बालभाषा : एखाद्या माणसाच्या भाषाव्यवहाराचा व्यक्तिगत विकास कसा होतो हे पाहिले, तर पहिला टप्पा म्हणजे बालभाषा हा ठरतो. लहान मूल आपल्या आयुष्यात भाषाव्यवहाराला ज्या भाषेने सुरुवात करते, ती त्याची प्रारंभिक बोली किंवा जन्मभाषा म्हणता येईल. ती शिकण्याअगोदर त्याला कोणतीच भाषा येत नसते. ती शिकण्यासाठी त्याला पाच-सहा वर्षे लागतात. ह्या शिकाऊ अवस्थेतील भाषा म्हणजे बालभाषा. ती बदलत बदलत अखेर चारचौघांच्या भाषेसारखी होते. प्रत्येक लहान मुलाची बालभाषा थोडी थोडी वेगळी ठरते, सुरुवातीला तर ती पुष्कळदा फक्त परिचितांनाच समजू शकते. ह्या मुदतीत आणि क्वचित नंतरही मोठी माणसे त्या मुलाशी बोलताना बालभाषेची नक्कल करण्याचा कधी कधी प्रयत्न करतात. ही ठराविक पद्धतीने केलेली नक्कल म्हणजे लालनभाषा वा शिशुभाषा. उदा., संत नामदेवांची ‘कुतन्या थमाल ले थमाल आपुल्या गाई’ सारखी रचना मराठी लालनभाषेत आहे.

लहान मुलांच्या भाषासंपादनाच्या प्रक्रियेसंबंधी काही लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत व त्यांचा पुरता उलगडा होणे जरूर आहे, तो अजून व्हावा तसा झालेला नाही : (१) ही प्रकिया साधारणपणे पहिल्या वर्षाच्या शेवटी सुरू होऊन सहाव्या-सातव्या वर्षी जवळजवळ पुरी होते आणि त्या मुलाला मोठ्या माणसाइतकेच भाषाप्रभुत्व लाभते. नंतर भाषिक विकास होतो तो म्हणजे शब्दसंग्रहात भर पडते, तसेच भाषेचे विविध विशेष उपयोग-उदा., पूजा करणे, कविता रचणे, साक्ष देणे इ.-माहीत होतात. (२) जर हे मूल बहिरे-मुके नसेल किंवा कमालीचे मतिमंद नसेल, तर ही क्रिया विनायास होते. भाषा कुणी शिकवावी लागत नाही. मुलावर भोवतालच्या ज्या भाषेचे संस्कार होतील ती भाषा ते चटकन उचलते, संस्कार खंडित झाले, तर ते ती विसरतेही. त्यामुळे सीमाप्रदेशातील मुले कधी दोन भाषा लहान वयात बोलू लागतात. भाषा लिहिणे हे मात्र मुद्दाम शिकवावे लागते. (३) जर ही मुदत टळल्यानंतर माणूस नवी भाषा शिकला, तर त्याला तिच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळणे सहज शक्य नसते. बहुधा अगोदर शिकलेल्या भाषेचा ही नवी भाषा शिकताना व्यत्यय येतो. उदा., मराठीची वऱ्हाडी बोली ज्याची जन्मभाषा आहे, अशा माणसाने प्रमाण-मराठी भाषा वऱ्हाडी वळणाने बोलणे किंवा मराठी भाषिक माणसाने मराठी वळणाचे हिंदी किंवा इंग्लिश बोलणे. (४) जन्मभाषेचे संपादन हा मुलाच्या एकंदर मानसिक-बौद्धिक वाढीचा भाग दिसतो. कोणती भाषा त्याची जन्मभाषा ठरणार, हे मात्र भोवतालचे संस्कार निश्चित करतात.

मूल भाषा शिकते म्हणजे काय काय शिकते ?-तर सुरुवातीला ते भाषा ऐकायला आणि ऐकून समजून घ्यायला लागते, पाठोपाठच ऐकलेले स्वत: बोलायला आणि समजून बोलायला शिकते, मुख्य म्हणजे अखेर ह्या पोपटपंचीच्या पुढे जाऊन पूर्वी न ऐकलेला मजकूर समजून घ्यायला आणि स्वत: बोलायला शिकते. श्रवण, अर्थग्रहण, उच्चारण, अर्थप्रेषण यांत मूल क्रमाक्रमाने नैपुण्य मिळवते ते आई बाप, भावंडे, शेजारी, सोबती यांचा आदर्श ठेवून आणि त्यांच्या सद्भावावर विसंबून. त्यांच्याकडून होणाऱ्या कौतुकामुळे त्याला हुरूप येतो.

