अपंग : कल्याण व शिक्षण: शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना दुष्कर किंवा अशक्यप्राय झाले आहे, अशा व्यक्तींना ‘अपंग व्यक्ती’ म्हणतात. मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते. अपंगांमध्ये, आंधळे, मुके—बहिरे आणि हातापायाने लुळे असलेले किंवा हातपायच नसलेले पांगळे-थोटे आणि मनाने दुर्बल असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश होतो. ह्रदय, फुप्फुस, डोळे इ. महत्वाच्या अवयवांच्या चिरकारी व्याधींमुळे

अकार्यक्षम झालेले स्त्रीपुरुष व शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असणारी मुले यांचाही अपंग व्यक्तींत समावेश करण्यात येतो.

डॉ. हेन्री कीसलर यांच्या मतानुसार दुष्काळ, रोगराई, युद्ध इ. कारणांमुळे अपंगता प्राप्त झालेल्यांची संख्या जगातील एकंदर लोकसंख्येच्या पंचवीस टक्के आहे. दुसऱ्या महायुद्धापासून अपंगांच्या प्रश्नास असाधारण महत्व प्राप्त झाले. हेन्री व्हिकारडो यांनी १९५२ मध्ये अमेरिकेत ‘अंबिलिटीस इंर्पोरेटेड’ नावाची अपंगांच्या पुनर्वसनासाठी एक संस्था काढली. भारतात १९५७ मध्ये श्रीमती फातिमा इस्माईल यांनी मुंबईत एक संस्था स्थापून भारतातील अपंगांच्या पुनर्वसनाच्या समस्येस तोंड देण्याच्या प्रयत्नास चालना दिली.

जन्मजात अपंग व जन्मानंतर झालेले अपंग, असे अपंगाचे दोन मूलभूत प्रकार आहेत. अपंगांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. निरनिराळ्या साधनांचा वापर करून पूर्णत: स्वावलंबी होण्यासारखे, केवळ संरक्षित वातावरणात कार्य करू शकणारे आणि अर्थोत्पादनास अयोग्य, असे अपंगांचे तीन वर्ग आहेत.

जन्मास किंवा बालपणात आलेली अपंगता व प्रौढपणी प्राप्त झालेली अपंगता यांमध्ये फरक असा, की पहिल्या प्रकारात पुनर्वसनाची आवश्यकता असली तरी निकड नसते कारण अर्थोत्पादन करू लागण्यास त्यांना अवधी असतो. दुसऱ्या प्रकारात अर्थोत्पादनात एकाएकी खंड पडल्याने पुनर्वसन शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक असते. हे न झाल्यास परावलंबित्व उद्भवण्याची शक्यता असेत. एकाहून अधिक उणिवा असल्याची ही पुनर्वसना प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो. लहान मुलात अपंगतेचे अस्तित्व ओळखणे अवघड असले तरी महत्त्वाचे असते. अपंगता आहे असे निश्चित झाले, की मुलाची शारीरिक, मानसिक व भावनात्मक तपासणी करून अपंगतेची व्याप्ती ठरविली जाते व त्यानुसार कोणते उपचार करावे लागतील याचा अंदाज घेता येतो. मूल ज्या कुटुंबात असेल, त्या कुटुंबातील व्यक्तींची मनोभूमिका व आर्थिक स्थैर्य लक्षात घेणेही आवश्यक असते. मुलाला व त्याच्या कुटुंबीयाना वास्तव दृष्टीने वागणूक देणे महत्त्वाचे असते. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यास जास्तीत जास्त संधी देणे, हे त्याच्या पुनर्वसनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. तरीदेखील अशक्य गोष्टी साध्य होतील या भ्रमात त्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी राहणे अनिष्ट असते. पुस्तके, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट इत्यादींच्या साहाय्याने अपंग मुलांच्या पालकांना शिक्षण देऊन अपंग मुलाचे संगोपन कसे करावे याविषयी योग्य ती माहिती देण्यात येते. सर्वसाधारण शिक्षणपद्धती व खास शिक्षणपद्धती यांचा वापर करून मुलाची अपंगता जास्तीत जास्त दूर करून त्यास स्वालंबन साध्य झाले,  तरच पुर्वसनाचा मूलभूत उद्देश साध्य होतो.

एके काळी असे मानले जात हेते, की वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीबरोबर जगातील रोगराई आणि अपंगता नष्ट होईल. परंतु आज तरी अशी स्थिती आहे, की मृत्युमान कमी झाले असले, तरी अपंगता त्या प्रमाणात कमी झालेली नाही. इथेच असमर्थता आणि अपंगता यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा. असमर्थता ही प्राथमिक स्वरूपाची असते आणि तिच्यामधून अपंगता निर्माण होते. डोळे नसल्यामुळे योणारी असमर्थता फक्त डोळ्यांच्या जगातच अपंगता ठरते. एखादा अंध मुलगा सभोवतालच्या वातावरणात कुतूहलाचा आणि दयेचा विषय होतो. परंतु अंधशाळेमध्ये त्या मुलाविषयी कोणालाच कृत्रिम सहानुभूती अथवा दया नसते. त्यामुळे अंधशाळेमध्ये हा मुलगा मनाने सुरक्षित असतो. अर्थातच त्याचे हे समाधान खोटे आणि कृत्रिम असते. या अंध मुलाला केव्हा ना केंव्हा तरी डोळसांच्या समाजात परत जावयाचे आहे, हीच दृष्टी योग्य आणि शास्त्रीय आहे. सारांश, अपंगता आणि अपंगांचे पुनर्वसन हे प्रश्न सामाजिक आहेत.

अपंग मुलाबाबतचा दृष्टिकोन त्याचे जीवन घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे अगत्याचे आहे. परंतु त्याआधी शरीरचना आणि मनोरचना ह्यांचा अपंगतेच्या संदर्भात परस्परांशी काय संबंध आहे हे पाहणे आवश्यक आहे. काही विशिष्ट तऱ्हेच्या शरीररचनेमुळे वागण्यामध्ये काही वेगळेपणा येण्याचा संभव आहे किंवा काय, याचा विचार पूर्वीपासून केला जात आहे. ह्या शास्त्राला ‘सोमॅटोसायकॉलॉजी’ असे म्हणतात. याबाबत स्थूल मानाने काही सूत्रे अशी सांगता येतील : (१) अपंग मुलाच्या शरीररचनेचा मनोरचनेशी प्रत्यक्षत: संबंध नसतो. केवळ अपंग आहे म्हणून मुलाच्या मनात विकृती आहे असे किंवा शरीराने तो चांगला आहे म्हणून त्याचा मनोविकासही उत्तम झाला आहे असे मानणे चुकीचे होईल. (२) मनुष्य म्हणजे केवळ हाडामांसाचा पुतळा नाही त्याच्या शरीरात अनेक अंत:स्रावी ग्रंथी कार्य करीत असतात. या ग्रंथींतील स्रावांचा माणसाच्या शरीरातील वाढीप्रमाणे वर्तुणुकीवरही परिणाम होतो. (३) माणसाची वाढ आणि वर्तणूक ही केवळ परस्परांवर अवलंबून नसून सामाजिक घटनांचा दोहोंवरही परिणाम होत असतो.

अपंगांचे शिक्षण :अपंगतेच्या विविध प्रकारांमुळे अपंगांना शिकविणाऱ्‍या शिक्षकांच्या, शैक्षणिक प्रशासकांच्या आणि नियोजकां- च्या पुढे नवे नवे प्रश्न उभे राहत आहेत. अपंगतेमुळे व शाळेच्या वातावरणाशी समरस न झाल्यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक गरजांनुसार शिक्षणाचेच वळण बदलावे लागते काही वेळा मुलाची अपंगता तीव्र असल्यामुळे त्याला शाळेत येता येत नाही, अशा वेळी त्यास घरीच शिकवावे लागते. काही मुलांना त्यांच्या दुर्बलतेनुसार विशेष वैद्यकीय आणि शैक्षणिक उपचार करावे लागतात. काही अपंग मुले सामान्य शाळेच्या चौकटीत बसत नाहीत, म्हणून त्यांच्याकरिता वेगळ्या शाळा काढव्या लागतात. अंपंगांच्या शिक्षणाचे हे सारे प्रश्न अभ्यासून त्यांच्या शैक्षणिक प्रमेयांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न अलीकडे होत आहे. शिक्षकांची श्रेणी, शालेय व्यवस्था आणि शैक्षणिक नियोजन अशा साकल्यात्मक दृष्टिकोनातून अपंगांचे शिक्षण वा पुनर्शिक्षण यांचा विचार करावयास हवा, अशी जाणीव निर्माण होऊ लागली आहे.

