सपीर, एडवर्ड : (२६ जानेवारी १८८४-४ फेबुवारी १९३९). अमेरिकन भाषावैज्ञानिक, मानवसंस्कृतिवैज्ञानिक तसेच अमेरिकन इंडियन भाषा व संस्कृती यांचे अभ्यासक. त्यांचा जन्म लौअनबर्ग, जर्मनी ( सध्याचे लेबोर्क, पोलंड ) येथे झाला. त्यांचे वडील यहुदी राबी ( धर्मोपदेशक ) होते. ते १८८९ मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क येथे स्थायिक झाले. सपीर यांनी कोलंबिया विदयापीठातून पदवी (१९०४) घेऊन मानवशास्त्र आणि भाषा-शास्त्र या विषयांत पीएच्.डी. (१९०९) मिळवली. त्यानंतर कॅनडामधील ‘ नॅचरल हिस्टरी म्यूझिअम ’ येथे संशोधक (१९१०-२५), शिकागो (१९२५-३१) व येल (१९३१-३७) या विदयापीठांत मानवशास्त्राचे प्राध्यापक ही पदे त्यांनी भूषविली. ⇨ फँट्स बोअस ह्या भाषा-वैज्ञानिक -मानवशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी केली. तेव्हा भाषा आणि संस्कृती यांचा अविभाज्य संबंध सपीर यांच्या विचारांत कायम समोर राहिला. त्यांना कविता आणि संगीतकृती रचण्याचाही नाद होता. लँग्वेज अन इंट्रोडक्शन टु द स्टडी ऑफ स्पीच (१९२१) हे त्यांचे सामान्य वाचकांसाठी म्हणून लिहिलेले पुस्तक वाचकांना अजूनही मुग्ध करते. एकोणिसाव्या शतकापासून दुर्लक्षित राहिलेल्या, भाषांचे आकृतिमूलक वर्गीकरण ह्या विषयाची त्यांनी अगदी नव्याने केलेली मांडणी आणि साहित्याच्या भाषिक अभ्यासाचे सूतोवाच या पुस्तकात आढळते. पण सपीर यांचे विचारधन त्यांच्या मृत्यूनंतर डेव्हिड मँडेलबाउम यांनी संपादिलेल्या सिलेक्टेड रायटिंग्ज ऑफ एडवर्ड सपीर (१९४९) या पुस्तकात सापडते. आधुनिक भाषाविज्ञानामधल्या ‘ फोनीय ’ सारख्या महत्त्वाच्या कल्पना स्पष्ट करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, तसेच माणसाच्या अनुभवविश्वावर होणाऱ्या भाषेच्या दूरगामी परिणामांचाही त्यांनी शोध घेतला आहे. या परिणामांबद्दलचा उपागम सपीर आणि बेंजामिन व्हॉर्फ यांच्या नावाने प्रसिद्ध आहे ( ‘ द सपीर-व्हॉर्फ हायपॉथीसिस’ ). ⇨ लेनर्ड ब्लूमफील्ड (१८८७-१९४९) यांच्या अधिक गणिती, अधिक वर्तनवादी विचार-सरणीचा भाषाविज्ञानावरील पगडा कमी झाल्यावर, सपीर यांच्या अधिक काव्यात्म वृत्तीला जाणवलेल्या भाषारहस्यांचे महत्त्व विशेष जाणवते. किंबहुना ब्लूमफील्ड आणि सपीर यांच्या विचारपद्धती परस्परपूरक ठराव्यात, अशी स्थिती आहे.

केळकर, अशोक रा.

सपीर यांनी अमेरिकेतील तसेच कॅनडा, मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील विविध इंडियन जमातींच्या भाषांचा – विशेषत्वाने अपॅची व नव्हाहो लोकांच्या आथाबास्कन बोलीचा – अभ्यास करून भाषाशास्त्र दृष्टया त्यांचे सहा प्रमुख गटांत वर्गीकरण केले. भाषेचा संस्कृतीशी असलेला संबंध विविध शोधनिबंधांतून व लेखांव्दारे त्यांनी स्पष्ट केला. भाषाशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय मानवशास्त्र या दोन नवीन अभ्यासशाखांचा अंतर्भाव मानवशास्त्राच्या अभ्यासात करावा, असे त्यांनी सुचविले. त्यांपैकी पहिली अभ्यासशाखा विविध समान गटांतील भाषेच्या भूमिकेचे विश्लेषण करील व दुसरी अभ्यासशाखा संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व यांतील नाते तपासून घेईल, अशी त्यांची धारणा होती. यासाठी त्यांनी काही सूत्रबद्घ पद्धती सुचविल्या. त्यांनुसार कार्य केल्यास लिखित पुरावा उपलब्ध नसतानाही मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाची पुनर्रचना करता येईल, असे दिसते. आधुनिक मानवशास्त्रीय संस्कृतीच्या संक ल्पनेवर सपीर यांच्या भाषाशास्त्रीय संशोधनाचा मोठा प्रभाव आहे.

न्यू हेवन ( कनेक्टिकट ) येथे त्यांचे निधन झाले.

देशपांडे, सु. र.