इटालिक भाषासमूह : इटालिक हा इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक समूह आहे. त्याचे मूळ स्थान इटली हे असून ख्रि. पू. ४०० च्या सुमारास त्यात तीन महत्त्वाच्या भाषा होत्या : अंब्रियन, ऑस्कन व लॅटिन.

अंब्रियन भाषा उत्तरेकडच्या व पश्चिमेकडच्या विस्तीर्ण प्रदेशांत बोलली जाई. १४४४ मध्ये सापडलेल्या इट्रुस्कन य रीमन लिपींतील सात लेखांवरून या भाषेची माहिती मिळते. हे लेख ख्रि. पू. २०० ते ७० च्या दरम्यान लिहिले गेले असावेत.

ऑस्कन ही सेग्नाइटनामक डोंगराळ जमातीची भाषा होती. इ. स. पहिल्या शतकात ती वापरात होती. तिचे सर्व शिलालेख दक्षिणेकडचे आहेत. कॅप्युआ, पाँपेई इ. ठिकाणची ती प्रमाणभाषा होती.

ऑस्कनशी संबंधित पेलिग्नियन ही भाषा होती. ऑस्कन व अंब्रियन यांच्या दरम्यान मध्य इटलीच्या डोंगराळ भागात अनेक बोली वापरात होत्या.

लेशियमची लॅटिन ही बोली म्हणजे केवळ रोमची बोली होती. ती आजूबाजूच्या ग्रामीण बोलींपासून भिन्न अशी नागर बोली होती. हळूहळू तिने आजूबाजूच्या बोलींची जागा घेतली. नंतर ती ऑस्कन व अंब्रियन यांच्या प्रदेशांत पसरली एवढेच नव्हे, तर इटालिकला परक्या असलेल्या बोलींना तिने हुसकावून लावले (उत्तरेकडे केल्टिक व इट्रुस्कन यांना आणि दक्षिणेकडे मेसापियनला). नंतर तिने गॉल, स्पेन व उत्तर आफ्रिका या प्रदेशांवर आक्रमण केले. बोलभाषा म्हणून तिचा वापर संपल्यावरही कित्येक शतके ती सबंध यूरोपची ज्ञानभाषा म्हणून राहिली आणि आजही ती कॅथलिक पंथाची धर्मभाषा म्हणून वापरली जाते.

साहित्यिक भाषा म्हणून ती ख्रि. पू. तिसऱ्या शतकापासून वापरली जाऊ लागली पण तिचा लिखित पुरावा ग्रीकपासून निघालेल्या रोमन लिपीत असून तो त्याही पूर्वीचा आहे. सर्वांत जुना पुरावा एका सुवर्णमुद्रेचा असून तो ख्रि. पू. ६०० चा आहे. त्यानंतर लिखित पुराव्यांची मालिकाच सुरू होते. लॅटिन साहित्य अतिशय समृद्ध असून त्याची बरीबरी ग्रीकशिवाय इतर कोणत्याही भाषेला करता येणार नाही.

इटालिक भाषा : राजकीय वर्चस्वामुळे लॅटिन भाषा रोमन साम्राज्यात सर्वत्र वापरली जाऊ लागलो. साम्राज्य नष्ट होताच भाषिक ऐक्यही नष्ट पावले आणि स्थानिक बोली निर्माण झाल्या. लॅटिनोद्‌भव भाषा रोमन लिपीचा उपयोग करतात. काही बोली आजूबाजूच्या सांस्कृतिक भाषांच्या प्रभुत्वाखाली आल्या, तर काही अत्यंत श्रेष्ठ प्रतीच्या भाषा म्हणून आज प्रतिष्ठित आहेत. लँटिनोद्‌भव भाषांचे पुढील गट आहेत :

(१) इटालियन :  इटलीत बोलली जाते. तिच्या अनेक बोली आहेत. तिचा सर्वांत प्राचीन पुरावा ९६०–९६४ चा आहे. प्रमाण इटालियन फ्लॉरेन्सच्या शिष्ट समाजात विकास पावलेली तस्कन बोली आहे.

(२) सार्डिनियन : सार्डिनिया बेटात बोलली जाते. तिच्या अनेक बोली आहेत.