गेल्या शतकात शिक्षणविषयक तत्त्वज्ञानात सर्वांत मोठा बदल मुलांविषयींच्या दृष्टिकोनात झाला आहे. एके काळी सामूहिक शिक्षण हा परवलीचा शब्द होता आता प्रत्येक मुलाचे वैयक्तिक विकसन हा शिक्षणपद्धतीचा पाया मानला गेला आहे. प्रत्येक मुलाचा विकास अनिर्बंधपणे व्हावा, प्रत्येक मुलाची बुद्धी, प्रवृत्ती आणि शैक्षणिक पात्रता ह्यांच्यानुसार त्याला जीवनविकासाची संधी मिळावी, असे मानले जाते. हा द्‍ृष्टिकोन अपंग मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत अधिकच महत्त्वाचा आहे.

अपंगतेचा प्रकार कोणताही असो, शिक्षणाचे तंत्र वा साधन कोणतेही असो, अपंगाचे शिक्षण हा एक स्वतंत्र शिक्षणसंप्रदाय आहे. जेथे शक्य असेल तेथे वैद्यकीय उपचार, शिक्षण व पुनर्वसन ह्यांच्या द्वारा अपंग अवयवांची अथवा इंद्रियांची शक्ती पुन्हा वाढीला लावली पाहिजे. ते शक्य नसेल, तर त्या शक्तीची जागा भरून काढण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. हे शिक्षण मुलांच्या गरजेनुसार आणि अशा मानसशास्त्रीय पद्धतीने दिले गेले पाहिजे, की मुलाच्या मनातील सारे गंड आणि विकृती निघून जाव्यात. मुलाला समाजात पुन्हा अर्थार्जन करणारा स्वावलंबी घटक म्हणून परत जाता यावे, ह्यासाठी शैक्षणिक द्‍ृष्ट्या करण्यात आलेले प्रयत्न जरी संख्येने थोडे असले, तरी सामाजिक प्रतीक म्हणून त्यांना महत्त्व आहे.

प्रत्येक अपंग मुलाची रोगमुक्त, स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्याची  इच्छा असते. अपंग मुलांची हळुवार देखरेख, शारीरिक स्वास्थ, मनोरंजन, सुंदर वातावरण सारे एकत्र केले, तरी अशा मानसिक स्वातंत्र्याची सर त्यांना येणार नाही. अपंगतेमुळे येणारे वैफल्य, निराशा, आलस्य ह्यांच्या जखडबंदीतून अपंग मुलांची मुक्तता करण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते. अनुभव हा एक शिक्षक असतोच, तथापि मुलाची अनुभव घेण्याची तयारी आणि त्यासाठी शिक्षकाने उपलब्ध करून दिलेली संधी ह्यांचा मेळ बसावा लागतो. शिक्षक मुलासाठी अनुभवांचे प्रचंड विश्व उभे करू शकतो. हे विश्व उभे करण्यासाठी वेगवेगळे मनोरंजक, आकर्षक आणि कल्पक खेळ, शिक्षणसाधने, नाट्य, हस्तकला, वनविहार इत्यादींचा उपयोग शिक्षक करतो. ह्या छोट्याछोट्या अनुभवांतून मुलाच्या मनातील पारतंत्र्य आणि परावलंबन नाहीसे होते आणि मूल स्वतंत्र- पणे व आत्मविश्वासाने जीवन जगू शकते.

अपंग मुलांचा अभ्यासक्रम ठरविताना, त्यांना काय शिकवावे हा प्रश्न उभा राहण्याचे कारण नाही. समाजातील इतर सर्व मुलांना जे ज्ञान, जे शिक्षण व जे अनुभव आवश्यक आहेत, तेच अपंगांना दिले गेले पाहिजेत. फरक होईल तो केवळ देण्याच्या पद्धतीमध्ये व साधनांमध्ये. अशा शिक्षणामुळे पुढे योग्य संधी मिळाल्यावर ही मुले इतरांसारखीच यशस्वी होतात, हे शास्त्रीय द्‍ृष्ट्या सिद्धही झाले आहे.

अंधत्व :जागतिक आरोग्य-संघटनेच्या १९५३ च्या पाहणीत साडेसहा कोटी लोक अंधत्वामुळे अपंग असलेले आढळले. जगातील कित्येक अविकासित देशांतील नोंदीमधील उणिवा लक्षात घेता ही संख्या चौदा कोटी इतकी असावी, असा अंदाज आहे. मध्यपूर्व व अतिपूर्व देशांत अंधांची संख्या सर्वांत जास्त आहे.

सर्वमान्य अशी अंधत्वाची व्याख्या अजूनही निश्चित नसल्यामुळे अंधांची नक्की संख्या किती ह्याचा अंदाज करणे कठीण आहे. संपूर्ण अंध व्यक्ती व सर्वसाधारण द‍ृष्टीच्या एकदंशांश इतकीच द्‍ृष्टी असलेल्या व्यक्ती यांची अंध व्यक्तींत गणना करण्यात येते. डोळ्यात फूल पडणे, तसेच डोळ्यातील तंत्रिका, द्‍ृक्पटल, कनीनिका या भागांच्या विकारांमुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींची संख्या विकसित देशांत अधिक आढळते. अविकसित देशांत मुख्यतः देवी, खुपऱ्‍या व स्वच्छमंडलाची मृदुता या विकारांमुळे अंधत्व प्राप्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.

अंध-शिक्षण : समकालीन जीवनातील विविध प्रवाहांत अंध मुलांना सहभागी करणे, हे अंधांच्या शिक्षणातील महत्त्वाचे तत्त्व समजले जाते. कारण ह्या प्रवाहात मिसळण्याच्या सौख्याला अंध मुले पारखी झालेली असतात. डोळस मुलांचे शिक्षण व अंध मुलांचे शिक्षण ह्यांत फारसे भिन्नत्व नाही. परंतु शिक्षणात वापरण्यात येणारी साधने व पद्धती ह्यांत स्पष्टपणे भिन्नत्व दिसून येते.

अंधांच्या बाबतीत या शिक्षणसाधनांचा उपयोग करावा तितका थोडाच असतो. ब्रेल पद्धतीच्या द्वारा अंधांच्या शिक्षणाचे वेगळे तंत्र वाढत आहे. तथापि आपण द्‍ृष्टिच्या द्वारा इतक्या प्रचंड प्रमाणावर शिकत असतो, की द्‍ृष्टी नसलेल्या मुलांना तो अभाव भरून काढण्यासाठी स्पर्श, गंध, रूची व श्रवण ह्या तोकड्या माध्यामांच्या द्वारा शिकवावे लागते. त्यामुळे ह्या मुलांचे विश्व किती मर्यादित आहे हे कळून येते.


