घाटगे, अमृत माधव : (१० ऑगस्ट १९१३—     ). संस्कृत व प्राकृत भाषासाहित्यांचे गाढे अभ्यासक. आधुनिक भाषाशास्त्राची दीक्षा घेणाऱ्या जुन्या पिढीतील मोजक्या विद्वानांपैकी एक. जन्म महागाव (जि. कोल्हापूर) येथे. शालेय शिक्षण गडहिलंग्ज व कोल्हापूर येथे. पाली–प्राकृत (१९३०) आणि संस्कृत (१९३६) या दोन्ही विषयांत एम्.ए. मुंबई विद्यापीठात प्रा. ह. दि. वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहून ते पीएच्.डी. झाले (१९४०). पुणे, कोल्हापूर, धारवाड, नागपूर येथील महाविद्यालयांतून अध्यापन (१९३५—६१). पुणे विद्यापीठाच्या डेक्कन कॉलेजमधील भाषाशास्त्र विभागात १९६१ पासून ते अध्यापन करीत आहेत. त्यांनी आधुनिक भाषाशास्त्राचा अभ्यास डेक्कन कॉलेज, पुणे (१९५५—५७) आणि अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, फिलाडेल्फिया (१९५७—५८) येथे केला. ‘संस्कृत ऐतिहासिक महाकोश’ योजनेत ते १९६३ पासून सहसंपादक आहेत. १९६९ पासून भाषाशास्र-प्रगत अध्ययन-केंद्राचे ते संचालक आहेत. त्यांची प्रमुख ग्रंथरचना पुढीलप्रमाणे : इंट्रोडक्शन टू अर्धमागधी (१९४१), हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स अँड इंडो-आर्यन लँग्वेजिस (विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स, मुंबई, १९६२), ‘अ सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्ट्स’’ या मालेतील कोंकणी ऑफ साउथ कॅनरा (१९६३),कुडाळी (१९६५), कुणबी ऑफ महाड (१९६६), कोचीन (१९६७), कोंकणी ऑफ काणकोण (१९६८), मराठी ऑफ कासरगोड (१९७०), वारली ऑफ ठाणा, गावडी ऑफ गोवा  मिली ऑफ डांग्ज  हे खंड, सम ॲस्पेक्ट्स ऑफ अप्लाइड लिंग्विस्टिक्स  इत्यादी. यांशिवाय त्यांनी अनेक शोधनिबंध व परीक्षणेही लिहिली आहेत.

केळकर, अशोक रा.