रोगप्रतिकारक्षमता : सर्व प्रकारच्या सजीवांना त्यांच्या परिसरातील निर्जीव व सजीव अशा दोन्ही प्रकारच्या आक्रमणांना तोंड देऊन स्वतःचे अस्तित्व टिकवावे लागते. यासाठी विविध यंत्रणा विकसित झालेल्या आहेत. प्राणिसृष्टीमधील अशा यंत्रणांचा अभ्यास, विशेषतः सूक्ष्मजीवांपासून संरक्षण करण्यासाठी विकसित झालेल्या यंत्रणांचा अभ्यास, रोगप्रतिकारक्षमता (किंवा प्रतिरक्षा) या विषयात समाविष्ट होतो. सूक्ष्मजंतूंची सर्वव्यापी उपस्थिती लक्षात घेता अशा यंत्रणांचे महत्त्व मोठे आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा अनुपस्थितीत जखमा किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर समस्या उत्पन्न होऊ शकतात व सार्वदेहिक संक्रामणेही संभवतात. मृत ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या- समूहांमध्ये) विघटनाची क्रिया सुरू होते. रोगप्रतिकारक्षमता विशिष्ट व अविशिष्ट अशा दोन प्रकारे कार्य करते. 

अविशिष्ट रोगप्रतिकारक्षमता : प्राणिसृष्टीतील प्रत्येक जाती ज्या पर्यावरणात जगण्यासाठी अनुयोजित झाली असेल त्याला अनुरूप अशी ऊतकरचना तीमध्ये उत्क्रांत होत असते. या रचनेमुळे प्राप्त होणारी अशी नैसर्गिक प्रतिकारक्षमता अविशिष्ट म्हणता येईल. रोगसंक्रामणाचा पूर्वेतिहास नसतानादेखील ही यंत्रणा कार्य करू शकते. संरचनात्मक, रासायनिक, कोशिकीय व तीव्र प्रतिक्रियात्मक अशा विविध पातळ्यांवर तिचा विचार करता येईल.  

(१) संरचनात्मक अवरोध : (यांत्रिक अटकाव). त्वचा आणि श्वसनमार्गाचे व पचनमार्गाचे श्लेष्मपटल (बुळबुळीत पातळ अस्तर) संक्रामणाला अडविणाऱ्या पहिल्या फळीचे कार्य करतात. त्वचेतील केराटिनयुक्त शृंगी (शिंगासारखा कठीण) थर, त्यावर आघात करून तिथेच निवहजीवी होणाऱ्या (समूह करून राहणाऱ्या) जंतूंसह त्वचेचे होणारे विशल्कन आणि स्वेद (घाम) व त्वक्‌-वसा (त्वचेतील विशिष्ट ग्रंथींतून बाहेर पडणारा स्‍निग्ध पदार्थयुक्त) स्त्राव यांमुळे रोगजंतू आत शिरकाव करू शकत नाहीत. याशिवाय स्त्रावांमधील ⇨वसाम्‍ले, लॅक्टिक अम्‍ल व लायसोझाइम हे एंझाइम (जीवसारायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारे प्रथिन) जंतुनाशनाची क्रिया करतात. त्वचेवरील विकृतिजनक नसलेले सूक्ष्मजंतूही वसाम्‍ले तयार करतात. श्लेष्मकलेतील आर्द्रता सूक्ष्मजंतूंना धरून ठेवते व श्लेष्मा (बुळबुळीत स्त्राव) सर्व सूक्ष्म कणांना अवगुंठित करून निष्क्रिय करतो. श्वसनमार्गामधील असे कण अस्तरावरील पक्ष्माभिकांच्या (सूक्ष्म केसासारख्या वाढींच्या) हालचालीमुळे वर ढकलले जातात व शिंक किंवा खोकला येऊन बाहेर फेकले जातात. श्लेष्मल स्त्रावामध्ये लायसोझाइम, इंटरफेरॉन इ. जंतुनाशक पदार्थही असतात. यांशिवाय लाळेमधील लायसोझाइम, योनिमार्गातील लॅक्टोबॅसिलस या सुक्ष्मजंतूंमुळे निर्माण झालेली अम्‍लता, बृहदांत्रामधील (मोठ्या आतड्यातील) सूक्ष्मजंतूंमुळे रोगजंतूंना होणारा अटकाव, मूत्रमार्गामध्ये मूत्रप्रवाहामुळे राहणारी निर्जंतुकता ही अधस्त्वचीय अवरोधास बळकटी आणतात.

(२) रासायनिक संरक्षक घटक : बाह्य त्वचा व अधस्त्वचा यांचा अवरोध ओलांडून खालच्या ऊतकात प्रवेश करणाऱ्या जंतूंचा नाश करणारी बीटा लायासीन, अन्य प्रथिने व पॉलिपेप्टाइड द्रव्ये ऊतकद्रवामध्ये आढळतात. मृत कोशिकांमधून बाहेर पडणाऱ्या पाचक एंझाइमांना निष्प्रभ करण्यासाठी निर्माण केलेली ही द्रव्ये जंतुजन्य एंझाइमांविरुद्धही उपयोगी पडतात. लोहरेणूंना बद्ध करून त्याचे परिवहन करण्यासाठी उपयुक्त असलेले ट्रान्सफेरिन हे प्रथिन जंतूंच्या परिसरातील मुक्त लोहाचा पुरवठा बंद करून त्यांची वाढ खुंटवू शकते. सूक्ष्मजंतूंकडून सक्रियित होऊन (अधिक क्रियाशील होऊन) त्यांना नष्ट करणारी पूरकद्रव्यांची प्रथिनमालिकाही रक्त व ऊतकद्रवामध्ये आढळते [⟶ प्रतिजन प्रतिपिंड]. संरक्षक संपुट (जिलेटिनी आवरण) नसलेल्या जंतूंविरुद्धही पूरक द्रव्ये विशेष प्रभावी असतात. ⇨ इंटरफेरॉने या प्रथिनांचाही समावेश अविशिष्ट घटकांमध्ये करता येईल. व्हायरसांतील ⇨ न्यूक्‍लिइक अम्‍लांच्या प्रतिलेखनास (जननिक माहितीचे संदेशक रिबोन्यूक्लिइक अम्‍लावर स्थानांतर करण्यास) अडथळा आणून व्हायरसांची वाढ थांबविणारी ही द्रव्ये लसीकाकोशिकांच्या [⟶ लसीका तंत्र] पृष्ठभागावरील महत्त्वाच्या घटकांचेही नियमन करतात. नैसर्गिक मारक कोशिकांनाही त्यांच्याकडून उत्तेजन मिळते.

(३) कोशिका पातळीवरील यंत्रणा : या यंत्रणेत भक्षिकोशिका व मारक कोशिका यांचा समावेश होतो. इल्या म्येच्‌न्यिकॉव्ह यांनी १८८४ मध्ये कोशिंकाकडून होणाऱ्या भक्षण व पाचनक्रियेचे महत्त्व वर्णन केले. त्यांनी वर्णिलेल्या लहान (लघु) भक्षिकोशिकांना आता बहुरूपकेंद्रकी (जटिल तऱ्हेने खंड पडलेले केंद्रक म्हणजे कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा पिंड असलेली) श्वेत कोशिका म्हणतात. त्यांमध्ये पाचक एंझाइमांचे कण असल्यामुळे त्यांना कण कोशिका असेही नाव आहे [⟶ रक्त]. काही कणांमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा हायपोक्लोराइट निर्मितिक्षम जंतुनाशक प्रथिने असतात. अस्थिमज्जेमधील (हाडांच्या पोकळ्यांतील मऊसर पदार्थातील) स्कंधकोशिकांपासून सतत निर्माण होणाऱ्या या कोशिका रक्तामध्ये थोडे दिवसच जगतात. विजातीय पदार्थांमध्ये त्या त्वरित आकर्षित होतात व त्यांचे कण भक्षण करतात. पृष्ठभागावर असलेल्या ग्राहींचे (विशिष्ट रासायनिक गट, रेणू वा व्हायरस यांची आसक्ती असलेल्या रासायनिक गटांचे वा रेणूंचे) या कामी साह्य होते. सूक्ष्मजंतूंवर जमा झालेले प्रतिपिंड रेणू व सक्रियित पूरक रेणू यांच्याशी हे ग्राही बद्ध होऊ शकतात. लघुभक्षिकोशिकांचे कार्य विशिष्ट प्रतिकारक्षमता यंत्रणेच्या मदतीने मुख्यतः होत असते व त्यांची स्वतंत्र अविशिष्ट परिणामकारकता मर्यादित असते.


