तुपी–ग्वारानी (तुपीअन) भाषासमूह : अमेरिकन इंडियन लोकांच्या बोलींपैकी मुख्यतः ब्राझील आणि पॅराग्वाय व त्याशिवाय पेरू, गियाना, बोलिव्हिया, यूरग्वाय, अर्जेन्टिना एवढ्या भूप्रदेशावर विखुरलेल्या बोलींचा समूह. दहा लक्षांहून अधिक लोक आज सु. ४०–५० बोली बोलतात त्यांखेरीज १४ तरी बोली नष्ट झालेल्या आहेत. ह्या सर्वांचे एक भाषाकुल बनते. ॲमेझॉन खोऱ्यात तुपी–नांबा (१४ हजारांहून थोडे कमी), पेरूत कोकामा (१० हजार), बोलिव्हियात चिरिग्वानो (१५ हजार) व पॅराग्वाय, ब्राझील, अर्जेन्टिनामध्ये ग्वारानी (५० हजार शिवाय अमेरिकन इंडियन नसलेले सु. १० लक्ष) ह्या प्रमुख बोली आहेत. तुपी–नांबा ही प्रादेशिक दळणवळणासाठी वापरली जाते. ग्वारानीला तर पॅराग्वायमध्ये स्पॅनिशच्या जोडीला राष्ट्रभाषा म्हणून मानले गेले आहे. सतराव्या शतकापासून ग्वारानी ही रोमन लिपीत लिहिली जात आहे.

ब्राझीलमध्ये पोर्तुगीज आणि अन्यत्र स्पॅनिश ह्या भाषांशी संपर्क आल्यामुळे शब्दांची देवाणघेवाण बरीच झाली आहे. त्यांपैकी शुद्ध रबराला ‘काडचूक’ हा शब्द तर फ्रेंच आणि इंग्लिशमध्येही रूढ आहे.

संदर्भ : Voegelin, C. F. Voegelin, F. M. Anthropological Linguistics, 7 : 7, Bloomington (Indiana), Oct. 1965.

केळकर, अशोक रा.