कॉकेशियन भाषासमूह : काळ्या समुद्रापासून कॅस्पियन समुद्रापर्यंत १,२०० किमी. पसरलेल्या कॉकेशस पर्वताच्या डोंगराळ भागात व त्यालगतच्या सपाट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या (तार्तर व इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील भाषा सोडून इतर) भाषा. या भाषा बोलणारे लोक श्वेतवर्णीय, सडसडीत, तरतरीत आणि बुद्धिमान असून विविध संस्कृतीचे आहेत. या प्रदेशात १९१७ पूर्वी रशियन भाषेचे वर्चस्व स्थापन होण्याची शक्यता होती पण प्रादेशिक व स्थानिक भाषांना उत्तेजन देण्याच्या कम्युनिस्ट राजवटीच्या धोरणाने ती आता नष्ट झालेली आहे.

 

उत्तरेकडील भाषा :  या भाषांचे दोन गट आहेत : पूर्वेकडील व मध्यभागातील भाषा आणि पश्चिमेकडील भाषा. या दोन गटांत अनेक साम्यस्थळे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे क्रियापदाचे कर्मणी किंवा अकर्मक स्वरूप. सर्वनाम व संख्यावाचक यांत मिळतेपणा आहे. तसेच शब्दसंपत्ती व उच्चार यांतही सारखेपणा असल्याने या गटांचे नाते स्पष्ट होते. पण एकंदर भाषासमूहाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यभागातील भाषांचा पूर्वेकडील व पश्चिमेकडील भाषांशी असलेला दृढ संबंध. पूर्व व पश्चिम भाषा ध्वनिरचनेच्या दृष्टीने भिन्न आहेत शिवाय पूर्वेकडील भाषांत शब्दांचे व्याकरणदृष्ट्या जसे वर्ग पाडता येतात, तसे पश्चिमेकडील भाषांत वर्ग नाहीत. यांतील मूळ रूप कोणते, हे ठरविणे कठीण आहे.

 

ईशान्येकडील प्रदेश डोंगराळ असल्यामुळे त्यात भाषावैचित्र्य अधिक आहे. त्यात पुढील विभाग आहेत : (१) आवार, आन्दी, दिदो (२) काझिकुमुक (३) दार्ग्वा (४) आर्ची (५) खुरीआघुल, बुदुख, फेक व तिच्या पोटभाषा, खिनालुय, रुतुल, लाखुर (६) उदी.

 

उत्तरेच्या मध्यभागात (१) चेचिएन (२) इंगुश (३) बाच या भाषा आहेत.

 

ईशान्य भाषा व्यंजनांच्या दृष्टीने समृद्ध आहेत, तर उत्तरेच्या मध्यभागाचे भाषावैशिष्ट्य स्वरसमृद्धी हे आहे.

  

शब्दांचे वर्ग उत्तरेच्या मध्यभागात सहा आहेत, तर इतर भागांत तीन किंवा चार आहेत. प्रत्येक शब्दापूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय असून त्यामुळे त्याचे वाक्यातील स्थान व अर्थवैशिष्ट्य नक्की होते. , हे पुरुषवाचक, आणि हे स्त्रीवाचक उपसर्ग असून इतर नामांचे वर्गीकरण दर्शविणारे भिन्नभिन्न प्रत्यय आहेत. विभक्तीप्रत्यय अनेक आहेत. आवार व आन्दी या भाषांत प्रथम पुरुषाचे वजक व समावेशक अनेकवचन आहे. क्रियापदाला पुरुषवाचक चिन्ह नाही. वुगो याचा अर्थ ‘मी आहे’, ‘तू आहेस’, ‘तो आहे’ यांपैकी कोणताही होऊ शकेल.

वायव्य भागातील लोक सतराव्या-अठराव्या शतकांत इस्लामी वर्चस्वाखाली आहे. त्यातले बरेच रशियन आक्रमणानंतर शेजारच्या तुर्की साम्राज्यात गेले. त्यांच्या भाषा रचनात्मक दृष्टीने जवळच्या असल्या, तरी शब्दसंग्रहाच्या दृष्टीने दूर गेलेल्या आहेत. त्यांच्यात तीन गट आहेत.