स्कंधकोशिकांपासून निर्माण झालेल्या एककेंद्रकी कोशिका रक्तातून विविध लसीकाभ ऊतकांमध्ये (प्लीहा, लसीका ग्रंथी इ.) पोहोचून तेथे आपले परिपक्व रूप म्हणजेच महाभक्षिकोशिकांचे रूप धारण करतात. लघुभक्षिकोशिकांपेक्षा संख्येने कमी, आयुर्मानाने दीर्घ व हालचालीत मंद अशा या कोशिका आक्रमणस्थळी उशिरा पोहोचतात. त्यांची भक्षण आणि पाचनक्रियाही मंद व अपूर्ण असते. या कोशिकांच्या रक्ताबाहेरील स्थानीकृत रूपांना निरनिराळी नावे आहेत. संयोजी (जोडण्याचे कार्य करणाऱ्या) ऊतकातील ऊतक-भक्षिकोशिका (हिस्टिओसाइट) यकृत, प्लीहा इत्यादींमधील रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तरातील भक्षिकोशिका (कुफर कोशिका) लसीका जालिका ऊतकामधील जालिकाकोशिका तंत्रिका तंत्रातील (मज्‍जासंस्थेतील) ऊतकातील सूक्ष्मश्लेषी कोशिका (मायक्रोग्लिया) इत्यादींचा यात समावेश होतो. एकत्रित रीत्या या सर्व महाभक्षिकोशिकांनी बनणाऱ्या यंत्रणेला जलिका अंतःस्तरीय तंत्र असे संकल्पनात्मक नाव दिले आहे. 

नैसर्गिक मारक कोशिका १९७५ मध्ये आढळल्या. लसीका कोशिकांसारख्या दिसणाऱ्या परंतु थोड्याशा कणिका असणाऱ्या या कोशिका कोशिका-विभाजनक्रिया स्थळी आकर्षित होऊन विभाजित कोशिकांशी बद्ध होतात. आपल्या कणिकांना या विभाजित कोशिकांमध्ये निवेशित करतात व त्यामुळे त्या कोशिकांची पटले गळू लागतात. अर्बुदीय (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीतील) व व्हायरसग्रस्त कोशिकांच्या वाढीस अशा रीतीने आळा बसतो. शरीरप्रक्रियेमधील या कोशिकांची भूमिका पूर्णपणे ज्ञात झालेली नाही स्कंधकोशिकांपासून होणाऱ्या निर्मितीवर अंकुश ठेवण्याचे कार्य त्या करीत असाव्यात.

 

 (४) तीव्र प्रतिक्रिया : रोगजंतूंचे किंवा इतर कोणत्याही विजातीय पदार्थांचे शरीरात आक्रमण झाल्यास स्थानिक प्रतिक्रिया शोथाच्या (दाहयुक्त सूजेच्या) स्वरूपात तर व्यापक सार्वदेहिक प्रतिक्रिया ज्वर व अस्वस्थता यांच्या रूपात प्रकट होते. शोथ प्रक्रियेमुळे रक्तपुरवठा वाढून भक्षिकोशिका व संरक्षक रसायनांचा पुरवठा होतो. जंतुविषाचे विरलन होते. मृत कोशिकांचे अवशेष हलवण्यास साहाय्य होते. तसेच आक्रमक कारकामधील ⇨प्रतिजनांवर प्रक्रिया होऊन ते प्रतिजन विशिष्ट प्रतिकार प्रतिसादाच्या निर्मितीसाठी लसीकाभ ऊतकांकडे पोहोचविले जातात. ज्वरामुळे काही जंतूंची वाढ रोखली जाते. महाभक्षिकोशिकांकडून सायटोकाइन वर्गातील इंटरल्युकीन – १ — आल्फा व -१—बीटा ही द्रव्ये निर्माण होतात आणि ती यकृतात निरनिराळी प्रथिनद्रव्ये (तीव्र-अवस्था-रक्तद्रव-प्रथिने) निर्माण करण्यात उत्तेजन देतात.

विशिष्ट रोगप्रतिकारक्षमता : नैसर्गिक किंवा उपजत अविशिष्ट यंत्रणांची क्षमता बहुद्देशीय असली, तरी ती मर्यादित असते. रोगजंतूंची मोठी संख्या, श्वसन-पचनादि मार्ग व त्वचा यांच्या अधिस्तराला होणारी इजा किंवा सार्वदेहिक विकृती यांच्या उपस्थितीत ही मर्यादित क्षमता अपुरी पडते. यासाठी शरीरात प्रवेश करणारे विजातीय रेणू ओळखून त्यांविरुद्ध प्रभावी प्रतिक्रिया करणे आणि त्या किंवा तत्सम रेणूंना निष्क्रिय करणारी यंत्रणा भावी आक्रमणांसाठी तयार ठेवणे, ही उद्दिष्टे साधण्यासाठी विशिष्ट प्रतिकारक्षमता विकसित होत असते. काही संक्रामणांची दुसऱ्यांदा बाधा व्यक्तीला होऊ शकत नाही हे इ. स. पू. पाचव्या शतकातील प्लेगच्या साथीपासून ग्रीकांना माहीत होते. आजही गोवर, कांजिण्या, देवी गालगुंड यांसारखे रोग फक्त एकदाच होऊन जातात हे सर्वांना माहीत असते. या ज्ञानावर आधारित विविध लशींचा उपयोग आता मोठ्या प्रमाणावर होत आहे.

विशिष्ट प्रतिकारक्षमता कोशिकीय व प्रतिपिंडीय (देहद्रवीय) अशा दोन मार्गांनी कार्य करते. विजातीय रेणूंना विजातीय अथवा ‘स्वीयेतर’ म्हणून ओळखणे व निज अथवा स्वीय रेणूंना तसे ओळखणे हे या यंत्रणेचे महत्त्वाचे अंग आहे. लसीका कोशिकांच्या विविध संचांकडून ही यंत्रणा कार्यान्वित होत असते. त्यांचे स्वरूप पहाण्यापूर्वी थोडक्यात या यंत्रणेचा विकास पहाणे इष्ट आहे.

एकोणिसाव्या शतकामध्ये लूई पाश्चर यांनी सूक्ष्मजीवविज्ञानाचा पाया घातला तसेच सूक्ष्मजीवांच्या संक्रामणापासून संरक्षणासाठी लशींचा उपयोग करता येतो, हेही सिद्ध झाले. तरीपण संक्रामणापासून संरक्षण करण्यासाठी प्राणिशरीर जी यंत्रणा वापरते तिच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. म्येच्‌न्यिकॉव्ह यांनी त्या शतकाच्या शेवटी सूक्ष्मजीव आणि रक्तातील श्वेतकोशिका यांच्या शरीराबाहेरील आंतरक्रियांचा अभ्यास केला. कोशिकांची भक्षणक्रिया व तिच्यामुळे होणारे सेंद्रिय कणांचे पाचन सूक्ष्मजंतूंना नष्ट करण्यात फार महत्त्वाचे असते, असे त्यांनी प्रतिपादन केले. ही भक्षणक्रिया हाच जंतूंपासून ऊतकांच्या संरक्षणाचा एकमेव मार्ग आहे, असे त्यांनी आपल्या ‘कोशिकीय प्रतिकारक्षमता’ सिद्धांतात मांडले. याच काळात जी. एच्. एफ्. नटॉल, एडूआर्ट बूखनर, एमिल बेरिंग, झ्यूल बॉर्दे वगैरे शास्त्रज्ञांनी कोशिकाविरहित रक्तद्रव सूक्ष्मजंतूंचा नाश करू शकतो हे दाखवून ‘देहद्रवीय प्रतिकारक्षमता’ सिद्धांत मांडला. त्याला आधारभूत अशा अवक्षेपण (न विरघळणारा साका तयार होणे), समूहन (एकत्र होऊन पुंजका तयार होणे), उदासिनीकरण (अम्‍लता किंवा क्षारकता नाहीशी करणे), ऑप्सोनिनीकरण (ऑप्सोनीन या रक्तद्रवातील प्रतिपिंडाच्या प्रक्रियेद्वारे परकीय कोशिका भक्षिकोशिकांची क्रिया होण्यास अधिक ग्रहणक्षम बनणे) वगैरे क्रिया निदर्शनास आणल्या व त्या प्रतिपिंडाकरवी कार्यान्वित होतात हेही दाखवून दिले. या दोन आग्रही सिद्धांतांचा समन्वय विसाव्या शतकात त्यांचे अन्योन्यसंबंध ज्ञात झाल्यावर घडून आला.


