एस्किमो-ॲल्यूट भाषासमूह : उत्तर अमेरिकच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात आणि सायबीरियाच्या लगतच्या किनाऱ्यावर म्हणजे सु. ५,५०० किमी. लांब पसरलेल्या पट्‍ट्यात बोलल्या जाणाऱ्या बोलींचे कुल. दक्षिणेकडील अल्गाँक्वियन, आथापास्कन इ. कुलांतील भाषांपासून ह्या भाषा जरा अलगच पडल्या आहेत. पूर्व सायबीरियातील चुकची-कामचाट्‍कन भाषाकुलाशी ह्याचे दूरचे नाते असावे. एस्किमो-ॲल्यूट कुलाची विभागणी पुढीलप्रमाणे :

 

(१) एस्किमो : सु. ५०,००० लोक. (अ) पूर्व-ग्रीनलंड, लॅब्रॅडॉर, हडसन उपसागराभोवतालचा प्रदेश व उत्तरेकडील बेटे ह्या प्रदेशांतील बोली एकमेकींत समजायला अडचण पडत नाही. (आ) पश्चिम-अलास्काचा किनारा, सायबीरियाचे पूर्व टोक.

 

(२) ॲल्यूट : सु. १,२०० लोक अलास्काचे नैर्ऋत्य टोक आणि अल्यूशन बेटे.

 

अल्यूशन बेटावर रशियाचा अंमल १८६७ पर्यंत होता. या अवधीत ॲल्यूट भाषा सिरिलिक लिपीत लिहिण्याचा प्रयत्‍न झाला. ग्रीनलंडमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या निमित्ताने एस्किमो भाषेचे रोमन लिपीत मुद्रण होऊ लागले. अलीकडे रेडिओवरही एस्किमो भाषेत कार्यक्रम प्रसारित होतात. अलास्कामध्ये पूर्वी चित्रलिप्या होत्या नंतर रोमन लिपीचे अंशत: अनुकरण करून काही शब्दचिन्हांवर आणि उच्चारघटकचिन्हांवर आधारलेल्या लिप्या तयार करण्यात आल्या. उयाकोक (१८६० — १९२४) ह्या एस्किमो माणसाचे प्रयत्‍न या संदर्भात उल्लेखनीय आहेत.

 

या कुलातील बोलींची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : क्, ग्, ङ् ह्या व्यंजनांबरोबर ह्यांच्यासारखीच, परंतु जीभ आणि मृदुतालू ह्यांचा स्पर्श अधिक मागे होतो अशी, तीन व्यंजनेही आहेत. (पुढील उदाहरणात क व त्याच्या जोडीचे व्यंजन ह्यांमधला फरक K व Q असा दाखविला आहे). स्वरांची मालिका करण्याची प्रवृती आहे : auiaibuq – ‘तो रक्त पुसून टाकतो’. क्रियापदाला कधीकधी कर्ता आणि कर्म ह्या दोन्हींच्या पुरूष-वचनाप्रमाणे सार्वनामिक परप्रत्यय लागतात. tuqut ह्या धातूपासून, tuquppaga – ‘मी त्याला मारतो’, tuquppak – ‘तो त्या दोघांना मारतो’ अशी रूपे होतात. हे प्रत्यय नामालाही लागू शकतात. iglu पासून igluga – ‘माझे घर’, असे रूप बनते. धातू आणि नाम ह्यांपासून नवीन शब्द साधण्यासाठी परप्रत्ययांची रेलचेल आहे. अशा परप्रत्ययांच्या साहाय्याने बराच अर्थ एकवटता येतो. qasu म्हणजे ‘दमणे’ ह्या धातूपासून, qasuiigsagbigsagsinnit luinagnag-puq म्हणजे ‘दमणे-नाही-कारक-स्थान-मिळणे-नाही-अजिबात-कुणाला-भूतकाळप्रत्यय’ (विश्रांतिस्थान अजिबात कुणाला मिळाले नाही ) असे रूप तयार होते.

संदर्भ : 1. Swadesh, Morris, “South Greenlandic (Eskimo)”, Liguistic Structures of Native America, New York,1946.

    2. Voegelin, C. F. Voegelin, F. M. “Languages of the World”, Anthropological Linguistics, 6 : 6, Bloomington (Indiana), June, 1964.

केळकर, अशोक रा.