बाल्टिक भाषासमूह : यूरोपच्या उत्तरेला बाल्टिक समुद्राच्या दक्षिणेला असलेल्या प्रदेशात ⇨ इंडो-यूरोपियन भाषा कुटुंबाची जी एक शाखा स्लाव्हिक शाखेच्या उत्तरेला पसरलेली आहे, तिला बाल्टिक हे नाव आहे. त्यात लेटिश व लिथ्युएनियन या दोन महत्त्वाच्या भाषा असून त्यातली पहिली अधिक उत्तरेकडे आहे. बाल्टिक शाखा ही स्लाव्हिक भाषांना लागून असल्यामुळे या दोन समूहांत बरीच साम्ये आढळतात. त्यामुळे पुष्कळदा या दोहोंचा बाल्टो-स्लाव्हिक या संयुक्त नावानेही विचार केला जातो. बाल्टिक भाषा या प्रामुख्याने स्थिरावलेल्या, शेतीव्यवसाय करणाऱ्या लोकांच्या भाषा असल्यामुळे इंडो-यूरोपियनच्या इतर उत्क्रांत शाखांपेक्षा त्या बऱ्याच प्राचीन स्वरूपाच्या राहिल्या आहेत. विशेषत: नामांना होणारा विभक्तिविकार हा याचा महत्त्वाचा पुरावा होय. क्रियापदरूपांत मात्र बरेच नावीन्य दिसून येते.
उपशाखा : (अ) जुनी (ओल्ड) प्रशियन ही पंधराव्या शतकातील ८०० शब्दांचा संग्रह उपलब्ध झाल्यामुळे, तसेच तीन छोट्या धर्मपुस्तिकांच्या भाषांतरामुळे व लुथरच्या एका लेखामुळे (१५६१) आपल्याला माहीत झाली आहे. आज ती अस्तित्वात नाही.
(आ) लेटो-लिथ्युएनियनमध्ये आजही अस्तित्वात असलेल्या दोन गटांचा समावेश होतो :
लिथ्युएनियन : हिचा सर्वांत जुना पुरावा १५४७ चा आहे. लिथ्युएनियाच्या विविध प्रांतातील बोलींत असणारे महत्त्वाचे फरक सोळाव्या व सतराव्या शतकांतील लिखित साहित्यापासूनच दिसून येतात. काही प्राचीन रूपे नष्ट होण्यापलीकडे आजची भाषा त्या वेळच्या भाषेपासून फारशी भिन्न नाही. इंडो-यूरोपियनच्या प्राचीनत्वाची कल्पना देण्याच्या दृष्टीने लिथ्युएनियनमधील काही वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. केवळ सोळाव्या शतकातच नव्हे, तर आजदेखील तिच्यात वैदिक संस्कृत, तसेच होमरचा ग्रीक यांतील रूपे आढळतात. उदा., ‘एस्ति’=तो आहे=सं. ‘अस्ति’, ग्री. ‘एस्ति’ किंवा ‘गीवस्’ = सं. ‘जीव:’, ग्री. ‘वीवोस्’. इतके असूनही लिथ्युएनियनचा उपलब्ध पुरावा मिळण्याचा काळ फार उशिराचा (म्हणजे सोळाव्या शतकातील) असल्यामुळे तिची व्याकरणपद्धती इंडो-यूरोपियनपेक्षा वेगळी आहे. विशेषत: क्रियापदवाचक रूपे अगदी नव्या प्रकारची आहेत. प्राचीन प्रशियन काही कमी पुरातन स्वरूपाची नाही, पण तिचीउपलब्ध सामग्री भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय अपुरी आहे. म्हणून तुलनात्मक व्याकरणात बाल्टिकच्या नावे दिली जाणारी रूपे पश्चिम लिथ्युएनियन लिखित साहित्यातून घेतली जातात.
लेटिश : लेटिशचा पुरावा त्याच काळापासून उपलब्ध आहे. पण त्यातील रूपे मात्र लिथ्युएनियनच्या मानाने अधिक बदललेली आहेत. कूरसारख्या आणखी काही बाल्टिक भाषा आहेत. पण त्यातील काहीही आज उपलब्ध नाही. सामान्यपणे तुलनात्मक व्याकरणात लिथ्युएनियन व लेटिश यांची अर्वाचीन रूपेच देण्यात येतात. एकोणिसाव्या शतकापर्यंत या भाषा शेतकऱ्यांच्याच भाषा होत्या आणि त्यांची रूपे प्राचीन रूपांसारखीच असल्यामुळे, त्यांनी दिलेली भाषिक माहिती त्यांच्यापूर्वी कित्येक शतके उपलब्ध असलेल्या लॅटिन व गॉथिक यांच्यापेक्षाही कित्येकदा अधिक जुनी असते. त्यातूनच या भाषांचे प्राचीनत्व सिद्ध होते.
संदर्भ : 1. Bloch, J. Curry, A. Ernout, A. Abrégé de grammaire comparee des langues Indo- européennes, Paris, 1905.
2. Meillet, A. Introduction a letude comparative des langues Indo-europeennes, Paris, 1937.
कालेलकर, ना. गो.