मेलानिशियन भाषासमूह: मलायो-पॉलिनीशियन भाषाकुटुंबाचा विस्तार मलायापासून मध्य व पूर्व पॅसिफिक महासागरामधील पॉलिनिशिया द्वीपसमूहापर्यंत आहे. त्या भाषाकुटुंबाच्या पूर्व किंवा महासागरी उपशाखेत मायक्रोनिशिया, पॉलिनिशिया, मेलानिशिया, या द्वीपसमूहांतील भाषा येतात. मेलानिशिया हा वर्ग काहीसा भौगोलिक आहे. पापुआ (न्यू गिनी) बेटापासून बाहेर पूर्वेकडे फिजी बेटापर्यंत पसरलेल्या बेटांत पापुआच्या अंतर्भागात बोलल्या जाणाऱ्या व इतर काही बोली सोडल्या [→ पापुअन भाषासमूह], तर इतर बहुतेक म्हणजे सु. २५० बोली या मेलानिशियन गटात म्हणजे पर्यायाने मलायो – पॉलिनीशियन भाषाकुटुंबात मोडतात. बोलणारे लोक अंदाजे ५ लाख आहेत.

यांच्यापैकी प्रमुख बोली या आहेत : फिजीयन (प्रमाण फिजीयन रोमन लिपीत लिहितात व वर्तमानपत्रे, सरकारी प्रकाशने यांतून छापतात, तसेच रेडिओवर वापरतात), मोतू, रोवियाना, बांबाताना, बुगोतू , तोलाई, याबेम, ग्रागाद, मोता. या भागांत धर्मप्रसार करणाऱ्या मेथडिस्ट, ल्यूथरन पंथियांनी या भाषांचा उपयोग करता यावा म्हणून लिपीनियोजन, मुद्रण, प्रकाशन, भाषांतर असे उद्योग हाती घेतले आहेत. त्या निमित्ताने या भाषांच्या वैज्ञानिक अभ्यासाला सुरुवात झाली आहे. फिजीयन सोडून इतर भाषांबद्दल मात्र अजून पुरेशी माहिती नाही. मलायो-पॉलिनिशियन भाषांची सर्वसाधारण वैशिष्ट्ये (उदा., जोडाक्षरांचा जवळजवळ अभाव इ.) यांच्यातही आहेत. [→ मलायो-पॉलिनिशियन भाषाकुटुंब].

संदर्भ : Codrington, R. H. The Melanesian Languages, 1885 .

केळकर, अशोक रा.