आरेटस : (सु. ३१५ – सु. २४५ इ. स. पू.). एक ग्रीक ग्रंथकार. जन्म आशिया मायनरमधील सोलाई येथे. तो काही काळ अथेन्समध्ये राहिला. मॅसिडोनियाचा राजा अँटिगोनस गॉनटस याच्या दरबारी तो होता. फैनोमेना ह्या त्याच्या पद्यमय ग्रंथात त्याने विविध नक्षत्रांचे वर्णन केले असून त्यांच्या उदयास्तासंबंधी माहिती दिली आहे. ह्या ग्रंथात पौराणिक उल्लेख फार थोडे आहेत. हा ग्रंथ युडॉक्ससच्या ग्रंथावर आधारलेला आहे. सिसरोने तरुणपणी ह्या ग्रंथाचे लॅटिनमध्ये भाषांतर केले होते. ⇨ ल्यूक्रीशिअसच्या लेखनशैलीवर ह्या भाषांतराचा फार मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते.

हंबर्ट, जॉ. (इं.); पेठे, मो. व्यं. (म.)