म्येच्‌न्यिकॉव्ह यांनी क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) सर्व अवस्थांमध्ये भक्षिकोशिकांचे महत्त्व आपल्या तुलनात्मक शरीरक्रिया अध्ययनातून दाखवून दिले. भक्षिकोशिकाक्रिया आणि पचनक्रिया यांच्या विकासात्मक सातत्यासंबंधी अमीबा व स्पंज या प्राण्यांसकट सर्व महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये त्यांनी संशोधन केले. आदिजीवांमध्ये (एकाच कोशिकेच्या बनलेल्या जीवांमध्ये प्रोटोझोआंमध्ये) स्वपोषण व घातक सूक्ष्मजीवांचे निरसन ही कार्ये एकाच कोशिकेत होत असली, तरी स्पंजामध्ये मात्र पाचक भक्षिकोशिका अंतःस्तरात व संरक्षक भक्षिकोशिका मध्यस्तरात अशी विभागणी दिसते. मध्यस्तरातील या कोशिकांचे रूप व कार्य उच्च कोटीतील सर्व सजीवांमध्ये अपरिवर्तित असे आढळते. सर्व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांमध्ये कोशिकीय प्रतिकारक्षमतेला निर्णायक महत्त्व आहे. त्यामानाने देहद्रवीय घटकांची त्यांच्या शरीरक्रियेतील भूमिका अस्पष्ट दिसते. जरी त्यांच्या देहगुहीय द्रवात व लसीका द्रवात समूहनघटक आढळत असले, तरी पृष्ठवंशीयांमधील, विशेषतः सस्तन प्राण्यांमधील, ग्‍लोब्युलिनाशी त्यांचे साम्य नसते. विशिष्ट प्रतिकारक्षमता यंत्रणा विकसित न झाल्यामुळे स्वयंप्रतिरोपण (स्वतःच्याच ऊतकांचे स्वतःवर केलेले कलम) व सजातीय प्रतिरोपण (स्वजातीमधील अन्य प्राण्याच्या ऊतकाचे केलेले कलम) यांमध्ये व्यवच्छेद करण्यास (वेगळेपणा ओळखण्यास) हे प्राणी असमर्थ असतात.  

पृष्ठवंशीयांपैकी आदिम वर्ग म्हणजे ⇨सायक्‍लोस्टोम प्राण्यांचा वर्ग होय. याच्या दोन उपवर्गांपैकी खालचा म्हणजे ⇨हॅगफिश हा महासागराच्या तळातील चिखलात आढळणारा माशासारखा प्राणी प्रतिपिंडनिर्मिती करू शकत नाही तो विलंबित अतिसंवेदनशीलता प्रतिक्रिया (बीसीजी लस टोचल्यावर) दाखवत नाही परंतु सजातीय प्रतिरोपण एकदा स्वीकारून बरे झाल्यावर पुन्हा मात्र अस्वीकृत करतो. दुसऱ्या उपवर्गातील ⇨लँप्री हा प्राणी मात्र काही काही प्रतिजनांविरुद्ध हळूहळू प्रतिपिंडनिर्मिती करतो व सजातीय प्रतिरोपणाचा त्याग करतो. त्यात ट्युबरक्युलिनाला (ट्युबरकल सूक्ष्मजंतूंपासून काढलेल्या विशिष्ट द्रव्यांनी युक्त असलेल्या निर्जंतुक द्रवाला) विलंबित अतिसंवेदनशीलताही दिसून येते. यावरून या उच्चतर प्राण्यापासून किंवा दोन्ही उपवर्गांच्या मध्ये असणाऱ्या  एखाद्या अज्ञात जातीपासून कोशिकेबरोबरच देहद्रवीय प्रतिकारक्षमता विकसित होण्यास सुरुवात झाली, असे अनुमान काढता येईल. या प्राण्यात हॅगफिशमध्ये नसलेली अशी आदिम ⇨यौवनलोपी ग्रंथी, अल्प प्रमाणात लसीकाभ कोशिका, रक्तामधील लसीका कोशिका, अस्थिमज्जेत व प्लीहेत लसीका कोशिका-केंद्रे आणि रक्तद्रवातील गॅमा-ग्‍लोब्युलीनसदृश रेणू अशी वैशिष्ट्ये आढळतात. मत्स्य वर्गापैकी इलॅस्मोब्रँक व टेलिऑस्ट माशांमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये जास्त विकसित झालेली दिसतात.

पक्ष्यांमध्ये यौवनलोपी ग्रंथीबरोबरच ‘फाब्रिसिअस स्यून’ (एच्. फाब्रिसिअस या इटालियन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारे) हे आणखी एक लसीकाभ इंद्रिय दिसून येते [⟶ प्रतिजन]. बाल्यावस्थेत जर ते काढून टाकले, तर प्रौढावस्थेत प्रतिपिंडनिर्मिती करणाऱ्या प्लाविका कोशिकांची (प्रतिपिंडांची निर्मिती करणाऱ्या विशिष्ट लसीका कोशिकांची) निर्मिती खुंटते. प्लीहेमधील कोशिकाजनन केंद्रेही तयार होत नाहीत. फाब्रिसिअस स्यून या इंद्रियासारखी इंद्रिये सस्तन प्राण्यांत व उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणाऱ्या) प्राण्यांत आढळत नाहीत परंतु त्यांचे कार्य आतड्यांच्या सान्निध असणारी लसीकाभ ऊतक क्षेत्रे (पेयर क्षेत्रे व आंत्रपृच्छ-ॲपेंडिक्स) करीत असावीत, असा अंदाज आहे. प्रतिकारक्षमता-स्मृती व जननकेंद्रे यांचा निकटचा संबंध असावा, कारण या दोन्हीचा बेडकात अभाव दिसतो. प्रतिपिंडाच्या निर्मितीचा प्रतिसाद दुसऱ्या व त्यानंतरच्या प्रतिजनमात्रेनंतर जास्त जलद आणि मोठ्या प्रमाणावर मिळणे हे या स्मृतीचे लक्षण आहे आणि पक्षी व सस्तन प्राण्यांमध्ये ते ठळकपणे दिसून येते.

 बहुक्षम स्कंधकोशिकेपासून विविध प्रकारच्या लसीका कोशिकांची निर्मिती व विकसन : छायांकित कोशिका लसीका किंवा तज्जन्य कोशिका दर्शवितात. [* विलंबित अतिसंवेदनशीलता टी-कोशिका लिंफोकाइन द्रव्ये निर्माण करतात. या द्रव्यांची चार प्रमुख असतात : (१) महाभक्षिकोशिका : आकर्षण, सक्रियण व स्थलांतर प्रतिबंध, (२) बहुरूपकेंद्रकी कोशिका : आकर्षण, सक्रियण, हिस्टामीन मोचन (३) इतर लसीका कोशिका : इंटरल्युकीन, कोशिका-विभाजन घटक (४) इतर ऊतके : त्वचा, अस्थिभंजक कोशिका इत्यादी].


