केळकर, अशोक रामचंद्र : (२२ एप्रिल १९२९–   ). भाषावैज्ञानिक व साहित्यसमीक्षक. जन्म पुणे येथे. शिक्षण पुण्यातच. एम्.ए. झाल्यावर (१९५३) डेक्कन कॉलेजच्या भाषाविज्ञान शाखेत संशोधन अधिछात्र (१९५५-५६). कॉर्नेल विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी (१९५८). व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलचे कुतूहल यांमुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. स्टडीज इन हिंदी-उर्दू : इंट्रोडक्शन अँड वर्ड फोनॉलॉजी (१९६८) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. यांशिवाय भाषा, शिक्षण आणि साहित्य यांसंबंधीचे अनेक शोधनिबंध, लेख आणि परीक्षण इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये निरनिराळ्या भाषाविषयक प्रकल्पांना मार्गदर्शन करतात. सरकारी, विद्यापीठीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर भाषाविज्ञानविषयक अनेक समित्या व परिषदा यांत ते भाग घेतात. रॉकफेलर आणि लिली या प्रतिष्ठानांतर्फे अनुक्रमे भाषाविज्ञान (१९५६–५८) आणि तौलनिक साहित्य व समीक्षा (१९५८) यांच्या अभ्यासासाठी त्यांस छात्रवृत्त्या मिळाल्या होत्या.  

जाधव, रा. ग.