इरोक्वायन भाषासमूह: अमेरिकन इंडियन लोकांच्या भाषांपैकी सेंट लॉरेन्स नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील बराच भाग ह्या  प्रदेशांतील जमातींत पूर्वी प्रचलित असलेल्या बोलींचे कुल. आज ह्या जमातींमधील फक्त काही व्यक्तींनीच आपल्या बोली टिकवून धरल्या आहेत (एकूण सु. ३२,००० पैकी २०,००० लोकांनी). त्या बोली म्हणजे सेनेका, क यूगा, ऑननडोगा ह्या जमातींची बोली शिवाय मोहॉक, ओनायडा, वायनडॉट (ह्यूरॉन), टस्कारोरा, चेरोकी ह्या इरोक्वायन बोली होत. ह्या आणि इतर जमातींच्या बोली मिळून एक इरोक्वाय संघ सतराव्या शतकात तयार झाला होता.

ह्यांपैकी चेरोकीसाठी सेकॉइया नावाच्या चेरोकी भाषिकाने १८२३ च्या सुमारास एक बाराखडी तयार केली. तीत काही चिन्हे रोमन सदृश, तर काही नवीन आहेत. उदा., D आ, R ए, T ई, i अ, A गो, J गू, H मी, θ ना, h नी, Z नो इत्यादी.

अतिशय गुंतागुंतीच्या पदविन्यासासाठी ह्या बोली प्रसिद्ध आहेत. धातूला अनेक प्रकारचे पूर्व-प्रत्यय आणि पर-प्रत्यय लागतात. उदा., y-us-ā-h-an-inhoskw-a‘haw-e’ भाषांतर :तो आपल्यासाठी घासभर घेऊन परत गेला.ह्या पदांपैकी उपान्त्य घटक a’haw हा मूळ घेणे धातू आहे, त्याला प्रत्यय लावून एवढा सगळा अर्थ एका पदामध्ये आणला आहे.

संदर्भ : 1. Lounsbury, F. G. Oneida Morphology, New Haven, 1953.

          2. Voegelin, C. F. Voegelin F. M. “Languages of the World”, Anthropological Linguistics, 6 : 6,  Bloomington (Indiana), June, 1964.

केळकर, अशोक रा.