लसीका कोशिका : अस्थिमज्‍जेमधील बहुक्षम स्कंधकोशिकांपासून मज्जाभ, एककेंद्रीय व लसीकाभ अशा तीन कोशिका मालिकांची निर्मिती होते. यांपैकी लसीका कोशिकाजननातील आद्यकोशिकेस त्या मालिकेतील परिबद्ध स्कंधकोशिका म्हणतात. या स्कंधकोशिकेतून निर्माण होत असलेल्या कोशिकांच्या दोन कुलांसाठी दोन प्रकारच्या पूर्वगामी कोशिका जन्म घेतात. एक पूर्वगामी प्रथम यौवनलोपी ग्रंथीमध्ये प्रवेश करते व तेथून प्रक्रिया होऊन टी-कोशिकेचे अंतिम प्रजननक्षम रूप बाहेर पडते. यापासून टी-कोशिकांचे अनेक विशिष्ट प्रकार उद्‌भवतात. उदा., स्मृती, साहाय्यक टी, दमनकारी टी, विलंबित अतिसंवेदनशीलता कोशिका वगैरे. दुसऱ्या कुलाची पूर्वगामी कोशिका अस्थिमज्‍जेतच विकसित होऊन बी-कोशिकेची निर्मिती होते. बी-कोशिकेतून स्मृती व स्त्रावक कोशिका जन्म घेतात. स्त्रावक कोशिकेचे अंतिम रूप प्लाविका कोशिका हे होय. हिच्यातून प्रतिपिंडाची निर्मिती होते.

शरीरातील सु. २ × १०१२ लसीका कोशिकांपैकी एक प्रतिशत रक्तात व बाकीच्या लसीकाभ ऊतकांत असतात. तसेच रोज सु. एक प्रतिशत कोशिका नाश पावून त्यांची जागा नवीन कोशिका घेतात. विजातीय रेणू ओळखण्यासाठी त्यांना अनुरूप असे ग्राही रेणू लसीका कोशिकांच्या पृष्ठभागावर असतात व त्यांच्याशी योग्य त्या प्रतिजनाचा संयोग होतो. प्रत्येक कोशिकेवरील ग्राही निराळ्या प्रकारच्या असल्यामुळे असंख्य प्रकारच्या प्रतिजनांचे अभिज्ञान होऊ शकते. ज्या लसीका कोशिकेवरील ग्राहीशी प्रतिजन संयोग होईल त्या कोशिकेच्या विभाजनास व गुणनास उत्तेजन मिळते आणि त्या प्रकारच्या ग्राही धारण करणाऱ्या कोशिकांची संख्या अनेक पटींनी वाढत जाते. अशा प्रकारे विशिष्ट रोगप्रतिकारक्षमतेस चालना मिळते. केवळ सूक्ष्मजंतुजन्य रोगांचे विषकारक रेणूच नव्हेत तर औषधे, हॉर्मोने (विविध शरीरांतर्गत वाहिनीविहीन ग्रंथींनी निर्माण केलेले उत्तेजक स्त्राव किंवा तत्सम कृत्रिम पदार्थ) वनस्पतिज किंवा प्राणिज इतकेच काय संश्लेषणजन्य (कृत्रिम रीत्या तयार केलेले) कोणतेही व्यामिश्र रेणू ही क्रिया घडवून आणू शकतात. या प्रतिजन ग्राहीच्या विविध प्रकारांची संख्या मोजणे अशक्य असले, तरी ती १० च्या घरात जाईल, असा अंदाज आहे. इतकी प्रचंड विविधता प्रकट करण्यासाठी जननिक सामग्रीत जीनांची [आनुवंशिक घटकांच्या एककांची ⟶ जीन] संख्याही प्रचंड लागेल परंतु तसे नसून प्रत्येक ग्राहीसाठी स्वतंत्र जीन न उपयोजिता, तुलनेने अल्प अशा जीनांच्या निरनिराळ्या प्रकारच्या संयोग शक्यतांमधून या ग्राही-प्रथिनांची निर्मिती घडते, असे दिसून आले आहे.  कोशिकाविभाजन होत असतानाही त्यांतील डीएनए [डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्‍ल ⟶ न्यूक्लिइक अम्‍ले] रेणूमध्ये थोडे बदल कधीकधी उत्स्फूर्तपणे होत असतात. या बदलांमुळे नवनिर्मित कोशिकांचे ग्राही जनक कोशिकांपेक्षा निराळे असतात. या क्रियेला कायकोशिकांचे उत्परिवर्तन असे म्हणतात. ग्राहीच्या स्वरूपातील ही विविधता आणि त्यांची जीनांच्या यदृच्छ संयोगांमधून होणारी निर्मिती लक्षात घेता सजातीय रेणूंशी संयोगक्षम असे काही ग्राही निर्माण होणे अपरिहार्य आहे. असे स्वयंप्रतिबोधनशील धारण करणाऱ्या कोशिका यौवनलोपी ग्रंथीमध्ये व अस्थिमज्‍जेमध्ये ग्राही नष्ट केल्या जातात. टी-कोशिकांमध्ये त्या स्वल्प प्रमाणात टिकून राहतात परंतु अपरिपक्व अवस्थेतच त्यांचा संयोग सजातीय प्रतिजनांशी होतो आणि अशा अपरिपक्व संयोगामुळे त्यांचा विकास खुंटून नाश होतो. अशा रीतीने सजातीय रेणूबद्दल सह्यता व विजातीयांबद्दल प्रतिक्रियाशीलता टिकवून धरली जाते.

लसीका कोशिकांचे सक्रियण : यासाठी प्रतिजनाचा ग्राहीशी संयोग होणे ही पहिली पायरी होय. ग्राहीची रचना जवळजवळ प्रतिपिंडासारखीच म्हणजे इंग्रजी वाय (Y) अक्षराच्या आकाराची (किंवा दुबेळक्यासारखी) असते. त्याच्या रेणूच्या दोन बाहूंमध्ये ॲमिनो अम्‍लांच्या लघू व गुरू शृंखलांमध्ये प्रतिजनबंधक स्थळे असतात. बुंध्याच्या कार्बोहायड्रेट भागाला एक अतिरिक्त पुच्छ असते. हे पुच्छ कोशिकापटलातून आरपार जाते. त्यामुळे ग्राही रेणू कोशिकेस जखडून ठेवला जातो. अशा प्रकारे बी-कोशिकेचे ग्राही गॅमा ग्‍लोब्युलिनसदृश्य असले, तरी टी-कोशिकेचे ग्राही मात्र दोनच शृंखलांनी बनलेले असतात. कारण मुक्त प्रतिजनांप्रमाणेच इतर कोशिकांशी  बद्ध असलेल्या प्रतिजनांशीही त्यांचा संयोग होत असतो. या कोशिकीय प्रतिजनांमध्ये यजमान कोशिकांच्या पृष्ठीय प्रतिजनांचा समावेश होतो. त्यांना एमएचसी (MHC मेजर हिस्टोकाँपॅटिबिलिटी काँप्‍लेक्स) किंवा एचएलए (HLA ह्यूमन ल्युकोसाइट अँटिजेन) असे नाव आहे. संक्रामित कोशिकांमध्ये रोगजंतू आपले विजातीय रेणू प्रगट करण्यासाठी या एमएचसी प्रतिजनांशी सहयोग करतात. त्यांच्यामुळे प्रतिजनाकडून टी-कोशिकांचे सक्रियण होते, बी-कोशिकांचे सक्रियण त्यामानाने जास्त सुलभ पद्धतीने होते. ग्राहीशी प्रतिजन-संयोग झाल्यावर रक्तातील बी-कोशिकांचे विभाजन सुरू होते व लिंफोकाइन द्रव्यांच्या साहाय्याने या विभाजनातून प्रतिपिंड निर्मितिक्षम कोशिकांचा कृत्तक (एकाच कोशिकेच्या समविभाजनाने बनलेला अनेक कोशिकांचा समूह) तयार होतो. या प्लाविका कोशिका दर सेकंदाला हजारो प्रतिपिंड रेणू स्त्रवू लागतात. कित्येक दिवस ही क्रिया चालू राहते. प्रतिजनाच्या अनुपस्थितीतही पुढे काही महिने रक्तप्रवाहात प्रतिपिंड आढळतात. लसीकाम ऊतकांमधील जनन केंद्रातील बी-कोशिकांच्या सक्रियणातून मात्र अशी तत्काळ कृत्तकनिर्मिती होत नाही. तेथील कोशिका स्मृतिकोशिका निर्माण करतात व त्याच कित्येक वर्षे ऊतकात व रक्तात वास्तव्य करतात. भविष्यकाळात पुन्हा त्याच प्रतिजनाने शरीरात प्रवेश केला, तर या कोशिका त्वरित प्रतिपिंड निर्मितीस आरंभ करतात.


