सर्बो -कोएशियन भाषा : ( सृप्स्कोहृवात्स्की येजिक ). यूरोपातील बाल्कन द्वीपकल्पात बोलले जाणारे आणि ⇨ स्लाव्हिक भाषासमूहा त मोडले जाणारे एक भाषायुग्म. काहीशी हिंदी-उर्दू भाषा-युग्मासारखीच त्याची स्थिती आहे. जवळजवळ एकच भाषा पण कॅथलिक चर्च आणि ऑर्थोडॉक्स चर्च यांच्या स्पर्धेमुळे उत्तर-पश्चिम भागातील हृवात् बोलणाऱ्या लोकांनी लॅटिन लिपी, लॅटिन धर्मभाषा, लॅटिन व इटालियनचे भाषिक वाङ्‌मयीन संस्कार इ. स. चौदाव्या शतकात स्वीकारले, तीच क्रोएशियन भाषा व झागेब शहर तिचे केंद्र. उरलेल्या दक्षिण-पूर्व भागातील सृब् बोलणाऱ्या लोकांनी मात्र सिरिलिक लिपी, चर्च-स्लाव्हिक धर्मभाषा, ग्रीक व रशियन भाषिक व वाङ्‌मयीन संस्कार तसेच राहू दिले, तीच सर्बियन (पूर्वीची सर्व्हियन ) भाषा आणि बेअगाड ( बेलगेड ) शहर तिचे केंद्र. सर्बो-क्रोएशियन भाषक सु. १७० लाख ( क्रोएशियन ६० लाख, सर्बियन ११० लाख ) आहेत. ते सर्बिया व क्रोएशिया या स्वतंत्र देशांखेरीज इटली, रूमानिया, हंगेरी या देशांच्या सीमावर्ती भागांतही अल्प संख्येने आहेत. या भाषिक विभाजनाला एकीकडे ऑस्ट्रिया-हंगेरी व व्हेनिस आणि दुसरीकडे तुर्की साम्राज्य  यांची बाल्कन प्रदेशासाठी जी सत्तास्पर्धा होती, तीही जोडीला कारणीभूत झाली.

वर्णव्यवस्था आणि लिप्या : व्हुक काराजिच या सर्बियन लिपिसुधारकामुळे १७८७ मध्ये आणि ल्यूदेवित गाय या क्रोएशियन लिपिसुधारकामुळे १८०९ मध्ये या दोन्ही भाषांची लेखनव्यवस्था उच्चरानुसारी झाली. ( कोष्टक पृ. ८०६ ).

क्रोएशियन लॅटिन वर्णमाला आणि तिचा क्रम जसा रोमन लिपीच्या जवळ आहे, तशीच सर्बियन सिरिलिक वर्णमाला आणि तिचा क्रम रशियन सिरिलिक लिपीच्या जवळ आहे, असे कोष्टकावरून लक्षात येईल. २३/२० क्रमांकांच्या वर्णाचा व्यंजन आणि स्वरसदृश व्यंजन असा दुहेरी उपयोग संस्कृतच्या अभ्यासकांना ओळखीचा वाटेल. तीच स्थिती सर्बो-क्रोएशियन शब्दसुराची आहे. शब्दांतील स्वरांची ऱ्हस्वदीर्घता, शब्दातील बलाचे स्थान आणि सबल स्वराचा सुरातील आरोह-अवरोह यांचे संबंध गुंतागुंतीचे आणि वैदिक संस्कृतमधील स्वर किंवा पंजाबीमधील शब्दसुर यांची आठवण करून देणारे आहेत. स्लाव्हिक भाषांची काही सामान्य उच्चरवैशिष्टयेही इथे दिसून येतात. स्वरांतील विकारांसाठी भेदक चिन्हे आहेत, पण ती मुख्यत: संदर्भ-गंथांत आणि पाठयपुस्तकांत वापरतात. उदा., à a”áâ.

पदव्याकरण : नामाला तीन कृत्रिम लिंगे, दोन वचने आणि सात विभक्ती ( प्रथमा, संबोधन, कर्म, संबंध, संप्रदान, करण-अपादन, अधिकरण ) असे विकार होतात. विकारांत परप्रत्यय, वर्णादेश, स्वरांचे ऱ्हस्वदीर्घत्व, स्वरबदल आणि शब्दसुर यांची गुंतागुंत दिसते. क्रियापदांमध्ये कालभेद आणि क्रियाव्याप्तिभेद, पुरूषवचनभेद आणि धातुसाधितांतील लिंगवचनभेद दिसतात. इंडो-आर्यन भाषांच्या अभ्यासकांना यातला बराच भाग ओळखीचा वाटेल. उदा., हिंदीमधील करूं-करे कडून करता-क्रिया ( जोडून कधीकधी है-था ) अशा प्रकारचा प्रवास. सार्वनामिक कर्ता सामान्यत: गाळला जातो.

वाक्यव्याकरण : क्रियापदाशी निकट संबंध असलेल्या काही पदांचा क्रम आणि लोप यांबद्दल गुंतागुंतीचे नियम आहेत. प्रश्नार्थक, सहायक्रिया, सार्वनामिक संप्रदान, संबंध व कर्म विभक्ती आणि वाक्यातील बलस्थान यांचा विचार करावा लागतो. ‘ पुस्तक देण्यासाठी ’ म्हणायचे की उपवाक्य वापरायचे याची लकब बोलीनुसार बदलते.

कोष्टक

शब्दसंग्रह : क्रोएशियनमध्ये जर्मन, लॅटिन, चेक या भाषांमधून शब्दरूपांचे, पुष्कळदा केवळ अर्थरूपांचे, आदान दिसते. सर्बियनमध्ये    तुर्की, ग्रीक, रशियन, चर्च-स्लाव्हिक आणि अलीकडे फ्रेंच, इंग्लिश भाषांतून आदान दिसते आणि तेही पुष्कळदा शब्दरूपांचे ( ठराव पास झाला हे शब्दरूपाचे आदान, तर ठराव संमत झाला हे केवळ अर्थरूपाचे आदान समजावे ).

सर्बियन आपल्या मौखिक कथनात्मक पदयवाङ्‌मयासाठी विशेष प्रसिद्घ आहे.[⟶ स्लाव्हिक भाषासमूह].

संदर्भ : 1. Lehiste, Ilse Pavle Ivic, Word and Sentence Prosody inSerboCroatian, Cambridge, 1986.

            2. Meillet, Antoine Andre Vaillant, Grammaire de la Langue Serbo-Croate, Paris, 1969 .

            3. Partridge, Monica, Serbo-Croat Practical Grammar and Reader, Belgrade, 1972.

केळकर, अशोक रा.