वासवदत्ता : अभिजात संस्कृत साहित्यातील एक प्रसिद्ध प्राचीन गद्यकथा. कर्ता सुबंधू. संस्कृतातील गद्यकथांची संख्या थोडी असली, तरी त्यांची परंपरा प्राचीन आहे. वासवदत्ता, ⇨दशकुमारचरित, ⇨हर्षचरित, ⇨कादंबरी, तिलकमंजरी, गद्यचिंतामणी आणि वीरनारायणचरित ह्या प्राचीन गद्यकथा होत. सुबंधूचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. त्याच्या चरित्राविषयीही फारशी माहिती मिळत नाही. तथापि ⇨बाणभट्टाने (सातवे शतक) हर्षचरिताच्या एका प्रास्ताविक श्लोकात वासवदत्तेचा गौरवोल्लेख केलेला आहे. बाणाने उल्लेखिलेला वासवदत्ता हा ग्रंथ सुबंधूकृत वासवदत्ताच होय, असे मानले जाते. वामनानेही (आठवे शतक) आपल्या काव्यालंकारात दिलेले एक उद्धरण सुबंधूच्या वासवदत्तेतील आहे. वाक्‌पतिराजानेही (आठवे शतक) आपल्या गउडवहोत सुबंधूचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार सुबंधूचा काळ सहावे किंवा सातवे शतक असावा.

संस्कृतमध्ये गद्यकाव्याचे ‘कथा’ आणि ‘आख्यायिका’ असे दोन प्रकार आहेत. वासवदत्तेचे कथानक पूर्णतः काल्पनिक असल्यामुळे वासवदत्ता ही गद्यकथा होय. तीवर नऊ टीका आहेत.

ही गद्यकथा थोडक्यात अशी : राजकुमार कन्दर्पकेतू याला एकदा स्वप्नात एक लावण्यवती राजकुमारी दिसते आणि तो तिच्या शोधार्थ निघतो. त्याच वेळी राजकुमारी वासवदत्तेलाही कन्दर्पकेतूचे स्वप्नात दर्शन होते. कन्दर्पकेतू विंध्य पर्वतावरील एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला असता पोपटांच्या एका जोडीच्या संवादातून त्याला वासवदत्तेचा शोध लागतो. एका पोपटाच्या साहाय्याने ह्या दोन प्रेमिकांचे मीलन होते. परंतु वासवदत्तेचे वडील, राजा श्रृंगारशेखर ह्यांनी तिचा विवाह पुष्पकेतुनामक एका विद्याधराधिपतीशी निश्चित केलेला असतो. त्यामुळे हे दोघे प्रेमिक जादूच्या घोड्यावर बसून विंध्य पर्वतावर पळून जातात. थकल्यामुळे एके ठिकाणी निजतात. प्रातःकाळी कन्दर्पकेतू झोपेत असतानाच अरण्यात भटकावयास गेलेल्या वासवदत्तेचा किरातांच्या टोळ्यांकडून पाठलाग होतो. ती संकटात सापडते. पण त्यांना गुंगारा देऊन ती एका आश्रमात येते. तेथे एका ऋषीच्या शापामुळे तिचे रूपांतर पाषाणमूर्तीत होते. तिचा शोध घेणाऱ्या कन्दर्पकेतूला तिची पाषाणमूर्ती दिसते आणि त्याच्या स्पर्शाने ती मूर्ती जिवंत होऊन पुन्हा ह्या दोन प्रेमिकांचे मीलन होते.

कृत्रिम, सामान्य कथानक, श्लेष, विरोधाभासांचा पदोपदी आविष्कार, व्यक्तिचित्रणकौशल्याचा अभाव, शाब्दिक कोट्यांची रसहीन आतषबाजी इ. दोघांमुळे सुबंधूच्या रचनेत पराकाष्ठेची क्लिष्टता आणि वाङ्‌मयदृष्ट्या रुचिहीनता आलेली आहे. ‘प्रत्यक्षरश्लेषमयविन्यासवैदग्ध्यनिधी’ असे सुबंधू स्वतःला म्हणवून घेतो. तथापि काव्यगुणांनी गद्य मंडित करायची जी वाङ्‌मयशैली संस्कृत साहित्यात निर्माण झाली तिचा सुबंधू कालदृष्ट्या अग्रेसर लेखक आहे. या शैलीत कथेला महत्त्व नसून वाङ्‌मयबंधाला आहे. कथानकापेक्षा वर्णनांचा फुलोरा, सरळसाध्या लेखनापेक्षा श्लेष विरोध उत्प्रेक्षादींनी नटलेली भाषा हे या शैलीचे रूप आहे. गद्यलेखनाची हीच समासबहुल, अलंकृत शैली पुढील गद्यकाव्यांत आढळते. अभिव्यक्तीचाच केवळ पसारा आधुनिक दृष्टीला रुचण्यासारखा नाही. पण बारकावे आणि गुंतागुंतीचे तपशील यांनी खच्चून भरलेल्या भारतीय मंदिराच्या प्राचीन शिल्पात दिसते तसे या शैलीचेही एक वैभव आहे.

संदर्भ : 1. Dasgupta, S. N. De, S. K. A History of Sanskrit Literature, Classical Period, Calcutta, 1962.

           2. Gray, L. H. Subandhu’s Vasavdatta – A Sanskrit Romance,  First Ed., Columbia University, 1912 Reprint Banarasidas, Motilal, Delhi, 1962.

 

मंगळूरकर, अरविंद