अनुभव-विश्व व त्याच्या मर्यादा :डोळस मुले जेव्हा प्रथम शाळेत दाखल होतात, त्यावेळी आपणाबरोबर एक मोठे अनुभवाचे विश्व ती घेऊन येतात. डोळस मूल आणि शिक्षक यांच्यामध्ये समान अनुभवाचे फार मोठे भांडवल असल्यामुळे शिक्षक व मुले यांच्यामध्ये मन- मोकळा संबंध प्रस्थापित होऊ शकतो. डोळस मुलाला आपल्या भोवतालच्या अनेक वस्तूंचे अनुभव नकळत येत असतात. त्यामुळे प्रत्येक सामान्यनाम उच्चारताच त्यापाठीमागच्या साऱ्‍या आठवणी आणि अनुभव जागे होऊन मुलाच्या मनश्चक्षूंपुढे एक प्रतीक उभे राहते. घर म्हटल्याबरोबरच केवळ घराचे जड रूप नव्हे तर त्यामागील सारे संबंध, सारी माया, सारे भावविश्व मुलाच्या मनात तरारून फुलते. ही प्रतिके, हे अनुभव आणि हे हाच भावविश्व मुलाच्या मनाचा गाभा आहे. आंधळ्या मुलांच्या बाबतीत ही प्रतीके पुष्कळदा अस्तित्वातच नसतात. असलीच तर ती धूसर आणि गढूळ असतात. अंधांच्या शिक्षणाची ही मोठीच समस्या असते. त्यामुळे अंध मुलांना त्यांच्या मर्यादित शक्तीच्या द्वारा का होईना, पण भोवताल- च्या जगाशी जास्तीत जास्त परिचय करण्याची संधी आणि नवीन नवीन अनुभव मिळण्याची शक्यता उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या मुलांच्या अनुभव-विश्वाचा विस्तार जितका करिता येईल, तितका केला पाहिजे.

भावनात्मक आविष्कार: बहुतेक अनुभवामागे भावना असतात आणि या भावनांच्या स्वरूपावर व तीव्रतेवर त्या त्या अनुभवाला स्मृतीत जागा मिळेल की नाही हे ठरते. प्रत्येक मुलाला भावजीवना- च्या काही प्रवृत्ती व प्रेरणा जन्मजात आलेल्या असतात. शिक्षण आणि संस्कार यांच्या द्वारा ह्या प्रवृत्तींना आकार येत असतो. अंध- पणाचा भावजीवनावर काय परिणाम होतो, हे निश्चितपणे अजून मोजता येत नाही. तथापि सर्वसाधारण मुलांमध्ये दिसणारे सर्व भावनाविष्कार अंध मुलांतही दिसतात. ह्या क्षेत्रातील तज्ञ

निरीक्षकांचा असा निष्कर्ष आहे, की अंधपणामुळे मुलाच्या भावनांचा आविष्कार अधिक उत्कट होत जातो.

अंध मुलांच्या शाळा वेगवेगळ्या असल्यामुळे तेथील शिक्षकांवर मोठीच जबाबदारी येऊन पडते. भोवतालच्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून डोळस शिक्षकांना भोवतालच्या जगातील विचार, अनुभव, आणि भावना अंध मुलांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात. विशेषत: अंध मुले वाढू लागली व कुमारवयात आली म्हणजे हा प्रश्न अधिकच तीव्र होत जातो.

सौंदर्यबुद्धीचा व क्रियाबुद्धीचा विकास : ह्या संदर्भात मुलांच्या सौंदर्यबुद्धीचा व क्रियाबुद्धीचा विचार करायला हवा. भावजीवनाची निरोगी वाढ होण्याकरिता सौंदर्य म्हणजे काय, मग ते चित्रातले असो, काव्यातले असो, शिल्पातले असो वा संगीतातले असो, हे समजावून घेण्याची पात्रता अंध मुलांमध्ये निर्माण केली गेली पाहिजे. दृष्टिहीनतेमुळे चित्रसौंदर्याला ही मुले पारखी असली तरी, शिल्प, साहित्य, संगीत वगैरे कलांद्वारा सौंदर्याचा आस्वाद घेणे त्यांना शक्य आहे.

विचार, शब्द आणि अनुभव : समोरच्या परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि तिला तोंड देण्यासाठी नियोजन करणे यासाठी शिक्षणाची खरी आवश्यकता आहे. अंधांना ज्ञानेंद्रियांद्वारा मिळणारे शिक्षण मर्यादित असल्यामुळे मनात निर्माण होणारी प्रतीके सोडली, तर संज्ञाग्रहण, संकल्पनीकरण (कन्सेप्ट फॉर्मेशन), सामान्यीकरण, सारग्रहण, अमूर्तीकरण आणि प्रकटीकरण ह्या बाबतीत अंध आणि डोळस मुले ह्यांत फारसा फरक आढळून येत नाही. अंधांच्या फिरण्यावर बंधन असले, तरी  त्यांच्या विचारप्रवाहावर कोठलेच बंधन नसते. विचार करताना अंध मुलांच्या मनापुढे कोणती प्रतीके उभी राहतात, कोणत्या कल्पनांचा ते वापर करतात किंवा विचारांचे वाहन म्हणून कोणती शब्दसृष्टी ते निर्माण करतात, हे पाहणे अर्थपूर्ण ठरते. त्यातील मानसशास्त्राचा भाग सोडला, तरी भाषा आणि भाषाशास्त्र शिकविण्याच्या दृष्टीने त्याला महत्त्व आहे. अंधांचे ज्ञान हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवापेक्षा शब्दांद्वारे मिळाल्याने अंधांची शब्दशक्ती समर्थ असते. अंध मुलांना प्रत्यक्ष क्रियेची, अनुभवांची जेवढी जास्तीत जास्त संधी देता येईल, तेवढे त्यांचे शिक्षण अधिक वास्तव होते. वेगवेगळ्या तऱ्हेची खेळणी, साधने, शिक्षणसाहित्य, सहली, प्राणिसंग्रहालये व वस्तुसंग्रहालये यांना भेटी, व्यायाम, ह्यांसारख्या प्रयत्नांतून मुलांचे क्रियाविश्व विकासित होत जाते. अंध आणि डोळस यांच्या एकत्र गटातून अंध मुले मागे पडू नयेत. म्हणून रोजच्या दैनंदिन जीवनातील अनेक क्रिया त्यांच्याकडून घोटून घ्याव्या लागतात. ह्यासाठी प्रयोगशाळेसारखे छोटेसे घरकुल व छोटेसे स्वयंपाकघर शाळेत निर्माण करावे लागते. तोंड धुण्यापासून तो व्यवस्थित जेवण्यापर्यंत दैनंदिन जीवनातील साऱ्‍या क्रिया अंध मुलांना यायलाच हव्यात. ह्यातूनच पुढे रेडिओ लावणे, शिवणयंत्र चालविणे, बसमधून जाणे, दुकानात जाऊन खरेदी करणे, पत्ते खेळणे वगैरे कामेही अंध मुले कौशल्याने करू शकतात.

शालेय अभ्यासक्रम : डोळस मुलाला प्रत्येक वस्तूचा आकार,रूप आणि रंगभेद दिसत असतो. अंध मुले रंगसौंदर्याला मुकलेली असतातच पण आकारसौंदर्याला पारखी झालेली असतात. हे सारे जीवनातील मूलभूत अनुभव आहेत आणि ते अंध मुलाला मिळावयाला हवेत. विशेषत: कुमारअवस्थेतील मुलांना असल्या अनुभवांची फार जरूरी असते व त्या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

माध्यमिक शिक्षण : माध्यमिक शिक्षण हा मुलांच्या शैक्षणिक जीवनाचा गाभा असतो म्हणून नऊ ते चौदा या वयातील मुलांचा अभ्यासक्रम आखताना खूपच काळजी घ्यावी लागते. मुलांना भाषा विषय शिकविताना केवळ पाठावर अवलंबून राहून चालत नाही. ह्याच वयात मुलांना हळूहळू वाङ्‌मयाभिरूची निर्माण होत असते. त्यांना काव्यवाचनाची गोडी लागते. दुर्दैवाने ह्या वयातील अंध मुलांना लागणारी पुस्तके अजूनही चांगल्या दर्जाची आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाहीत. या दृष्टीने बोलक्या पुस्तकांचा उपयोग अधिक व्हावयास पाहिजे. बोलकी पुस्तके म्हणजे पुस्तकाचे ध्वनि-मुद्रित रूपांतर.

