तिबेटो–ब्रह्मी भाषासमूह : भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या अतिशय विस्तीर्ण प्रदेशात विस्कळीतपणे पसरलेल्या अनेक भाषा आहेत. त्यांच्यातील भाषिक साम्यामुळे त्यांचा एक गट कल्पिलेला असून त्याला तिबेटो–ब्रह्मी भाषासमूह हे नाव आहे. हा गटही ⇨ सिनो–तिबेटी भाषांसमूहाची एक शाखा आहे.

या भाषा बोलणारे लोक अंदाजे दोन कोटी असून त्यातले जवळजवळ अर्धे ब्रह्मी व एक चतुर्थांश तिबेटी आहेत. या समूहातील तिबेटी व ब्रह्मी या दोनच भाषा समृद्ध व साहित्यिक दर्जाच्या आहेत.

या भाषांचे आजचे स्वरूप लक्षात घेतले तर असे दिसते, की त्यात दोन परस्परभिन्न प्रवाह आहेत. त्यातल्या तिबेटी, ब्रह्मी, लोलो, मोसो इ. काही भाषांनी पूर्वापार चालत आलेले एकावयवी रूप टिकवून धरले आहे. तर काचिन (सिङ्‌फो), नागा, बोडो व हिमालयाच्या प्रदेशातील बोलींत प्रत्यय व उपसर्ग लागून मूळ अवयवाची वाढ झालेली आहे.

वर्गीकरण : सिनो–तिबेटी भाषासमूहाच्या चिनी व तिबेटो–ब्रह्मी या दोन शाखा आहेत. तिबेटो–ब्रह्मी शाखेत तिबेटी, ब्रह्मी, गारो, बोडो, नागा, कुकी–चीन या व अजून नीट अभ्यासल्या न गेलेल्या अनेक बोलींचा समावेश होतो.

भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषासमूहांपैकी  तिबेटो–ब्रह्मी ही सर्वांत कमी म्हणजे शेकडा ०·७३ लोकांकडून बोलली जाते. तरीही या समूहातल्या भाषांची संख्या इतर कोणत्याही समुहापेक्षा अधिक, म्हणजे जवळजवळ १०० आहे.

भारतीय तिबेट–ब्रह्मीचे तीन गट पाहण्यात येतात : (१) हिमाचल प्रदेश, काश्मीर, लडाख यांतील तिबेटी बोली आणि नेफामधील ग्यारूङ्–मिश्मी बोली (२) आसाम, त्रिपुरा व मेघालय यांतील बोडो (३) मणिपूर आणि नागालँडमधील नागा कुकी–चीन. एकंदर भाषिक चित्र अतिशय गुंतागुंतीचे असले, तरी हे तीन गट आधारभूत मानून चालणे सोयीचे ठरेल.

लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिल्यास तिसऱ्या गटातील मणिपुरी पहिल्या क्रमांकाची भाषा ठरते. तिच्या भाषिकांची संख्या सात लाखांवर आहे. तिच्या खालोखाल दुसऱ्या गटातील बोडो (साडेतीन लाख भाषिक), गारो (तीन लाख भाषिक) आणि त्रिपुरी (तीन लाख भाषिक) व तिसऱ्या गटातील मिझो अथवा लुशाई (जवळजवळ अडीच लाख भाषिक) या भाषा येतात. पहिल्या गटातील नेपाळच्या प्रदेशात बोलली जाणारी नेवारी ही एक महत्त्वाची भाषा असून इ. स. चौदाव्या शतकापासून तिच्यात उत्तम साहित्यनिर्मिती होत आहे. मणिपुरीची साहित्यपरंपराही प्राचीन असून उत्तम दर्जाची आहे.

हे तिन्ही गट जवळजवळ तीनचार हजार वर्षांपासून भारतात स्थलांतरित होत असून ते ज्या तीन भिन्न मार्गांनी आले, त्याप्रमाणे त्यांचे गट पडले असावेत. यांपैकी एक गट तिबेटच्या मार्गाने, दुसरा ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाने आणि तिसरा ब्रह्मदेशातून आला असावा.

लेखन : या समूहातील बहुसंख्य भाषा लिपिबद्ध झालेल्या नाहीत. तिबेटीचे लिखित साहित्य सातव्या शतकापासून उपलब्ध आहे. ब्रह्मीचे अकराव्या शतकापासून सुरू होते. या दोन्ही भाषांनी वापरलेल्या लिपीचे मूळ भारतीय आहे. तू–यू–हुएन या तिबेटी जमातीच्या वर्चस्वाखाली अकराव्या व तेराव्या शतकांच्या दरम्यान कान्सू येथे पीत नदीवर सि–ह्यां हे साम्राज्य स्थापन झाले. त्याच्या समृद्ध साहित्यातील काही अवशेष शिल्लक असून ते चिनीच्या अनुकरणाने अकराव्या शतकात तयार केलेल्या लिपीत आहेत. चौदाव्या शतकात चिनीच्याच अनुकरणाने लोलोने एक चित्रलिपी बनविली होती. मोसोचीही अशीच एक लिपी आहे. परंतु ती मंत्रविद्येसाठीच वापरली जाते.


ध्वनीविचार : तिबेटो–ब्रह्मीचा तौलनिक अभ्यास अजून मर्यादितच आहे. त्यामुळे एकंदर समूहाच्या ध्वनिपद्धतीची वैशिष्ट्ये देणे कठीण आहे. हे विधान व्यंजने व स्वर या दोघांनाही लागू पडते.

मुळातील भाषेचे सूर लोलो, लिसू इ. भाषांनी टिकवून धरले आहेत. तिबेटो व ब्रह्मी या भाषांत सुरांची संख्या किमान झाली आहे, तर हिमालयातील प्रदेशात ते पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे त्यांना अनेकावयवी रचनेकडे वाटचाल करणे सोपे झाले आहे.

तिबेटो–ब्रह्मीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपसर्ग व प्रत्यय यांचा उपयोग करून नवे शब्द बनवणे. या साधनाच्या जोरावर नाम व क्रियापद यांची भिन्नभिन्न कार्ये करणारी भिन्नभिन्न रूपे बनवणे सोपे झाले आहे. या भाषासमूहात क्रियापद व नाम यांच्या प्रक्रियेत फारसा फरक नाही. क्रियावाचकाला विशिष्ट उपसर्ग जोडून नामवाचक बनवता येते.

वाक्यरचनेतील शब्दक्रम निश्चित असतो. विशेषण नामापूर्वी आणि क्रियापद वाक्याच्या शेवटी येते. या रचनेत कर्ता नाही, कारण क्रियापद नेहमी तटस्थ असते. कर्ता दाखवायचाच झाला, तर कर्तृवाचक शब्दाला साधनवाचक शब्दाची जोड देण्यात येते.

संदर्भ : Cohen, Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.

कालेलकर ना. गो.