मागधी साहित्य : मागधी भाषेत स्वतंत्र साहित्य नाही. संस्कृत नाटकांतून काही ठिकाणी मागधीचा उपयोग केलेला आहे. नाटकांतील कोणकोणती पात्रे मागधी वापरत ह्याबद्दल संस्कृत अलंकारशास्त्रात व्याकरणकारांत मतभेद दिसून येतो. भरताच्या नाट्यशास्त्रानुसार अश्वरक्षक, अंतःपुरवासी आणि आपत्तीत सापडलेला नायक ही भाषा वापरतो. मार्कण्डेयाने आपल्या प्राकृतसर्वस्वात उद्‌धृत केलेल्या कोहलाच्या मताप्रमाणे ही भाषा वापरणारे राक्षस, भिक्षू, क्षपणक (जैन यती) आणि चेट (गडी, दास) इ. होत. मागधी ही पिशाचांची आणि नीच जातींची भाषा होय, असे दशरूपकात म्हटले आहे.

संस्कृत नाट्यवाङ्‌मयात ज्या पात्रांच्या तोंडी मागधी घातली आहे, अशा पात्रांपैकी काही अशी : शूद्रककृत मृच्छकटिकातील संवाहक शकाराचा दास स्थावरक वसंतसेनेचा नोकर कुंभीलक चारुदत्ताचा नोकर वर्धमानक भिक्षू आणि चारुदत्ताचा पुत्र रोहसेन. कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलात दोन प्रहरी (पहारेकरी), कोळी आणि शकुंतलेचा छोटा मुलगा सर्वदमन. विशाखदत्ताच्या मुद्राराक्षसात जैन साधू, दूत, तसेच चांडालवेषधारी सिद्धार्थक आणि समिद्धार्थक, भट्टनारायणाच्या वेणीसंहारातला राक्षस आणि त्याची बायको. पिशेलच्या म्हणण्यानुसार ललितविग्रहराज ह्या सोमदेवकृत नाटकात जी मागधी वापरलेली आहे, ती अधिक व्याकरणनिबद्ध अशी आहे.

तगारे, ग. वा.