भारतीय ब्रेल : भाषाविषयाच्या अभ्यासात भारतीय ब्रेल शिकणे व लिहिणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. स्पर्शपद्धतीवर आधारलेल्या या ठिपक्या-ठिपक्यांच्या लिपीतून अंध मुलांना जणू नवीन डोळेच मिळतात. ही लिपी लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. वेगवेगळे आकार, चढउतार किंवा कमीजास्त जाडी अंध मुलांना स्पर्शाने कळते. वाचताना मात्र ही लिपी नेहमीसारखी डावीकडून उजवीकडे वाचली जाते.स्पर्शपद्धतीवरच ब्रेल लिपी बसविलेली आहे. लूइस ब्रेल ह्या प्रख्यात फ्रेंच समाजसेवकाने ही पद्धत शोधून काढली. ही लिपी सहा उठावाच्या टिंबांवर बसविलेली आहे. ह्या लिपीत लिहावयाचे असल्यास जाड कागदावर भोके असणारी एक विशिष्ट पट्टी ठेवतात. ह्या पट्टीचा हेतू अक्षरे सरळ आणि योग्य जागी उठावी हा असतो. नंतर एका अणुकुचीदार लोखंडी पेन्सिलीने अक्षरांची टिंबे टोचतात. लिहून झाले की कागद उलटतात. उलट्या कागदावर उठावाची टिंबे उठलेली असतात. त्यावर हात फिरवताच अक्षर कोणते हे कळते. लिपी मराठीत व गुजरातीत आणण्याच्या बाबतीत कै. नीलकंठराय छत्रपती ह्यांनी फार मोठे परिश्रम घेतले. त्यांचे बंधू श्री. हरिप्रसाद छत्रपती ह्यांनी अनेक पुस्तिका प्रसिद्ध करून ह्याविषयी मोठी जागृती केली. यूनेस्कोच्या साहाय्याने व बऱ्याच संशोधनानंतर आता सर्वमान्य अशी भारतीय ब्रेल लिपी तयार झाली आहे. याशिवाय अंध मुलांना खेळण्यासाठी कोपऱ्यात उठावाने अक्षरे उमटवून केलेले पत्ते, उठावाची घड्याळे, उठावाचे नकाशे वगैरे शिक्षणसाहित्यही अलीकडे उपलब्ध झाले आहे.

कला, हस्तकला व उपयोग :चौदा ते सोळा वर्षांची मुले आणि त्यानंतरच्या युवावस्थेतील मुलांचा गट यांमध्ये सर्वांत महत्त्वा- चा प्रश्न व्यवसायशिक्षणाचा असतो. आजवर अंध मुलांना संगीत, वाद्यांची दुरुस्ती, टंकलेखन, लघुलेखन, वेतकाम, खुर्च्या भरणे, ब्रश करणे, खडू करणे, चर्मकला, विणकाम, भरतकाम इ. उद्योगांत गुंतविण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येत असे. परंतु नवीन यंत्रप्रधान संस्कृतीमध्ये अंधांना करता येतील असे अनेक व्यवसाय उपलब्ध होत आहेत. टेलिफोन-ऑपरेटिंग, यंत्राचे छोटेछोटे भाग जुळविणे, मोटारीतील तारांची जोडणी करणे, छापखान्यात घड्या घालणे, मोजणे वगैरे अनेक कामे अंध माणसे करू शकतात.


अंध-शिक्षणाच्या दोन पद्धती : स्वतंत्र अंधशाळांमधून शिक्षणाच्या अधिक सोयी उपलब्ध झाल्या, तरी अंधांच्या सर्वांगीण विकासाला आवश्यक असलेली सामाजिकता त्या शिक्षणात येत नाही. त्यामुळे ते शिक्षण थोडेसे एकांगी बनण्याचा संभव असतो. संमिलित शिक्षण साधण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे नेहमीच्या शाळेतच अंध मुलांच्यासाठी एक वेगळा वर्ग काढावा. या वर्गावर एक तज्ञ वर्ग- शिक्षक नेमावा. ह्या अंध मुलांनी जास्तीत जास्त तास डोळस मुलांच्या बरोबरच अभ्यास करावा. परंतु ब्रेल-लेखन, गणित अशा विषयांकरिता त्यांचा वर्ग वेगळा भरवावा. ह्या पद्धतीमध्ये अंधांसाठी जो तज्ञ शिक्षक नेमला जाईल त्याच्यावर ह्या अंध मुलांच्यावर वैयक्तिक लक्ष ठेवण्याची, त्यांचा अभ्यास प्रगतिपर राखण्याची आणि इतर शिक्षकांनी शिकविलेले विषय आणि अंधांचे विषय ह्यांमध्ये एकसूत्रता आणण्याची मोठी जबाबदारी येऊन पडते. दुसऱ्‍या पद्धतीत, अंध मुले डोळस मुलांच्याप्रमाणेच नेहमीच्या वर्गात नोंदली जातात, बसतात आणि गरज पडेल त्या वेळी विशेष शिक्षकाकडे पाठविली जातात. अर्थात दोन्ही पद्धतींतील मूलतत्त्वे सारखीच आहेत. फक्त आपण कशाला महत्त्व द्यावयाचे, त्यावर पद्धतीची निवड अवलंबून असते.

फणसा येथील प्रयोग : एका नव्या प्रयोगाची इथेच दखल घेणे वाजवी ठरेल. अंधांच्या राष्ट्रीय संस्थेने टाटानिधीच्या मदतीने ‘अंधांचे शेतकी आणि ग्रामीण टाटा शिक्षण-केंद्र’ स्थापन केलेले आहे. मुंबईपासून १६० किमी. वर उंबरगाव तालुक्यात फणसा या गावी ९७·१२५ हेक्टर जमीन घेऊन हे केंद्र सुरू केले आहे. सर्व देशभराच्या अंध मुलांना येथे प्रवेश मिळतो. शेती, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, बागकाम वगैरे व्यवसाय अंधांना शिकवून त्यांना ग्रामीण विभागातच स्थायिक करावयाचे हा त्या केंद्राचा हेतू आहे.

पूरक शिक्षण : अंध मुलांच्या बाबतीत वैयक्तिक लक्ष ही एक मूलभूत गरज असल्यामुळे वर्गात अधिक मुले घेणे केव्हाही योग्य होणार नाही. या दृष्टिकोनातून पाहता वर्गांची अभ्यासातील गती व निपुणता तर कायम राहावी, पण शिक्षकावर तर ताण पडू नये, ह्या दृष्टीने अंध मुलांच्या वर्गात जास्तीत जास्त दहा-पंधरा मुले असावीत. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने तर अभ्यास कार्यक्रमांना फार महत्त्वाचे स्थान आहे.

शालेय शिक्षणाखेरीज अंधांचे व्यावसायिक पुनर्वसन करणेही महत्त्वाचे असते. रस्त्यांतून हिंडण्याफिरण्याची क्रिया काठी किंवा शिकवलेले कुत्रे यांच्या साहाय्याने करता येते. किंबहुना सफेद रंगाची काठी हे अंधत्वाचे प्रतीक बनले. अतिशय कमकुवत असलेल्या परंतु पूर्णपणे अंध नसलेल्या मुलांची दृष्टी वाचविण्यासाठी उपाययोजनेची आवश्यकता असते. उत्तम प्रकाशयोजना, वाचताना बसण्याची सुयोग्य पद्धत व मोठी अक्षरे यांच्या साहाय्याने हे शक्य होते.

वाचेची अपंगता : वाचाशक्तीचा विकास न होण्यास बहिरेपणा, मानसिक विकृती, भावनिक विकार, शारीरिक विकृती आणि प्रमस्तिष्क व निमस्तिष्क यांचे विकार ही प्रमुख कारणे होत. या व्यक्तींना सहानभूतीची फार गरज असते. बोलताना अडखळणे, तोतरे बोलणे, एखादाच शब्द बोलता न येणे व पूर्णपणे मुके असणे असे ह्या अपंगतेचे निरनिराळे प्रकार असतात. अशा व्यक्तींना उभे करून ओठांच्या हालचाली करणे, जीभ, तालू, ओठ यांच्या हाल- चालींनी शब्दोच्चार शिकविणे, हे शिक्षणाचे महत्वाचे अंग असते.

