वि.सि. सुकथनकर

सुकथनकर, विष्णु सिताराम : (४ मे १८८७– २१ जानेवारी १९४३). महाराष्ट्रातील एक व्युत्पन्न संस्कृतज्ज्ञ. भारतविद्येचे अभ्यासक आणि महाभारताच्या चिकित्सक पाठावृत्ती   चे प्रमुख संपादक. त्यांचा जन्म सिताराम व ढाकलीबाई या सुसंस्कृत व सुशिक्षित दांपत्यापोटी मुंबई येथे झाला. सितारामपंत हे अभियंता होते तर आजोबा शांताराम नारायण हे सरकारी वकील होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईतच झाले. त्यांनी सेंट झेव्हिअर महाविद्यालयात नाव घातले (१९०२-०३) पण ते पुढे इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले. तेथील सेंट जॉन्स कॉलेज ( केंब्रिज ) मधून त्यांनी अध्ययन करून गणित विषयात (मॅथिमॅटिक्स ट्रायपॉस) बी.ए. पदवी संपादन केली (१९०६) व नंतर ते एम्.ए. झाले (१९०८). त्यानंतर एडिनबर्ग युनिव्हर्सिटी (१९०९) मध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले आणि जर्मनीला भारतीय भाषाशास्त्राभ्यासासाठी गेले. बर्लिनमध्ये त्यांनी तत्कालीन जर्मन विद्वानांची व्याख्याने ऐकली आणि हाइन्रिख ल्यूड्यर्स या प्राच्यविद्यावंताच्या मार्गदर्शनाखाली ‘ शाकटायनाज ग्रामर’ ( अध्याय एक, पाद एक) या विषयावर संशोधनात्मक प्रबंध बर्लिन विद्यापीठास सादर केला (१९१४). त्याला यक्षवर्मनचे समालोचन ( टीका ) ‘ चिंतामणि ‘ या शीर्षकाने जर्मन भाषेत टिपणांसह अनुवादित करून जोडले. त्यांना पीएच्.डी. पदवी मिळाली. पुढे हा प्रबंध १९२१ मध्ये पुस्तकरुपांत प्रसिद्घ झाला. तत्पूर्वी बर्लिनमध्येच त्यांनी मम्मटाच्या काव्यप्रकाशा  वर लिहिलेल्या संकीर्ण शोधनिबंधांतून (१९१२) त्यांच्या विद्‌वत्तेची चुणूक दिसते. शिवाय त्यांनी रा. गो. भांडारकरांच्या वैष्णविझम, शैविझम अँड मायनर रिलिजस सिस्टिम्स  या ग्रंथाची जर्मन भाषेत विस्तृत सूची केली (१९१४). या निमित्ताने त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला.

भारतात परत आल्यानंतर सुरुवातीची दोन वर्षे (१९१४– १६) त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात संशोधक विद्यावंत म्हणून काम केले. पुढे त्याच खात्यात सहायक अधीक्षक म्हणून पश्चिम विभागात काम केले (१९१५–१९). ही नोकरी करीत असताना त्यांच्याकडे १९१७ मध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या ओरिएंटल संशोधन मंदिराच्या ॲनल्स  या संशोधनपत्रिकेचे संपादन करण्याची संयुक्त जबाबदारी सोपविली होती. पुढे ते अमेरिकन ओरिएंटल सोसायटीमध्ये अधिव्याख्याता होते (१९२०). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील विविध विद्यापीठांमधून त्यांनी अभ्यागत व्याख्याता म्हणून १९२०-२१ दरम्यान व्याख्याने दिली. ते ग्रेज इन (लंडन) आणि अमेरिकन ओरिएंटल सोसायटीचे सदस्य होते, पुढे ते त्या संस्थेचे सन्माननीय सदस्य झाले (१९३८). सर रा. गो. भांडारकरांनंतर हा सन्मान मिळविलेले ते दुसरे भारतीय संशोधक होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेद्वारे प्रसिद्घ होणाऱ्या जर्नल चे ते प्रमुख संपादक झाले (१९२४). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात असताना इंडियन अँटिक्विटी मध्ये काही परीक्षणात्मक लेख त्यांनी लिहिले (१९१७). त्यांपैकी बेलवलकर यांच्या ‘सिस्टिम्स ऑफ संस्कृत ग्रामर’ या निबंधावर लिहिताना कीलहोर्नने लिहिलेल्या माहितीचा बेलवलकरांनी उपयोग केला नाही. त्यामुळे काही महत्त्वाचे मुद्दे सुटल्याचा उल्लेख त्यांनी केला. याच अँटिक्विटी मध्ये याकोबीच्या जर्मन कौटिलीय अर्थशास्त्रा वरील शोधनिबंधाचे इंग्रजी भाषांतर सुकथनकरांनी प्रसिद्घ केले (१९१८). त्यांना कोरीव लेखांच्या वाचनामध्ये अधिक रस निर्माण झाला कारण भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील नोकरी व भाषाशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता आणि त्याला केंब्रिजमधील मॅथिमॅटिक्स ट्रायपॉस या पदवीमुळे शास्त्रशुद्घ मांडणीची साथ लाभली होती. त्यांनी एपिग्राफिया इंडिका साठी श्री पुलमावी याच्या प्राकृत कोरीव लेखाचे वाचन व त्यावरील भाष्य संकलित केले (१९१९). हा कोरीव लेख बेल्लारी जिल्हा (तत्कालीन मद्रास इलाखा) येथे सापडल्यामुळे सातवाहनांची सत्ता दक्षिणेत विस्तारली होती, असे अनुमान त्यांनी काढले. आर्. जी. भांडारकर कॉमेमोरेशन  व्हॉल्यूम यात त्यांनी ‘पॉलिग्राफिक नोट्स’ या शीर्षकार्थाचा शोधनिबंध लिहिला. यांतून त्यांचे पुराभिलेखविद्येचे सूक्ष्म निरीक्षण ज्ञात होते.

