सय्यद (सय्यिद) घराणे : दिल्लीच्या तख्तावर सत्तेवर (इ. स. १४१४-१४५१) असलेले एक सुलतान घराणे. या घराण्याचे पूर्वज अरबस्तानातून हिंदुस्थानात आले आणि मुलतान येथे स्थायिक झाले. या घराण्यात खिज्रखान (कार. १४१४-२० मे १४२१), मुबारकशाह (कार. १४२१-१९ फेबुवारी १४३४), मुहम्मदशाह (कार. १४३४-१४४५) आणि अलाउद्दीन आलमशाह (कार. १४४५-१४५१) असे चार सुलतान झाले.

खिज्रखान हा पहिला सुलतान फिरोझशाह तुघलक (कार. १३५१- १३८८) याच्या कारकीर्दीत मुलतानचा सुभेदार होता. दीपालपूरचा सुभेदार सारंगखान लोदी याने खिज्रखानाचा पराभव करून मुलतान घेतले, तेव्हा काही वर्षे त्याने मेवातमध्ये काढली. त्यानंतर तैमूरलंगने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली काबीज केली (१३९८). त्याने खिज्रखानास मुलतान, लाहोर व दीपालपूर यांची सुभेदारी आणि दिल्लीत आपला राजप्रतिनिधी नेमले. त्यावेळी दिल्लीचा तुघलक सुलतान नसीरूद्दीन मुहम्मदशाह गुजरातला पळून गेला होता. तुघलकांच्या मालइकबाल वजीराने त्याला परत बोलावून दिल्लीच्या तख्तावर बसविले परंतु प्रत्यक्षात सत्ता दौलतखान लोदी याच्या हातात होती. खिज्रखानाने मुहम्मदशाहास १४१० मध्ये पकडले व त्याची राजधानी फिरोझाबाद हस्तगत केली. मुहम्मदशाह १४१२ मध्ये मरण पावला आणि त्याच्या दरबारातील दौलतखान लोदी गादीवर आला पण त्याचा पराभव करून खिज्रखानाने सय्यद घराण्याची दिल्लीवर स्थापना केली (६ जून १४१४). त्याने विश्वासू अधिकारी नेमून तुघलकांच्या सरदारांना दयाबुद्धीने वागविले. गोरगरिबांसाठी मदतकार्य केले. तैमूरच्या कृपेमुळे आपल्याला सत्ता व प्रतिष्ठा प्राप्त झाली, म्हणून तो तैमूरचा मुलगा शाहरूख याला अखेरपर्यंत खंडणी व नजराणे पाठवीत असे. शाह ही पदवी धारण न करता तो स्वत:स रायत-इ-आला म्हणवून घेत असे. सुरूवातीस तीन वर्षे सार्वजनिक प्रार्थनेतही त्याने शाहरूखचेच नाव ठेवले. त्याने पूर्वीची नाणी सन बदलून वापरात आणली व नवीन पाडली नाही. तुर्क-अफगाणांनी केलेले उठाव त्याने मोडून काढले. त्याचे राज्य दिल्ली व आसपासचा परिसर असे मर्यादित होते. फक्त त्याने नागौरची एकच दूरवरची स्वारी १४१६ मध्ये गुजरातच्या अहमदशाहाविरूद्ध केली. तसेच १४२१ मध्ये मेवात लुटले आणि कोटलाचा किल्ल उध्वस्त केला. तो निर्व्यसनी व न्यायी होता.

खिज्रखानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुबारक तख्तावर बसला. त्याने शाह ही पदवी धारण करून स्वत:च्या नावाने खुत्बा पढण्याची प्रथा सुरू केली. त्याने नाणी पाडली परंतु सुरूवातीस याबाबतीत वडिलांचेच जुन्या नाण्यांचे धोरण स्वीकारले. त्याच्या वेळी पंजाबातील खोकर जमात, तुर्क व मोगल यांनी उठाव केले. खोकरांचा नेता जस्रथ याने सय्यदांना गादीवरून खाली खेचण्याचा अनेकदा प्रयत्न केला. माळवा, जौनपूर वगैरे राज्यही दिल्लीवर आक्रमण करण्याची संधी शोधत होती. तसेच दुआबातील इटावा, बदाऊन येथील तसेच ग्वाल्हेरच्या राजपुतांची बंडे उदभवली पण मुबारकने सर्व बाजूंनी शत्रूशी यशस्वी मुकाबला केला. अखेर दिल्लीतील असंतुष्ट हिंदु-मुसलमान गटांनी त्याचाच वजीर सखर-उल्-मुल्क यास हाताशी धरून कपटकारस्थान करून त्याचा खून केला.