बहिरेपणा : जन्मजात बहिरेपणा, बोलता येऊ लागल्यावर आलेला बहिरेपणा, रोगामुळे उद्भवलेला बहिरेपणा व मर्यादित बहिरेपणा असे बहिरेपणाचे वर्गीकरण करतात.

 सोळाव्या शतकात जेरॉनीमो कार्डानो याने बहिऱ्‍यांना शिकविणे शक्य असते असे प्रथम दाखवून दिले. अठराव्या शतकात शार्ल मीशेल द ल एपे (१७१२–१७८९) यांनी खुणांच्या भाषेचा शोध लावला. झामूएल हाय्‌निके (१७२७–१७९०) यांनी ओष्ठवाचनाचा शोध लावला.

श्रवणशक्तीच्या जन्मजात कमतरतेमुळे जर बहिऱ्‍या व्यक्तीला बोलता येत नसले, तर त्या व्यक्तीस ‘मूक–बहिरा’ असे म्हणतात. कानामधील जन्मजात विकृती, व्हायरस-संसर्ग व मध्यकर्णातील जंतुसंसर्ग ह्या कारणांमुळे वयाच्या पहिल्या चार-पाच वर्षांत बहिरे- पणा येऊ शकतो. पाच वर्षांनंतर जंतुसंसर्ग, गोवर व प्रौढांत काना- तील अस्थिकाठिन्य यासारख्या विविध कारणांनी बहिरेपणा उद्भवतो.

 बहिऱ्‍या व्यक्तीच्या पुनर्वसनात ओष्ठवाचन व श्रवणसाहाय्यक यांचे महत्त्वाचे अंग असते. श्रवणहानी सत्तर डेसिबेलहून कमी असल्यास ओष्ठवाचनाने व्यक्तीचे शिक्षण होऊ शकते. श्रवणहानी सत्तर डेसिबेलहून अधिक असल्यास श्रवणसाहाय्यकांचा उपयोग होतो. आंतरकर्ण व मेंदूचे विकार यांच्यामुळे उद्भवलेल्या श्रवणहानीत श्रवणसाहाय्यकांचा उपयोग होत नाही. अशा व्यक्तीत ओष्ठवाचन व श्रवणानुसारी चिन्हे, रंगांचे संकेत व आकृत्या यांच्या साहाय्याने शिक्षण देण्यात येते.

तीनचार वर्षांखालील मुलांमध्ये श्रवणहानीचे निदान करणे अवघड असते. अशा मुलांत वाचाशक्तीचा विकास होत नाही. वाचा- शक्तीचा विकास झाल्यानंतर उद्भवलेल्या श्रवणहानीत निरनिराळ्या उपायांनी वाचाशक्ती परत जागृत करता येते.

संसर्गजन्य रोगाविरूद्ध प्रतिबंधक उपाय, फुटक्या कानावर, सर्दीवर व कानाच्या विकारांवर योग्य वेळी उपाय यांनी बहिरेपणा टाळण्यास मदत होते.

मूक–बहिऱ्‍या मुलांचे शिक्षण : मूक–बहिऱ्‍या मुलांचे प्रश्न मुख्यत: श्रवणहीनता आणि वाचाहीनता ह्यांतून निर्माण झालेले असतात. मूक-बहिऱ्‍या मुलांना समोर एखादी वस्तू दिसत असते, परंतु त्या वस्तूला काय म्हणावयाचे, तिचे वर्णन कसे कराव याचे आणि तिच्यासंबंधी ज्ञान कसे प्राप्त करावयाचे, हा त्यांच्या समोरील मोठा अवघड प्रश्न असतो. मूक-बहिऱ्‍या मुलांच्या मानसिक प्रतिक्रिया होत असाव्यात, परंतु त्यांना शब्दांचा आकार देता येत नसावा. बहिरेपणामुळे वाचा जाणे हीच काही मूक–बहिऱ्‍या मुलांच्या बाबतीत येणारी सर्वांत मोठी अपंगता नव्हे, त्याहून मोठी अपंगता त्यांच्या शिक्षणात आणि जीवनविकसनात निर्माण होत असते. मुलाच्या वयाच्या पहिल्या सहा वर्षांपर्यंतचे शिक्षण मुख्यत:श्रवणेंद्रियाद्वाराच होत असते. चांगले ऐकू शकणारे मूल वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत सुमारे दोन हजार शब्द समजू शकते. त्यांचा अर्थ त्याला चांगला कळतो आणि त्यांतील पुष्कळसे शब्द मूल वापरूही शकते. ह्या शिक्षणाला आणि विकासाला बहिरे मूल पारखे असते. निरनिराळ्या वस्तूंचे नावे बहिऱ्‍या मुलाला माहीत नसतात, इतकेच नव्हे, तर वस्तूंना नावे असू शकतात, हीच जाणीव त्याच्या मनात जागृत झालेली नसते. फक्त आपल्या शारीरिक गरजांपुरत्या खुणा, आविर्भाव अगर हावभाव ही मुले करू शकतात. भोवतालच्या समाजाशी संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांचा तो एक अत्यंत तोकडा प्रयत्न असतो. वस्तुबोधापेक्षा खरी अडचण उभी  राहते, ती कल्पना आणि भावना यांच्या प्रकटीकरणाची.


भाषाशक्तीची जागृती :मूक–बहिऱ्‍यांचे शिक्षण थोडेफार यशस्वी व्हावयाचे असेल, तर जितक्या लवकर त्यांच्या शिक्षणाला सुरूवात होईल तितके चांगले. या मुलांना शिक्षणासाठी वेगळ्या  व स्वतंत्र विद्यालयाची आवश्यकता असते. या विद्यालयातून प्रशिक्षित शिक्षक असणेही आवश्यक असते. मूक–बहिऱ्‍यांची शिक्षणपद्धती अवघड आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. कारण शिक्षणाचे जे माध्यम भाषा त्यालाच ही मुले पारखी झालेली असतात. प्रथम भाषाशक्ती जागृत व्हावयाची आणि नंतर त्याद्वारा शिक्षणाला सुरूवात करावयाची, अशी ही आडवळणी वाट आहे. अशा विद्यालयाचा पहिला हेतू मुलाला भाषा आणि तिचा उपयोग समजण्याची शक्ती देणे हा आहे. मुलाच्या अपंगतेच्या मर्यादेत बोलायला शिकविणे हा दुसरा हेतू आहे. ह्यासाठी हातांच्या खुणांची पद्धत फार पूर्वीपासून वापरली जात आहे. कित्येक शतके ह्या क्षेत्रात खुणांनी शिकविण्याच्या पद्धतीच प्रचलित होत्या. तथापि एखादे मूल केवळ खुणांची पद्धत शिकले असेल, तर भाषा समजणे आणि बालणे या क्रिया त्याला येणे शक्य नाही. उच्चाराचे शिक्षण देण्यासाठी व ध्वनी आणि अर्थ यांची सांगड श्रवणहीन मुलाच्या मनात निर्माण करण्याच्या दृष्टीने मौखिक पद्धत, म्हणजे तोंडाने भाषेचे प्रात्यक्षिक दाखविणे, ही अत्यंत उपयुक्त आहे. ध्वनी आणि अर्थाची सांगड घालणे हीच मूक–बहिऱ्यांच्या शिक्षणा- तील प्रधान समस्या असते.

