झ्यूल ब्लॉक

ब्लॉक, झ्यूल : (१ मे १९८० – २९ नोव्हेंबर १९५३). फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ. भारतीय भाषाशास्त्राच्या अभ्यासकांत ब्लॉक यांचे स्थआन निःसंशय सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी व्याकरण विषयातली उच्च पदवी संपादन केली. लॅटिन व ग्रीक यांच्यावर त्यांचे उत्कृष्ट प्रभुत्व होते, त्यामुळे सील्व्हँ लेव्ही व आंत्वान मेये यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाषाशास्त्राचा अभ्यास सुरू केला.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतीय भाषाशास्त्रात एकतर वैदिक, पाली, प्राकृत इ. प्राचीन भाषांचा अभ्यास करणारा, त्याचप्रमाणे तुलनात्मक इंडो – यूरोपियाच्या मागे लागलेला तज्ञांचा वर्ग, किंवा अत्याधुनिक भाषांचा अभ्यास करणारा सरकारी अधिकारी व ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा वर्ग असे दोन विभाग होते. प्राचीन व अत्याधुनिक यांच्यामधला उत्क्रांतीचा अभ्यास दुर्लक्षितच होता.

झ्यूल ब्लॉक यांनी या मध्यंतरीच्या भाषिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले. १९०६ साली त्यांनी पौर्वात्य विद्यमान भाषासंस्था आणि उच्चाभ्यास संख्या यांच्या पदव्या मिळविल्या. या पुढील अभ्यासात भारताभ्यासाचे तज्ञ लेव्ही आणि सामान्य तुलनात्मक भाषिक अभ्यासाचे श्रेष्ठ अभ्यासक मे ये यांच्याकडून एक महत्त्वाचे तत्व ते शिकले, ते ऐतिहासिक दृष्टीचे होय. इतिहासामुळे ज्या संस्कृतीचे भाषा हे वाहन आहे तिचे दर्शन तर होतेच, पण वास्तव घटनांचे ज्ञान होऊन मन कल्पनारम्य भ्रामक सिद्धांतांच्या मागे लागत नाही. यामुळे सत्यशोधनाच्या कार्यालाही कठोर परंतु स्पष्ट अशा पद्धतीचा आधार मिळतो.

इ. स. १९०६ ते १९०८ च्या दरम्यान ते भारतात दोन अडीच वर्षे येऊन राहिले. त्यापूर्वी त्यांनी हिंदी व तमिळ या भाषांचा अभ्यास करून पॅरिसमध्ये त्यांचे अध्यापनही केले होते. भारतात पुण्याला ते सर रामकृष्ण भांडारकरांकडे बराच काळ होते आणि तिथे त्यांनी मराठीचा खोल अभ्यास केला. यांशिवाय ते काही काळ पाँडिचेरी व चंद्रनगर येथेही राहिले होते.

फ्रान्समध्ये परतल्यानंतर त्यांनी भाषाशास्त्रीय संशोधनाकडे संपूर्ण लक्ष दिले. १९१४ साली त्यांनी आपला मराठी भाषेच्या घटनेवरील प्रबंध La formation de la langue marathe’ हा पॅरिस विद्यापीठाला सादर केला. पण त्याच वर्षात पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे तो १९२० पर्यंत अप्रकाशित राहिला.

फ्रान्सच्या कायद्यानुसार सक्तीचे असलेले लष्करी शिक्षण त्यांनी १९०१ – २ मध्ये घेतले होते. १९१४ ते १९१९ या काळात त्यांना सैन्यात भरती व्हावे लागले आणि त्यांनी इन्फंट्रीत क्रमाक्रमाने सार्जट, सब लेफ्टनंट व लेफ्टनंट अशी कामे केली.

युद्धानंतर त्यांचे अध्यापन कार्य पुन्हा सुरू झाले. उच्चाभ्यास संस्थेत मार्गदर्शन (१९१९—५१), ‘कोलेझ्य द फ्रांस’मध्ये सील्व्हँ लेव्हीच्या बदली अध्यापन (१९१९—२०), आल्फ्रेद फूशे यांच्या जागी पॅरिस विद्यापीठात भारतीय विद्येचे प्राध्यापक (१९२०—२६), पॅरिसच्या ‘लिंग्विस्टिक सोसायटी’चे कार्यवाह (१९२०—४६), पौर्वात्य भाषासंस्थेत तमिळ व हिंदी या भाषांचे प्राध्यापक (१९२१—१९३७), ‘कोलेझ्य द फ्रांस’मध्ये प्राध्यापक (१९३७—५१).

या काळात त्यांनी शेकडो ग्रंथपरीक्षणे केली आणि जवळजवळ पाउणशे शोधनिबंध लिहिले. १९०५ साली त्यांनी काही विद्वानांच्या सहकार्याने कार्ल ब्रुग्मान यांच्या तुलनात्मक इंडो-यूरोपियन व्याकरणाच्या संक्षिप्त आवृत्तीचा फ्रेंच भाषेत अनुवाद केला. त्यांचे इतर ग्रंथ असे : Un manuel du scribe cachemirien au XVIIe Siecle Le Lokaprakasa attribute a Ksemendra (१९१४) La formation de la landue marathe (१९२०) L’ indo-aryen, du veda aux temps modernes (१९३४) Structure grammaticale des langues dravidiennes (१९४६) Les inscriptions d’ Asoka (१९५०) Les Tsiganes (१९५३) Application de’ la cartographie a l’ histoire de l’ Indo-aryen (मरणोत्तर प्रसिद्ध). अत्यंत आटोपशीर व मुद्याला धरून लिहिण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांचे ग्रंथ क्लिष्ट वाटतात. पण एखाद्या विषयावर पूर्वी जे संशोधन झालेले आहे ते वाचकाला माहीत असेल पाहिजे, त्याचप्रमाणे ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भाशीही त्याचा परिचय असला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. या अभ्यासातून त्याच्याशी संबंधित अशा समाजाला जर आपण समजून घेऊ शकलो नाही, तर त्याला फारशी किंमत नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

इ. स.  १९२० नंतरच्या भारतातील भाषाशास्त्रीय अभ्यासावर त्यांच्या संशोधनाचा पडलेला प्रभाव निर्विवाद आहे. हे संशोधन अजूनही मार्गदर्शक ठरावे इतके मूलगामी आहे. सेव्ह्र येथे त्यांचे निधन झाले.

कालेलकर, ना. गो.