बोप, फ्रांट्स : (१४ सप्टेंबर १७९१ – २३ ऑक्टोबर १८६७). विख्यात जर्मन भाषाशास्त्रज्ञ. जन्म माइन्त्स येथे. १८१२ पासून प्रथम पॅरिस आणि नंतर लंडन येथे संस्कृतचा अभ्यास केला. १८२१-१८६४ पर्यंत बर्लिन येथे तो पौर्वात्य भाषा व भाषाशास्त्र ह्या विषयांचा प्राध्यापक होता. १८१९ साली त्याने महाभारतातले नलोपाख्यान लॅटिन भाषेत भाषांतर व टिप्पणी यांसह प्रसिद्ध केले, ते पुढे खुप प्रसिद्धी पावले. पाश्चात्य विद्यापीठांत संस्कृतच्या अभ्यासास ह्या आख्यानाने सुरुवात करण्याची पद्धत अनेक वर्षे चालू होती.

बोप ह्याने रास्क आणि ग्रिम ह्यांच्याबरोबर तौलनिक भाषाशास्त्राचा पाया घातला. ह्या विषयातील त्याची कामगिरी मुख्यतः त्याच्या पुढील दोन ग्रंथावर आधारलेली आहे : (१) Uber das Conjugations system der Sanskritsprache… (१८१६, इं. भा. अनॅलिटिकल कम्पॅरिझन ऑफ द संस्कृत, ग्रीक, लॅटिन अँड ट्यूटॉनिक लँग्वेजिस, १८२०). ह्या ग्रंथात त्याने संस्कृतच्या धातुरुपांचा इतर इंडोयूरोपियन भाषांच्या साहाय्याने तौलनिक अभ्यास प्रथमच केला. ह्या ग्रंथाच्या पहिल्या अर्ध्या भागात हा मुख्य विषय असून उरलेल्या भागात रामायण, महाभारत, वेद अशा ग्रंथातील वेच्यांची भाषांतरे आहेत. ह्या ग्रंथात बोप ह्याने वर्णविचार केलेला नाही. (२) त्याचा नावाजलेला दुसरा ग्रंथ म्हणजे : Vergleichende Grammatik des Sanskrit, Zend, Griechischen, Lateinischen, Litauischen, Altslawischen, Gothischen and Deutschen (पहिली आवृ., १८३३ – १८४९, ६ खंड दुसरी आवृ., १८५७ तिसरी आवृ., १८६८ इं. शी. कम्पॅरेटिव्ह ग्रामर ऑफ दी संस्कृत, झेंद, ग्रीक, लॅटिन, लिथुएनियन, गोथिक, जर्मन अँड स्लाव्होनिक लँग्वेजिस). पहिल्या ग्रंथात विचारात न घेतलेल्या आणखी काही इंडो-यूरोपियन भाषांचा अंतर्भाव ह्या ग्रंथात केला आहे. तसेच त्याने विषयाची व्याप्ती फक्त क्रियापदांच्या रुपापुरती मर्यादित न ठेवता व्याकरणाचा सर्वांगीण विचार केला आहे. पण अभ्यासकांच्या मते बोप ह्याचे, ध्वनिपरिवर्तने नियमबद्ध असतात, ती वाटेल तशी घडत नसतात, इकडे दुर्लक्ष झाले आहे.

हे दोन ग्रंथ लिहिण्यात बोप ह्याचा मुख्य उद्देश व्याकरणात रुपसिद्धीस लागणाऱ्या प्रत्ययांचे मूळ रुप शोधण्याचा होता. त्याच्या मते हे प्रत्यय एके काळी स्वतंत्र शब्द होते. प्रा. मेय्ये ह्याने म्हटले आहे की, ‘कोलंबसने जसे हिंदुस्थानला जाण्याचा मार्ग शोधून काढण्याचे ठरवून अमेरिकेचा शोध लावला, तसे बोप ह्याने प्रत्ययांचे मूळ रुप शोधून काढण्याचे ठरवून तौलनिक भाषाशास्त्राचा शोध लावला.’

बोप ह्याच्या दुसऱ्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर एडवर्ड ईस्टविक ह्याने १८६० व १८६२ साली केले आणि एम्. ब्रेआल ह्याने फ्रेंच भाषांतर १८६६-७२ ह्या काळात प्रसिद्ध केले. ह्या भाषांतरामुळे इंग्लंड व फ्रान्स येथे भाषांच्या तौलनिक अभ्यासास चालना मिळाली.

बोप ह्याने बर्लिन अकादमीच्या इतिवृत्तांत लेख लिहून केल्टिक ही इंडो-यूरोपियन भाषा-कुळातील असल्याचे (१८३८), आल्बेनिअन ही ग्रीक व लॅटिनला जवळची मानली जात असे, तशी ती नसल्याचे (१८५४) आणि बाल्टो-स्लाव्हिक व इंडो-इराणियन यांची भाषिक जवळीक असल्याचे दाखवून दिले. ह्यांखेरीज त्याने संस्कृत व्याकरण व संस्कृत-लॅटिन शब्दकोशही प्रसिद्ध केले आहेत. बर्लिन येथे त्याचे निधन झाले.  

मेहेंदळे, म. अ.