त्रुब्येत्स्कॉई, न्यिकलाई स्यिरग्येयेव्ह्यिच : (१६ एप्रिल १८९०–२५ जून १९३८). प्रसिद्ध रशियन भाषावैज्ञानिक. त्यांचा जन्म रशियन सरदार घराण्यात मॉस्को येथे झाला. त्यांना क्रांतीनंतर रशिया सोडावा लागला. १९२२ पासून त्यांची ऑस्ट्रियात व्हिएन्ना विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. हिटलरच्या आक्रमणानंतर त्यांना विद्यापीठ सोडावे लागले. त्यांचा व्हिएन्ना येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. रोमान याकॉपसन ह्या प्रसिद्ध रशियन भाषावैज्ञानिकाचा प्रदीर्घ स्नेह आणि सहकार्य त्यांना मिळाले. चेकोस्लोव्हाकियातील प्राग येथील भाषावैज्ञानिक अभ्यासमंडळाच्या स्थापनेत आणि नंतरच्या मोलाच्या कार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भाषाविज्ञान, विशेषतः वर्णविन्यास किंवा स्वनव्यवस्था (फोनॉलॉजी) संपूर्णतः नव्या वळणाने पुढे नेण्याचे कार्य ज्या आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी केले त्यांत त्रुब्येत्स्कॉई यांचा अंतर्भाव होतो. सायबीरिया, कॉकेशस ह्या प्रदेशांतील व स्लाविक उपकुलामधील भाषांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होताच पण इतरही अनेक भाषा वर्णविन्यासाच्या अंगाने त्यांनी डोळ्याखालून घातल्या होत्या. Grundzüge der Phonologie (१९३९, अपूर्ण इं. भा.प्रिन्‍सिपल्स ऑफ फोनॉलॉजी, १९६९) हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय.

त्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत : (१) उच्चारभेदांचे नुसते बिनचूक आणि सविस्तर वर्णन करणे म्हणजे वर्णविन्यासाचे वर्णन नव्हे. ह्या उच्चारभेदांपैकी अर्थभेद दर्शविणारे उच्चारभेदच वर्णावली सिद्ध करताना लक्षात घ्यावेत. (२) वर्णावली म्हणजे केवळ एक जंत्री नसून ओष्ठ्यता, घोष, नासिक्यता ह्यांसारख्या अनेक वर्णघटकांतून सिद्ध झालेला तो एक व्यूह आहे. प्रत्येक भाषेचा असा विशिष्ट व्यूह असतो. (३) एरवी भिन्न मानावे लागणारे वर्ण विवक्षित परिस्थितीत–उदा., आदी व्यंजनापूर्वी–तसे अर्थभेदक रहात नाहीत, असे कधी कधी दिसून येते. ह्या स्थितीची दखल वर्णावली सिद्ध करताना घ्यावी लागते. उदा., एरव्ही अर्थभेदक असलेले इ, ई शब्दाच्या अंती विकल्पाने येतात अशी एखाद्या भाषेत स्थिती असेल, तर शब्दाच्या अंती ऱ्हस्वदीर्घतानिरक्षेप स्वरचिन्हच ठेवणे युक्त होय. (४) बोलींचा तौलनिक आणि ऐतिहासिक अभ्यास वर्णविन्यासाच्या ह्या नव्या सिद्धांतांनुसार पुन्हा केला पाहिजे.

केळकर, अशोक रा.