क्षेत्राभ्यास, भाषाशास्त्रीय : (फील्ड स्टडी लिंग्विस्टिक्स). अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्त्य संशोधक निसर्गाकडून मनुष्यजीवनाकडे वळले. केवळ मनुष्यप्राण्याचे शरीर आणि शरीरव्यापार यांत गुंतून न पडता मनुष्याचे आपसांतले व्यवहार आणि मनोव्यापार यांच्याकडे त्यांनी लक्ष वळवले. परिणामी अर्थशास्त्र, भाषाशास्त्र यांसारख्या मानव्य व विज्ञानशाखा उदयाला आल्या. नंतर समाजशास्त्र, मानवशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींची त्यात भर पडली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात केवळ चिंतन करून आणि ग्रंथांचा धांडोळा घेऊन भागणार नाही, जोडीला क्षेत्रीय निरीक्षणही करावे लागेल, ही जाणीव झाली.

भाषाशास्त्रापर्यंत ही जाणीव पोचली.आउगुस्ट श्लाय्खर (१८२१–६८) आणि जॉर्ज व्हेंकर (१८५२–१९११) या जर्मन अभ्यासकांनी ऐतिहासिक भाषाभ्यासासाठी स्थानिक बोलींचे महत्त्व जाणले आणि बोलींच्या क्षेत्राभ्यासाला अनुक्रमे १८५२ आणि १८७६ मध्ये सुरुवात केली. यानंतरच्या काळात ⇨ फेर्दिनां द सोस्यूर (१८५७–१९१३) व इतर अभ्यासकांनी एकेका भाषाभेदाचे स्थलकालनिरपेक्ष वर्णन-विश्लेषणाचे महत्त्व सांगितले, वर्णनात्मक भाषाशास्त्राचा पाया घातला आणि क्षेत्रीय भाषाभ्यासाची त्याला जोड देण्यात आली. त्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या : (१) भाषेच्या शब्दरूपांचे वर्णन करताना श्रुतिगम्य वैशिष्ट्यांची ध्वनिलिपीत नोंद तर करावी लागेलच, पणत्यांच्या मागच्या व्यवस्थेचा शोध घ्यायला पाहिजे [→ वर्णविचार].(२) शब्दरूपांबरोबर त्यांची व्याकरणव्यवस्था आणि त्यांना जोडलेली अर्थरूपे यांचाही शोध घ्यायला पाहिजे. (३) केवळ सुटेसुटे शब्द गोळा करून फार तर कोश तयार होतो, पण ते पुरेसे नाही. जोडीला वाक्येआणि वाक्यसमूह गोळा करायला पाहिजे. अशा वाक्यांची आणि वाक्य-समूहांची मदत शब्दरूपांच्या जोडीची अर्थरूपे आणि व्याकरणव्यवस्था कळायला होते. विसाव्या शतकाच्या मध्यावर भाषाभेदांच्या सामाजिक अनुबंधाचे नव्याने भान आले आणि भाषिक क्षेत्राभ्यासाला एक नवेपरिमाण लाभले.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण भाषेचे क्षेत्रीय निरीक्षणकोणते उद्दिष्ट मनात वागवून करीत आहोत, हे ठरवल्यानंतर आपल्याक्षेत्रीय निरीक्षणाचे नेमके स्वरूप ठरते. आपण कुणाकुणाला (कोणत्या भाषासूचकांना) कोणकोणते प्रश्न (कोणत्या प्रश्नावलीतून) विचारणार आहोत? आलेली उत्तरे कशा प्रकारे नोंदणार आहोत ? आपली पश्नावली कच्च्या स्वरूपात असताना एका चाचणी-पाहणीत (पायलट-फील्डटेस्ट) वापरून, पुस्त्या-दुरुस्त्या करून, मग पक्की करणे केव्हाही श्रेयस्कर.क्षेत्रीय भाषाभ्यास मुख्यतः तीन उद्दिष्टांसाठी होऊ शकतो :