(३) प्रॉव्हांसाल : प्रॉव्हांसच्या बोली व लांग्‌दॉकियन, लिमूझँ, केर्सिनेल, रूरगा व गॅस्कन या पोटभाषांची बनलेली आहे. तिचे साहित्व १००० च्या सुमाराला सुरू होते मात्र तिचा सर्वांत जुना पुरावा ११०२ चा आहे.

(४) फ्रेंच : यात उत्तरेकडची फ्रेंच, इल द फ्रान्स व आग्नेय फ्रेंच असे भेद आहेत. पॅरिसच्या शिष्टभाषेवर आधारलेली प्रमाण फ्रेंच भाषा सतराव्या शतकापासून रूढ झाली. फ्रेंचचा सर्वांत जुना पुरावा ‘स्ट्रॅसबर्गची शपथ’ (इ. स. ८४२) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लेखात आहे [àफ्रेंच भाषा].

(५) स्पॅनिश : स्पेनच्या उत्तरेला ॲस्टोरियन इत्यादी, मध्य स्पेनमध्ये कॅस्टीलियन व दक्षिणेकडे आंदाल हे भेद आहेत. साहित्यलेखनाची परंपरा मध्य स्पेनच्या भाषेवर आधारलेली आहे. भाषेचा सर्वांत जुना पुरावा दहाव्या शतकातील आहे [→ स्पॅनिश भाषा].

(६) कातालान : स्पेनमध्ये व फ्रान्समध्ये बोलली जाते. या भाषेचा सर्वांत जुना पुरावा ११७१ चा आहे.

(७) पोर्तुगीज : उत्तर, मध्य व  दक्षिण असे भेद असून सर्वांत जुना पुरावा ११९२ चा आहे [→ पोर्तुगीज भाषा].

(८) र्‍हेटो-रोमन : स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया व इटली यांच्या हद्दीवर आहे. या गटाच्या बोलींपैकी रोमांश ही १९३८ पासून स्विस संघराज्याची एक भाषा म्हणून वापरली जाते. सर्वांत जुना पुरावा बाराव्या शतकातील आहे.

(९) दालभात : एड्रिॲटिक किनाऱ्यावर बोलल्या जाणाच्या रागुझें व व्हेल्योत या बोलींचा यात समावेश आहे. त्यांपैकी पहिली सतराव्या शतकात व दुसरी १९०० च्या सुमाराला नाहीशी झाली.

(१०) रुमानियन : या गटाच्या चार महत्त्वाच्या बोली आहेत : (१) रूमानियनांची दाको-रूमानियन, (२) अल्बेनिया, थेसाली व मॅसिडोनियामधील मारूदो- रूमानियन, (३) मेग्लेनाइट व (४) इस्त्रो-रूमानियन. रूमानियनचा लिखित पुरावा सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सापडतो [→ रूमानियन भाषा].

स्पॅनिश ही स्पेन व ब्राझील सोडून सर्व दक्षिण अमेरिका व मध्ये अमेरिका यांची प्रमाणभाषा आहे. कॅलिफोर्नियाचा व टेक्ससचा काही भाग, उत्तर आफ्रिकेचा काही भाग इ. प्रदेशांतही ती बोलली जाते.

पोर्तुगीज ही पोर्तुगालची व ब्राझीलची प्रमाणभाषा असून पोर्तुगीज वसाहतींत राजभाषा म्हणून वापरली जाई त्यामुळे भारतातील गोवा, दीव व दमण या भागांतही ती बोलणारे व समजणारे लोक आहेत.

फ्रेंच भाषा फ्रान्स, पूर्व कॅनडा व उत्तर आफ्रिकेचा काही भाग यांत बोलली जाते. पश्चिम आशियातील बऱ्याच देशांत तिचे वर्चस्व असून भारतातील तिच्या वसाहतींत (पाँडिचरी, कारिकल, यानाआँ, माहे, चंद्रनगर) तिचा राजभाषा म्हणून वापर होता. सांस्कृतिक भाषा म्हणून तिला जगभर प्रतिष्ठा आहे.

संदर्भ : Meillet, Antoine Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris, 1954.

कालेलकर, ना. गो.