प्रतिपिंडाकडून प्रतिजनाच्या निष्प्रभावीकरणाचे कार्य रक्तरसात किंवा ऊतकद्रवांमध्येच यशस्वी रीत्या घडून येते. जेव्हा प्रतिजन कोशिकेच्या आत प्रवेश करतो तेव्हा प्रतिपिंड परिणामहीन ठरतो. अशा वेळी कोशिकेसह प्रतिजनाचा नाश करण्यासाठी टी-कोशिका उपयुक्त ठरतात. महाभक्षिकोशिकांचेही या कामी साह्य होत असल्याने या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक रासायनिक पदार्थांनी एकसूत्रता आणली जाते. यजमानाच्या जवळजवळ सर्व सकेंद्रक कोशिकांवर असणारा एमएच-१ प्रतिजन व त्याच्याशी सहबद्ध असणारा विजातीय प्रतिजन ओळखण्याची क्षमता दमनकारी अथवा कोशिका घातक टी-कोशिकांमध्ये असते. या संयोगामुळे व्हायरस किंवा सूक्ष्मजंतूंनी युक्त असलेले कोशिकांचे विघटन होऊन त्यांच्या कणांचे महाभक्षिकोशिकांकडून पाचन होते. त्याचबरोबर दमनकारी परिणामामुळे बी-कोशिकांचे आणि साहाय्यक टी-कोशिकांचे कार्य मंदावून प्रतिकारक्षमता यंत्रणेचेही संदमन होत रहाते. याउलट एमएच-२ प्रतिजन मात्र काही टी-कोशिका, बी-कोशिका, महाभक्षिकोशिका व तत्सम कोशिकांपुरताच मर्यादित प्रमाणात आढळतो. या प्रतिजनाच्या प्रतिबोधनाची क्षमता साहाय्यक टी-कोशिकांमध्ये असते. त्यामुळे त्याच्याशी सहबद्ध असलेला विजातीय प्रतिजन अशा साहाय्यक कोशिकांना उत्तेजित करतो. महाभक्षिकोशिकांकडून इंटरल्युकिन-१ हे द्रव्यही या कामी उपयोगात आणले जाते. परिणामी साहाय्यक टी-कोशिका इंटरल्युकिन-२ हे द्रव्य निर्मिते व त्याच्या मदतीने स्वतःचे विभाजन करते. याशिवाय लिंफोकाइन या सामूहिक नावाने ओळखली जाणारी अनेक द्रव्ये निर्माण होतात व साहाय्यक टी-कोशिकांच्या विभाजनास आणि बी-कोशिकांकडून प्रतिपिंड निर्मितीसही मदत होते. अशा रीतीने महाभक्षी टी- व बी-कोशिका यांचे संयुक्त प्रतिकारक्षमता कार्य घडत राहाते.

  

इंटरल्युकिन-१ हे द्रव्य १९७२ मध्ये सापडले. त्यानंतरच्या १५–२० वर्षांत विविध कोशिकांकडून निर्मित अशी सु. १०० पॉलिपेप्टाइड द्रव्ये इतर कोशिकांचे सक्रियण, विरूपण (कार्य व आकार यांत बदल होणे) आणि नियंत्रण करीत असल्याचे आढळले आहे. या सर्वांना समावेशक अशी सायटोकाइन संज्ञा व त्यावरूनच लसीका कोशिका नियंत्रकांना लिंफोकाइन असे नाव दिले गेले आहे. इंटरल्युकीन-१ चे आल्फा व बीटा असे दोन स्वतंत्र रेणू असतात आणि त्यांची क्रिया प्रतिकारक्षमतेतील इतर बऱ्याच कोशिका, ऊतकाच्या प्रतिष्ठापनातील (ऊतकाची जागा घेण्याच्या क्रियेतील) तंतुजनांसारख्या कोशिका व चयापचयी (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये भाग घेणाऱ्या) कोशिका यांवर होत असते. ऊतकशोथामध्येही ही द्रव्ये निर्माण होत असल्याने प्रतिकारक्षमता शोथ, चयापचय व प्रतिष्ठापन यांचे जटिल अनोन्यसंबंध या घटकांकडून सांभाळले जातात असे दिसते. त्याचप्रमाणे या द्रव्यांच्या मेंदूवरील परिणामातून ज्वर, क्षुधानाश, हॉर्मोन नियंत्रकांचे मोचन इ. बदल घडून येतात यावरून तंत्रिका तंत्राशी देखील प्रतिकारक्षमतेचा संबंध जोडणे शक्य आहे.

प्रतिकारक्षम कोशिकांच्या सक्रियणाचे अंतिम परिणाम : प्रतिपिंड रेणू मुक्त झाल्यावर सूक्ष्मजंतूंशी संयोग पावून त्यांची यजमान कोशिकांशी बद्ध होण्याची विशेष रेणवीय संरचना अवरुद्ध करतात. यामुळे ऊतकांवरील आक्रमण थांबते. तसेच हे प्रतिपिंड चलनशील जंतूंची व काही आदिजीवांची चालक इंद्रिये निष्क्रिय करतात जंतुजन्य बहिर्विषांना (उदा., धनुर्वात, घटसर्प) निष्प्रभ करतात नैसर्गिक मारक कोशिकांना कार्यान्वित करतात आणि पूरक पदार्थ प्रणालीचे सक्रियण घडवून आणतात. प्रतिपिंडाच्या बाहूमधील जड शृंखलेचा भाग प्रतिजनामुळे विकृत होऊन पूरक प्रथिनाशी संयोग पावू शकतो आणि या संयोगामुळे जी प्रक्रियामालिका सुरू होते तीतून मुख्यत्वे सी ३ बी हे प्रथिन मुक्त होते. त्याच्या साह्याने भक्षिकोशिका कार्यान्वित होतात संपुटरहित जंतूंच्या कोशिका पटलात पूरकाचे काही घटक रोवले जाऊन त्यामुळे जंतूंची अंतर्द्रव्ये गळू लागतात आणि स्नेह कोशिका (ज्यांच्या कोशिका द्रव्यात अनेक मोठे, क्षारकीय रंजकाने रंगविता येणारे व रंगविण्यासाठी वापरलेल्या रंजकापेक्षा निराळा रंग धारण करणारे कण असतात अशा कोशिका) व क्षारककर्षी (क्षारकीय रंजकाने रंगविता येणाऱ्या) कोशिका यांमधून हिस्टामीन बाहेर पडते. पूरक प्रणालीतून इतरही अनेक द्रव्ये (सी १ ते सी ९) मुक्त होतात व रक्तवाहिन्यांची पार्यता वाढवणे, कण कोशिकांना व एककेंद्रकी कोशिकांना आकर्षून घेणे, व्हायरसांचे उदासिनीकरण, सूक्ष्मजंतूंचे समूहन व कोशिकालयन यांसारखी विविध क्रियांची मालिकाच पूरक पदार्थांकडून निर्माण होत असते. अशा रीतीने सूक्ष्मजंतूंचा नाश त्यांचे भक्षण व भक्षित कणांचे पाचन होते. यानंतर होणारी शोथ प्रतिक्रिया महाभक्षिकोशिकांना आकर्षून त्यांच्या मदतीने नष्ट जंतूंचे कण लसीकाभ इंद्रियांकडे पोचवते. तेथील कोशिकांना या कणांमधील प्रतिजन मिळाल्यामुळे प्रतिकारक्षमता यंत्रणा पुन्हा नव्याने काम करू लागते.  

पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे यजमान कोशिकांच्या अंतर्भागात प्रवेश करणारे जंतू (उदा., क्षय, कुष्ठ, आंदोलज्वर या रोगांचे जंतू) व व्हायरसांचे कोशिका ते कोशिका असा थेट प्रसार होणारे कण यांचा रक्तप्रवाहात वावर न झाल्यामुळे ते प्रतिपिंडांपासून अबाधित रहातात. त्यांच्या नाशासाठी टी-कोशिकांची यंत्रणा उपयोगी पडते. कोशिका घातक टी-कोशिका प्रतिजन प्रकट करणाऱ्या यजमान कोशिकांना इजा करून आतील जंतू आणि व्हायरस कण यांना बाहेर पाडतात व इतर कोशिकांवर संक्रामण होण्याची शक्यता कमी करतात. साहाय्यक टी-कोशिका लिंफोकाइन द्रव्यांकरवी भक्षण व मारक क्रिया परिणामकारकपणे घडवून आणतात. भक्षिकोशिकांना शोथस्थळी जखडून ठेवण्यासाठी त्यांची चलनशीलता कमी केली जाते. गॅमा इंटरफेरॉन व अर्बुद-ऊतकमृत्यू घटक यांसारखी काही लिंफोकाइन द्रव्ये जखडलेल्या कोशिकांची भक्षणशीलता वाढवितात. यामुळे सूक्ष्मजंतू आणि रोगग्रस्त व अर्बुदलक्षणी कोशिकांचा नाश होतो. प्रतिकारक्षमता संनिरीक्षण गृहीतकानुसार अर्बुदकोशिका वारंवार निर्माण होतच असतात पण त्यांची वाढ प्रतिकारक्षमता यंत्रणेकडून रोखली जाते. यासाठी अर्बुदावरील एमएचसी प्रतिजनांना टी-कोशिकांची यंत्रणा प्रतिसाद देत असते.  


रोगप्रतिकारक्षमता यंत्रणेचे व्यावहारिक महत्त्व : मानवी प्रतिकारक्षमता यंत्रणा जरी आयुष्यभर कार्यरत असली, तरी तिची कार्यक्षमता नेहमीच समाधानकारक पातळीवर असते असे नाही. नवजात अर्भकाला मातेकडून मिळालेले प्रतिपिंड आणि सुरुवातीचा काही महिन्यांचा संरक्षित जीवनाचा काळ संपून ते शैशवात पदार्पण करते, तेव्हा त्याची प्रतिकारक्षमता कमी पडू लागते. त्याचप्रमाणे वृद्धावस्थेमध्ये प्रथिननिर्मिती व त्याबरोबरच अविशिष्ट प्रतिकारक्षमता यंत्रणेतील पचन व श्वसनासारखी तंत्रे मंदावतात. यांशिवाय कुपोषण, निर्जलीभवन, रोगांच्या साथी, मोठ्या शस्त्रक्रिया, रक्तस्त्राव, मोठ्या प्रमाणावर भाजणे इ. ताणांना शरीर सामोरे जाते, तेव्हा प्रतिकारक्षमता अपुरी पडण्याची शक्यता असते. अशा सर्व प्रसंगी योग्य ते घटक पुरवून कार्यक्षमता सुधारावी लागते. यासाठी जीवनसत्त्वे (विशेषतः अ जीवनसत्त्व), प्रथिने, रक्तातील आवश्यक ते घटक किंवा पूर्ण रक्त व लशी देतात. संक्रामणाचा धोका जेव्हा जास्त असेल, तेव्हा जंतुनाशके व प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ यांचा प्रतिबंधात्मक उपयोग अपरिहार्य ठरतो. औषधे, क्ष-किरणासारखी प्रारणे ( तरंगरूपी ऊर्जा), मधुमेह, अवटू ग्रंथि-स्त्रावन्यूनत्व [⟶ अवटु ग्रंथि] यांसारखे दीर्घकालीन हॉर्मोन विकार, अर्बुदे, व्हायरस संक्रामणे व पर्यावरणातील घातक पदार्थ यांमुळे देखील प्रतिकारक्षमतेवर विपरीत परिणाम घडतो. मूलतः प्रतिकारक्षमता यंत्रणेचीच न्यूनता घडवून आणणाऱ्या विकारांचा विचार ‘रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग’ या नोंदीत केला आहे.

 प्रतिकारक्षमतेच्या कार्यातून उद्‌भवणाऱ्या काही महत्त्वाच्या विकारांमध्ये ⇨ ॲलर्जीचा (अधिहृषता, अतिसंवेदनशीलता) समावेश प्रथम करावा लागेल. विशिष्ट विजातीय प्रतिजनांना प्रतिक्रिया निर्माण करण्याची उपार्जित बदललेली क्षमता असे वर्णन होऊ शकणारी ही अवस्था प्रथम १९०६ मध्ये फोन पिरके यांनी ॲलर्जी या शब्दात मांडली. प्रतिकारक्षमता यंत्रणेच्या काही प्रतिक्रिया व्यक्तीला संरक्षण देण्याऐवजी हानिकारक आणि कधीकधी मारक परिणाम घडवितात, त्यांचा यात समावेश होतो. मूळचा ॲलर्जी हा शब्द आता मुख्यत्वे रोगसंक्रामणाशी संबंध नसलेल्या प्रतिजनांच्या संदर्भात वापरला जातो. अतिसंवेदनशीलता ही सर्वसमावेशक संज्ञा (प्रतिकारक्षमता) यंत्रणेच्या सर्व अनैच्छिक किंवा आगंतुक प्रतिसादांना लावली जाते. प्रतिजनविरोधी प्रतिक्रियेमधून उद्‌भवणारी रासायनिक कारके (औषधिक्रियावैज्ञानिक कारके) व त्यांमुळे होणारी ऊतकहानी अशा सर्व घटनांमध्ये नेहमी आढळतात. या प्रतिक्रियांचे चार प्रकार आहेत. पहिले तीन प्रतिपिंडजन्य असून चौथा कोशिकीय प्रतिकारक्षमतेवर आधारित असतो. त्यालाच विलंबित अतिसंवेदनशीलता असेही म्हणतात.

पहिल्या प्रकारात स्नेह कोशिकेशी बद्ध असलेल्या आयजी-ई अथवा रिॲजीन प्रतिपिंडाशी प्रतिजनाचा मिलाफ होतो. त्यामुळे स्‍नेह कोशिकेतील कण बाहेर पडतात आणि त्यांमधील हिस्टामीन, हेपारीन आणि अरुणकर्षी (कोशिकाद्रव्यात इओसीन रंजकांनी अभिरंजित होणारे कण असलेल्या) व उदासीनरंजी (कोशिकाद्रव्यात उदासीन रंजकांनी अभिरंजित होणारे कण असलेल्या) श्वेत कोशिकांना आकर्षणारी रसायनानुचलनी (ज्यांच्या रासायनिक प्रभावाने त्यांच्या सापेक्ष दूर वा जवळ जाण्याची कोशिकांची हालचाल होते अशी) द्रव्ये बाहेर पडतात. तीव्र शोथ प्रतिक्रिया घडून येते. तिच्या स्थानानुसार नासिकाशोथ, श्वासनलिकेच्या आकुंचनामुळे दमा, त्वचेवर पित्ताच्या गांधी उठणे, खाज किंवा प्रतिजन रक्तात प्रविष्ट झाला असल्यास रक्तदाबाचा अवसाद (आकस्मिक शक्तिपात) अशी लक्षणे झपाट्याने दिसू लागतात. सुरुवातीची तीव्रता कमी झाल्यावर क्षारककर्षी कोशिकांच्या आगमनामुळे या लक्षणांची पुनरावृत्ती होऊ शकते. नंतर ती दीर्घकाळ (काही तास) टिकतात. आयजी-जी प्रतिपिंडाची अतिरिक्त निर्मिती करण्याची प्रवृत्ती सु. १०% लोकांमध्ये दिसून येते व ती कुटुंबविशिष्ट असू शकते. अतिसंवेदनशीलता असलेल्या प्रतिजनांना ॲलर्जेन (अधिहृष्यजन) असे म्हणतात व त्यांमध्ये परागकण, कवकबीजुके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचे प्रजोत्पादक घटक), प्राणिज कोंडा, पिसे, घरातील धुळीतील कीटकजन्य उत्सर्ग, अंड्यातील प्रथिने इ. असंख्य प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश होतो. अतिसंवेदनशीलतेचे निरसन करण्यासाठी अतिसूक्ष्म मात्रेपासून सुरुवात करून अल्प काळात वाढत्या क्रमाने प्रतिजनांची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) त्वचेखाली देतात. यामुळे आयजी-जी प्रतिपिंडनिर्मिती वाढते आणि हे प्रतिपिंड-रेणू आयजी-ई बरोबर प्रतिजनासाठी स्पर्धा करू लागतात. असेच निरसन कालमानानेदेखील हळूहळू आपोआप होऊ शकते.  

