परशुराम लक्ष्मण वैद्यवैद्य, परशुराम लक्ष्मण : (२९ जून १८९१–२५ फेब्रुवारी १९७८). संस्कृत, पाली, प्राकृत भाषा – साहित्याचे थोर पंडित. जन्म सिद्धेश्वर ह्या कोकणातील एका खेड्यात. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे माधुकरी मागून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगली येथे गुरुगृही राहून संस्कृतचे विशेष अध्ययन केले. त्यानंतर नासिकला एका नामांकित वैद्यांच्या घरी राहून आयुर्वेदाचा अभ्यास केला. पुढे खाजगी रीत्या इंग्रजीचा अभ्यास करून नासिकच्याच एका माध्यमिक शाळेत इंग्रजी चौथीत प्रवेश मिळविला. त्यानंतर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते मॅट्रिक झाले (१९१२). संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील शिक्षण अर्धवट सोडून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी नोकरी धरली. पुढे रॅंग्लर परांजपे यांच्या मदतीने १९१८ साली ते बी. ए. झाले. ह्या परीक्षेत त्यांना पहिला वर्ग आणि भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. १९१९ साली पाली हा विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठाची एम्‌. ‍ए. ची परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तत्पूर्वीच प्रथम कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आणि नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांच्या प्राध्यापकीय जीवनाची सुरुवात झाली होती. १९२१ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यपद त्यांना देण्यात आले होते. पुढे भारत सरकारकडून प्राच्यविद्याभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळवून ते फ्रान्स आणि बेल्जियम येथे दोन वर्षे होते. पॅरिस विद्यापीठाची डी. लीट्‌. ही पदवी त्यांनी ह्या वास्तव्यात मिळविली (१९२३). भारतात परतल्यानंतर ते पुन्हा सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकवू लागले. १९२८ मध्ये त्यांना स्प्रिंगर संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. १९३० साली त्यांची पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बदली झाली. १९३२ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते वाडिया महाविद्यालयात प्राध्यापक झाले. तेथेच १९४७ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पाच वर्षे बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक व संस्कृत-पाली विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर चार वर्षे दरभंगा येथील मिथिला इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत रिसर्च ह्या संस्थेचे ते संचालक होते. १९६१ पासून पुढील बारा वर्षे पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले. येथेच हरिवंशाचे संपादनही त्यांनी केले.

वैद्य ह्यांनी आपल्या संशोधनाचे क्षेत्र निश्चित करून घेतले होते आणि ते म्हणजे संस्कृत, पाली आणि प्राकृत भाषांतील महत्त्वाच्या ग्रंथांचे चिकित्सक आणि पद्धतशीर संपादन करणे. त्यांनी संपादिलेल्या ग्रंथांपैकी काही असे : संस्कृत – महाभारतातले कर्णपर्व (१९५४), रामायणातील अयोध्याकांड व युद्धकांड (१९६२,१९७१), सार्थ वाग्भट, भाग १ व २ (१९१५), अष्टांगहृदय, ललितविस्तर (१९५८), दिव्यावदानम्‌ (१९५९), महायानसूत्रसंग्रह : भाग १ व २ (१९६१ १९६४), लंकावतारसूत्रम्‌ (१९६४) अर्धमागधी – जैन ग्रंथांपैकी सूयगडं (१९२१), उवासगदसाओ (१९३०), कुम्मापुत्रचरिय (१९३०), विवागसुयं (१९३२) पाली बौद्ध ग्रंथांपैकी धम्मपद (१९२१), बौद्धागमार्थसंग्रह (१९५६) अपभ्रंश ग्रंथांपैकी जसहरचरिउ (१९३१), महापुराण, ३ भाग (१९३७ १९४० १९४३), हरिवंशपुराण (१९४१). प्राकृत व्याकरणाशी संबंधित – वररुचीचा प्राकृत प्रकाश (१९२३), हेमचंद्रकृत प्राकृत व्याकरण (१९२७), त्रिविक्रमाचे प्राकृत व्याकरण. ह्यांखेरीज सहा भागांत महाभारत सूची (१९६७–७२) त्यांनी तयार केली. बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार (१९२७) हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तसेच ३५ प्रदीर्घ लेखही लिहिले.

वैद्य हे ऐहिक गोष्टींच्या बाबतीत उदासीन होते. ‘दरिद्री म्हणून जन्माला आलो, दरिद्री म्हणूनच मरावे’ असे त्यांचे स्वतःबाबतचे विचार होते. मिळालेला पैसा त्यांनी सत्कार्यास्तव देऊन टाकला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराला त्यांनी भरीव आर्थिक मदत केली होती. शिक्षणासाठी मदत मागणाऱ्या व्यक्तींनाही ते मुक्तहस्ते साहाय्य करीत. पुणे येथे ते निधन पावले.

इनामदार, वि. बा.