चतर्जी, सुनीतिकुमार : (२६ नोव्हेंबर १८९० —   ) विश्वविख्यात भारतीय भाषाशास्त्रज्ञ, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक व अध्यापक. जन्म सिबपूर (प.बंगाल) येथे. इंग्लिश साहित्य आणि भाषा हा विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठातून ते बी.ए. (१९११) आणि एम्‌.ए. (१९१३) झाले. महाविद्यालयीन अभ्यास करतानाच भाषांच्या तौलनिक अभ्यासाकडे ते वळले व लंडन विद्यापीठामधील ‘स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज’ मध्ये त्यांनी भाषाशास्त्राचा आणि ध्वनिविचाराचा अभ्यास केला आणि डी.लिट्‌. (१९२१) पदवी घेतली. नंतर पॅरिस विद्यापीठात काही महिने अध्ययन करून ते भारतात परतले. पुढे कलकत्ता विद्यापीठात स्थापन झालेले ‘खैरा प्रोफेसर ऑफ इंडियन लिंग्विस्टिक्स अँड फोनेटिक्स’ हे अध्यासन त्यांनी भूषविले (१९२२ — ५२). त्यांनी आपले लेखन, अध्यापन, भाषण ह्यांद्वारा आधुनिक भाषाशास्त्राच्या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून दिले आणि भारतात आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनिविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवली. अनेक परिषदा, समित्या यांमधून त्यांनी कार्य केले. त्यानिमित्त जगातील विविध देशांचा प्रवास केला व अनेक देशीविदेश प्राचीन-आधुनिक भाषा अवगत करून घेतल्या.

त्यांची इंग्लिश, बंगाली आणि हिंदी भाषांमधील लेखनसंपदा विपुल आहे. तिची संपूर्ण सूची स्वतंत्र पुस्तिकारूपाने कलकत्त्याहून प्रसिद्ध झालेली आहे. त्यातील पुढे दिलेल्या मुख्य ग्रंथांच्या शीर्षकांवरून जरी नजर टाकली, तरी विविध भाषा, त्यांच्या रचना, ध्वनिविचार, ऐतिहासिक अभ्यास आणि साहित्य ह्यांविषयीचा त्यांचा अभ्यास व भारताच्या सांस्कृतिक विविध स्रोतांची आणि त्यांतील एकात्मतेची जाणीव, जगातील इतर संस्कृतींशी आलेल्या व येणाऱ्या भारताच्या संबंधाबद्दल त्यांची आस्था ही दिसून येतात : अ ब्रीफ स्केच ऑफ बेंगाली फोनेटिक्स (१९१८), ऑरिजिन अँड डिव्हेलपमेंट ऑफ द बेंगाली लॅग्वेज (प्रबंधाचे संस्कारित रूप, १९२६), द्वीपमय भारत (टागोरांबरोबर केलेल्या नैर्ऋत्य आशियाच्या प्रवासाचे वर्णन, १९४०, नवी आवृ. १९६०), इंडो-आर्यन अँड हिंदी (व्याख्याने १९४०, पुस्तकरूपाने १९४२, नवी आवृ. १९६०, हिंदीमधूनही उपलब्ध), लॅग्वेजेस अँड द लिंग्विस्टिक प्रॉब्लेम ऑफ इंडिया (१९४३, हिंदी व बंगाली भाषांतरे), भाषाप्रकाश : बाङला व्याकरण, राजस्थानी भाषा (१९४९), ऋतंभरा (हिंदी निबंधसंग्रह, १९५१), किरात-जनकृती ऑर द इंडो — मंगोलॉइड्‌स (१९५१), आसाम अँड इंडिया (१९५३), आफिकॅनिझम, द आफ्रिकन पर्सनॅलिटी (१९६०), इंडियॅनिझम अँड द इंडियन सिंथेसिस (१९६२), लॅंगवेजेस अँड लिटरेचर्स ऑफ मॉडर्न इंडिया (१९६३), द्रविडियन (१९६६), पीपल, लॅंग्वेज अँड कल्चर ऑफ ओरिसा (१९६६), बाल्ट्‌स अँड आर्यन्य (१९६८), इंडिया अँड इथिओपिया (१९६९), वर्ल्ड लिटरेचर अँड टागोर (१९७१), इरानियन कल्चर अँड इट्‌स इंपॅक्ट ऑन द वर्ल्ड फ्रॉम द ॲकिमेनियन टाईम्स (१९७२).

त्यांना अनेक मान-सन्मानांचा लाभ झाला. संस्कृत आयोग (१९५६-५७), पश्चिम बंगाल विधान परिषद (१९५२—६५), ‘साहित्य अकादेमी’ (१९६९—  ), ‘इंटरनॅशनल फोनेटिक असोसिएशन’ (१९६९—  ), ‘एशियाटिक सोसायटी’, कलकत्ता, बंगीय साहित्यपरिषद (१९३६), ‘लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया’, पहिली ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ लिंग्विस्ट्‌स’ (१९७०) ह्यांची अध्यक्षपदे तसेच ‘नॅशनल प्रोफेसर ऑफ ह्युमॅनिटीज’ (१९६५—  ), ‘पद्मविभूषण’ (१९६३) हे त्यांपैकी विशेष उल्लेखनीय होत.

केळकर, अशोक रा.