मूक–बहिऱ्या मुलांचे शिक्षण किता प्रमाणात यशस्वी होईल, हे पुढील तीन घटकांवर अवलंबून आहे : (१) मुलाची जन्मजात बुद्धिमत्ता, (२) मुलाची शिकण्याची प्रवृत्ती आणि (३) सर्वांत महत्त्वा- चा घटक म्हणजे मूक–बहिऱ्या मुलामध्ये श्रवणशक्तीचा कितपत अंश शिल्लक आहे हा. जन्मजात बहिऱ्या असलेल्या मुलाचे उच्चारण संपूर्णपणे स्वाभाविक कधीच होत नाही. त्याचे बोलणे मोठ्या परिश्र- माचे, अस्पष्ट, दोषयुक्त आणि समजण्यास कठीण असे असते. मूक–बहिऱ्यांचे बोलणे कितीही दोषयुक्त असले, तरी त्याचा उपयोग शाळेत, बाजारात, घरी आणि कामाच्या ठिकाणी होतो. ज्या समाजात  मूक–बहिऱ्यांचे बोलणे ऐकण्याची सवय आहे, तेथे तर  हे बोलणे अधिकच उपयुक्त होते. संपूर्णपणे स्वाभाविक असे बोलणे मात्र ह्या मुलांना साधणे कठीण असते.

प्रत्येक शब्दापाठीमागचा संदर्भ, वाक्याची रचना आणि त्यातून होणारा अनुभवाचा किंवा विचाराचा आविष्कार मुलाला समजावयास हवा. ह्यासाठी मुलांना बोललेले, लिहिलेले समजले पाहिजे. आणि ओष्ठवाचनाच्या द्वारा का होईना, उच्चारित शब्दाचा वरवरचा नव्हे, तर खोल अर्थ उमगला पाहिजे. अर्थातच अंध मुलांच्या शिक्षणात जसा श्रवणाचा उपयोग केला जातो, तसाच मूक–बहिऱ्यांच्या शिक्षणात दृष्टीचा उपयोग केला जातो.

आधुनिक शिक्षणव्यवस्थेत मूक–बहिऱ्या मुलांना शिकविताना आधुनिक साधने आणि परंपरागत कला यांचा भरपूर उपयोग केला जातो. दृक्श्राव्य-साधने, चित्रे, रंगाची कार्डे, आकडे, आरसे, छायाचित्रे, नकाशे, प्रतिकृती, अंतरोपरिदर्श, छोटे चित्रपट वगैरे साधनेही वापरली जातात. मूक–बहिऱ्यांच्या शाळेतील पाठ हे विषयाच्या बाबतीतच नव्हे, तर साधनांच्या बाबतीतसुद्धा विविधतेने युक्त असावेत. ओष्ठवाचन पक्के करण्याच्या दृष्टीने शक्य तेथे श्रवणसाधनाच्या द्वारा लेखनवाचनाचे पाठ घ्यावेत.

श्रवणसाधनांच्या द्वारा मुलाची भाषा सुधारता येते. इतकेच नव्हे तर इतरांची बोलण्याची पद्धती लक्षात आल्यामुळे संवाद सुलभ होतो. ओष्ठवाचन कसे शिकवावे, भाषा कशी सुधारावी, वाचनलेखन कसे सुधारावे हे ह्या शिक्षणातील महत्त्वाचे असे प्रश्न असतात. ह्या संदर्भात उच्चारोपचाराचाही उल्लेख करायला हवा. उच्चारणातील दोष कोणते आहेत, हे बघून त्यानुसार करण्यात येणाऱ्या उपचारांना ‘उच्चारोपचार’ असे म्हणतात. अडखळत बोलणे, तोतरे बोलणे, एखाद्या अक्षरावर अडणे, ह्यांमुळे माणसाच्या शब्दप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तो माणूस ही विशिष्ट अक्षरे वा शब्द बोलावयाचा प्रयत्न करतो, परंतु त्यामुळे बोलणे हे सामाजिक दृष्टया त्याला दु:खदायक होते. त्याची अवहेलना होते. शब्दोच्चार आणि वाक्यरचना शिकविणे, बोलताना विराम घेणे या आणि इतर वैद्यकीय उच्चारोपचारांनी ह्या उच्चारदोषांवर विजय मिळविता येतो आणि काही प्रमाणात मूक—बहिऱ्याचा न्यूनगंड कमी करता येणे शक्य असते.

शारीरिक अपंगांचे शिक्षण : अपंग माणसाच्या शिक्षणाचा हेतू अपंगतेपासून मुक्तता हा आहे. परंतु पुष्कळदा अपंगांची शारीरिक स्थिती अशी विचित्र असते, की दुसऱ्या व्यक्तीची किंवा यांत्रिक साधनांची मदत अपरिहार्य ठरते. टेकण्यासाठी लागणारी काठी किंवा कुबड्या, चष्मा, दातांची कवळी ही अशा कृत्रिम साधनांची रोजच्या व्यवहारातील उदाहरणे आहेत. जेवण, स्वत:ची स्वच्छता, कपडे घालणे, दाढी, आंघोळ, भांग पाडणे, लिहिणे, टेलिफोन घेणे, टंकलेखन करणे, इस्त्री करणे, दुचाकीवरून फिरणे, स्वयंपाक करणे, झाडणे, कपडे धुणे, खिडकी लावणे, हात नसताना पत्ते खेळणे, वाचणे, पेटी वाजवणे, विणणे अशा नानाविविध क्रिया करण्याकरिता सु. तीनशे प्रकारची साधने आता उपलब्ध आहेत.

अपंग मुलांचे व्यक्तिमत्त्व आणि क्रीडा-प्रवृत्ती :शारीरिक अपंगतेतून मुक्तता मिळवणे हे जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा अपंगाच्या मनातील काल्पनिक अंपगतेतून त्याची मुक्तता करणे अधिक महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने पाहता अपंग मुलांचे मनसुद्धा अपंग असते, अशी एक समजूत आहे, ती सर्वस्वी खरी नाही. उलटपक्षी, अपंग मुलांच्या मनात ज्या प्रवृत्ती वाढत जातात, त्यांचे मूळ पुष्कळदा समाजाच्या अपंगांविषयीच्या दृष्टिकोनातच आढळून येते. मुलांची भावनिक आणि सामाजिक वाढ पूर्ण होण्यासाठी ह्या मुलांना खेळण्याची संधी मिळावयास हवी. खेळ हे मुलाच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकटीकरणाचे अत्यंत स्वाभाविक असे माध्यम आहे. परंतु  अपंग मुलांना पुष्कळ मर्यादित चौकटीतसुद्धा भरपूर खेळण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या क्रिडा-प्रवृत्तीचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही. लहान मूल घरकुल किंवा बाहुलाबाहुली खेळताना नाट्यमय रीतीने वेगवेगळ्या कल्पनाविश्वात असते. त्याला वास्तवतेची चौकट असते, पण बंधन नसते. अशा खेळांमधून नाट्यमय रीतीने मुलांचे भावविश्व फुलत जाते. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. मॅलिनी  क्लाईन ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, हा खेळ मुलाच्या मनाच्या विकासावर प्रकाश टाकणारा मोठा झरोका आहे. दुर्दैवाने अपंग मुलांना पुष्कळदा ही संधी नाकारली जाते आणि त्यामुळे अर्भकावस्था संपल्यानंतर ही मुले अकालीच मानसिक दृष्टीने प्रौढ बनतात.

अभ्यासक्रम : ह्या अपंग मुलांना लहानलहान, पण त्यांच्या जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा, अडचणी येत असतात. हात नसलेल्या मुलांना कुठलाही विषय सर्वसामान्य मुलांच्या इतकाच चांगला समजतो. तथापि परीक्षेत लिहिताना जरी कृत्रिम हात दिला, तरी सर्वसामान्य मुलाइतक्या वेगाने हा मुलगा लिहू शकत नाही तेव्हा त्या मुलाला आपली उत्तरे तोंडी सांगण्याची किंवा लेखनिका द्वारा लिहिण्याची, ध्वनिमुद्रित करण्याची परवानगी देता येईल किंवा काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मूलत: या मुलांना सोयीची परीक्षापद्धती कशी निर्माण करता येईल. ह्याचाही विचार करावयास हवा. इतर मुलांना शारीरिक शिक्षणाचे पाठ आपण देतो, त्याप्रमाणे हात किंवा पाय नसलेल्या मुलाला कोणत्या तऱ्हेचे शारीरिक शिक्षण द्यावे, ह्याचाही विचार होणे आवश्यक आहे.