दुसऱ्या प्रकारात प्रतिजन मुक्त स्परूपात नसून तो कोशिकेचाच एक भाग किंवा तिच्याशी सहयुक्त झालेला औषधांचा रेणू किंवा सूक्ष्मजंतूंचा अंश असतो. प्रतिपिंड रक्तात अभिसारी असतो. त्यांच्या आंतरक्रियेनंतर पूरकद्रव्याचे सक्रियण होऊन किंवा अन्यथा कोशिकालयन, संचयन किंवा भक्षण कार्यान्वित होते आणि त्यापासून निर्माण होणारे घटक वृक्क (मूत्रपिंड), यकृत, प्लीहा इ. इंद्रियांमध्ये जातात. चुकीच्या गटाचे रक्त दिल्यावर होणारी प्रतिक्रिया या प्रकारात मोडते. तांबड्या कोशिकांच्या लयनामुळे हुडहुडी भरून ताप येतो. अरक्तता निर्माण करणारी ही अतिसंवेदनशीलता साल्मोनेला जंतूंपासून निर्माण झालेल्या प्रतिजनामुळे देखील होऊ शकते. सेडार्मिड या औषधामुळे रक्तातील बिंबाणूंवर [⟶ रक्त] प्रतिजन बद्ध होऊन याच प्रकारची प्रतिक्रिया घडते. बिंबाणुलयन व त्यामुळे ⇨नीलारुणी रोग निर्माण होतो. हे शामक औषध आता वापरात नाही.


तिसरा प्रकार प्रतिजन-प्रतिपिंड बंधनामुळे निर्माण झालेल्या रेणुसमुच्चयांची जटिले घडवून आणतात. ही जटिले रक्तवाहिन्यांमध्ये अवक्षेपित होऊन अवरोध व शोथप्रतिक्रियाही सुरू करतात. मोठ्या प्रमाणात अवक्षेपण झाल्यास पूरक प्रणाली कार्यान्वित होऊन ऊतकभक्षणक्रिया व कार्यक्षमता ऱ्हास होऊ लागतात. त्याचे परिणाम सांधे, वृक्क, श्वसनमार्ग, त्वचा, हृदयाचा अंतःस्तर या स्थानी प्रामुख्याने उद्‌भवतात. घोड्यांच्या रक्तरसातून काढलेले घटसर्पाचे प्रतिविष वापरण्यास जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा अशा प्रकारच्या ‘रक्तरस आजार’ (सीरम सिकनेस) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया बऱ्याच रुग्णांमध्ये उद्‌भवतात. रक्तरस प्रथिनांप्रमाणे प्रतिक्रियानिर्मितिक्षम औषधांमुळेही अशी जटिलांवर आधारित अतिसंवेदनशीलता अलीकडील काळात आढळू लागली आहे. पेनिसिलीन, सल्फा यांसारखी औषधे आठ-दहा दिवस घेतल्यावर काही रुग्णांमध्ये त्वचेवरील पुरळ, ज्वर, सांध्यांमध्ये वेदना, लसीका ग्रंथीची सूज, वृक्काच्या कार्यक्षमतेचा ऱ्हास, हृदयाचा अशक्तपणा इत्यादींपैकी काही लक्षणे दिसू लागतात. औषध थांबल्यावर प्रतिजन शरीरातून पूर्णपणे उत्सर्जित झाल्यावर ती कमी होतात. सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्या संक्रामणांमध्येही त्यांच्या प्रतिजनांमुळे अशी प्रतिक्रिया होत असावी.

याच प्रकारच्या प्रतिक्रियेचे एक लक्षण प्रतिजनाच्या शरीरातील प्रवेशस्थळी स्थानीय स्वरूपात दिसून येते. त्याला एन्. एम्. आर्थस या फ्रेंच सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांच्या नावावरून ‘आर्थस प्रतिक्रिया’ म्हणतात. अंतःक्षेपणाच्या जागी रक्तवाहिन्यांच्या परिसरात जटिलांच्या अवक्षेपणामुळे वाहिनीशोथ होऊन कण कोशिकांचे मोठ्या प्रमाणावर समूहन होते. हिस्टामीनसदृश द्रव्यांचे सक्रियण होऊन सूज येते. ही प्रतिक्रिया सु. २४ तास टिकते. काही मधुमेहींमध्ये इन्शुलिनाच्या अंतःक्षेपणाने अशीच प्रतिक्रिया होऊ शकते. श्वसनमार्गाने प्रतिजन प्रविष्ट झाल्यास शेतकऱ्यांमध्ये किंवा कापूस, ऊस, कॉफी इ. हाताळणाऱ्या औद्योगिक कामगारांमध्ये यांमुळे छातीत आवळल्यासारखे वाटणे, अस्वस्थता, ज्वर इ. लक्षणे निर्माण होऊ शकतात. प्रतिजनयुक्त वातावरणात राहिल्यास ती १-२ दिवसांत लोप पावतात.

प्रतिकारक्षमता जटिल रेणू दीर्घकाळ शरीरात राहिले, तर परिणामी प्रतिकारक्षमता-जटिल विकार होऊ शकतात. विविध प्रकारचे बहिर्जात प्रतिजन (व्हायरस, सूक्ष्मजंतू, परोपजीवी, औषधे, अन्नघटक) व अंतर्जात प्रतिजन (केंद्रक घटक, हॉर्मोने, ग्लोब्युलिने, अर्बुदे कोशिका) तिसऱ्या प्रकारच्या प्रतिक्रियांमधून अशी विकारनिर्मिती करीत असावेत, असे आता दिसून येऊ लागले आहे.  

चौथ्या प्रकारात टी-कोशिकांचा सहभाग असल्याने प्रतिक्रिया विलंबित असते. प्रतिजनाचा स्मृती कोशिकांवर परिणाम झाल्यावर त्यांचे विभाजन सुरू होते व पुरेशा संख्येने अशा टी-कोशिका प्रतिजनाच्या सान्निध्यात आल्यावर प्रतिसाद दिसू लागतो. ट्युबरक्युलिन चाचणीमध्ये किंवा रासायनिक संपर्कजन्य त्वचाशोथामध्ये ही क्रिया दिसून येते. प्रथम लसीका कोशिका व एककेंद्रकी कोशिकायुक्त ऊतकद्रव प्रतिजनापाशी जमतो. एककेंद्रकी (कोशिकांचे) रूपांतर महाभक्षिकोशिकांमध्ये होते. अनेक महाभक्षींचे एकत्रीकरण होऊन बहुकेंद्रकी बृहत् कोशिका तयार होतात. या ऊतक परिवर्तनाला कणार्बुदनिर्मिती असे म्हणतात. काही दिवसांनी हळूहळू सर्व प्रतिक्रिया मावळते. रासायनिक पदार्थ उदा., क्रोमियम, निकेल, पारा यांसारख्या धातू, केसाचे कलप, औषधे इत्यादींमुळे निर्माण झालेला त्वचाशोथ कित्येक आठवडे टिकून रहातो.  

