मेये, आंत्वान : (११ नोव्हेंबर १८६६–२१ सप्टेंबर १९३६). फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ. जन्म मूलें येथे. सुप्रसिद्ध स्विस भाषाशास्त्रज्ञ ⇨ फेर्दिनां द सोस्यूर यांचे शिष्य. आर्मेनियमपासून सुरुवात करून सर्व इंडो-युरोपियन विषयांचा अभ्यास केला. १९०६ मध्ये ‘कोलेझ्य द फ्रांस’ मधील मीशेल ब्रेआल यांच्या जागी, त्यांची निवड झाली. सामान्य भाषाशास्त्र आणि इंडो-युरोपियन हे त्यांचे खास विषय असून त्यांत त्यांनी विपूल संशोधन केलेले आहे. ग्रीक व लॅटिन भाषांचे इतिहास, प्राचीन इराणी व्याकरण, स्लाव्हिक भाषांचा तौलनिक अभ्यास, आर्मेनियन इ. विषयांवरील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध असून, इंडो-युरोपयिन भाषांच्या तौलनिक अभ्यासावरचा त्यांचा Introduction a  l’ e’tude comparative des langues indoeurope ennes (१९०३ इं. शी. इंट्रोडक्शन टू द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द इंडो-युरोपयन लँग्वेजी स) हा ग्रंथ आजही प्रमाणभूत मानला जातो. सामान्य भाषाशास्त्रावरील त्यांचे महत्त्वाचे लेख Linguistique historique et linguistique ge’ne’rale या नावाने दोन खंडांत प्रसिद्ध झालेले असून त्यांनी एकंदर २४ ग्रंथ, ५४० संशोधनपर लेख, शेकडो ग्रंथपरीक्षणे आणि इतर पुष्कळ लेखन केलेले आहे. पहिल्या महायुद्धानंतर यूरोपात निर्माण झालेल्या राष्ट्रीयत्वाच्या आणि भाषांच्या क्षेत्रमर्यादा यांसारख्या प्रश्‍नांवरचा Les langues dans l’ Europe nouvelle हा ग्रंथही महत्त्वाचा आहे. त्यांच्या Esquisse de la grammaire comparee’ de l’ arme’nien classique (१९०२ इ. शी. आउटलाइन ऑफ अ कंपॅरेटिव्ह ग्रॅमर ऑफ द क्लासिकल आर्मेनियन) Le slave commun (१९२३) Esquisse dune historie de la langue latine (१९२८) इ. ग्रंथांचा वरील संदर्भात उल्लेख करता येईल. Les langues du monde चे (१९२४) एम्‌. कोएन समवेत ते सहसंपादक होते. कठीण विषय सोपा आणि आकर्षक करून सांगण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. शातोमेयां येथे त्यांचे निधन झाले.

कालेलकर, ना. गो.