(१) भाषाविश्लेषणासाठी क्षेत्राभ्यास : विशिष्ट भौगोलिक स्थळ, सामाजिक स्थान आणि विशिष्ट कालखंड यांमुळे निश्चित झालेले भाषारूप अभ्यासासाठी निवडून त्याच्या वर्णव्यवस्था, पदव्याकरण, वाक्यव्याकरण आणि शब्दार्थसंग्रह या अंगांनी भाषाविश्लेषण करण्यासाठी सामग्री गोळा करणे, हे एक उद्दिष्ट असू शकते. उदा., पश्चिम वर्‍हाडमधील ग्रामीण भागातले शेतकरी १९४० ते १९५० या दशकात कोणती एकजिनसी बोली बोलत होते ? पाहणी १९८० च्या सुमारास झाली, तर भाषासूचक साठ-सत्तर वयोगटातल्या स्त्री-पुरुषांपैकी असावा लागेल. अशा पाहणी-साठी गावोगाव फिरावे लागतेच अशातला भाग नाही. एक किंवा अधिक मोजक्याच व्यक्तींची दीर्घ मुलाखत घेणे, अनेक व्यक्तींच्या छोट्या मुलाखती (विशेषतः एका प्रश्नावलीला धरून) घेणे, किंवा त्या विशिष्ट भाषकसमूहात काही कालावधीत मिळूनमिसळून राहून सहभागी निरीक्षण करणे, असेतीन कमीअधिक औपचारिक पर्याय कमीअधिक प्रमाणात अवलंबावे लागतात. वर्णव्यवस्थेसाठी अमुक अर्थरूपासाठी कोणते शब्दरूप असे विचारून मिळालेल्या जोड्या, पदव्याकरणासाठी अशा जोड्यांच्या जोड्या (उदा., मी जातो – मी गेलो मी येतो – मी आलो), वाक्यव्याकरणासाठी कमीअधिक जुळत्या वाक्यांचे संच (उदा., मी / श्याम गावाला / शाळेला जातो / निघतो) . शब्दार्थसंग्रहासाठी विशिष्ट शब्दरूप अनेक अर्थ दिसतील अशा उदाहरणांतून किंवा विशिष्ट अर्थरूप अनेक शब्दरूपांनी व्यक्त होईल अशा उदाहरणांतून (उदा., जेवायला वेळ आहे, जेवायला वेळ झाला नाही, जेवायची वेळ झाली जेवायला अजून वेळ आहे, जेवायला अजून अवकाश आहे, जेवायला अजून उशीर आहे.) अशी विविध प्रकारची सामग्री उपयोगी ठरते. थेट विश्लेषणात्मक प्रश्न टाळावे लागतात. उदा., तुमच्या भाषेत नामाला लिंगे असतात ? किती लिंगे ? वेळ पुल्लिंगी आणि वेळ स्त्रीलिंगी यात काही अर्थभेद आहे ? कोणता अर्थभेद ? अशा प्रश्नांची उत्तरे संशोधकाने स्वतः शोधून काढायची असतात ते काम भाषासूचकावर ढकलून उपयोगाचे नाही ! तसे ते ढकलल्यास फार तर भाषेबद्दलचे प्रचलित समज-गैरसमज गोळा होतील. (बारा कोसांवर वाणी बदलते, हा भारतीय समज मात्र भारतापुरता तरी खरा आहे.)

