आयमारा भाषासमूह: अमेरिकन इंडियन लोकांच्या भाषाकुलांपैकी एक भाषाकुल. दक्षिण अमेरिकेतील मुख्यत्वे पेरू, बोलिव्हिया ह्या देशांमध्ये ह्या समूहातील लुपाका, कोलाहुआयास चार्का ह्या बोली मिळून सु. ६ लक्ष लोक ह्या भाषासमूहातील भाषा बोलतात. उत्तरेकडून केचुआ बोली बोलणाऱ्या इंका लोकांचे पंधराव्या शतकात आक्रमण होईपर्यंत आयमाराचा विस्तार आणि बोलींची संख्या अधिक असली पाहिजे. हल्ली आयमारा आणि केचुआ ह्या भाषासमूहांना एकाच केचुमारा भाषासमूहाची दोन उपकुले मानतात. लुपाकामध्ये वाङ् मयनिर्मिती झाली आहे. आयमारातून अल्पाका हे प्राणिनाम स्पॅनिशमार्फत इंग्लिशमध्ये आले आहे.

संदर्भ :  Voegelin, C.F. &amp Voegelin, F.M. “Languages of the World,” Anthropological                

          Linguistics, 7:7, Bloomington (Indiana), Oct. 1965.

केळकर, अशोक रा.