दंडी : (६०० ते ७५० च्या दरम्यान). भारतीय जीवनाचे एक आगळे दर्शन घडविणारा गद्यकथाकार, साहित्यशास्त्रज्ञ आणि वैदर्भी मार्गाने पदलालित्य खुलविणारा कवी. परंपरा आणि साहित्यसंदर्भ पाहता दंडीचा पणजा कौशिकगोत्री दामोदरस्वामी हा मूळचा उत्तर गुजरातेतील आनंदपूरचा. भारवीच्या साहाय्याने कांचीच्या पल्लववंशीय विष्णुवर्धनाच्या आश्रयाला आलेला. वीरदत्त व गौरी हे दंडीचे आई–वडिल. वडील बालपणी वारल्यामुळे आणि कांचीवर संकट आल्याने दंडीला गाव सोडून भटकावे लागले. या भ्रमणात त्याने उत्तर भारतातील अनेक स्थळे आणि जीवन पाहिले शास्त्राध्ययनही केले. सुरक्षितपणा लाभल्यावर कांचीत राजाश्रय मिळवून तो स्थायिक झाला आणि साहित्यिक गुणवत्तेने नावलौकिकास चढला. त्याच्या लेखनातील संदर्भ आणि त्याचे विशेष शब्दप्रयोग तो दाक्षिणात्य असल्याचे व राजदरबारांशी निकट संबंध असल्याचे सुचवितात.

 राजशेखराने दंडीच्या तीन प्रबंधांचा उल्लेख केला आहे त्यांतील काव्यादर्श आणि ⇨ दशकुमारचरित  हे दोन. तिसऱ्या प्रबंधासाठी अभ्यासकांनी सुचविलेली अनेक नावे संशोधनान्ती मागे पडली आहेत. गेल्या ३०–४० वर्षांत उपलब्ध झालेली अवन्तिसुंदरीकथा  दंडीचा तिसरा प्रबंध होय, असे दिसते. भोजाच्या शृंगारप्रकाशामध्ये द्विसंधानकाव्याचा उल्लेख आहे. ही त्याची चौथी साहित्यकृती.

 साहित्यशास्त्राज्ञ, गद्यकथालेखक आणि कवी ही दंडीची तीन रूपे संशयास्पद वाटून काही अभ्यासकांनी तीन भिन्न दंडीनामक लेखक मानले आहेत. काव्यादर्शाच्या रूपाने साहित्यतत्त्वे मांडणारा आचार्य दशकुमारचरितासारखी उथळ घटनांची आणि स्वैर वर्तनाची कथा लिहिणार नाही, असे सकृद्‌दर्शनी वाटते परंतु साहित्यतत्त्वे आणि साहित्यलेखन यांत भेद असू शकतो आणि एकाच लेखकाच्या वेगवेगळ्या वयातील साहित्यकृतींत विषय, भाषा, शैली या दृष्टींनी भिन्नता संभवते. तेव्हा वरील साहित्यकृतीचे कर्तृत्व विवाद्य ठरू नये.

द्विसंधानकाव्य भोजाच्या उद्धरणाखेरीज उपलब्ध नाही. उपलब्ध अवन्तिसुंदरीकथा अपूर्ण आहे. दशकुमारचरितात आठच कुमारांची चरित्रे आहेत आणि याची पूर्व आणि उत्तरपीठिका मागाहून अन्य लेखकांनी लिहिली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. अवन्तिसुंदरीकथा  आणि दशकुमारचरित  यांत विषयसाम्य आहेच. तेव्हा एक मत असे, की अवन्तिसुंदरीकथा ही दशकुमारचरित्रताची खरी पूर्वपीठिका. अवन्तिसुंदरीकथासागर या अलीकडे सापडलेल्या ग्रंथाने वेगळा विचार सुचतो. सारकर्त्याला मूळ कथा-ग्रंथ संपूर्ण उपलब्ध होता, यात शंका नाही. या तीन ग्रंथांच्या तुलनात्मक अभ्यासावरून दशकुमारचरित  ही दंडीची तरुण वयातील रचना दिसते. हाच कथाविषय उत्तर कालात त्याने विकसित रूपात आणि प्रगल्भ शैलीत पुन्हा मांडला. ही रचना म्हणजे अवन्तिसुंदरीकथा.

काव्यादर्श  कांचीच्या राजकुमाराला साहित्यशास्त्र शिकविण्यासाठी दंडीने रचला, असे म्हणतात. काव्यशास्त्राच्या इतिहासात, इ. स. सहाव्या–सातव्या शतकांतील भामह व दंडी यांचे ग्रंथ हेच (नाट्यशास्त्राखेरिज) आरंभीचे उपलब्ध साहित्य. काव्यादर्शाचे तीन (रंगाचार्यांच्या आणि मद्रासच्या आवृत्तीप्रमाणे दोषप्रकरण स्वतंत्र केल्यास चार) परिच्छेद (प्रकरणे) आहेत. यांत काव्याची व्याख्या, काव्यप्रकार, काव्यमार्ग, गुण–दोष, अलंकार, चित्रबंध आणि प्रहेलिका हे विषय चर्चिले आहेत. अलंकरण–तत्त्वाने साहित्यस्वरूप विशद करण्याची आरंभीची दृष्टी या ग्रंथात दिसते. मात्र दंडीचे ३५ अलंकारांचे–विशेषतः यमक, अनुप्रास, चित्रबंध यांचे–विस्तृत विवेचन भामहाच्या प्रमाणेच पुढील अलंकारचर्चेचा आधार ठरले आहे. साहित्यप्रकारांचे भाषा, गद्य-पद्य, रचनाबंध यांना अनुसरून केलेले भेद उपयुक्त आहेत. कथा व आख्यायिका यांत मूलभूत भेद नसल्याचे दंडीचे मत विचारप्रेरक आहे. दंडीचा महत्त्वाचा विचार काव्यमार्गासंबंधीचा आहे. त्याच्या वैदर्भ आणि गौड या काव्यमार्गांत केवळ प्रांतीय विशेषांची किंवा विशिष्ट लेखनसरणीची नोंद घेण्याची दृष्टी नाही. काव्यमार्गाचा संबंध पदावलीच्या गुणवत्तेशी आहे. अलंकार हे काव्याला शोभा आणणारे धर्म आहेत असे दंडी मानतो काव्यमार्गाने, विशेष गुणांची योजना आणि दोषांचा परिहार करून, लेखनास काव्यत्व येते असा हा विचार आहे. वामनाने हा विचार पुढे नेऊन रीति-तत्त्व मांडले आणि ते काव्यात्मा म्हणून ठरविले. हे तत्त्व आणि पुढे आनंदवर्धनाने घेतलेला संघटनादी कल्पनांचा परामर्श यांचा संबंध दंडीच्या काव्यमार्गाशी आहे. आरंभकाळातील लेखक असूनही साहित्यशास्त्रातील आलंकारिक विचारप्रणाली दंडी ‘आचार्य’ ठरला तो यामुळे.

संदर्भ : 1. Dasgupta, S. N. De, S. K. A History of Sanskrit Literature, Calcutta, 1962.

           2. Gupta, D. K. Meharchand Lachhmandas, A Critical Study of Dandin, Delhi, 1970.

           3. Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Delhi, 1961.

           ४. उपाध्याय, बलदेव, संस्कृत–सुकवि–समिक्षा, वाराणसी, १९६३.

          ५. व्यास, भोलाशंकर, संस्कृत– कविदर्शन, वाराणसी, १९६८.

भट, गो. के.