ह्या प्रक्रियेच्या ढोबळ मानाने चार अवस्था मानता येतात : (१) पूर्वतयारी (सरासरी वयोमर्यादा-जन्मापासून ते नवव्या महिन्यापर्यंत) : कानावर येणाऱ्या आवाजांपैकी माणसाच्या बोलण्याची वेगळी दखल घेणे रडणे, हसणे, विविध-बहुधा एकाक्षरी-आवाज काढणे आई मुलाशी जे बोलत असते त्याचे संस्कार होणे-उदा., आवाज चढवून बोलल्यावर ओठ काढणे, चुचकारून बोलल्यावर उगी राहणे किंवा खुषी दाखवणे इत्यादी. (२) प्रारंभिक बालभाषा (वयोमर्यादा-तिसऱ्या वर्षाअखेर) : काही विशेष सोदाहरण सांगावयाचे तर एकेरी शब्दाची वाक्ये बोलणे (दुदू, पापा, हाय), नंतर उद्देश्य-विधेय विभागणी करणे (दुदू हाय, पापा कोको), नंतर पूर्वी न ऐकलेली नवी वाक्ये रचणे (पापा हाय असे नव्याने म्हणणे), उच्चारातील ढोबळपणा (उदा., ‘देदे’-‘दीदी’ यांत फरक न करणे), व बोबडेपणा (क, च, ट या वर्गांबद्दल त वर्ग वापरणे) कमी होत जाणे सामान्य नामे सुरूवातीला विशेष नामासारखी वापरणे, नंतर वस्तू समोर आल्यावर सामान्य अर्थाने उपयोग करणे, अखेर वस्तू समोर नसताना सामान्य नामाचा उपयोग करणे विधाने, आज्ञा, प्रश्न यांत हळूहळू फरक करणे या अवस्थेच्या शेवटी सलग गोष्ट ऐकायची आवड उत्पन्न होते. (३) प्रौढभाषेची पूर्वतयारी (वयोमर्यादा-पाचव्या वर्षाअखेर) : उच्चार जवळजवळ प्रौढासारखे करणे, वाक्याला वाक्य जोडू लागणे वस्तू आणि आकडे मोजणे गोष्ट किंवा निरोप सांगणे, गाणी पाठ म्हणणे भाषेशी खेळणे-उदा., शाब्दिक विनोद, अनुप्रास इ.-नवीन शब्दाचा अर्थ विचारणे व सांगणे, तसेच ऐकलेला नवा शब्द तयार करून वापरणे-उदा., विशेषणाला-‘पणा’ लावून नाम बनवणे. (४) बालभाषेकडून प्रौढभाषेकडे संक्रमण (वयोमर्यादा आठव्या–नवव्या वर्षापर्यंत) : वाक्यात वाक्य गुंतवून गुंतागुंतीची वाक्ये तयार करणे-उदा., ‘जर अमूक तर तमूक’ विनोद समजणे व करणे भाषेच्या द्वारा मैत्री जोडणे, भांडण करणे, चिडवणे घराबाहेरच्या जगात भाषा वापरणे-उदा., दुकानातून वस्तू आणणे, शाळेत नवी माहिती शिकणे इ. सत्यकथा आणि कल्पित कथा यांतील फरक ओळखणे, खरे बोलणे आणि खोटे बोलणे यांतील फरक लक्षात येणे इत्यादी. जर्नल ऑफ चाइल्ड लॅंग्वेज हे नितयकालिक डेव्हिड क्रिस्टल यांच्या संपादकत्वाखाली केंब्रिज विद्यापीठातर्फे १९७४ पासून प्रसिद्ध केले जाते. दरवर्षी त्याचे तीन अंक निघतात.

संदर्भ : 1. McNeill, David, The Acquisition of Language, New York, 1970. 2. Slobin, Dan I. Psycholinguistics, Glenview, III. 1971.

केळकर, अशोक रा.