पुनर्वसन : शारीरिक अपंग मुलांना शिक्षण देण्याच्या पुढील पद्धती सर्वत्र वापरल्या जातात : (१) नेहमीच्या वर्गात शिकविणे, फार तर आवश्यक ती साधने देणे, (२) नेहमीच्या शाळेत पण वेगळ्या वर्गात शिकविणे—गरज भासेल व शक्य असेल त्या वेळी सर्वांबरोबर एकत्र आणणे, (३) शारीरिक अपंगासाठीच त्या वेळी काढलेल्या केवळ दिवसा भरणाऱ्‍या वेगळ्या शाळांत शिकविणे, (४) शारीरिक अपंग मुलांसाठीच असलेल्या  व राहण्याची सक्ती असणाऱ्‍या विशेष शाळांत शिकविणे, (५) अपंगांच्या इतर गटांसाठी काढलेल्या इतर शाळांत पण वेगळ्या गटांत शिकविणे, (६) रुग्णालयातील वर्ग, (७) त्रिव्यवहारशिक्षण, (८) रेडिओ-टेलिव्हिजन यांच्या द्वारा शिकविणे आणि (९) खाजगी शिक्षक नेमून शिक्षणाची व्यवस्था करणे.


मानसिक अपंगता : मानसिक उणिवा मेंदूच्या विकारांमुळे किंवा मानसिक क्षोभामुळे उद्भवतात. कुमारवयात व प्रौढत्वात मानसिक क्षोभ उद्भवतात. विकारजन्य उणिवा कोणत्याही वयात उद्भवतात. विकारांचा प्रारंभ बालकाच्या जन्मापूर्वी, जन्मवेळी व जन्मानंतर होऊ शकतो. जन्मापूर्वी रंगसूत्रे व जुनक (जीन) यांच्या विकृती, आनुवंशिक विकृती, किरणोत्सर्गी पदार्थाशी घनिष्ठ संबंध, गर्भाशयात असताना जंतुसंसर्ग यांसारख्या कारणांमुळे, जन्मवेळी शस्त्रक्रियेसारख्या क्रियांमुळे व जन्मानंतरही अशाच इतर कारणांमुळे मेंदूत विकृती उत्पन्न होतात. जन्मसमयी वापरलेल्या शस्त्रामुळे, प्रसूतीस वेळ लागल्यामुळे किंवा ती फार सत्वर झाल्या- मुळे मेंदूस इजा पोहोचू शकते. जन्मानंतर डोक्यास मार, तंत्रिका- तंत्रांत जंतुसंसर्ग मेंदूतील रक्तविहिन्यांचे विकार, काविळीमुळे होणारा मेंदूत शोथ या महत्त्वाच्या कारणांमुळे विकृती उद्भवते. खेरीज गृहस्थिती, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक निर्बंध यांमुळे काही मुलांची ज्ञानग्रहणाची शक्ती विलंबित वा विमंदित होऊ शकते.

अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी अगोदर त्यांच्या मानसिक दौर्बल्या- च्या व्याप्तीचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. बुद्धिगुणांकाच्या (इंटेलिजन्स कोशंट) साहाय्याने हे केले जाते. बीने-सायमन-किंवा गेझेल-चाचणी यांच्या साहाय्याने मुलांचे मानसिक किंवा विकासी वय निश्चित करण्यात येते. या वयास त्याच्या प्रत्यक्ष वयाने भागल्या- वर भागाकारास शंभराने गुणून जी संख्या येते, तिला ‘बुद्धिगुणांक’ म्हणतात.

मानसिक वय

X १०० = बुद्धिगुणांक.

प्रत्यक्ष वय

हा ५० ते ७५ असल्यास मुलास शालेय शिक्षण देणे शक्य असते. अशी मुले शिक्षणार्ह प्रकारात मोडतात. २५ ते ५० बुद्धिगुणांक असलेली मुले शिक्षणार्ह प्रकारात मोडतात. अशा मुलांना चार-पाच इयत्तांपलीकडे शालेय शिक्षण देणे शक्य नसते. त्यांच्यासाठी विशेष शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्यांना उद्योगशिक्षण देणे व दैनंदिन जीवनातील सर्वसाधारण कर्तव्ये करण्याचे शिक्षण देणे शक्य असते. अशा मुलांना एखाद्या संस्थेत ठेवण्याऐवजी घरीच ठेवल्याने जास्त फायदा होतो. बुद्धिगुणांक २५ हून कमी असल्यास मुलास कोणत्याही प्रकारचे शिक्षण देणे शक्य होत नाही. किंबहुना त्याचे मानसित दौर्बल्य इतके असते, की त्याची काळजी त्याला एखाद्या खास संस्थेत घ्यावी लागते. पालकांचे आर्थिक व भावनिक स्थैर्य यांचा विचार करून योग्य वेळी अशा मुलाला संरक्षित वातावरणात ठेवणे हितकारक ठरते. ज्या मुलांची शैक्षणिक कुवत सर्वसाधारण मुलांपेक्षा थोडीशीच कमी असते, अशांना सर्वसामान्य शाळांतून शिक्षण दिले जाते मात्र शाळेतच अशा मुलांसाठी खास वर्ग काढणे आवश्यक असते.

मस्तिष्क-पक्षघातामुळे उद्भवलेली अपंगता : जन्मापूर्वी, जन्मवेळी किंवा जन्मानंतर पहिल्या एकदोन वर्षांत काही विकारांमुळे मेंदूच्या प्रेरक विभागात विकृती उत्पन्न होऊन, शरीराच्या चलनक्रियेत अडथळा उत्पन्न होतो व त्यामुळे अपंगता उद्भवते. अशा मुलांच्या पुनर्वसनात चलनवलन, स्वावलंबन व इतरांशी व्यवहार करता येणे, ही तीन मुख्य उद्दिष्टे असतात. यासाठी स्नायूंचा अंगग्रह कमी करणे, शरीराचा तोल संभाळणे, मर्यादित हालचाली करणे, सपाट जमिनी- वरून व चढणीवर चालणे व विद्युत्-उपचार हे शरीरोपचार, तसेच वाचाशिक्षण, औषधे व खास साधने यांचा उपयोग करून मुलांचे पुनर्वसन करता येते.

चिरकारीविकारजन्य अपंगता : हृदय,फुप्फुस, दृक् यांसारख्या महत्त्वाच्या इंद्रियांच्या चिरकारी व्याधीमुळे अपंगत्व येते. व व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होऊन त्यास अर्थोत्पादन करणे अशक्य होते. अशा व्यक्तींना योग्य औषधे व आहार, शस्त्रक्रिया इ. वैद्यकीय उपचार करून मर्यादित प्रमाणात किंवा संपूर्णत: उद्योगक्षम करता येते.  

हातापायांची अपंगता : युद्धात, औद्योगिक अपघातात व इतर प्रसंगी हात किंवा पाय गमविलेल्या व्यक्तींविषयी फार पूर्वींपासून प्रयत्न केले जात आहेत. अशांना कृत्रिम हातपाय बसवून देणे आवश्यक असते. दुसऱ्‍या महायुद्धानंतर अशा व्यक्तींच्या पुनर्वसना- च्या प्रश्नाला फार जोरदार चालना मिळून कृत्रिम हातपाय तयार करण्याची एक खास कला निर्माण झाली आहे. पाय गमविण्यापेक्षा हात गमविल्यामुळे उद्भवलेले अपंगत्व जास्त हानिकारक असते. अपघातात किंवा युद्धात इजा झाल्यावर हात किंवा पाय यांच्यावर योग्य ती शस्त्रक्रिया करणे व नंतर व्यक्तीला कृत्रिम हात किंवा पाय बसवून ते वापरण्याचे शिक्षण देणे ह्या गोष्टी पुनर्वसनात महत्त्वाच्या असतात.

कुष्ठरोगामुळे हातापायाची बोटे, हात, पाय, तोंड, नाक वगैरे अवयवांना अपंगत्व येते व त्याकरिता योग्य प्रकारची पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करून ते दूर करता येते.

