रामॉन इ काहाल, सांत्यागो : (१ मे १८५२ – १८ ऑक्टोबर १९३४). स्पॅनिश ऊतकवैज्ञानिक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांच्या सूक्ष्म संरचनेसंबंधीच्या विज्ञानातील तज्ञ). तंत्रिका एकक किंवा तंत्रिका कोशिका (मज्जापेशी) ही तंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) मूलभूत एकक असल्याचे प्रस्थापित केल्याबद्दल त्यांना ⇨कामील्लो गॉल्जी यांच्या समवेत १९०६ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. त्यांच्या या शोधामुळे तंत्रिका तंत्रामध्ये तंत्रिका एककाचे मूलभूत कार्य ओळखण्यास आणि तंत्रिका आवेगाची [⟶ तंत्रिका तंत्र] प्रक्रिया आधुनिक दृष्टीकोनातून समजण्यास मदत झाली.

त्यांचा जन्म पेतिल्ला दे ॲरॅगॉन येथे झाला. सारगॅसो विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेऊन पदवी संपादन केल्यावर ते सैन्यात भरती झाले व पुढील वर्षी क्यूबाला गेले. तेथे त्यांना हिवतापाचा आजार जडल्याने त्यांना स्पेनला परत पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांनी सारगॅसो विद्यापीठात शारीराचे (शरीररचनाशास्त्राचे) अध्ययन करून डॉक्टरेट पदवी मिळविली. १८८३ मध्ये व्हॅलेन्शिया येथे त्यांची वर्णनात्मक शारीर या विषयाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. दरम्यानच्या काळात कोणाच्याही मदतीशिवाय ते उत्तम सूक्ष्मदर्शकविज्ञ व ऊतकवैज्ञानिक झाले. त्याच वेळी क्षयातून बरे होत असताना ते उत्तम छायाचित्रकारही झाले. १८८७ मध्ये बार्सेलोना विद्यापीठात त्यांची ऊतकविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पुढे १८९२ मध्ये माद्रिद विद्यापीठात ते ऊतकविज्ञान व विकृतिविज्ञानीय शारीर या विषयांचे प्राध्यापक झाले आणि १९२२ मध्ये या पदावरून सेवानिवृत्त झाले.

रामॉन इ काहाल यांनी तंत्रिका कोशिका अभिरंजित करण्यासाठी (सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अभ्यास करण्याकरिता कृत्रिम रीत्या रंगविण्यासाठी) वापरण्यात येणाऱ्या गॉल्जी यांच्या सिल्व्हर नायट्रेट रंजकामध्ये १९०३ मध्ये सुधारणा केली. भ्रूणांच्या व लहान वयाच्या प्राण्यांच्या मेंदूतील तंत्रिका ऊतक, संवेदी केंद्रे व मेरुरज्जू (केंद्रीय तंत्रिका तंत्राचा दोरीसारखा व पाठीच्या कण्यातून जाणारा भाग) यांच्या सूक्ष्म संरचनांच्या सर्वसाधारण अध्ययनाकरिता उपयुक्त असा सुवर्ण रंजक १९१३ मध्ये विकसित केला. या तंत्रिकाविशिष्ट रंजकामुळे रामॉन इ काहाल यांना डोळ्यातील जालपटलाची (प्रकाशसंवेदी व दृक्तंत्रिकेला जोडलेल्या स्तराची) सूक्ष्म संरचना आणि मेंदूतील करड्या द्रव्यातील व मेरुरज्जूतील तंत्रिका कोशिकांची संरचना व अनुबंधने यांचा मागोवा निश्चित करणे शक्य झाले तसेच मेंदूतील अर्बुदांच्या (नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठींच्या) निदानामध्ये त्याची खूपच मदत झाली.

स्पेनचे राजे तेरावे आल्फॉन्सो यांनी १९०२ मध्ये रामॉन इ काहाल यांच्या नावाने माद्रिदमध्ये ‘इन्स्टिट्यूट काहाल’ ही संस्था स्थापन केली. तेथे रामॉन इ काहाल यांनी मृत्यूपावेतो संचालक म्हणून काम केले. नोबेल पारितोषिकाशिवाय त्यांना अनेक बक्षिसे तसेच स्पॅनिश व परदेशातील सन्माननीय पदव्या मिळाल्या. १८९४ मध्ये रॉयल सोसायटीने क्रूनियन व्याख्याने देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. १८९९ मध्ये अमेरिकेतील बुस्टर (मॅसॅचूसेट्स) येथील क्लार्क विद्यापीठात ते विशेष व्याख्याते होते. १९०९ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून निवड झाली. त्यांनी तंत्रिका संरचनांवर विपुल ग्रंथ निर्मिती केली. त्यांमधील Estudios sobre la de generation y regeneracion del sistema nervioso (२ खंड, १९१३-१४) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. ते माद्रिद येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.