मुबारक हा सय्यद घराण्यातील सर्वांत पराकमी, कर्तबगार, न्यायी आणि कर्तृत्ववान सुलतान होय. त्याचे स्वत:चे कार्यक्षम सैन्य होते. त्यामुळे त्याने अंतर्गत व बाह्य शत्रूंशी समर्थपणे मुकाबला केला आणि राज्याचा विस्तार झाला तथापि मुत्सद्देगिरी आणि गुप्तहेरखाते यांत तो कमी पडला. परिणामत: त्याची दैदिप्यमान कारकीर्द संपुष्टात आली. तो वास्तुकलेचा भोक्ता होता. त्याने यमुनेच्या काठी मुबारकबाद नावाचे नवीन शहर वसविले आणि तिथे एक भव्य मशीद बांधली. तो सश्रद्ध इस्लामनिष्ठ होता, तरी धर्मवेडा नव्हता. तो सर्वधर्मीय प्रजेशी ममत्वाने वागे. त्याने खत्रींना आश्रय दिला, तव्दतच ग्वाल्हेरच्या हिंदू राजाला हुशंगशाहच्या आकमणाविरूद्ध सहकार्य केले. त्याच्या पदरी विव्दान होते. त्यांपैकी याह्या सरहिंदी या इतिवृत्तकाराने तारीख-इ-मुबारक शाही हा मुबारकशाहच्या कारकीर्दीवर विश्र्वसनीय माहिती देणारा ग्रंथ लिहिला. मुबारकने मोगलांच्या आक्रमणांना तोंड तर दिलेच पण शेख अली यास सर्व सामान-सुमान मागे ठेवून पळवून लावले. तसेच त्याचा पुतण्या सेऊरचा अमीर मुझफ्फर याने शांततेची बोलणी करून आपली मुलगी मुबारकच्या दत्तक मुलास दिली. शेख अली पुन्हा आला नाही आणि त्यामुळे भारतातील मोगलांचे आगमन सु. शंभर वर्षे लांबले.

मुबारकशाहच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाचा मुलगा मुहम्मदखान बिन फरीदखान हा मुहम्मदशाह हे नाव धारण करून दिल्लीच्या तख्तावर आला. सुरूवातीचे सहा महिने त्याचा वजीर सरवर-उल्-मुल्क यानेच प्रत्यक्षात सर्व कारभार केला. त्यास त्याने खान-इ-जहान हा किताब दिला. सरवरने जुन्या सरदारांना कमी करण्याचे धोरण अवलंबिले पण कमाल-उल्-मुल्क या सरदाराच्या नेतृत्वाखाली असंतुष्ट सरदारांनी त्याला विरोध करून दिल्लीवर स्वारी केली. सरवराने प्रत्यक्ष सुलतानालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला पण मुहम्मदशाहच्या अंगरक्षकांनी सरवर-उल्-मुल्कला ठार केले. एवढेच नव्हे, तर त्याच्या सहकाऱ्यांनाही सैन्याने कंठस्नान घातले. त्यांनतर सैन्याने दिल्लीचा कब्जा घेऊन जुन्या सरदारांनी मुहम्मदशाहवर आपला विश्वास व्यक्त केला. कमाल-उल्-मुल्क याची मुख्यप्रधान (वजीर) म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर मुहम्मदशाह विलासी जीवन व्यतीत करू लागला. राज्यकारभाराकडे त्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले. तेव्हा मेवाती नेता जलालखान याच्या निमंत्रणावरून माळव्याचा सुलतान मुहम्मद खल्जी याने दिल्लीवर स्वारी केली. त्यावेळी मुहम्मदशाहने सरहिंदचा सुभेदार बहलूल लोदी यास मदतीस बोलाविले. तो वीस हजार घोडेस्वारा-निशी आला पण लढाईच्या दुसऱ्या दिवशीच मुहम्मदशाहाने खल्जीशी तहाची बोलणी सुरू केली. त्यामुळे मुहम्मद खल्जीने सैन्य मागे घेतले पण बहलूलने खल्जींच्या सैन्यावर अचानक हल्ल करून लूटालूट केली. लहरी मुहम्मदशाह सुलतानाने बहलूलची त्याबद्दल स्तुती केली आणि त्यास आपला मुलगा मानले व खान-इ-खानान ही पदवी त्यास दिली. बहलूलने याचा गैरफायदा घेऊन पंजाब पादाक्रांत केला व १४४३ मध्ये दिल्लीवरही अयशस्वी स्वारी केली. मुहम्मदशाहच्या अखेरच्या दिवसांत राज्याला उतरती कळा लागली. मुलतान प्रांत स्वतंत्र झाला, शर्कीनी पूर्वेकडील काही भाग जिंकला. रयतेने सारा थकविला. एवढेच नव्हे, तर दिल्लीच्या परिसरातील काही अमीर स्वतंत्रपणे वागू लागले. मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर त्याने आपला मुलगा अलाउद्दीन यास आपला वारस नेमले.


अलाउद्दीन आलमशाह हे बिरूद धारण करून दिल्लीच्या गादीवर आला. त्यासुमारास बहलूल लोदीने दिल्लीव्यतिरिक्त जवळजवळ सर्व प्रदेश पादा-कांत करून सुलतान नाममात्रच होता. शिवाय आलमशाहा बंडखोर अमीरांसमोर हतबल झाला होता. अखेर तो बदाऊनला जाऊन विलासात राहिला. त्याचा वजीर हमीदखान याने बहलूल लोदी व नागौरचा क्रियामखान यांना निमंत्रित केले. त्याचा डाव असा होता की, दोघांपैकी एक नामधारी सुलतान होईल व सर्व सत्ता आपण उपभोगू पण बहलूल द्रूतगतीने दिल्लीला गेला आणि तख्तनशीन झाला. त्याने हमीदखानचा कपटाने खून करविला आणि स्वत: सुलतान झाल्याचे जाहीर करून आलमशाहाला कळविले. नादान, विलासी आलमशाहला त्याने बदाऊन येथे सर्व सुख-सोयींची व्यवस्था करून तिथेच राहण्यास भाग पाडले. तिथेच पुढे तो १४७८ मध्ये मरण पावला. क्रियामखान हात हालवीत दिल्लीच्या वाटेवरून नागौरला परतला. सय्यद घराण्याची सत्ता संपुष्टात येऊन लोदी घराणे दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाले.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Delhi Sultanate, Bombay, 1983.

गोखले, कमल