इंडो-आर्यन भाषासमूह : इंडो-यूरोपियन भाषाकुंटुंबातील अगदी पूर्वेकडचा भाषासमूह. यातील भाषा भारत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, नेपाळ व श्रीलंका या देशांत मुख्यत: बोलल्या जातात. या भाषा-कुटुंबातील देशांतर करून गेलेले लोक मॉरिशस बेटे, आफ्रिका येथेही आढळतात. जिप्सी भाषाही मुळात या समूहातीलच होत.

१९६१ च्या खानेसुमारी प्रमाणे या समूहाच्या ६६ भाषा व ५७४ बोली भारतात नोंदल्या गेल्या असून, त्यांच्या भाषिकांची संख्या ३२,१७,२०,७०० म्हणजे एकंदर लोकसंख्येच्या ७३·३० टक्के होती.

या समूहाच्या तीन शाखा आहेत : इराणी, दार्दिक व इंडो-आर्यन. इराणी शाखेच्या इराणी व पूर्व अशा दोन उपशाखा आहेत. पहिल्या उपशाखेची महत्त्वाची भाषा इराणी ही आहे. दुसऱ्या उपशाखेत दोन गट आहेत : अफगाणिस्तान-बलुचिस्तान गट व घालचाह गट. पहिल्या गटात पश्तो (पुश्तू), ओरमुरी व बलुची या भाषा असून दुसऱ्या गटात वाखी, शिघनी, इशाकश्मी व मुंजानी यांचा समावेश आहे. या सर्व भाषा भारताबाहेर बोलल्या जातात. 

दार्दिक (पिशाच) शाखेच्या काफीर, खोवार व दार्द अशा तीन उपशाखा असून पहिल्या दोन भारताबाहेरच्या आहेत. काफीर उपशाखेत बशगली, वाइआला, वेरोन व अशकुंद या भाषा असून खोवार उपशाखेत खोवार ही भाषा आहे. दार्द उपशाखेत शिना, काश्मीरी व कोहिस्तानी या भाषा आहेत. शिना भाषिक १,५५८, काश्मीरी भाषिक १९,१४,४४६ व कोहिस्तानी २३३ आहेत.

इंडो-आर्यन शाखेच्या तीन उपशाखा आहेत : बाह्य, अंतर्गत व मध्यस्थ. बाह्य उपशाखेचे तीन गट आहेत : वायव्य, दक्षिण व पूर्व. वायव्य गटात सिंधी व लहंदा, दक्षिण गटात मराठी व कोकणी आणि पूर्व गटात ओडिया, बंगाली, बिहारी व असमिया या भाषा येतात.

अंतर्गत उपशाखेचे दोन गट आहेत : मध्य व पहाडी. मध्य गटात हिंदी (हिंदुस्थानी, बांगरू, ब्रज, कनौजी व बुंदेली), पंजाबी, गुजराती, भिली, खानदेशी व राजस्थानी यांचा समावेश करण्यात येतो. पहाडी गटात पूर्व पहाडी, मध्य पहाडी (कुमाऊँनी, गढवाली) व पश्चिम पहाडी (जौनसरी, सिरमौडी, बाघाटी, किउथाली, सतलज बोली, कुलू बोली, मंडी बोली, चंबा बोली, भद्रवाह बोली इ.) येतात.

शेवटच्या मध्यस्थ उपशाखेत हिंदी (अवधी, कोसली, बाघेली, बाघेलखंडी, छत्तीसगढी, लाडिया) येते. एकंदर हिंदी भाषिक १३,३४,३५,३६० असून उर्दू भाषिक २,३३,२३,५१८ आहेत.

इंडो-आर्यन शाखेच्या भाषा संस्कृत भाषा किंवा तत्सम इतर बोलींतून आल्या आहेत. परस्परांपासून कितीही दूर अंतरावरच्या भाषा घेतल्या, तरी त्यांचे एकमूलत्व जाणवण्याइतके साम्य त्यांच्यात निश्चितच सापडते.

या भाषा बोलणारे लोक भारतातील इतर सर्व भाषाकुटुंबांच्या भाषिकांमागून आले. त्यांच्या आगमनाचा काळ ख्रि. पू. १५०० ते १२०० मानला जातो. त्यांच्या भाषेचा सर्वांत जुना पुरावा ऋग्‍वेदाच्या सूक्तांत आढळतो. ही सर्व सूक्ते एकाच वेळी रचलेली नसून कालदृष्ट्या जुन्यात जुने व अगदी नवे यांत कित्येक पिढ्यांचे अंतर असावे, असे अंतर्गत पुराव्यावरून दिसते. याच भाषेचे स्थिर व व्याकरणबद्ध रूप काही शतकांनंतर संस्कृत या नावाने प्रस्थापित झाले आणि अतिशय श्रेष्ठ प्रतीचे वैचारिक, तांत्रिक, धार्मिक इ. साहित्य त्यातून निर्माण झाले.