भारतविद्यावंत म्हणून त्यांची कीर्ती १९२० नंतर दृग्गोचर होते. या एका वर्षात त्यांनी सात शोधनिबंध लिहिले आणि ते भांडारकर प्राच्यविद्या मंदिराच्या ॲनल्स मध्ये प्रकाशित झाले. यांपैकी पहिल्या खंडातील दोन शोधनिबंध आंध्र राजांचे मूलस्थान यांची चर्चा करणारे आहेत. त्यांनी तीन क्षत्रप कोरीव लेख आर्. टी. बॅनर्जी यांच्या सोबत संपादून १९२१ मध्येएपिग्राफिया इंडिकात  (खंड १६) प्रकाशित केले. इ. आर्. हॅव्हेल्सच्या हॅन्डबुक ऑफ इंडियन आर्ट  या पुस्तकातील भारतीय कला ही धर्माधिष्ठित आहे. या विधानाला अनेक उदाहरणे देऊन आव्हान दिले आहे. त्यांच्या मते ती ग्रीक किंवा गॉथिक कलेप्रमाणे चैतन्यवादी आहे. त्यांनी वाकाटक घराण्याच्या दोन कोरीव लेखांचे वाचन व संपादन केले. त्यांनी स्वप्नवासवदत्त या रोमांचकारी नाटकाचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्घ केले (१९२२).

मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तौलनिक भाषाशास्त्रावर १९२५ पासून ते व्याख्याने देऊ लागले. या सुमारासच त्यांची महाभारत महाकाव्याच्या चिकित्सक पाठावृत्ती   साठी पहिले प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती झाली (४ ऑगस्ट १९२५). भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने महाभारता च्या चिकित्सक पाठावृत्ती  चा प्रकल्प १९१९ मध्येच हाती घेतला होता. त्यांच्या अगोदर एन. बी. उत्‌गिकर यांनी केलेले काम आणि त्यांना साहाय्य करणारे संपादक मंडळ व समिती होती. त्यांनी पूर्वीचे झालेले काम पाहिल्यानंतर त्या विभागाची फेरमांडणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली कारण हस्तलिखितांचा तुलनात्मक आढावा घेऊन विश्वासार्ह मजकूर निश्चित करणे गरजेचे होते. त्यावेळी महाभारता च्या हस्तलिखितांचे ढोबळ वर्गीकरण दक्षिणेकडील मूळ प्रती व उत्तरेकडील मूळ प्रती असे करण्यात आले होते आणि अक्षरशः भिन्न लिप्यांत व भारतीय भाषांत अनुवादित केलेल्या शेकडो हस्तलिखित प्रती होत्या मात्र सुकथनकरांनी त्या हस्तलिखितांच्या मूळ उत्पत्तिस्थानापर्यंत शोध घेऊन त्यांचा काल, स्थळ, नकला यांविषयीची विश्वसनीय माहिती गोळा झाल्यानंतर टीकात्मक आवृत्ती तयार करता येईल, हे गृहीत धरुन कामाची आखणी केली आणि एक प्रयोगात्मक विराटपर्वाची चिकित्सक आवृत्ती सु. १६ हस्तलिखितांचा (११ देवनागरी, प्रत्येकी एक बंगाली, तेलुगू आणि ग्रंथ व दोन मलयाळम्) धांडोळा घेऊन तयार केली. तिला लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण प्रस्तावनेत त्यांनी आपल्या संशोधनाची दिशा स्पष्ट केली आहे. पुढे त्यांनी उपलब्ध विविध भाषांतील पाठांची अत्यंत काटेकोरपणे चिकित्सा करून त्या साधनसामग्रीच्या आधारे दोन वर्षांत आदिपर्वाची चिकित्सक आवृत्ती तयार केली. सुकथनकरांनी नकला करणाऱ्यांच्या व्यक्तिगत लकबी लक्षात न घेता विविध प्रकारच्या हस्तलिखितांतील जननिक संरचनांचा शोध घेण्यास सुरुवात केली. महाभारता च्या अभ्यासाचा विचार करता १९३३ हे साल प्राच्यविद्या संशोधनातील कळस (शिखर) म्हणता येईल या कालावधीत आदि-पर्वातील अंतिम अध्यायाची चिकित्सक पाठावृत्ती टीपा-टिपण्या, पुरवणी, भिन्न शब्दार्थ इत्यादींसह प्रकाशित झाली. त्याला सुकथनकरांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण, विचारपरिप्लुत, अनेक मुद्यांचा ऊहापोह करणारी अभिजात शैलीतील प्रस्तावना (प्रोलेगॉमिना ) हा एक स्वतंत्र शोधनिबंधच होय. यानंतर त्यांनी उर्वरित जीवन महाभारताच्या चिकित्सक पाठावृत्ती  ला प्रमुख संपादक या नात्याने वाहिले. ‘विराटपर्व’ रघुवीरनी केला (१९३६). ‘उद्योगपर्व’ सुशील कुमार दे यांनी केला (१९४०). त्यानंतर ‘वनपर्व’ १९४२ मध्ये प्रकाशित झाला. या सर्वांचे संपादन करून सुकथनकर यांनी त्यांना प्रस्तावना लिहिल्या. हे करीत असताना त्यांनी नल आख्यान, भृगू आणि भारत यांसारख्या महाभारता तील काही विषयांवर स्वतंत्र शोधनिबंध लिहिले. त्यांनी महाभारता च्या सांस्कृतिक बृहत्‌सूचीच्या कामास सुरुवात केली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या रौप्यमहोत्सवानंतर (जानेवारी १९४३) दोन आठवड्यांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पत्नीचे नाव मालिनीबाई. त्यांना दोन मुलगे आहेत.

त्यांच्या संशोधनात गणितीय काटेकोरपणा, शास्त्रशुद्घ तंत्र आणि संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासाने आलेली शिस्त होती. त्यांनी पन्नासहून अधिक शोधनिबंध लिहिले. तसेच काही कोरीव लेखांचे वाचन करून तत्संबंधीचे अन्वयार्थ नोंदविले, काही अनुमाने काढली. तसेच काही जर्मन भाषेत भाषांतरित झालेल्या संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर केले तथापि महाभारता च्या चिकित्सक पाठावृत्ती चे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी विविध पर्वांना लिहिलेल्या प्रस्तावना आणि संपादित केलेले पर्वांचे खंड अधिकृत मानले गेले आहेत. त्यांच्या प्रस्तावना खंडाच्या मार्गदर्शक नियमावलीचा आधार घेऊन नंतरच्या संशोधक-संपादकांनी महाभारता च्या चिकित्सक पाठावृत्ती  चे कार्य सु. ५० वर्षांत तडीस नेले. जगात एकमेवाद्वितीय म्हणून प्रतिष्ठा लाभलेल्या, महाभारताच्या चिकित्सक पाठावृत्ती च्या सिध्दतेत सुकथनकरांचा सिंहाचा वाटा आहे. या कार्यास त्यांनी समर्पणवृत्तीने झोकून दिल्यामुळे हे त्यांचे जीवितकार्य ठरले.  

  

संदर्भ : Gode, P. K. Ed. Sukhtankar Memorial Edition :Analebta, Vol. II, Bombay, 1945 .  

देशपांडे, सु. र. भाटे, सरोजा.