भाषाशिक्षण वर्णविचार व्याकरण व्युत्पत्तिशास्त्र क्षेत्राभ्यास, भाषाशास्त्रीय.

संदर्भ : 1. Bloomfield, Leonard, Language, New York, 1933.

            2. Jespersen, Otto, Language its Nature, Development and Origin, London, 1922.

            3. Meillet, Antoine, Les langues dans l’ Europe nouvelle, Paris, 1928.

            4. Vendryes, J, Le language, Paris, 1950.

कालेलकर, ना. गो.”