प्रौढ अपंगांचे पुनर्वसन ही एक सामाजिक जबाबदारी आहे. अपंग माणूस हा हीन दर्जाचा नसून केवळ दुर्दैवाने त्याच्याच उणीव उत्पन्न झाली आहे, म्हणून त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान न करता समाजाने त्याला त्याचे योग्य ते स्थान मिळवून देण्यास साहाय्य केले पाहिजे. हे प्रयत्न शासकीय त्याचप्रमाणे वैयक्तिक पातळीवरून होणे आवश्यक असते. अपंग व्यक्तींना कार्यक्षम बनवून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची संधी दिली गेली पाहिजे. कार्यक्षम बनवण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती व शारीरिक शक्ती वाढीस लावणे जरूर असते. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची मानसिक वृत्ती तयार करावी लागते. ह्याला ‘समायोजन’ म्हणतात. अंपगांचे व समाजाचे मानसिक परिवर्तन हे पुनर्वसनात महत्त्वाचे असते.

शरीरोपचार, व्यवसायी चिकित्सा, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव यांच्या साहाय्याने अपंगांचे वैद्यकीय पुनर्वसन केले जाते. व्यवसायी चिकित्सा अपंगाचे मन उद्योगांत रमविताना निर- निराळ्या स्नायूंना मजबुती आणते व अपंगाच्या औद्योगिक पुनर्वसनाचा पाया घालते. हातापायांनी अधू असणाऱ्‍यासाठी कृत्रिम हातापायांचा उपयोग करून त्यांना परत कार्यक्षम बनविणे शक्य असते. जलोपचार, विद्युत्-उपचार, स्वकृत व परकृत हालचाली, मालीश, जंबुपार किरण, शेक देणे वगैरे उपचारांनी स्नायूंची शक्ती वाढविता येते. नंतर चाकांच्या खुर्च्या, कुबड्या यासारखी साधने वापरतात.

अपंगाचे व्यावसायिक पुनर्वसन करताना त्याची मनोवृत्ती, शैक्षणिक पात्रता, शारीरिक शक्ती, कौटुंबिक पार्श्वभूमी व त्याची पूर्वीचा व्यवसाय लक्षात घेतला जातो. हे काम वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांचे असते. कार्यक्षम अपंगाची माहिती कारखानदारांना पुरविणे व अपंगाची शिफारस करणे हे कार्यसुद्धा त्या कार्यकर्त्यांचे असते. 

अपंगाचे मानसिक, वैद्यकीय व व्यावसायिक पुनर्वसन करून त्याला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे, सुखी कौटुंबिक जीवनाची प्राप्ती करून देणे, त्याच्यासाठी सर्वसाधारण व विशेष प्रशिक्षण देणाऱ्‍या शाळा, वर्ग किंवा संस्था स्थापणे व समाजातील इतर व्यक्तिंचा अपंगाविषयीचा दृष्टिकोन बदलून समाजात त्यांना सहानभूतीची वागणूक देणे व त्यांना योग्य ते स्थान मिळवून देणे हे समाजाचे कर्तव्य ठरते.

अपंग कल्याण : एके काळी अपंगांच्या प्रश्नाचा विचार भूतदयेच्या पातळीवरून होत असे. भारतीय संस्कृतीनुसार अपंगांना दानधर्म हे सामान्य माणसाचे व राजंचे धर्मकर्तव्य समजले जाई. प्रत्येक धर्मा- तच या दृष्टीने व्यक्तींना काही आदेश दिले गेले आहेत. बौद्ध व जैन धर्मांत अशा प्रकारच्या दानधर्मावर जास्त भर देण्यात आला आहे. सदावर्ते, अन्नछत्रे, मठ आणि धर्मशाळा या संस्थाही अपंगांच्या निर्वाहासाठी निर्माण झालेल्या दिसतात.

  आधुनिक काळात सामाजिक शास्त्रांतील विचारसरणीच्या प्रभावाने या प्रश्नाचा आता केवळ भूतदयावादी भूमिकेवरून विचार होत नाही. शास्त्रनिष्ठ पातळीवरून अपंगांच्या प्रश्नाची मीमांसा केली जाते. अपंगाच्या जागतिक संस्था, यूनेस्कोकडून अपंगांची होणारी जागतिक स्वरूपाची पाहणी, भारताच्या संविधानात अपंगांच्या संरक्षणाचा केला गेलेला खास उल्लेख आणि सर्व देशांत अपंगांसाठी निर्माण झालेल्या कल्याण-संस्था या सर्व गोष्टींवरून अपंगांबाबात आता अधिक सहानुभूतीचा दृष्टिकोन बाळगण्यात येत असल्याचे दिसून येते.

भारत आणि महाराष्ट्र येथील प्रयत्न: नॅशनल सँपल सर्व्हेच्या १९६०-६१ सालातील अंदाजानुसार व अन्य काही पाहण्यांवरून अपंगांच्या संख्येचे ढोबळ आकडे सांगता येतात. (अपंगांची मोजदाद १९३१ च्या शिरगणतीपर्यंतच केली जात असे. त्यामुळे यांबाबतची निश्चित स्वरूपाची आकडेवारी देता येणे शक्य नाही.) हे आकडे पुढील प्रमाणे :

 

अपंगांचा प्रकार

भारत

महाराष्ट्र

(१)

अंध

सु. ४० लाख

२८,०००

(२)

मूक-बहिरे

२,८६,००० (बहिरे)

२०,०००

 

 

+ २,४४,००० (मूक)

 

(३)

शारीरिक अपंग

सु. १६,०००

भारतीय नियोजन-मंडळामार्फत समाज-कल्याणाच्या आणि समाज-सुरक्षितता-विभागामार्फत अपंगांच्या शिक्षणाच्या व कल्याणाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यासाठी राष्ट्रीय व राज्य-पातळीवर सल्लागार समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. अंधांसाठी ‘नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड’ ही केंद्रवर्ती संस्था आहे. अखिल भारतात एकूण ११० च्यावर संस्था अंधांच्या विविध समस्या हाताळीत आहेत. बहुतेक सर्व राज्यांतून अंधांसाठी खास नोकरी-केंद्रे उघडण्यात आली आहेत. मूक–बहिऱ्‍यांसाठी भारतात सु. ५३ शाळा चालू आहेत. त्यांच्यासाठी धंदेशिक्षणाच्या शाळा व नोकरी-केंद्रेही उघडण्यात आली आहेत.

अंध, शारीरिक अपंग आणि अतिमंद मुलांसाठी खाजगी व सरकारी पातळींवरून शाळा, मूक-बहिऱ्‍याची स्वतंत्र विद्यालये, सर्व प्रकारच्या अपंगासाठी कारखान्यांतून व शेतकी-केंद्रांतून कामे, निवडक अपंग मुलांना शिष्यवृत्या आणि अपंगांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण इ. मार्गांनी महाराष्ट्र राज्यातील समाजकल्याण-खात्याने या क्षेत्रात कार्य चालविले आहे. भारतीय व प्रादेशिक पातळ्यांवरून होणारे हे कार्य अर्थातच फार मर्यादित आहे. परंतु त्यात अपंगांचे सामाजिक पुनर्वसन, शिक्षण, व्यावसायिक पुनर्वसन या उद्दिष्टांचा समावेश केला गेला आहे. पैसा, साधनसामग्रीचा पुरवठा, सामाजिक सेवक व सेवक-संस्थांची उपलब्धी व उत्साह आणि सरकारी यंत्रणेतील कार्यक्षमता या सर्व घटकांवर या कार्याची प्रगती अवलंबून आहे.

पहा : समाजकल्याण.

संदर्भ : 1. Fergusson, Thomas Kerr, A. W. Handicapped Youth, London, 1960.

         २. गोखले, शरच्चंद्र, नावडती मुले, पुणे, १९६३.

           ३. मोहनी, उषा, अपंगत्वावर  विजय, पुणे, १९६१.

गोखले, शरच्चंद्र वागळे, चं. शं.