व्हेर्नर, कार्ल आडॉल्फ : (७ मार्च १८४६–? १८९६). डॅनिश भाषाशास्त्रज्ञ. ऐतिहासिक भाषाशास्त्रात विशेष उल्लेखनीय कार्य. त्याचा जन्म ऑर्हूस, डेन्मार्क येथे झाला. तो कोपनहेगन विद्यापीठात १८८३पासून अध्यापन करीत होता. इंडो-यूरोपियन व्यंजनपरिवर्तनाच्या ⇨ याकोप ग्रिमने (१७८५ – १८६३) शोधून ठेवलेल्या नियमाला काही अपवाद आढळत होते आणि वर्णपरिवर्तने नियमितपणे होतात, या अपेक्षेला ढळ पोहोचत होता. व्हेर्नरने विद्यार्थिदशेतच १८७५मध्ये लिहिलेल्या एका लेखात या अपवादांचा पोटनियम शोधून त्यांची व्यवस्था लावली आणि ध्वनिपरिवर्तने निरपवाद असतात, या नव-व्याकरणकार (निओ-ग्रमेरियन) संप्रदायाच्या प्रतिपादनाला बळकटी मिळाली.

व्हेर्नरचा नियम असा : इंडो-यूरोपियन मौखिक स्पर्श व्यंजने प्‌, त्‌, क्‌ ग्रिमच्या नियमानुसरा जर्मानिक भाषांतून अनुक्रमे फ्‌, थ्‌ (thin प्रमाणे), ह्‌ (विसर्गाप्रमाणे अघोष) अशा अघोष ईषत्‌-स्पृष्ट (घर्षक) व्यंजनांच्या रूपात आढळतात. उदा., संस्कृत भ्रातर्‌ : गॉथिक brothar (त्‌ पासून थ्‌). नंतर स्वर आणि आधी निर्बल स्वर अशा स्थितीत मात्र ती व्यंजने सघोष होतात. उदा. संस्कृत पितर्‌ : गॉथिक fadar. (जाड ठशाने बलयुक्त स्वर दाखवले आहेत त्‌ पासून इथे ड्‌.)

अशा इतर भाषिक परिवर्तनांतूनही व्हेर्नर-नियम-सदृश नियम आढळतात. उदा. इंग्लिशमधील पुढील जोडी जुळावी : ‘exercise, e’xert (एक्सर्‌साइज्‌, इग्झर्ट्‌).

पहा : भाषाशास्त्र.

संदर्भ : Hamp, Eric and Others, Ed. A Reader in 19th Century Historical Indo-European Linguistics, Chicago, 1967.                                   

केळकर, अशोक रा.