(२) भाषेतिहासासाठी क्षेत्राभ्यास : विशिष्ट भाषारूपाला दोन अंगे असतात. विशिष्ट प्रकारचा भाषाव्यवहार (ज्याच्यातून नकळत झालेले भाषिक प्रमाद किंवा कळूनसवरून केलेले भाषिक खेळ गाळून टाकले आहेत) आणि त्यातून प्रकट झालेली भाषाव्यवस्था (किंवा आपणअसेही म्हणू शकू की, विशिष्ट प्रकारची भाषाव्यवस्था आणि तिलासर्वस्वी अनुसरणारा भाषाव्यवहार, ज्याच्यात अव्यवस्थेला वावच नाही) . काळाच्या ओघात भाषारूप जसेच्या तसे टिकून राहील किंवा दरबारा वर्षांनी किंचितसे नवे भाषारूप प्रकट होईल, हे झाले परंपरासातत्य. विशिष्ट भौगोलिक स्थल वा सामाजिक स्थान डोळ्यासमोर ठेवून कालांतराने क्षेत्रीय पाहणी करता येईल. उदा., अशा पाहणीत ‘जाता तर’ हा भाषाप्रयोग जाऊन ‘गेला असता तर’ हा कायम झाल्याचे दिसेल. काळाच्या ओघात एकच भाषारूप जाऊन स्थलभेदांना किंवा सामाजिक भेदांना अनुसरून वेगवेगळी भाषारूपे त्याच्या जागी उपस्थित होतील. तसतशी क्षेत्रीयपाहणी करता येईल. उदा., एकच अर्थरूप स्थलभेदांना अनुसरून ‘तेल’, ‘तेल’ किंवा ‘त्येल’, ‘त्येल’ किंवा ‘त्याल’, ‘त्याल’ किंवा ‘तील’, ‘तील’ अशा शब्दरूपांत प्रकट होईल. हे झाले परंपराविभाजन. काळाच्या ओघात मूळची भिन्न भाषारूपे प्रत्यक्ष भाषाव्यवहारात एकमेकांशी संलग्न होतात आणि परिणामी एका भाषाविशेषाची किंवा भाषापरिवर्तनाची आयातनिर्यात होईल, हा झाला परंपरासंकर. असे संकर शोधण्यासाठी क्षेत्रीय पाहणी करता येईल. उदा., एका शहराच्या भोवती बारा कोसांवर वर्तुळे काढून पाहणी केली, तर शहरी भाषारूपाच्या प्रभावाने कमीअधिक अंतरावरची ग्रामीण भाषारूपे कितपत संकरित झाली आहेत, याचा अंदाज घेता येईल. ऐतिहासिक उद्दिष्टाला अनुरूप अशी प्रश्नावली ठरवावी लागते.

(३) भाषासर्वेक्षणासाठी क्षेत्राभ्यास : विशिष्ट भाषारूपाची भौगोलिक स्थलव्याप्ती किंवा सामाजिक स्थानव्याप्ती अजमावण्यासाठी क्षेत्रीय पाहणी करता येईल. अशा पाहणीमध्ये संशोधकाला डोळस भौगोलिक किंवा सामाजिक संचार करावा लागेल. असा डोळस भाषिक संचार पिग्मेलियन लिहिणाराजॉर्ज बर्नार्ड शॉ आणि त्याचे मराठी रूपांतर करणारेपु. ल. देशपांडे (ती फुलराणी) किंवा काही नट-नटी अशा बिगर-संशोधकांनीही केलेला दिसतो. प्रश्नावली निश्चित, आटोपशीर आणिनेमक्या भाषाविशेषांचा वेध घेणारी असावी लागेल. तिच्यामध्ये भाषावेधी प्रश्नांबरोबर भाषासूचकवेधी प्रश्नांचाही समावेश करावा लागेल किंवामूक निरीक्षणाचा अवलंब करावा लागेल. लिंग, वयोगट, जन्मस्थल, व्यवसायस्थल किंवा विवाहोत्तर स्थल, शिक्षण, उत्पन्नगट इ. सूचक--विशेषांची नोंद करावी लागेल. उद्दिष्टांनुसार प्रश्नावली ठेवावी हे जरी खरे असले, तरी कधीकधी उद्दिष्टपूर्तीसाठी अनुकूल अशी सामग्री अचानकपणे डोळ्यासमोर येते. तिच्यावर झडप घालण्याचे अवधान मात्र पाहिजे.

एका काळी जुनी हस्तलिखिते, दस्तऐवज, कोरीव लेख इत्यादिकांखेरीज भाषासंशोधनाची कल्पना करणेही अवघड होते. आज त्यांच्या जोडीला क्षेत्राभ्यासाशिवाय भाषासंशोधनाची कल्पना करणे तितकेच अवघड आहे.

फीतमुद्रक (टेपरेकॉर्डर), कॅमेरा, संगणक इ. आधुनिक साधने संशोधकाचे काम हलके करतात पण संशोधकाची नजर आणि अनुभवाने येणारे शहाणपण याची जागा ती घेऊ शकत नाहीत.

संदर्भ : 1. Bhaskararao, P. Practical Phonetics Part-I, Pune, 1972.

         2. Kelkar,  Ashok R. “The Scope of a Linguistic Surveyin Language Surveys in Developing Nations, Ed. Ohanessian, S. &amp Others, Washington D. C., 1975.

         3. Samarin, William J. Field Linguistics, New York, 1967.

         ४. कुलकर्णी, सु. बा. ‘‘बोलीभाषांचा अभ्यास’’, भाषा व साहित्य संशोधन, भाग १ (संपा., जोशी, वसंत स.), पुणे, १९८१.

केळकर, अशोक रा.