कालेलकर, नारायण गोविंद :  (११ डिसेंबर १९०९ —                             ). प्रसिद्ध मराठी भाषाशास्त्रज्ञ. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बांबुळी येथे. शिक्षण बडोदे, मुंबई व पॅरिस येथे. फ्रेंच भाषा व साहित्य यांत पदविका (१९३९). पॅरिस विद्यापीठाची डी.लिट्. ही पदवी (१९५०). रॉकफेलर सिनियर फेलो (१९५५-५६).  बडोदे येथील महाविद्यालयात व विद्यापीठात फ्रेंच भाषा-साहित्य अाणि भाषाशास्त्र यांचे अध्यापन (१९४० — ५६).  १९५६ पासून पुण्याच्या डेक्कन कॉलेजात इंडो-आर्यन व इंडो-यूरोपियन भाषाशास्त्राचे अध्यापन व भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख. १९७३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाच्या मराठी महाशब्दकोशाच्या योजनेचे प्रमुख संपादक. या मंडळाचे व महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य.

बुद्धकालीन भारतीय समाज (१९३५) व कंपॅरेटिव्ह मेथड इन हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स (१९६०) हे त्यांचे अनुवादित ग्रंथ उल्लेखनीय आहेत. यांशिवाय अनेक फ्रेंच कथा, कविता, लेख यांचेही त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या स्वतंत्र ग्रंथसंपदेतील ध्वनिविचार (१९५५), भाषा आणि संस्कृति (१९६०) व भाषा : इतिहास आणि भूगोल (१९६०) हे ग्रंथ अत्यंत मौलिक आहेत. यांपैकी पहिल्या दोन ग्रंथांना महाराष्ट्र राज्य पारितोषिके व तिसऱ्या ग्रंथाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक १९६८ देण्यात आले आहे.

जाधव, रा. ग.