स्वयंप्रतिकारक्षमताजन्य विकार : स्वकीय रेणूंविरुद्ध प्रतिपिंड निर्माण करण्याची बी-कोशिकांची क्षमता नैसर्गिक रीत्या विलुप्त होत असते. काही व्यक्तींमध्ये हे विलोपन पूर्णतः होत नाही. त्यामुळे शरीरक्रियात्मक काही रेणू, ग्राही अथवा कोशिका यांच्या विरुद्ध प्रतिपिंडनिर्मिती होऊन त्यातून काही विकार उद्‌भवतात. लसीका कोशिकांमध्ये शरीरातील स्वकीय रेणूंबद्दल सह्यता असण्याची (म्हणजेच प्रतिपिंडनिर्मिती न करण्याची) मूलभूत कारणे अजून स्पष्ट नाहीत परंतु सहाव्या गुणसूत्राच्या (एका पिढीतून पुढील पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सूक्ष्म घटकाच्या) लघुबाहूवर असलेल्या एचएलए नावाच्या स्थानाशी त्यांचा संबंध जोडता येतो. या ठिकाणी असलेल्या जीनसमूहाकडून विशिष्ट एमएचसी-१ आणि एमएचसी-२ प्रतिजन कोशिकांवर प्रकट केले जातात आणि त्यामुळेच प्रतिपिंड निर्मितीमधील हा बदल घडून येतो असे दिसते. या जीन संबंधामुळे स्वयंप्रतिकारक्षमता विकार काही कुटुंबांतून जास्त प्रमाणावर आढळतात. याशिवाय सूक्ष्मजंतू आणि व्हायरस संक्रामणामुळे टी-कोशिकांच्या काही बहुकृत्तकांचे (निरनिराळे पूर्वज वा जननिक घटना असलेल्या दोन वा अधिक कोशिकांपासून तयार झालेल्या कोशिकांचे) सक्रियण होऊनही असे बदल घडत असावेत, असा अंदाज आहे. उदा., एम्. ए. एप्स्टाइन व वाय्. एम्. बार या ब्रिटिश व्हायरसतज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारा आणि मानवातील विविध प्रकारच्या कर्करोगांना कारणीभूत असणारा एप्स्टाइन-बार व्हायरस. जंतुप्रतिजनांच्या यजमान कोशिकांमधील प्रतिजनांशी असलेल्या साम्यामुळे काही संक्रामणांमध्ये निर्माण झालेले प्रतिपिंड यजमान कोशिकांशी बद्ध होत असावेत, असाही प्रयोगसिद्ध पुरावा आहे. उदा., एश्चेरिकिया कोलाय व स्ट्रेप्टोकॉकस जंतूंचे प्रतिजन अनुक्रमे बृहदांत्र व वृक्क यांच्या प्रतिजनांसारखे असल्याने बृहदांत्रशोथ व वृक्कशोथ उद्‌भवतात. प्रतिपिंडनिर्मितीमधील दमनकारी टी-कोशिकांचे नियंत्रक कार्य कमी पडल्यामुळे किंवा साहाय्यकारी कोशिकांची कार्यक्षमता अतिरेकी झाल्यानेही स्वयंप्रतिकारक्षमताजन्य विकार होत असण्याची शक्यता आहे. या प्रकारच्या विकारांमध्ये प्रतिपिंडाचे लक्ष्य होणाऱ्या प्रतिजनांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. आर्. जे. ग्रेव्ह्‌ज या आयरिश वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा ग्रेव्ह्‌ज रोग-अवटू ग्रंथीमधील थायरॉक्सिन या हॉर्मोनाचा ग्राही एच्. हाशिमोटो या जपानी शस्त्रक्रियाविशारदांच्या नावाने ओळखण्यात येणारा हाशिमोटो अवटुशोथ-थायरोग्‍लोब्युलिनाचा रेणू इन्शुलीन प्रतिरोध मधुमेह-इन्शुलिनाचा ग्राही मारक पांडुरोग (ॲनिमिया)–जठरातील भित्तीय कोशिका व जठरनिर्मित अंगभूत घटक.


याशिवाय दैहिक आरक्त चर्मक्षय, संधिवाताभ संधिरोग यांसारख्या रोगांमध्ये प्रतिपिंड एखाद्या विशिष्ट इंद्रियाशी निगडित नसून व्यापक प्रमाणावर रोधक क्रिया करतात. स्वयंप्रतिकारक्षमतेमधील संबंधित प्रतिजन्य-प्रतिपिंड प्रतिक्रियांचे स्वरूपही निरनिराळ्या प्रकारचे असू शकते. उदा., रक्त कोशिकालयनकारी पांडुरोगात दुसऱ्या प्रकारची अतिसंवेदनशीलता असते, तर दैहिक आरक्त चर्मक्षयात व संधिवाताभ संधिशोथात ती तिसऱ्या प्रकारची असते आणि मोठ्या प्रमाणावर जटिले अवक्षेपित होत असतात.

प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियांवर आधारित प्रयोगशाळेतील परीक्षा : या प्रतिक्रियांमध्ये आवश्यक असलेल्या घटकांचे संतुलित प्रमाण आणि अतिरिक्त प्रमाणात असलेल्या घटकांचे (म्हणजे न वापरल्या गेलेल्या घटकांचे) मापन अतिशय अचूकपणे करण्याची क्षमता असलेली उपकरणे उपलब्ध झालेली असल्यामुळे त्यांचे उपयोजन विविध क्षेत्रांत वाढत आहे. जीवद्रव्यातील प्रतिजन अथवा प्रतिपिंड यांच्या मापनामुळे संक्रामक रोगांचे निदान करणे तर सोपे झालेच आहे परंतु संक्रामणेतर रोगांमध्येदेखील विकृतिजन्य घटकांच्या रक्तातील प्रमाणावरून निदान व फलानुमान (रोगाच्या भावी प्रगतीसंबंधीचे अनुमान) यांच्यातही सुधारणा झाली आहे. तसेच हॉर्मोने, औषधे व निरनिराळे शरीरक्रियात्मक घटक यांच्या जीवद्रव्यातील मापनासाठीही प्रतिकारक्षमताधारित आमापन पद्धती संवेदनशील व अचूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहेत. जैव संशोधन, रोगनिदान व औषधमात्रानियंत्रण या कामी अशा मापनपद्धती उपयुक्त ठरतात. प्रतिजन अथवा प्रतिपिंड यांना एखादे एंझाइम, अनुस्फुरक (अन्य उद्‌गमाकडून येणाऱ्या प्रारणाचे शोषण करून दृश्य रूपातील प्रारण उत्सर्जित करणारे) रेणू किंवा किरणोत्सर्गी समस्थानिक (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे विभिन्न अणुभारांचे विशिष्ट मूलद्रव्यांचे अणुप्रकार) जोडून मापनाची पद्धत जास्त सोपी करता येते. [⟶ विकृतिविज्ञान, उपरुग्ण].

पहा : इंटरफेरॉने जालिका-अंतःस्तरीय तंत्र प्रतिजन प्रतिपिंड रक्त लस व अंतःक्रामण लसीका तंत्र.  

संदर्भ : 1. Barrett, J. T. Textbook of Immunology, London, 1988.

           2. Chapel, H. Haeney, M. Essentials of Clinical Immunology, London, 1984.

           3. Cooper, E. L. General Immunology, 1982.

           4. Haeney, M. Introduction to Clinical Immunology, London, 1985.

           5. Humphrey, J. H. White, R. G. Immunology for Medical Students, London, 1970.

           6. Linton, A. H. Microbes, Man and Animals, New York, 1982.

           7. Roitt, I. M. Essential Immunology, London, 1984.

           8. Roitt, I. M. and others, Immunology, 1985.

           9. Silverstein, A. M. A History of Immunology, San Diego, 1989.

         10. Weir, D. M. Immunology, Edinburgh, 1988.

         11. Wilson, G. Dick, H. M. Topley and Wilson’s Principles of Bacteriology, Virology and Immunity, 4 Vols., London, 1983-84.

         12. Woolf, N. Cell, Tissue and Disease, London, 1986.

श्रोत्री, दि. शं.