इराणी भाषासमूह : इराण व त्याच्या आसपासचा प्रदेश यांत बोलल्या जाणार्‍या इंडो-यूरोपियन कुटुंबातील या भाषा आहेत. त्यांचे सर्वांत जुने रूप अवेस्ता व प्राचीन इराणी यांत सापडते. नंतरच्या मध्यकाळात या भाषासमूहाच्या दोन महत्त्वाच्या भाषा आहेत : पूर्वेकडे सोग्डियन व पश्चिमेकडे पेहलवी (जिचे नंतर फार्सीत परिवर्तन झाले ती). या दोन भाषा कित्येक शतके पश्चिम आशियातील प्रतिष्ठित भाषा होत्या.

प्राचीन इराणी : इराणी भाषा प्राचीन काळात फार जलदपणे परिवर्तन पावली तथापि तिचा भरपूर प्रमाणात पुरावा उपलब्ध नाही. अनेक जुन्या व नव्या बोलींचा अभ्यास योग्य रीतीने झालेला नाही.

अवेस्ता ही पारश्यांच्या धर्मग्रंथाची भाषा आहे. सॅसॅनिडी साम्राज्यात राज्यधर्म म्हणून स्वीकारल्या गेलेल्या जरथुश्त्री धर्मगुरूंनी तो रचला. मूळ ग्रंथाचा केवळ एकतृतीयांश भागच आता उपलब्ध आहे. तो वेगवेगळ्या काळांत तयार झालेला असून नंतर त्याची विषयावर मांडणी झालेली आहे. प्रथम मुखपरंपरेने जतन केलेला हा ग्रंथ नंतर पेहलवी लिपीवर आधारलेल्या एका लिपीत अतिशय सूक्ष्म भेद लक्षात घेऊन लिहिण्यात आला. त्यात दोन प्रकारचे साहित्य आहे : एक जरथुश्त्रप्रणीत तत्त्वांची गाथा म्हणून ओळखले जाणारे वृत्तबद्ध साहित्य व दुसरे अत्यंत प्राचीन सूक्ते (यश्त) व त्यामानाने नंतरचे विधिविषयक नियम (वेंदिदाद व विदेवदात) असलेले साहित्य [→ अवेस्ता] . मधल्या काळातील माहिती फारच त्रोटक आहे.

मध्य इराणी : इसवी सनाच्या प्रारंभापासून किंवा बर्‍याच नंतर इराणी पुन्हा दृष्टिपथात आली, पण ती मध्य इराणी होती. त्यात एक पश्चिमेकडचा व एक पूर्वेकडचा असे दोन गट होते. पहिल्याला पेहलवी हे नाव असून त्याचा वापर सॅसॅनिडी साम्राज्यातील अनेक धार्मिक व लौकिक ग्रंथात केलेला आढळतो [ पेहलवी भाषा-साहित्य]. या गटाच्या दोन शाखा होत्या : वायव्येकडील पार्थियन व नैर्ऋ‌त्येकडील मध्य इराणी किंवा पारसीक. पारसीकचे परिवर्तित रूप म्हणजे अर्वाचीन ⇨ फार्सी भाषा.

मध्य इराणीत पुढील भेद आहेत : सोग्डियन (सुग्दीक), खोतानी, ख्वारिज्मी व एक अजून अस्पष्ट राहिलेली बोली.

अर्वाचीन इराणी : अर्वाचीन काळातील इराणी बोली अरबी लिपीत लिहिल्या जातात. फार्सी ही त्यांतील सर्वश्रेष्ठ होय, कारण एक उच्च संस्कृती आणि अतिशय समृद्ध साहित्य यांचे ती माध्यम आहे. तिचा सर्वांत प्राचीन पुरावा आठव्या शतकातील आहे. फिर्दौसी (सु. ९४०–१०२०) हा आद्य फार्सी लेखकांपैकी एक. त्याचे शब्दभांडार जवळजवळ पूर्णपणे इराणी आहे तर आजची फार्सी ही अरबी शब्द वापरून लिहिलेली इराणी आहे. हीच भाषा भारतातील मोगलांनी स्वीकारली.

नैर्ऋत्येच्या आणखी काही बोली होत्या. लुरी व बखतियारी  दक्षिणेकडे. सोमघुन मासर्म, बूरिंगून इ. फार्सी बोली. अम्मानमधील कुमझारी. यांपैकी कोणत्याही बोलीत साहित्य नाही.

वायव्येकडील गटाच्या पाच भिन्न शाखा आहेत : मध्य इराणच्या बोली, कॅस्पियन बोली, कुर्द बोली, झाझा बोली व बलुची बोली. बलुचीचे उत्तरेकडील एक व मकरानी नावाचा दक्षिणेकडील एक असे दोन पोटभेद असून त्यांच्या दरम्यान द्राविड वंशीय ⇨ ब्राहुई भाषा  पसरली आहे [→ बलुची भाषा साहित्य].

पूर्वेकडील इराणी अगदी विस्कळीत आहे. त्यात एक महत्त्वाची अफगाणी व इतर बोली आहेत.

अफगाणीचे खरे नाव पश्तो किंवा पुश्तू आहे. सोळाव्या शतकापासून तिचे पुरावे मिळू लागतात. तीवर इराणीचा प्रभाव आहे. पुश्तू भाषेत लोकसाहित्य (विशेषतः गीते) विपुल आहे. पुश्तू लिपी ही अरबी लिपीत काही अक्षरांची भर घालून बनविलेली आहे. ती इराणच्या सरहद्दीपासून पेशावरपर्यंत पसरलेली आहे. १९३६ पासून ती अफगाणिस्तानची राजभाषा झाली. तिच्या महत्त्वाच्या बोली पेशावरी, कंदाहारी व वानेलसी या आहेत [ पुश्तू भाषा साहित्य].

पामीर प्रदेशात अनेक पूर्व इराणी बोली प्रचलित आहेत. त्या भारतीय, तुर्की किंवा फार्सी बोलींनी वेढलेल्या आहेत. एक गट शुग्नी व तिचे भेद तसेच याझगुलामी व वांची (आता मृत) यांचा बनलेला असून दुसरा इश्काशिमी व सांगलेची यांचा बनलेला आहे. यांशिवाय चित्रालची यिदधा, मुंजी, वाखी, ओरमुरी, पुराची इ. बोली आहेत.

शेवटचा एक गट वायव्येकडील बोलींचा असून त्याला आसैत हे नाव आहे.

कालेलकर, ना. गो.