पहाडी भाषा समूह : भारतीय भाषांच्या पहाणीत ग्रीअर्सनने ð इंडो-आर्यन भाषासमूहाचे जे वर्गीकरण केले, त्यातील हा एक भाषासमूह आहे. ग्रीअर्सनने त्याचे नामकरण ‘मध्यवर्ती समूह’ असे केलेले असून, तो हिमालयाच्या पायथ्याच्या डोंगराळ भागात पसरलेला आहे आणि त्यामुळेच त्याला ‘पहाडी’ म्हणजे डोंगराळ प्रदेशातील हे नाव देण्यात आलेले आहे.

या समूहाचे पूर्व, मध्यम व पश्चिम असे पोटभाग करण्यात आलेले असून, त्यात पुढील भाषांचा समावेश होतो : पूर्व-खसकुरा किंवा नेपाळी पल्पा. मध्य-कुमाऊँनी गढवाली. पश्चिम-जौनसरी, सिरमौडी, बाघाटी, किउथाली, सतलजच्या बोली, कुलूच्या बोली, मंडीच्या बोली, चंबाच्या बोली, भद्रावतीच्या बोली व अनिश्चित अशा काही बोली.

मध्य पहाडीच्या कुमाऊँनी व गढवाली या बोली भाषिकांच्या संख्येच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे त्यांच्या भाषिकांची संख्या अनुक्रमे १०,३०,०७६ व ८,०९,७४६ होती. पश्चिम पहाडीच्या महत्त्वाच्या बोली अशा : मंडेआली २,२७,३४७ सिरमौडी १,११,३८९ बारामौडी ५६,२२६ जौनसरी ५४,१२२ कुलुई ४९,८५९ चुराही ४३,७४८ चमेआली ४३,६९० व बशहरी ३३,५३३.

याशिवाय ज्यांचे भाषिक वर्गीकरण नीट झालेले नाही, अशा काही पहाडी बोली आहेत.

संदर्भ : 1. Government of India, Census of India, 1961: Vol. I, Part II-C (ii), Language Tables, Delhi, 1964.

2. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. IX, Part 4, Delhi, 1968.

कालेलकर, ना. गो.