 

(१) चेरकेस या गटात पूर्व चेरकेस व पश्चिम चेरकेस असे पोटभाषांचे दोन विभाग आहेत. पहिल्या विभागात बोलली जाणारी काबार्दी ही एकमेव बोली आहे. दुसऱ्या विभागातील प्रमुख बोली शापसुघ, ब्झेदुख, खाकुच, आब्‌खाझ, केमिरगोय, बेसलेनेघ या आहेत. चेरकेसचा सर्वांत जुना नमुना सतराव्या शतकात एका प्रवाशाने एकत्रित केलेल्या शब्दांचा व वाक्यांचा आहे. सर्व जुने साहित्य मुखपरंपरागत आहे. एकोणिसाव्या शतकापासून त्याचा संग्रह करण्याकडे अभ्यासकांचे लक्ष लागले. १९१८ नंतर या भाषेला लिखित रूप व प्रमाण व्याकरण देऊन साहित्यनिर्मितीचे प्रयत्न सुरू झाले.

 

(२) उबिख गटाच्या बोली १८६४ पर्यंत बोलल्या जात होत्या. आता त्या नामशेष झाल्या असून त्याची जागा चेरकेसने घेतली आहे.

 

(३) आब्‌खाझ भाषिक लोक कॉकेशियात बरेच आहेत. तिच्या महत्त्वाच्या बोली ब्झेब, आबशुय, सामुरसाकान व आबाझा या आहेत. आबाझाला साहित्यिक दर्जाही आहे. रशियनवर आधारित लिपीतून अनेक ग्रंथ व नियतकालिके एकोणिसाव्या शतकापासून प्रसिद्ध होत आहेत. या भाषांची स्वररचना अस्थिर असून व्यंजनरचना क्लिष्ट आहे आणि त्यांच्यात संयुक्त व्यंजनाची विपुलता विशेष आढळते. नामप्रक्रियेत विभक्ती फार कमी आहेत पण त्यांची उणीव शब्दयोगी अव्ययांनी भरून काढली आहे. धातुप्रक्रिया गुंतागुंतीची आहे.

 

दक्षिणेकडील भाषा : या भाषांत दोन गट असून त्यांत ⇨जॉर्जियन भाषेचा समावेश होतो. कॉकेशियन भाषांपैकी अनेक शतकांपासून माहित असलेली आणि फार पूर्वीपासून साहित्यिक दर्जा प्राप्त झालेली ती एकमेव भाषा आहे. आजूबाजूच्या प्रगत अशा इंडो-यूरोपियन व सेमिटिक भाषांचा तिच्यावर ठसा उमटलेला आहे.

 

(१) जॉर्जियन भाषा जॉर्जिया या सोव्हिएट प्रजासत्ताकात व काही आसपासच्या भागात बोलली जाते. या भागात कोर्तलुरी, काखुरी, प्शाउरी, तुशुरी, खेवसुरुली, ग्लिउली, इंगिलुरी, गुरुली, इमेरुली, राचुली इ. बोली आहेत. जॉर्जियनचा सर्वांत जुना पुरावा सहाव्या शतकातील आहे. त्यानंतर तीन शतकांनी मिळणाऱ्या पुराव्यापेक्षा तो भाषिक दृष्ट्या फारसा वेगळा नाही. बाराव्या शतकापासून तिच्यात श्रेष्ठ दर्जाची साहित्यरचना झालेली आहे. ती शासकीय भाषा असल्यामुळे तिचा दर्जा कधीच खाली गेला नाही. त्यामुळेच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून तिच्यात निर्माण झालेले आधुनिक साहित्य उच्च प्रतीचे आहे. टिफ्लिस विद्यापीठात ती माध्यम म्हणून वापरली जाते.

 

(२) पश्चिमेकडे मेग्रेली निना, चानुरी नेला, खनुरी एना या भाषा आहेत. त्यांची स्वररचना स्थिर आणि स्पष्ट आहे. व्यंजनरचना तशीच आहे. नामप्रक्रिया सोपी पण धातुप्रक्रिया गुंतागुंतीची आहे. क्रियापदात धातूला अनेक उपसर्ग व प्रत्यय जोडून रूप बनवले जाते.

 

कालेलकर, ना. गो.