संस्कृतची परिवर्तित अवस्था मध्य इंडो-आर्यन या नावाने ओळखली जाते. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाच्या शेवटापर्यंत ती चालू होती. तिचे नमुने पाली साहित्य, अशोकाचे शिलालेख, जैन धर्मावाङ्‌मय, सप्तशतीसारखे काव्यग्रंथ, संस्कृत नाटकांतील प्राकृत गीते व विदूषक, स्त्रिया इत्यादींच्या तोंडी असलेली भाषा अशांसारख्या लिखित साहित्यातून मिळते. आधुनिक आर्य भाषांची पूर्वावस्था दर्शविणारे तिचे स्वरूप अपभ्रंश या नावाने ओळखले जाते.

वेदकालीन भाषेची व्यंजनपद्धती व स्वरपद्धती तिच्या अभ्यासकांनी आपल्या ग्रंथांत सूक्ष्मपणे वर्णन केली आहे. ती पुढीलप्रमाणे:

व्यंजने: 

           

स्फोटक: 

मृदुतालव्य 

क,

ख,

ग,

घ,

ङ.

 

तालव्य

च,

छ,

ज,

झ,

ञ.

 

मूर्धन्य

ट,

ठ,

ड,

ढ,

ण.

 

दंत्य

त,

थ,

द,

ध,

न.

 

ओष्ठ्य

प,

फ,

ब,

भ,

म.

कंपक : 

 

       

पार्श्विक :

 

       

अर्धस्वर :

तालव्य

       
 

ओष्ठ्य 

       

घर्षक :

तालव्य

       
 

मूर्धन्य

       
 

दंत्य

       
 

कंठ्य

विसर्ग 

 

स्वर:

         

शुद्ध : अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ ऋ‍ृ, लृ.

संयुक्त: ए, ऐ, ओ, औ. 

शब्दान्ती येणाऱ्या स्वराचा त्यानंतरच्या स्वराशी आणि शब्दान्ती येणाऱ्या व्यंजनाचा त्यानंतरच्या स्वराशी किंवा व्यंजनाशी विशिष्ट नियमांनुसार संधी होतो. शब्दान्ती फक्त स्वर किंवा एकच व्यंजन येते. इतरत्र दोन किंवा अधिक व्यंजने येऊ शकतात.

नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद हे व्याकरणातील विकारक्षम वर्ग आहेत. नामांत तीन लिंगे (पुरुष, स्त्री, नपुंसक), तीन वचने (एक, द्वि, बहु) व आठ विभक्त्‍या आहेत. मूळ नामाला किंवा त्याच्या विकारयुक्त रूपाला प्रत्यय लागून विभक्ती सिद्ध होते. हाच प्रकार सर्वनाम व विशेषण यांचा आहे मात्र सर्वनामाचे अनेकवचन प्रत्यय लागून होत नाही.

 सामान्यत: दोन शब्दांचे समास आढळतात.

क्रियापदाची रूपेही क्रियापद ज्या पदाचे, गणाचे असेल त्यानुसार आणि कर्तृनिष्ठ, कर्मनिष्ठ वा प्रयोजक असल्यास तदनुसार बदलते. क्रियापदावरून पुरुष व वचन यांचा बोध होतो लिंगाचा होत नाही. क्रियापदावरून बनविलेल्या धातुसाधितांचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो. काळ व अर्थ यांना अनुसरून क्रियापदांची अनेक रूपे होतात. काळ सामान्यत: पाच आहेत: वर्तमान, अपूर्ण भूत, पूर्ण भूत, अनद्यतन व भविष्य. अर्थ पाच आहेत: विधान, संभावना, विधी, इच्छा व आज्ञा यांचे वाचक.

धातूंना किंवा त्यांच्या विकारयुक्त रूपांना प्रत्यय जोडले जातात. हे प्रत्यय पुरुषवाचक, वचनवाचक तसेच कालदर्शक व अर्थदर्शक आहेत.विभक्तिप्रत्यय ध्वनि-परिवर्तन होऊन बदलले. विशेषत: अंत्यव्यंजनाच्या लोपामुळे नामांचे बाह्यरूप बदलले. पुढील काळात तर विभक्ती बहुतांशी नष्ट होऊन प्रत्ययांऐवजी शब्दयोगी अव्यये आली आणि एकदोन अपवाद सोडल्यास नपुंसकलिंग नाहीसे झाले. क्रियापदात ध्वनिपरिवर्तनाने रूपे बदलली व त्यामुळे पदांचा व गणांचा भेद नाहीसा होऊ लागला. नव-आर्यभाषांत तर पुष्कळदा धातुसाधितांचा उपयोग कालनिर्मितीसाठी होतो व सहायक क्रियापदांचा उपयोग दिसून येतो.

या सर्व घडामोडींत वाक्यरचना मात्र दुबळीच राहिली. साधी विधाने, उभयान्वयी अव्ययांनी जोडली जाणारी साधी वाक्ये किंवा परस्परांनुसारी किंवा एककालिक क्रिया दाखविण्यासाठी वापरण्यात येणारी धातुसाधिते सोडल्यास या रचनेत गुंतागुंतीचे सूक्ष्म भेद व्यक्त करण्याचे सामर्थ्य नव्हते. यूरोपियन भाषांच्या अनुकरणाने व प्रभावाने ते आता येऊ लागले आहे.

संदर्भ : Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vols. V-IX, Delhi, 1966-1968.

कालेलकर, ना. गो.