ग्रिम, याकोप : (४ जानेवारी १७८५–२o सप्टेंबर १८६३). याकोप आणि व्हिल्हेल्म ग्रिम (२४ फेब्रुवारी १७८६–१६ डिसेंबर १८५९) हे दोन जर्मन बंधू भाषाशास्त्राचे अभ्यासक आणि परीकथांचे-लोककथांचे संशोधक-संकलक म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघांचेही जन्म हानाऊ येथे झाले. त्यांचे शिक्षण प्रथम कासेल आणि नंतर मारबर्ग येथे झाले. मारबर्ग येथे शिकत असताना फ्रिड्रिख फोन साव्हिन्यी ह्या प्रशियन विधिवेत्त्याच्या हाताखाली त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. दोघांनीही कासेल येथील ग्रंथालयात नोकरी केली नंतर गर्टिगेन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. तथापि १८३७ मध्ये हॅनोव्हरच्या राजाने राज्यघटना बाजूस सारल्यानंतर त्याला विरोध करणाऱ्यांत हे दोघे बंधू सामील झाल्यामुळे त्यांना गटिंगेन विद्यापीठातून काढून टाकण्यात आले तसेच हॅनोव्हर राज्यातूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली त्यामुळे ते कासेलला परतले. १८४१ मध्ये ते बर्लिनला आले. बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांना ‘प्रशियन विज्ञान अकादमी’चे सदस्यत्वही देण्यात आले.

Kinder und Hausmaerchen (३ खंड १८१२, १८१५, १८२२ ग्रिम्स फेअरी टेल्स  ह्या नावाने इंग्रजीत अनेक भाषांतरे) Deutsche Sagen (२ खंड १८१६–१८) हे त्यांनी परस्पर सहकार्याने निर्मिलेल्या ग्रंथांपैकी विशेष उल्लेखनीय होत. ग्रिम बंधूंच्या परीकथांना इसापनीतिकथा किंवा पंचतंत्रातील कथा ह्यांच्याइतकेच महत्त्व दिले जाते. Deutsche Sagen  मध्ये प्राचीन जर्मानिक महाकाव्यपरंपरेचे विश्लेषण आहे. ह्यांशिवाय Geschichte der deutschen Sprache (१८४८) हा जर्मन भाषेचा इतिहास त्यांनी लिहिला आणि जर्मन शब्दकोशाची प्रचंड योजना तयार करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली होती. हे काम त्यांच्या हयातीत ते पूर्ण मात्र करू शकले नाहीत. ते अन्य व्यक्तींनी पूर्ण केले.

ग्रिम बंधूंपैकी याकोपला व्याकरणात आणि भाषाशास्त्रात विशेष रस होता. Deutsche Grammatik  हा याकोप ग्रिमचा स्वतंत्र ग्रंथ. ऐतिहासिक व तौलनिक जर्मन व्याकरणविषयक ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती १८१९ साली प्रसिद्ध झाली तथापि रास्मुस क्रिस्ट्यान रास्क ह्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञाच्या संशोधनाने प्रभावित होऊन त्याने तो शास्त्रीय पद्धतीने पुन्हा लिहून काढला (१८२२). त्यामुळे आणि विशेषतः त्यात आलेल्या जर्मानिक भाषांच्या ध्वनिपरिवर्तनाच्या सिद्धांतामुळे याकोप फार प्रसिद्धीला आला. हा नियम ‘ग्रिमचा नियम’ म्हणून ओळखला जातो. ह्याशिवाय Deutsche Rechtsalterthuemer (१८२८) व Deutsche Mythologie (१८३५) हे याकोपचे अन्य दोन ग्रंथ.

व्हिल्हेल्मला वाङ्‌मयाची अधिक ओढ होती. Die Deutsche Heldensage (१८२९) हा जर्मन वीरकथांचा संग्रह ही त्याची स्वतंत्र कामगिरी. हे दोघे बंधू बर्लिन येथे निधन पावले.

घारपुरे, न. का. कालेलकर, ना. गो.